Friday, 30 June 2023

वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाच्या

स्वतंत्र इमारतीचे विद्यापीठात भूमीपूजन

शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाच्या स्वतंत्र इमारतीचे भूमीपूजन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह उपस्थित शिक्षक व मान्यवर.
 
शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाच्या स्वतंत्र इमारतीच्या भूमीपूजन प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह उपस्थित शिक्षक व मान्यवर.



कोल्हापूर, दि. ३० जून: शिवाजी विद्यापीठामधील वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाच्या स्वतंत्र इमारतीचे भूमीपूजन आज कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले.

विद्यापीठाने नुकतेच यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटच्या इमारतीचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते भूमीपूजन केले. त्याच्या शेजारीच फॅकल्टी डेव्लपमेंट सेंटर फॉर सायबर सिक्युरिटीच्या शेजारी असलेल्या जागेमध्ये वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाच्या स्वतंत्र इमारतीचे भूमीपूजन करण्यात आले. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी भूमीपूजन करून पहिली कुदळ मारुन बांधकामास प्रारंभ केला.

या इमारतीला तळमजला आणि दोन मजले असणार असून पहिल्या टप्प्यामध्ये तळमजल्याचे काम प्रस्तावित आहे.  या इमारतीचे क्षेत्रफळ १४५१.७४ चौ.मी. इतके असेल. विद्यापीठाच्या स्वनिधीतून होत असलेल्या या इमारतीसाठी ६ कोटी ३८ लाख ५८ हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. इमारतीच्या कामाचे वास्तुविशारद विशाल पाटील (पुणे) असून शिवप्रसाद कन्स्ट्रक्शन ठेकेदार आहेत. सदरचे बांधकाम हे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, आजीवन अध्ययन केंद्राचे डॉ. रामचंद्र पवार, डॉ. आण्णासाहेब गुरव, डॉ. दीपा इंगवले, उपकुलसचिव रमेश लिधडे, उपकुलसचिव (स्थापत्य) रणजीत यादव, उपअभियंता (विद्युत) अमित कांबळे, डॉ. गिरीष कुलकर्णी, रमेश पोवार, सदानंद सबनीस यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्याम कुंभार, कार्यकारी अभियंता एस.आर. पाटील, उपअभियंता हे.मा. जोशी, ठेकेदार अमर जाधव, वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

Tuesday, 27 June 2023

जीवन हेच शिक्षण मानणारी महात्मा गांधींची ‘नई तालीम’ आजही प्रस्तुत: डॉ. अभय बंग

 शिवाजी विद्यापीठात गांधींच्या अनुयायांविषयी दोन पुस्तकांचे प्रकाशन

शिवाजी विद्यापीठात महात्मा गांधी यांच्या अनुयायांविषयी दोन महत्त्वाच्या पुस्तकांचे प्रकाशन करताना डॉ. अभय बंग. सोबत (डावीकडून) डॉ. प्रकाश पवार, डॉ. भारती पाटील, डॉ. नंदा पारेकर, डॉ. विलास शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, दशरथ पारेकर, डॉ. अशोक चौसाळकर, प्रसाद कुलकर्णी, डॉ. श्रीकृष्ण महाजन.

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना डॉ. अभय बंग

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना डॉ. अभय बंग

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना डॉ. अभय बंग


कोल्हापूर, दि. २७ जून: शिक्षणाच्या बाबतीत खडबडून जागे व्हावे, अशी स्थिती आजच्या भोवतालामध्ये आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष जीवनात घडणाऱ्या शिक्षणाला नई तालीमचे स्वरुप देणाऱ्या गांधीजींच्या शैक्षणिक संकल्पनेची प्रस्तुतता अबाधित आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठात आजचे शिक्षण आणि महात्मा गांधी यांचे उपाय या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत बोलत होते. मानव्यशास्त्र सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर व डॉ. नंदा पारेकर लिखित महात्मा गांधी आणि त्यांचे सांगाती आणि विजय तांबे लिखित महात्मा गांधींचे लोकविलक्षण अनुयायी: गोपराजू रामचंद्र राव या दोन पुस्तकांचे डॉ. अभय बंग यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

डॉ. बंग यांनी आपल्या व्याख्यानामध्ये आजच्या शैक्षणिक परिस्थितीचा अत्यंत साकल्याने वेध घेतला आणि त्या अनुषंगाने महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या नई तालीम शैक्षणिक संकल्पनेचे महत्त्व व प्रस्तुतता विषद केली. ते म्हणाले, महात्मा गांधींच्या अनुभवातून नई तालीम शिक्षणप्रणाली उदयास आली. त्या संकल्पनेचा विकास विनोबांनी केला. महात्मा गांधी यांना पाहू शकलो नसल्याचे आयुष्यभराचे दुःख असले तरी त्यांनी सुरू केलेल्या शाळेत विनोबांकडून शिकलो, ही पुण्याई आहे. शिक्षणाचे उद्दिष्ट आपल्याला जीवनातच शोधावे लागते, हा नई तालीमचा गाभा आहे. त्यामुळे या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जबाबदारी आणि त्याच बरोबर बौद्धिक आव्हानही दिले जायचे. जीवनातली कर्तव्यकर्मे करता करता मिळणारे शिक्षण याला विनोबा स्वधर्म म्हणत. आजकाल कर्तव्यकर्मांच्या जाणिवेचाच अभाव असल्याने शिक्षणप्रक्रिया घडूनच येत नाही. मुळात शिक्षण हे देताही येत नाही, व घेताही येत नाही, तर ते घडते. शरीरश्रम, बुद्धीला चालना यांसह प्रत्यक्ष जीवनात घडणाऱ्या शिक्षणाला अशा प्रकारे गांधीजींनी नई तालीमचे स्वरुप दिले. ज्ञान हे प्रत्येकामध्ये आहेच, फक्त त्यावरील अज्ञानाची पुटे काढून टाकण्याचे काम शिक्षकाला करावयाचे असते. यातून मी कोण आहे, हे समजणे म्हणजे शिक्षण आहे. मोजक्या शब्दांत सांगायचे तर जीवन हेच शिक्षण आहे. केवळ आपण त्या दृष्टीने जीवनाच्या हरेक अंगाकडे पाहायला शिकले पाहिजे.

महात्मा गांधी यांना सामान्यातल्या सामान्य माणसामध्ये उपयोगितावादाच्या पलिकडे विलक्षण रस असे. त्यामुळे जगभरातून त्यांना निस्वार्थ अनुयायी लाभले. त्यांची ईश्वरी मावनरुपाऐवजी निर्गुण ईशतत्त्वावर श्रद्धा होती. पुढे ईश्वर हा सत्य आहे आणि त्यापुढेही जाऊन सत्य हाच ईश्वर आहे, असा झालेला प्रवास हा खूपच रोमांचक आहे कारण त्यापुढे मग आस्तिक-नास्तिक असा भेदच मुळी उरत नाही, असेही डॉ. बंग यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतामध्ये कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले की, नई तालीम ही महात्मा गांधी यांनी जगाला दिलेली सर्वोत्तम भेट आहे. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या आजच्या धुरिणांनी तिची आजच्या परिप्रेक्ष्यामध्ये कशा प्रकारे अंमलबजावणी करता येऊ शकेल, या दृष्टीने चिंतन करण्याची गरज आहे.

यावेळी डॉ. अशोक चौसाळकर यांनी महात्मा गांधी आणि त्यांचे सांगाती या पुस्तकाविषयी आणि डॉ. भारती पाटील यांनी महात्मा गांधींचे लोकविलक्षण अनुयायी: गोपराजू रामचंद्र राव या पुस्तकाविषयी मनोवेधक विवेचन केले. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. दशरथ पारेकर यांनीही पुस्तकांच्या लेखनप्रेरणेविषयी मनोगत व्यक्त केले. गांधी अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. प्रकाश पवार यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.

नागरी सहकारी बँकांच्या प्रगतीसाठी छत्र संस्था महत्त्वाची: अतुल खिरवाडकर

 

अतुल खिरवाडकर

शिवाजी विद्यापीठात आयोजित नागरी सहकारी बँकांच्या व्यवस्थापन विकास कार्यक्रमात बोलताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. मंचावर (डावीकडून) डॉ. राजेंद्र पडवळ, धनंजय गोखले, अतुल खिरवाडकर, महेश धर्माधिकारी व निपुण कोरे.


कोल्हापूर, दि. २७ जून: नागरी सहकारी बँकांसमोर वृद्धी साधण्याचे मोठे आव्हान आहे. त्या दृष्टीने रिझर्व्ह बँकेने नॅशनल को-ऑपरेटिव्ह फायनान्शियल अँड डेव्हलपमेंट कंपनी (एन.सी.एफ.डी.सी.) ही छत्र संस्था निर्माण करण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्याचा लाभ घेऊन सर्व नागरी सहकारी बँकांनी एकत्र येऊन आपली प्रगती साधून घ्यावी, असे आवाहन या छत्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल खिरवाडकर यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचे बँक ऑप इंडिया अध्यासन, गुरूवर्य लक्ष्मणराव इनामदार सहकार प्रशिक्षण केंद्र आणि कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्र संस्था आणि नागरी सहकारी बँकांसमोरील रिझर्व्ह बँकेशी निगडित समस्या समजून घेताना या विषयावर एकदिवसीय व्यवस्थापन विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. खिरवाडकर बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व असोसिएशनचे अध्यक्ष निपुण कोरे प्रमुख उपस्थित होते.

श्री. खिरवाडकर यांनी नागरी सहकारी बँकांच्या दृष्टीकोनातून छत्र संस्थेचे समकाळातील महत्त्व अगदी सोप्या भाषेत विषद केले. ते म्हणाले, भारतातील २८ राज्यांपैकी अवघ्या ११ राज्यांत सहकारी बँका आहेत. केंद्रशासित प्रदेशात अथवा ईशान्येकडील राज्यांत एकही सहकारी बँक नाही. गेली २७ वर्षे झाली, नागरी सहकारी बँकांची संक्रमणावस्था संपतच नाही. या काळात सदर बँकांची संख्या २२०० वरुन १४०० पर्यंत खाली आली आहे. आणखीही ६०-७० बंद होण्याच्या मार्गावर आहेत. प्रत्यक्षात देशातील व्यापक लोकसंख्येला नागरी सहकारी बँकांची आवश्यकता असताना, नेमके कोठे चुकते आहे, याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली. त्या गरजेतून विविध समित्या नेमून परिस्थितीचा वेध घेण्यात आला. दास कमिटीने सर्वप्रथम नागरी सहकारी बँकांसाठी छत्र संस्थेची शिफारस केली. त्यातून ही संस्था या वर्षअखेरपर्यंत कार्यान्वित होते आहे. देशातील नागरी सहकारी बँकांना संघटित करणे आणि त्यांच्या समस्या सोडविण्यास सहाय्य करणे, असे प्रमुख हेतू त्यामागे आहेत. सहकारी बँका संघटित झाल्यास चमत्कार घडविण्याची त्यांची क्षमता सिद्ध होईल. सहकारी बँकांना मदत करणे, हे तर महत्त्वाचे उद्दिष्ट आहेच. त्याच बरोबरीने त्यांना आवश्यक तेथे योग्य सल्ला देणे, समस्या सोडविण्यासाठी संवादसेतू निर्माण करणे आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून एकात्मिक संरचना निर्माण करणे ही प्रमुख उद्दिष्टेही आहेत. त्याचा नागरी सहकारी बँकांना निश्चितपणाने लाभ होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठात बँकिंगशी निगडित केंद्रे आहेत. त्यांच्या माध्यमातून विद्यापीठ आणि बँकिंग विश्व यांचे सहसंबंध दृढ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. यापुढील काळातही या दोन क्षेत्रांनी एकत्र येऊन सहकारी बँकिंग हे नव्या युगाचे बँकिंग म्हणून नव्या पिढीशी जोडण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. या क्षेत्रात चांगले मनुष्यबळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने बँकिंग क्षेत्रात विद्यार्थ्यांना इंटर्नशीप कशी मिळवून देता येईल, या दृष्टीने धोरण आखता येऊ शकेल. गरजाधारित अभ्यासक्रम निर्माण करता येतील. तंत्रज्ञानाचा वापर वाढत असल्याने सायबर सुरक्षेच्या दृष्टीने मनुष्यबळास प्रशिक्षित करता येईल. तसेच क्षमता वर्धनासाठी विविध उपक्रम हाती घेता येऊ शकतील.

यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष निपुण कोरे यांच्यासह मुंबईचे लेखापरीक्षक धनंजय गोखले आणि रिझर्व्ह बँकेचे निवृत्त अधिकारी अविनाश जोशी यांनीही मार्गदर्शन केले. विद्यापीठाच्या बँक ऑफ इंडिया अध्यासनाचे समन्वयक डॉ. राजेंद्र पडवळ यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले तर महेश धर्माधिकारी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कोल्हापुरातील विविध नागरी सहकारी बँकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Monday, 26 June 2023

यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटच्या इमारतीच्या बांधकामास प्रारंभ

 प्रस्तावित काम वर्षभरात पूर्ण करा: मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची सूचना

शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटच्या इमारतीच्या बांधकामाच्या भूमीपूजनप्रसंगी कुदळ मारुन प्रारंभ करताना महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील. सोबत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवर.

शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटच्या इमारतीच्या बांधकाम प्रारंभ प्रसंगी कोनशिला अनावरण करताना महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील. सोबत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवर.

शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटच्या इमारतीच्या बांधकाम प्रारंभ प्रसंगी इमारतीच्या नकाशाची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेताना महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील. सोबत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्यासह मान्यवर.


कोल्हापूर, दि. २६ जून: शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटच्या इमारतीचे प्रस्तावित बांधकाम येत्या वर्षभरात पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, अशी सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.

शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विद्यापीठात यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटची स्थापना करण्यात येऊन त्या माध्यमातून ग्रामीण विकासासाठी पूरक व दिशादर्शक अशा अभ्यासक्रमांना प्रारंभ करण्यात आला. त्यासाठी राज्य शासनाने भरीव निधीचीही तरतूद करण्यात आली. या विभागासाठी स्वतंत्र इमारत विद्यापीठाकडून प्रस्तावित करण्यात आली. त्या प्रस्तावित इमारतीच्या बांधकामास आज मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते राजर्षी शाहू जयंतीचे औचित्य साधून प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर बोलत असताना मंत्री पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना उपरोक्त निर्देश दिले.

सुरवातीला मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते कुदळ मारुन स्कूलच्या इमारतीचे भूमीपूजन करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. मंत्री पाटील यांनी यावेळी संबंधित इमारतीच्या नकाशांची पाहणी करून केवळ विद्यापीठातीलच नव्हे, तर परिसरातील एक आदर्श इमारत म्हणून याची उभारणी करावी, असेही सुचविले. कामाच्या बाबतीत कोणतीही कुचराई न होता वर्षभराच्या कालावधीत इमारतीच्या प्रस्तावित तळमजल्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

तत्पूर्वी, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी मंत्री श्री. पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, आंतरविद्याशाखा अधिष्ठाता डॉ. मेघा गुळवणी, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटचे समन्वयक डॉ. नितीन माळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जे.आर. पाटील, अधीक्षक अभियंता श्याम कुंभार, उपअभियंता हेमा जोशी, ठेकेदार प्रशांत कदम, आजीवन अध्ययन केंद्राचे डॉ. रामचंद्र पवार, कै. शारदाबाई पवार अध्यासनाच्या डॉ. भारती पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, डॉ. अमोल मिणचेकर यांच्यासह स्कूलमधील शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

इमारतीविषयी थोडक्यात माहिती...

यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटच्या प्रस्ताविक इमारतीमध्ये तळमजला अधिक दोन मजले असणार आहेत. पहिल्या टप्प्यात आजपासून तळमजल्याच्या बांधकामास प्रारंभ करण्यात आला. या अंतर्गत एकूण २०५१.१५ चौ.मी. इतके बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे १० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी महाराष्ट्र शासनाकडून पहिल्या टप्प्यामध्ये ५ कोटी ३५ लाख २८ हजार रुपये इतके अनुदान प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वास्तुविशारदांनी याचे नकाशे तयार केले असून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फतच इमारतीचे काम करण्यात येत आहे. कोल्हापूर येथील श्री दत्तप्रसाद कन्स्ट्रक्शन यांच्यामार्फत हे काम करवून घेण्यात येत आहे.

शिवाजी विद्यापीठात राजर्षी शाहू जयंती उत्साहात

 

शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजनप्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्यासमवेत मान्यवर.

शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन केंद्रात राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजनप्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्यासमवेत मान्यवर.

शिवाजी विद्यापीठाच्या वस्तुसंग्रहालय संकुलातील राजर्षी शाहू कलादालनामध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेसमवेत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासमवेत मान्यवर.


कोल्हापूर, दि. २६ जून: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राजर्षी शाहू संशोधन केंद्र आणि शिवाजी विद्यापीठ वस्तुसंग्रहालय संकुलामधील राजर्षी शाहू कला दालन येथेही कुलगुरू डॉ. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांना भेट देऊन शाहू महाराजांच्या तेथील प्रतिमांनाही अभिवादन केले.

यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, उपकुलसचिव डॉ. प्रमोद पांडव, डॉ. देविकाराणी पाटील, सचिन घोरपडे यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Friday, 23 June 2023

जागतिक आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या सहा खेळाडूंची निवड

 विद्यापीठाच्या खेळाडूंची ऐतिहासिक कामगिरी

राणी मुचंडी

रेश्मा केवटे

सुदेश्ना शिवणकर


ओंकार कुंभार

सिद्धांत पुजारी

संदेश कुरळे



कोल्हापूर, दि. २३ जून: चीनमधील चेंगडू येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२३ या कालावधीत होणाऱ्या जागतिक आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या सहा क्रीडापटूंची भारतीय विश्वविद्यालय संघामध्ये निवड झाली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच जागतिक आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये विद्यापीठाच्या सहा खेळाडूंची निवड झाली आहे. विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी ही माहिती दिली.

डॉ. बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत चीनमधील चेंगडू येथे जागतिक आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी भारतीय विश्वविद्यालय संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली. भारतीय संघ अॅथलेटिक्स, टेनिस टेबल, लॉन टेनिस, जलतरण, तिरंदाजी, बॅडमिंटन, तलवारबाजी आणि व्हॉलीबॉल या क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होणार आहे. त्यात शिवाजी विद्यापीठाचे खेळाडू ॲथलेटिक्स आणि लॉन टेनिस या दोन क्रीडा प्रकारांत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या वतीने अॅथलेटिक्समध्ये पाच जण आणि लॉन टेनिसमध्ये एक असे एकूण सहा खेळाडू सहभागी होत आहेत. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच सहा खेळाडू एकत्रितपणे आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवडले गेल्याची घटना घडली आहे.

जागतिक स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंची नावे (कंसात महाविद्यालयाचे नाव व क्रीडा प्रकार यानुसार) पुढीलप्रमाणे:- १. ओंकार कुंभार (नाईट कॉलेज ऑफ कॉमर्स, इचलकरंजी, ८०० मी. धावणे), २. सिद्धांत पुजारी (आजरा महाविद्यालय, आजरा, ३००० मी.  स्टीपलचेस), ३. सुदेश्ना शिवणकर (यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, सातारा, १०० मी. धावणे X १०० मी. रिले), ४. रेश्मा केवटे (डी. पी. भोसले महाविद्यालय, कोरेगाव, हाफ मॅरेथॉन), ५. राणी मुचंडी (डी. पी. भोसले महाविद्यालय, कोरेगाव, हाफ मॅरेथॉन) आणि ६. संदेश कुरळे (शिवराज महाविद्यालय, गडहिंग्लज, लॉन टेनिस)

यातील ओंकार कुंभार याने खेलो इंडियास्पर्धेत रौप्य पदक आणि अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविले आहे. सिद्धांत पुजारी याने अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक आणि खेलो इंडियामध्ये रौप्य पदक मिळविले आहे. सुदेश्ना शिवणकर हिने अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये सुवर्ण आणि कांस्य तर खेलो इंडियामध्ये सुवर्ण आणि रौप्य पदक मिळविले आहे. रेश्मा केवटे हिने अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धे सुवर्ण आणि कांस्य पदक आणि खेलो इंडियामध्ये रौप्य पदक मिळविले आहे. अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रॉसकंट्री स्पर्धेत तिने वैयक्तिक व सांघिकही सुवर्णपदक पटकावले आहे. राणी मुचंडी हिने अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रॉस कंट्रीमध्ये वैयक्तिक आणि सांघिक रौप्य पदक जिंकले आहे. टेनिसपटू संदेश कुरळे याने पश्चिम विभागीय स्पर्धेमध्ये रौप्यपदक तसेच राष्ट्रीय पातळीवरच्या अनेक स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवले आहे.

खेलो इंडिया आणि अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाला महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आणून ठेवण्याची महत्त्वाची कामगिरी या खेळाडूंनी केली आहे. अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाला जनरल चॅम्पियनशिप मिळवून देण्यामध्ये या खेळाडूंचा मोलाचा वाटा आहे.

या खेळाडूंना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, शिवाजी विद्यापीठ ॲथलेटिक्स संघाचे प्रशिक्षक रामा पाटील, डॉ. इब्राहिम मुल्ला, डॉ. सविता भोसले, अभिजित पांडुरंग मस्कर, डॉ. देवेंद्र बिरनाळे, डॉ. धनंजय पाटील, डॉ. उदय शिंदे, डॉ. बाळासाहेब भोसले, डॉ. राहुल मगदूम, बळवंत बाबर, मंजुळा पाटील-साखरे यांच्यासह सर्व प्रशिक्षक, निवड झालेल्या खेळाडूंच्या महाविद्यालयांचे प्राचार्य यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.

 

विद्यापीठाच्या इतिहासातील महत्त्वाचा क्षण: कुलगुरू डॉ. शिर्के

शिवाजी विद्यापीठाच्या सहा खेळाडूंची एकाच वेळी जागतिक आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी निवड होणे, हा विद्यापीठाच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, यंदाच्या मोसमात विद्यापीठाच्या खेळाडूंनी सर्वच स्पर्धांमध्ये आपली कामगिरी उंचावली आणि त्यामध्ये सातत्य राखले. त्यांच्या या सातत्यपूर्ण कामगिरीचेच हे फलित आहे. हे खेळाडू अभिनंदनास पात्र आहेतच; शिवाय, जागतिक स्पर्धेत ते देशाबरोबरच शिवाजी विद्यापीठाचाही नावलौकिक उंचावतील, असा विश्वास मला वाटतो. विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, माजी संचालक डॉ. प्रकाश गायकवाड आणि सर्वच प्रशिक्षक यांचे या निमित्ताने मी अभिनंदन करतो.