Monday, 13 November 2023

शिवाजी विद्यापीठाचा पोर्तुगालच्या द कमॉइश इन्स्टिट्यूटसमवेत सामंजस्य करार

 




पणजी (गोवा) येथे पोर्तुगालच्या दि कमॉईश इन्स्टिट्यूटसमवेत सामंजस्य करार प्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आणि गोवा येथील पोर्तुगालच्या कॉन्सुलेट जनरल इसाबेल राइमुन्दो. सोबत डॉ. डेल्फिम कोरेइया दि सिल्वा, ऐश्वर्या चव्हाण, डॉ. मेघा पानसरे, डॉ. एस.बी. सादळे आदी.




पोर्तुगीज भाषा व सांस्कृतिक आदानप्रदानासाठी महत्त्वपूर्ण

कोल्हापूर, दि. १३ नोव्हेंबर: विदेशी भाषा विभाग, शिवाजी विद्यापीठ व ‘द कमॉइश इन्स्टिट्यूट फॉर कोऑपरेशन अँड लँग्वेज’, लिस्बन, पोर्तुगाल या दोन संस्थांमध्ये नुकताच पणजी (गोवा) सामंजस्य करार झाला.

हा सामंजस्य करार करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या नेतृत्वाखाली प्रतिनिधी मंडळ पणजी (गोवा) येथे गेले होते. त्यामध्ये इंटरनॅशनल अफेअर्स सेलचे संचालक डॉ. एस. बी. सादळे, विदेशी भाषा विभागप्रमुख डॉ. मेघा पानसरे यांचा समावेश होता. या प्रतिनिधी मंडळाने पोर्तुगालच्या गोवा येथील कॉन्सुलेट जनरल श्रीमती इसाबेल राइमुन्दो यांची भेट घेतली. या कराराअंतर्गत पोर्तुगीज भाषा आणि संस्कृती प्रसार, शिक्षक प्रशिक्षण, तसेच वैज्ञानिक आणि सांस्कृतिक प्रकल्पांच्या अंमलबजावणीमध्ये सहकार्य इत्यादी बाबींचा समावेश होतो. या प्रसंगी पोर्तुगीज दूतावास सांस्कृतिक केंद्राचे प्रतिनिधी डॉ. डेल्फीम कोरेइया द सिल्वा, कमॉइश इन्स्टिट्यूट संचालक मंडळाच्या अध्यक्ष आना फर्नांडिस व पोर्तुगीज भाषा शिक्षिका ऐश्वर्या चव्हाण उपस्थित होते.

‘द कमॉइश इन्स्टिट्यूट फॉर कोऑपरेशन अँड लँग्वेज’, लिस्बन, पोर्तुगाल, ही संस्था पोर्तुगाल राष्ट्राची अधिकृत आंतरराष्ट्रीय संस्था असून ती भारतात पोर्तुगीज भाषा आणि संस्कृती अभ्यास व प्रसारासाठी समर्पित कार्य करते. या संस्थेमार्फत पोर्तुगीज भाषेचे विविध अभ्यासक्रम चालतात. या करारानंतर होणाऱ्या भाषा व सांस्कृतिक परस्पर आदानप्रदान याबाबत दोन्ही संस्था अतिशय आशावादी असल्याचे मत श्रीमती इसाबेल राइमुन्दो व डॉ. डी. टी. शिर्के यांनी व्यक्त केले.  

डॉ. डी. टी. शिर्के यांनी पोर्तुगीज भाषेबरोबरच सांस्कृतिक विनिमय, वैविध्यपूर्ण उपक्रमशीलता व भाषांतर क्षेत्रात योगदान या माध्यमातून दोन्ही संस्था व देशांतील परस्परसंबंध अधिक दृढ होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. भविष्यात डिजिटल आशय निर्मिती, मिश्र व दूरस्थ अध्ययन, पोर्तुगालमधील विविध विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांशी संशोधन क्षेत्रात सह-प्रकल्प व  भागीदारी विकसित करण्यास प्राधान्य देण्याची मनीषा व्यक्त केली.

श्रीमती इसाबेल राइमुन्दो यांनी शिवाजी विद्यापीठाच्या प्रतिनिधी मंडळाचे आभार मानले. भारत व पोर्तुगाल या देशांतील राजनैतिक संबंध २१ व्या शतकात नव्या पर्वात पोहोचले असून त्यामध्ये सातत्याने परस्पर-सहकार्य सुरु असून शिवाजी विद्यापीठाशी झालेला सामंजस्य करार अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मत व्यक्त केली व शिवाजी विद्यापीठातील पोर्तुगीज भाषेच्या अभ्यासक्रमातून विद्यार्थी विविध क्षेत्रांत संधी प्राप्त करतील, अशी आशा व्यक्त केली.

या कार्यक्रमात सुरुवातीस डॉ. डेल्फीम कोरेइया द सिल्वा यांनी स्वागत केले व ‘संपर्क भाषा ते बहुकेंद्रित भाषेपर्यंत पोर्तुगीज भाषेचा प्रवास: २१व्या शतकातील आव्हाने आणि संधी’ या विषयावर माहिती दिली. जागतिक, आंतरखंडीय आणि बहुकेंद्री भाषा म्हणून पोर्तुगीज भाषेच्या आर्थिक आणि भौगोलिक सामर्थ्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

भारत आणि पोर्तुगाल या दोन राष्ट्रांत अनेक सामंजस्य करार झाले आहेत. व्यापाराची देवाणघेवाण सुरु आहे. तसेच पोर्तुगीज संस्कृतीचा गोव्यावर मोठा सांस्कृतिक प्रभाव राहिला आहे. संगीत, पाककला, वास्तुकला, धर्म अशा अनेक स्तरांवर हा प्रभाव दिसून येतो. पोर्तुगाल मध्येही मोठ्या संख्येने भारतीय आहेत. त्यामुळे पोर्तुगीज भाषेचे ज्ञान व संवाद कौशल्य युवकांसाठी करिअरच्या अनेक नव्या संधी उपलब्ध करून देते.

पोर्तुगीज भाषा अभ्यासक्रम सुरु करणारे शिवाजी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील पहिले व एकमेव विद्यापीठ आहे. २०१९ मध्ये शिवाजी विद्यापीठात पोर्तुगीज भाषेचा एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्यात आला. परंतु त्यानंतर कोरोना साथीमुळे तो खंडित झाला होता. आता पुन्हा डिसेंबर, २०२३ पासून पोर्तुगीज भाषेचे तास सुरु होणार आहेत.

या सामंजस्य करारातून शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी व प्राध्यापकांना  पोर्तुगीज भाषा अध्ययनाची संधी प्राप्त होत आहे. या करारामुळे शिवाजी विद्यापीठ व ‘द कमॉइश इन्स्टिट्यूट फॉर कोऑपरेशन अँड लँग्वेज’, लिस्बन, पोर्तुगाल यांच्यात शैक्षणिक व सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी थेट संबंध प्रस्थापित झाले आहेत. त्यामुळे शिवाजी विद्यापीठातील पोर्तुगीज भाषा शिकणाऱ्या विद्यार्थी-शिक्षक यांना जागतिक स्तरावर पोर्तुगीज भाषेशी संबंधित विविध शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांच्या उपक्रमांत सहभाग घेण्याची संधी मिळणार आहे.   

मध्ययुगीन महाराष्ट्राचे इतिहास संशोधक व अभ्यासकांना पोर्तुगीज संदर्भसाधनांच्या आकलनासाठी पोर्तुगीज भाषा अवगत असणे अनिवार्य आहे. त्यामुळेच पोर्तुगीज भाषेचे ज्ञान मराठी भाषिक इतिहास संशोधक व अनुवादकांसाठी अनेक शैक्षणिक, संशोधन व रोजगाराच्या संधी निर्माण करते.

२१व्या शतकात भारत आणि पोर्तुगाल, तसेच ब्राझीलसह विविध पोर्तुगीज भाषिक देश परस्पर व्यापारी संबंध वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ब्राझील ही सध्या जगातील सातव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. पोर्तुगाल, पोर्तुगीज भाषिक राष्ट्रे व भारत यांच्यातील वाढते व्यापारी संबंध लक्षात घेता दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगळूरू, हैद्राबाद, चेन्नई अशा महानगरी शहरांत बहुराष्ट्रीय कंपन्यांना पोर्तुगीज भाषातज्ज्ञांची मोठी गरज आहे.

शिवाजी विद्यापीठ व ‘द कमॉइश इन्स्टिट्यूट फॉर कोऑपरेशन अँड लँग्वेज’, लिस्बन, पोर्तुगाल यांच्यामधील सामंजस्य करार महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.  शिवाजी विद्यापीठासाठी ही नव्या संधी उपलब्ध करून देणारी बाब आहे.

Thursday, 9 November 2023

डॉ. जी.डी.बापू लाड स्वातंत्र्य लढयातील तेजस्वी नेतृत्व - डॉ.विलास पवार

 कोल्हापूर, दि.09 नोव्हेंबर - डॉ. जी.डी.बापू लाड म्हणजे स्वातंत्र्य लढयातील तेजस्वी नेतृत्व आणि धगधगते अंगार होते. जाती-पातीचे समीकरणे,गंुडगिरी, सावकारी नाहीसे करणे, एक गांव एक पानवठा अशी लोककल्याणकारी धोरणे बापूंनी राबविली, असे प्रतिपादन माजी प्राचार्य डॉ.विलास पवार यांनी आज येथे केले.

     शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण अध्यासन केंद्राच्यावतीने क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड व्याख्यानमालेअंतर्गत क्रंातिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड : व्यक्ती आणि कार्य या विषयावर विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहामध्ये व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून डी.डी.शिंदे सरकार महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॅा.विलास पवार बोलत होते.अध्यक्षस्थानी कुलगुरू डॅा.दिगंबर शिर्के तर विधान परिषदेचे सदस्य आमदार अरूणआण्णा लाड यांची विशेष उपस्थिती होती.


            डॅा.पवार बोलताना पुढे म्हणाले,डॉ.जी.डी.बापू लाड यांची पत्नी विजयाताई लाड यांनीही स्वतंत्र्य लढयामध्ये मोठा सहभाग घेतला होता. गोर-गरीब जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी बापूंनी मोर्चे आणि आंदोलने केली.देश स्वतंत्र झाल्यानंतर बापू आमदार म्हणून विधान सभेचे आणि विधान परिषदेचे सदस्य होते.देशाचे माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू अखंड भारतामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करणारे दीर्घ दृष्टीकोन असणारे नेते होते.त्यावेळेस आमदार आणि मंत्री यांचे पगार जास्त होते.त्यावेळची सामाजिक स्थिती पाहता आण्णांनी आमदारांचे पगार कमी करण्याची मागणी केली होती.त्याचबरोबर, दुसरी मागणी सर्व जमिनी लागवडीखाली आणण्याबाबतची होती.तसेच, शेतकरी बांधवांसाठी आधुनिक खतांचा कारखाना काढला पाहिजे या सर्वबाबी बापूंनी मांडल्या.खाजगी क्षेत्रातील बस कामगारांवर होणारे अत्याचारांवर त्यांनी आवाज उठवून तात्काळ 1958 ला स्टेट ट्रान्सपोर्टची निर्मिती केली. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये सर्व सामान्य जनतेसाठी एस.टी.चा प्रवास सुरू झाला. ग्रामीण भागातील मुलांमध्ये बौध्दिक क्षमता आहे हे ओळखून त्याला चालना देण्यासाठी अभियात्रिकी महाविद्यालयांसाठी प्रयत्न केले.कोणत्याही प्रलोभनास ते कधीही बळी पडणारे नव्हते.त्यांच्या कारखान्याची सुरूवात 2002 मध्ये झाली.कोणावरही अन्याय केला नाही.त्यांनी शिक्षण संस्था, पाणी पुरवठा संस्था, माती परीक्षण केंद्र काढले.क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या सानिध्यात घडलेले बापू यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या नावावर विद्यार्थ्यांसाठी बोर्डींग काढले आणि अनेक लोकांचे संसार उभे केले.स्वातंत्र्य सैनिक नागनाथआण्णा नायकवडी यांचे समवेत दरोडेखोरांचे मतपरिवर्तन करून देशाच्या स्वातंत्र्य लढयामध्ये त्यांना सहभागी करून घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले.सर्वसामान्य लोकांनी बापूंसमवेत या लढयामध्ये भाग घेतला.बापंूची ज्या अवस्थेमध्ये जडण-घडण झाली, ज्या भावनेने त्यांनी कामे केली त्यापेक्षा आपण किती तरी पटीने मागे आहोत.त्यांनी जया जिद्दीने लढा दिला ती माणसे आज राजकारणात नाहीत.  या देशातील सर्व समाज आणि प्रत्येक कुटुंब साक्षर व्हावे अशी त्यांची मनोकामना होती. 

            अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के म्हणाले, जी.डी.बापू लाड हे स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतर ही स्वकीयांसाठी आयुष्यभर लढले आणि अत्याचार मुक्त समाज निर्मीतीसाठी बापूंनी प्रयत्न केले.त्यांनी गोर-गरीब जनतेमध्ये एक परिवर्तनीय विचार घालून दिला. बापूंच्या विचारांचे आणि मूल्यांचे चिंतन विद्यार्थ्यांनी कायमस्वरूपी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत. 

           कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.नितीन माळी यांनी केले.डॉ.उमेश गडेकर यांनी आभार मानले तर डॉ.उर्मिला दशवंत यांनी सूत्रसंचालन केले.

             यावेळी डॉ.अरूण भोसले, डॉ.भारती पाटील, कॉ.धनाजी गुरव, मारूती शिरतोडे, श्रीकांत लाड, प्राचार्य आर.एस.डुबल, डॉ.रणजित शिंदे, कथाकथ्नकार जयवंत आवटे यांचेसह कुंडल सांगलीहून आलेले मान्यवर, शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

-----

Friday, 3 November 2023

शिवाजी विद्यापीठात जनगणना माहिती संशोधन कार्यकेंद्राचे उद्घाटन

दर्जेदार संशोधन धोरणनिश्चितीसाठी उपयुक्त: डॉ. निरुपमा डांगे


शिवाजी विद्यापीठात जनगणना कार्य संचालनालयासमवेत सामंजस्य करार प्रसंगी कराराच्या प्रतींचे हस्तांतर करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि संचालक डॉ. निरुपमा डांगे. सोबत (डावीकडून) डॉ. सोमनाथ पवार, डॉ. शशीभूषण महाडिक, डॉ. प्रकाश पवार, डॉ. महादेव देशमुख, डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. सरिता ठकार, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, ए.एन. राजीव, व्ही.ए. अहिरे, वाय. एस. पाटील, किरण गुरव, प्रवीण भगत, अभिजीत रेडेकर आदी.

शिवाजी विद्यापीठात जनगणना कार्य संचालनालयासमवेत सामंजस्य करार प्रसंगी कराराच्या प्रतींचे हस्तांतर करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि संचालक डॉ. निरुपमा डांगे. सोबत (डावीकडून) कुलसचिव डॉ. विलास शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, ए.एन. राजीव, व्ही.ए. अहिरे.

शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागात स्थापन करण्यात आलेल्या जनगणना माहिती संशोधन कार्यकेंद्राचे उद्घाटन करताना जनगणना कार्य संचालनालयाच्या (महाराष्ट्र) संचालक डॉ. निरुपमा डांगे. सोबत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आदी.

शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागात स्थापन करण्यात आलेल्या जनगणना माहिती संशोधन कार्यकेंद्राच्या उद्घाटन प्रसंगी जनगणना कार्य संचालनालयाच्या (महाराष्ट्र) संचालक डॉ. निरुपमा डांगे यांच्यासमवेत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, श्री. ए.एन. राजीव, डॉ. प्रकाश पवार, डॉ. शशीभूषण महाडिक.



(शिवाजी विद्यापीठात जनगणना माहिती संशोधन कार्यकेंद्र उद्घाटन व सामंजस्य करार- व्हिडिओ)


कोल्हापूर, दि. ३ नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठात स्थापन करण्यात आलेल्या जनगणना माहिती कार्यकेंद्रामध्ये दर्जेदार संशोधन व्हावे आणि त्या माध्यमातून प्रशासनाला धोरणे निश्चित करण्यासाठी योग्य दिशादर्शन व्हावे, अशी अपेक्षा जनगणना कार्य संचालनालयाच्या (महाराष्ट्र) संचालक डॉ. निरुपमा डांगे (आय.ए.एस.) यांनी आज येथे व्यक्त केली.

शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागात संचालनालयाच्या जनगणना माहिती संशोधन कार्यकेंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठासमवेत सामंजस्य करार आणि कार्यकेंद्राचे औपचारिक उद्घाटन अशा संयुक्त कार्यक्रमात डॉ. डांगे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

डॉ. डांगे म्हणाल्या, जनगणनेद्वारे प्राप्त होणारी माहिती ही अत्यंत मूलभूत असते. तिची गोपनीयता ही सर्वोच्च प्राधान्याची बाब असली तरी संशोधकांना ही माहिती उपलब्ध करून देऊन देशाला दिशादर्शक अशी धोरणे आखण्यासाठी तिचा अतिशय उत्तम वापर करता येऊ शकतो. त्या दृष्टीने संचालनालयाने विद्यापीठांमध्ये कार्यकेंद्रे स्थापन करण्याचे धोरण स्वीकारले असून विद्यापीठातील संशोधकांनी जनगणना माहितीचे वेगवेगळ्या शास्त्रीय पद्धतींनी विश्लेषण करून ती उपलब्ध करून द्यावी, जेणे करून केंद्र सरकारला लोकहिताची धोरणे राबविणे अधिक सोयीचे होईल.

हा सामंजस्य करार दूरगामी उपयुक्त स्वरुपाचा ठरेल, असे सांगून कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, राज्य शासनासमवेत शिवाजी विद्यापीठ अनेक संयुक्त सहकार्य प्रकल्पांवर काम करीत आहे. त्यामध्ये काही जिल्ह्यांच्या योजना निर्धारणावरही काम करण्यात येत आहे. जनगणना कार्य संचालनालयासमवेत झालेल्या या सामंजस्य करारामुळे जनगणनेसारख्या अत्यंत मूलभूत माहितीच्या विश्लेषणावर संशोधकांना काम करता येणे शक्य होणार आहे. त्या माहितीवर आधारित अनेकविध संशोधन प्रकल्प हाती घेता येऊ शकतील. या कक्षाची गोपनीयता हा निकष लक्षात घेऊन सुद्धा जनगणनेच्या पलिकडे अन्य सरकारी माहिती सुद्धा या कार्यकेंद्राद्वारे संशोधकांना एकाच छताखाली उपलब्ध करून देता येईल. यामुळे त्यांच्या संशोधनाची कार्यकक्षा विस्तारेल. याखेरीज जनगणना कार्य संचालनालयानेही काही संशोधनात्मक प्रश्न सुचवावेत, म्हणजे त्यांनाही आवश्यक ते विश्लेषण येथूनच करून देता येईल.

यावेळी संचालनालयाविषयी वरिष्ठ अधिकारी ए.एन. राजीव यांनी विशेष सादरीकरण केले. सामंजस्य करारावर संचालनालयाच्या वतीने संचालक डॉ. डांगे यांनी तर विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी स्वाक्षरी केल्या. त्यानंतर डॉ. डांगे यांच्या हस्ते संख्याशास्त्र अधिविभागातील जनगणना माहिती संशोधन कार्यकेंद्राचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. डांगे यांनी केंद्राची पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले. यावेळी अधिविभाग प्रमुख डॉ. शशीभूषण महाडिक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर डॉ. सोमनाथ पवार यांनी आभार मानले.

या कार्यक्रमास जनगणना कार्य संचालनालयाच्या वतीने व्ही.ए. अहिरे, वाय. एस. पाटील, किरण गुरव आणि प्रवीण भगत हे अधिकारी उपस्थित होते, तर विद्यापीठाच्या वतीने अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. महादेव देशमुख, डॉ. सरिता ठकार, राज्यशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. प्रकाश पवार, सांख्यिकी अधिकारी अभिजीत रेडेकर आदी उपस्थित होते.

  

जनगणना कार्य संचालनालयाविषयी...

भारत सरकारचे महारजिस्ट्रार कार्यालय हे केंद्रीय गृहमंत्रालयाचे संलग्न कार्यालय असून त्याची सध्या देशभरात ३५ कार्यालये आहेत. राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमधील कार्यालयांना जनगणना कार्य संचालनालय म्हणून संबोधले जाते. या कार्यालयांचे मुख्य कार्य दशवार्षिक जनगणना करण्याचे असून प्रत्येक जनगणनेवेळी देशातल्या प्रत्येक नागरिकाक‌डून सामाजिक, लोकसंख्याशास्त्रीय, आर्थिक, शैक्षणिक आणि इतर अनुषंगिक माहिती मोठ्या प्रमाणात गोळा केली जाते. याचबरोबर देशातील प्रत्येक कुटुंबाविषयी आणि त्या घरांतील उपलब्ध भौतिक साधन-सुविधा व मालमत्तेविषयीही माहिती गोळा केली जाते. या माहितेचे विश्लेषण करून त्यावर आधारित विविध विकासात्मक योजना आखल्या जातात.

 

जनगणना माहिती संशोधन कार्यकेंद्राविषयी...

भारतीय जनगणनेमधून प्राप्त होणारी माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण असून तिचे सखोल संशोधन व विश्लेषण होणे गरजेचे आहे. ही बाब विचारात घेऊन महारजिस्ट्रार कार्यालयाने देशातील विविध १८ विद्यापीठांमध्ये जनगणना माहिती संशोधन केंद्रांची स्थापना करण्याचे ठरविले. त्यानुसार शिवाजी विद्यापीठात १२ वे कार्यकेंद्र स्थापन करण्यात आले आहे. या संशोधन केंद्रातील सुविधांचा लाभ विद्यापीठातील तसेच विद्यापीठाबाहेरील संशोधकांना घेता येणार आहे. संशोधन केंद्रामध्ये माहिती घेण्यासाठी व विश्लेषण करण्यासाठी संगणक, प्रिंटर तसेच सांख्यिकीय विश्लेषणासाठी आवश्यक असलेले सॉफ्टवेअरही उपलब्ध करून देण्यात आली आहेत, अशी माहिती अधिविभाग प्रमुख डॉ. महाडिक यांनी दिली.