Saturday, 23 December 2023

संशोधकांनी इतिहासाची वस्तुनिष्ठ मांडणी करावी: डॉ. अशोक चौसाळकर

 शिवाजी विद्यापीठामध्ये मराठा इतिहासावरील राष्ट्रीय परिषद संपन्न

शिवाजी विद्यापीठात आयोजित मराठा इतिहास संशोधन परिषदेच्या समारोप समारंभात बोलताना डॉ. अशोक चौसाळकर. मंचावर (डावीकडून) डॉ. सी.आर. दास, डॉ. चंद्रकांत अभंग, डॉ. अवनीश पाटील, डॉ. जिगर मोहम्मद, डॉ. इश्रत आलम, डॉ. वर्षा शिरगांवकर, डॉ. नीलांबरी जगताप.


कोल्हापूर, दि. २३ डिसेंबर: इतिहासाच्या अभ्यासक व संशोधकांनी इतिहासाची वस्तुनिष्ठ व परखड मांडणी करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी काल येथे केले.

महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालय आणि शिवाजी विद्यापीठाचे छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज्याभिषेक दिन व स्वराज्य स्थापना दिन यांच्या ३५० व्या वर्धापन वर्षानिमित्त ‘मराठा इतिहास संशोधनाचा कक्षाविस्तार’ या विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा समारोप विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात झाला. त्यावेळी डॉ. चौसाळकर बोलत होते.

डॉ. चौसाळकर म्हणाले, सद्यस्थितीत इतिहास ही ज्ञानशाखा धोक्याच्या विळख्यात सापडली आहे. अस्मितादर्शी राजकारणासाठी इतिहासाचा गैरवापर करण्यात येत आहे. यापासून अभ्यासक, संशोधकांसह समाजानेही सावध व सजग असायला हवे. वस्तुनिष्ठ इतिहास लोकांसमोर आणण्यासाठी प्रयत्नरत राहण्याबरोबरच प्रसंगी परखड भूमिका घेतली जाणेही आवश्यक आहे. खोटा इतिहास पसरविण्यासाठी समाजमाध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आहे. हेही रोखले जायला हवे. अनेक तोतया इतिहासकार आपल्या स्वार्थासाठी इतिहासाचा वापर करून घेत आहेत. त्यांनाही रोखण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

समारोप समारंभास पुण्याचे डॉ. सी.आर. दास, डॉ. चंद्रकांत अभंग, जम्मू विद्यापीठाचे डॉ. जिगर मोहम्मद, अलिगढ विद्यापीठाचे डॉ. इश्रत आलम, डॉ. वर्षा शिरगांवकर, डॉ. उदय सुर्वे आदी उपस्थित होते.

या तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेसाठी देशभरातून विविध विद्यापीठांतील अनेक तज्ज्ञ, अभ्यासक उपस्थित राहिले आणि त्यांनी मराठा इतिहासाच्या अनुषंगाने शोधनिबंध सादर केले. मराठा इतिहासाची साधने, इतिहास लेखन, मराठा इतिहासातील आर्थिक पैलू, सामाजिक- सांस्कृतिक इतिहास, पुरातत्त्व, कला आणि स्थापत्य, मराठा युरोपियनांचे आपापसातील संबंध, लष्करी इतिहास अशा विविध विषयांवरील दर्जेदार शोधनिबंधांचा त्यात समावेश होता. या परिषेदेच्या औचित्याने मराठाकालीन कागदपत्रांवर नव्याने प्रकाश टाकण्यात आला.

यावेळी परिषदेस उपस्थित पाहुण्यांसाठी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शनही शिवाजी विद्यापीठ संग्रहालय संकुल येथे भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा व नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. परिषदेसाठी शिवाजी विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांतील शिक्षक व संशोधक विद्यार्थ्यांचीही लक्षणीय उपस्थिती लाभली.

परिषद यशस्वी होण्यासाठी समन्वयक डॉ. नीलांबरी जगताप, कोल्हापूर वस्तुसंग्रहालयाचे सहाय्यक संवर्धक उदय सुर्वे आणि इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी परिश्रम घेतले.

Thursday, 21 December 2023

अॅड. धन्यकुमार गुंडे यांची शिवाजी विद्यापीठास सदिच्छा भेट

 

राष्ट्रीय अल्पसंख्याक अयोगाचे सदस्य अॅड. धन्यकुमार गुंडे व सौ. निर्मला गुंडे यांचे शिवाजी विद्यापीठात स्वागत करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह मान्यवर.


कोल्हापूर, दि. २१ डिसेंबर: राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य अॅड. धन्यकुमार जिनाप्पा गुंडे यांनी आज शिवाजी विद्यापीठास सपत्नीक सदिच्छा भेट दिली.

अॅड. धन्यकुमार गुंडे हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांचे आज सकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आपल्या दालनामध्ये शाल, स्मृतिचिन्ह व ग्रंथ भेट देऊन स्वागत केले. त्यांच्या पत्नी सौ. निर्मला गुंडे यांचाही शाल व ग्रंथभेट देऊन सत्कार केला. यावेळी अॅड. गुंडे यांनी आपण शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असल्याचा अतिशय अभिमान असल्याचे नमूद केले. त्याचप्रमाणे देशातील विद्यार्थ्यांमध्ये ‘राष्ट्र प्रथम’ ही सर्वोच्च भावना रुजविण्यासाठी सातत्याने प्रबोधन व कार्य करीत असून त्यासाठी पदाचा सदुपयोग करीत राहणार असल्याचेही सांगितले. शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाच्या कार्याविषयीही त्यांनी कौतुकोद्गार काढले. यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांनी, विद्यापीठातील सामाजिक वंचितता व समावेशन धोरण केंद्र, लोकविकास केंद्र आदी केंद्रांच्या माध्यमातून अल्पसंख्याकांसह वंचित घटकांच्या उत्थानाच्या अनुषंगाने अभ्यास व संशोधन करण्यास विद्यापीठाचे प्राधान्य असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे सामाजिक-आर्थिक धोरण निश्चिती व निर्मिती यांसाठी आवश्यक माहिती पुरवून योगदान देण्यासाठी अध्यासनांनी काम करण्यासाठी प्रेरित करण्यात येत असल्याचेही सांगितले.

या भेटीनंतर अॅड. गुंडे यांनी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाचे कार्य, संशोधन आणि प्रस्तावित इमारत प्रकल्पाची माहिती घेतली.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. विजय ककडे, महावीर अध्यासनाच्या सल्लागार समितीचे सदस्य अनिल पाटील, डी.ए. पाटील, डॉ. चंद्रकांत चौगुले आदी उपस्थित होते.


अॅड. रूपाली पणदूरकर यांच्या स्मरणार्थ

मातापित्यांकडून विद्यापीठास ३५ लाखांची देणगी

विद्यार्थिनींसाठी साकारणार स्वतंत्र अभ्यासिका

(कै.) अॅड. रुपाली पणदूरकर


अॅड. रुपाली पणदूरकर यांच्या स्मरणार्थ ३५ लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे सुपूर्द करताना सौ. हेमकिरण पणदूरकर व अॅड. राम पणदूरकर. सोबत वरदराज बापट, अॅड. अमोल रणसिंग, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, सिद्धार्थ शिंदे, स्वागत परुळेकर, एस के. पवार.




कोल्हापू, दि. २१ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठाचे निवृत्त भूगोल अधिविभाग प्रमुख व ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ डॉ. (अॅड.) राम पणदूरकर व त्यांच्या पत्नी हेमकिरण यांनी पेन्शन बचतीतून साठविलेली पुंजी रु. ३५ लाख आपली एकमेव अपत्य दिवंगत डॉ. (अॅड.) रूपाली पणदूरकर यांच्या स्मरणार्थ कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे सुपूर्द केली. या देणगीमधून शिवाजी विद्यापीठातील 'कमवा व शिका विद्यार्थिनी वसतिगृह परिसरात विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र अभ्यासिका बांधण्यात येणार आहे. नवीन वर्षात ही अभ्यासिका साकार होईल.

अॅड. रूपाली पणदूरकर यांनी सर्व शिक्षण शिवाजी विद्यापीठातून पूर्ण केले. वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी त्यांनी महाराष्ट्रातील बालगुन्हेगारीचा सामाजिक व कायदेविष‌यक अभ्या या विषयावर शोधप्रबंध सादर करून कायदे विषयात पीएच.डी. मिळविली होती. सतारवादनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण गांधर्व महाविद्यालयातून घेऊन सार्वजनिक व्यासपीठांवरुन सतारवादनाचे कार्यक्रम केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या "न्यायदीप" या संशोधन पत्रिकेत त्यांचे अभ्यासपूर्ण संशोधन लेख सन्मानपूर्वक प्रसिद्ध झाले होते. त्यांनी २००१ पासून १४ वर्षे कोल्हापूर दिवाणी न्यायालयात वकीली केली.

अॅड. रुपाली यांची उद्या (दि. २२ डिसेंबर) जयंती आहे. या जयंतीच्या पूर्वसंध्येला पणदूरकर दांपत्याने कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन ३५ लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश सुपूर्द केला. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी पणदूरकर दांपत्याच्या दातृत्वाबद्दल शिवाजी विद्यापीठाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली. या प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे, स्वागत परुळेकर, वरदराज बापट, प्रा. एस.के. पवार, अॅड. अमोल रणसिंग उपस्थित होते.

मातापित्यांच्या दातृत्वाची पुनर्प्रचिती: कुलगुरू डॉ. शिर्के

शिवाजी विद्यापीठाचे माजी भूगोल विभाग प्रमुख डॉ. राम पणदूरकर यांनी आपली दिवंगत कन्या अॅड. रुपाली यांच्या स्मरणार्थ विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र अभ्यासिका निर्मितीसाठी ३५ लाख रुपयांची देणगी दिली, ही गहिवरून टाकणारी बाब आहे. मुलीच्या माघारी समाजातील लेकीबाळींना तिच्या स्थानी मानून त्यांच्यासाठी काही तरी भरीव उभे करण्याचे दातृत्व पणदूरकर दांपत्याने दाखविले आहे. गत वर्षी माजी सहाय्यक कुलसचिव पंडित मारुलकर यांनीही त्यांच्या मुलीच्या स्मृतीप्रित्यर्थ दिलेल्या देणगीतून संशोधक विद्यार्थिनींसाठी अस्मिता वसतिगृह उभारण्यात आले आहे. पणदूरकर दांपत्यामुळे मातापित्यांच्या दातृत्वाची पुनर्प्रचिती आली, अशी भावना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी यावेळी व्यक्त केली.

Wednesday, 20 December 2023

शिवराज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील तेजस्वी घटना: डॉ. जयसिंगराव पवार

 शिवाजी विद्यापीठात तीन दिवसीय मराठा इतिहास संशोधन परिषदेस प्रारंभ

शिवाजी विद्यापीठात आयोजित मराठा इतिहास संशोधन राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बीजभाषण करताना ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार. मंचावर (डावीकडून) डॉ. नीलांबरी जगताप, डॉ. अवनीश पाटील, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व उपसंचालक हेमंत दळवी.

शिवाजी विद्यापीठात आयोजित मराठा इतिहास संशोधन राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बीजभाषण करताना ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार. मंचावर (डावीकडून) कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व उपसंचालक हेमंत दळवी.


कोल्हापूर, दि. २० डिसेंबर: शिवराज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील तेजस्वी घटना आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी आज येथे केले.

शिवराज्याभिषेक दिन व स्वराज्य स्थापना दिन यांच्या ३५० व्या वर्धापन वर्षानिमित्त मराठा इतिहास संशोधनाचा कक्षाविस्तार या विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन आज विद्यापीठात श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते झाले. या समारंभात शिवराज्याभिषेक या विषयावर बीजभाषण करताना डॉ. पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. पवार म्हणाले, कृष्णाजी सभासद यांनी बखरीमध्ये नोंदविल्यानुसार, चोहो दिशांना सर्वत्र मुस्लीम शाह्यांचे राज्य असताना छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव मराठे राजे झाले, ही काही सामान्य बाब नव्हती. महाराष्ट्रात राज्याभिषेकाची कोणतीही पूर्वपिठिका नसताना महाराजांना ही संकल्पना सुचणे ही देखील एक क्रांतीकारक घटना होती. त्यातून त्यांचे द्रष्टेपण अधोरेखित होते. राज्याभिषेकाची संकल्पना गागाभट्टाची मानणे गैर आहे. गागाभट्टाने महाराष्ट्रातील राज्याभिषेकाच्या विरोधकांना शांत करण्याचे महत्त्वाचे काम केले आणि दुसरे म्हणजे श्री शिवराज्याभिषेक प्रयोगः ही पुस्तिका निर्माण केली. हे त्याचे योगदान मात्र नाकारता येणार नाही.

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही त्यांनी घडवून आणलेली मनो-राजकीय (Psycho-political) क्रांती असल्याचे सांगून डॉ. पवार पुढे म्हणाले, मराठ्यांत पिढ्यानपिढ्या रुजलेली गुलामीची मानसिकता दूर करून भूमीपुत्र म्हणून जबाबदारीची भूमिका बजावण्यासाठी त्यांनी सज्ज व्हावे, अशी महाराजांची भावना आणि अपेक्षा होती. मराठ्यांनी महाराजांची ही भावना सार्थ ठरविल्याचे पुढे सिद्ध झाले. संभाजी महाराजांच्या माघारी मराठा स्वराज्य संपल्यातच जमा झाल्याचे वातावरण असताना मराठ्यांनी औरंगजेबासारख्या पातशहाला २६ वर्षे झुंजत ठेवले. ही साधी गोष्ट नव्हती. मराठ्यांनी फिनिक्सप्रमाणे भरारी मारत आपले लढवय्येपण सिद्ध केले. महाराजांनी घडविलेल्या या क्रांतीमधून मराठ्यांना नवी ओळख प्रदान करणारे, नव्या आकांक्षा रुजविणारे आणि देशाच्या भवितव्याला दिशा देणारे नवे युग जन्माला आले.

यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी मराठा इतिहासाचा वेध घेणाऱ्या या परिषदेला उद्घाटनपर शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवराज्याभिषेक दिनाचा ३५० वा वर्धापन साजरा करण्यासाठी विद्यापीठ अनेकविध उपक्रम राबवित आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभागी होऊन योगदान द्यावे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध पैलूंविषयी संशोधन करण्यासाठी फेलोशीप देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्याचा लाभ इतिहासाच्या संशोधक विद्यार्थ्यांनी जरुर घ्यावा. त्याचप्रमाणे मराठ्यांच्या केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेरील इतिहासाबाबतही संशोधन करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने सदरची राष्ट्रीय परिषद उपयुक्त भूमिका पार पाडेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या परिषदेच्या निमित्ताने आयोजित शिवकालीन शस्त्रप्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस श्रीमंत शाहू महाराज यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. नीलांबरी जगताप यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. स्नेहल पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी आभार मानले.

परिषदेत विविध विषयांवर होणार चर्चा

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत मराठा इतिहासाचा सामाजिक-आर्थिक, सामाजिक-सांस्कृतिक, संदर्भसाधने व स्रोत, पुरातत्त्व, कला व स्थापत्य, लष्करी इतिहास, मराठा व युरोपियन अशा अनेक अंगांनी संशोधकीय वेध घेण्यात येणार आहे. त्यामध्ये देशभरातील मान्यवर इतिहास संशोधक उपस्थित राहून सहभागी होणार आहेत. २२ डिसेंबर रोजी ४.३० वाजता डॉ. अशोक चौसाळकर, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे, इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेचा समारोप होईल. या परिषदेच्या निमित्ताने युको बँकेशेजारील शिवाजी विद्यापीठ संग्रहालय संकुलामध्ये शिवकालीन शस्त्रास्त्रांचे विशेष प्रदर्शन आयोजित केले आहे.

घुसखोरीवरुन चीनला भारताने परखड इशारा देण्याची गरज: डॉ. यशवंतराव थोरात

 विद्यापीठात भारत-चीन संबंध विषयावर राष्ट्रीय परिषद

शिवाजी विद्यापीठात 'भारत-चीन संबंध' या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रात बीजभाषण करताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. यशवंतराव थोरात. मंचावर डॉ. अशोक चौसाळकर व कर्नल शिव कुणाल वर्मा.

शिवाजी विद्यापीठात 'भारत-चीन संबंध' या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रात बीजभाषण करताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. यशवंतराव थोरात. मंचावर (डावीकडून) डॉ. राहुल त्रिपाठी, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्रीराम पवार, डॉ. अशोक चौसाळकर, कर्नल शिव कुणाल वर्मा व डॉ. प्रकाश पवार.


कोल्हापूर, दि. २० डिसेंबर: भारत शांतताप्रिय देश आहे, हे खरे; मात्र घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही, असा परखड शब्दांत चीनला इशारा देण्याचीही गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ तथा विचारवंत डॉ. यशवंतराव थोरात यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठात आयोजित भारत-चीन संबंध या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन सत्रात बीजभाषण करताना ते बोलत होते. विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर होते.

डॉ. यशवंतराव थोरात यांनी आपल्या बीजभाषणामध्ये भारत व चीन यांच्यातील १९५० ते १९६२ या कालावधीतील सहसंबंधांचा सूक्ष्म वेध घेतला. ते म्हणाले, नवस्वतंत्र व प्रजासत्ताक अशा भारत व चीन यांच्यात १९५०मध्ये सुरवातीला मैत्रीपूर्ण संबंध राहिले. हिंदी-चीनी भाई भाई म्हणण्याइतपत ही मैत्री होती. साम्राज्यवादी व वसाहतवादी सत्तेशी झगडून त्यांचे वर्चस्व झुगारून देऊन स्वातंत्र्य मिळविण्यात हे देश यशस्वी ठरले. त्या काळात आशिया आणि आफ्रिका खंडांतील अन्य देशही स्वतंत्र होत होते. त्यांचे नेतृत्व भारत व चीन करीत होते, मात्र त्यांचे हेतू मात्र वेगवेगळे होते. पंडित नेहरू आणि माओ या दोन बलाढ्य व्यक्तीमत्त्वांमधून उद्भवलेला संघर्ष प्रत्यक्ष जीवनात प्रतिबिंबित झाला. त्यामध्ये १९५५ च्या बांडुंग परिषदेत नेहरूंनी माओ व चीनचा परिचय करून देण्याचे केलेले धार्ष्ट्य, ज्या तिबेटशी भारताचे दोन हजार वर्षांचे धार्मिक संबंध होते, त्यावर केलेले अतिक्रमण, १९६० मध्ये दलाई लामांचे तिबेटकडून भारताकडे पलायन आणि त्यांचा पाठलाग करीत चीनी सैनिकांची भारतात घुसखोरी अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर भारत-चीन संबंधात कटुता येत जाऊन अखेरीस भारतावरील आक्रमणापर्यंत येऊन पोहोचले. यामागे चीनची विस्तारवादी सत्तालोलुपताही कारणीभूत आहे. या युद्धातील पराभव आपल्याला आजही झोंबणारा आहे. त्यावेळी आपल्या सैनिकांकडे शौर्य व धैर्याची कमतरता नव्हती. मात्र शस्त्रसामग्री व साधनांची कमतरता निश्चित होती. लोकशाहीत लष्कर हे एक साधन असते. त्याकडे १९५० ते १९६२ या काळात आपले अक्षम्य दुर्लक्ष्य झाले. त्यावेळी आपले अपयश युद्धातील नव्हते, तर ते आपल्या देशाचे आणि आपल्या परराष्ट्र धोरणाचे अपयश होते.

डॉ. थोरात पुढे म्हणाले, भूतकाळापासून धडा घेऊन आपण पुढे जायला हवे. चीन व पाकिस्तान हे केवळ आंतरराष्ट्रीय सहकारी नाहीत, तर मित्र आहेत. त्यांच्या आपापल्या महत्त्वाकांक्षा आहेत. चीनच्या भू-राजकीय महत्त्वाकांक्षा तर प्रचंड आसुरी आहेत. भारतीय नियंत्रण रेषा उल्लंघून आत शिरण्यासाठी ते सातत्याने संधींच्या शोधात आहेत. त्यामुळे त्यांना सज्जड इशारा देण्याची आवश्यकता आहे. या इशाऱ्यामध्येही पुन्हा युद्धाच्या शक्यता आहेतच. पण, युद्ध हे सैन्याकडून लढले जात असले, तरी घडविले जाते ते नागरिकांकडून, ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. शांततेची किंमत व कदर अन्य कोणाही पेक्षा जवानांना असते. युद्धात ते देह ठेवतात, ते तुमच्या-आमच्या जीवनात शांतता नांदावी, यासाठी. या बाबीचे भान ठेवून आपण आंतरराष्ट्रीय संबंधात पुढे जायला हवे, असेही त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. अशोक चौसाळकर यांनी डॉ. थोरात यांच्या सटीक मांडणीचे कौतुक केले. ते म्हणाले, डॉ. थोरात यांनी मांडलेल्या दृष्टीकोनाशी अभ्यासकांचे मतभेद होण्याची शक्यता गृहित धरल्यानंतरही तिचे महत्त्व उरते. १९६२च्या युद्धाची त्यांनी उलगडून दाखविलेली पार्श्वभूमी महत्त्वाची आहे. अवघे दहा टक्के सैन्यबळ आणि अपुरी युद्धसामग्री वापरून लढल्या गेलेल्या या युद्धात आपला अल्पकाळासाठी पराभव झाला. पराभवाचे दुःख असले तरी भारत पुनश्च मुसंडी मारुन त्यामधून बाहेर पडला, हेही वास्तव आहे. तत्कालीन नेतृत्वाचे ते अपयश आणि यशही ठरले, याकडेही त्यांनी निर्देश केला.

यावेळी मंचावर कर्नल शिव कुणाल वर्मा, डॉ. राहुल त्रिपाठी, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्रीराम पवार, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रकाश पवार उपस्थित होते. नेहरू अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. प्रल्हाद माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. जयश्री कांबळे यांनी परिचय करून दिला. नेहा वाडेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुखदेव उंदरे यांनी आभार मानले.

उद्घाटन सत्रानंतर चर्चासत्रात मान्यवरांच्या उपस्थितीत विविध सत्रे पार पडली. यामध्ये भारत-चीन संबंध या विषयावर कर्नल शिव कुणाल वर्मा यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार-संपादक श्रीराम पवार होते. दुसऱ्या सत्रात डॉ. राहुल त्रिपाठी व डॉ. सुखदेव उंदरे यांनी भारताचे परराष्ट्र धोरण या विषयावर मांडणी केली. डॉ. प्रल्हाद माने सत्राध्यक्ष होते. तिसऱ्या सत्रात डॉ. अशोक चौसाळकर भारत-चीन संबंधांतील समकालीन प्रवाह या विषयावर मांडणी केली. डॉ. भारती पाटील सत्राध्यक्ष होत्या. श्रीराम पवार आणि डॉ. रविंद्र भणगे यांच्या उपस्थितीत समारोप सत्र संपन्न झाले.

Sunday, 17 December 2023

विद्यापीठाच्या ग्रंथ महोत्सवाला वाचकांचा प्रतिसाद

 वाचकाला त्याचेच पुस्तक मिळाले आठ वर्षांनी परत

ग्रंथ महोत्सवात पुस्तक पाहण्यात गुंग झालेले वाचक


कोल्हापूर, दि. १७ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या ६० व्या दीक्षान्त समारंभाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय ग्रंथ महोत्सवाला वाचकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. उद्या, दीक्षान्त समारंभादिवशी विद्यार्थी तसेच महाविद्यालयांचा पुस्तक खरेदीला अधिक प्रतिसाद लाभेल, अशी अपेक्षा सहभागी प्रकाशकांनी व्यक्त केली. एका वाचकाला त्याचेच पुस्तक आठ वर्षांनी परत मिळाल्याची दुर्मिळ घटनाही या महोत्सवात घडून आली.

विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभानिमित्त ग्रंथमहोत्सव आयोजित करण्याची परंपरा जोपासण्यात आली आहे. त्यामध्ये राज्यभरातून दर्जेदार प्रकाशक आणि विक्रेते सहभागी होतात. यंदा हा महोत्सव तीन दिवसांचा आयोजित केला आहे. त्यामध्ये एकूण २२ प्रकाशक व ग्रंथविक्रेते सहभागी झाले आहेत. आज रविवार, सुटीचा दिवस असल्याने तुलनेत गर्दी कमी असली तरी चोखंदळ वाचकांनी त्याचा लाभ घेत कुटुंबियांसह ग्रंथमहोत्सवाला भेट दिली आणि पुस्तकखरेदी केली. विद्यापीठातील अधिविभागांचे शिक्षक, विद्यार्थी आणि प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांनीही महोत्सवाला भेट देऊन पुस्तक खरेदी केली.

महोत्सवात सहभागी झालेल्या भाग्यश्री प्रकाशनाच्या भाग्यश्री कासोटे म्हणाल्या की, सुटीचा दिवस असल्याने आज चोखंदळ वाचकांनी आपल्या कुटुंबियांसह प्रदर्शनाला भेट देऊन पुस्तक खरेदी केली. उद्या दीक्षान्त समारंभाच्या दिवशी हजारो विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक, महाविद्यालयीन कर्मचारी, ग्रंथपाल आदी मंडळी विद्यापीठात येणार असल्याने पुस्तकविक्रीस चांगला प्रतिसाद लाभेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

व्हॅलेंटाईन गिफ्ट आठ वर्षांनी मिळाले परत

डॉ. नितीन रणदिवे यांना त्यांचेच पुस्तक पुन्हा भेट देताना यशवंत बुक स्टॉलचे नेताजी कदम


विद्यापीठाच्या ग्रंथमहोत्सवात आज एक अनोखा व दुर्मिळ प्रसंग अनुभवास आला. विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. नितीन रणदिवे हे ग्रंथ महोत्सवात खरेदीसाठी पुस्तकांची पाहणी करीत होते. येथील यशवंत बुक स्टॉलमध्ये दुर्मिळ आणि नामवंत लेखकांची पुस्तके ५०% सवलतीत देण्यात येत आहेत. तेथे विविध पुस्तके चाळत असताना ज्येष्ठ विचारवंत आ.ह.साळुंखे यांचे सर्वोत्तम भूमिपुत्र: आक्षेप- डॉ.आंबेडकरांची विचारधारा आणि लेखकाची भूमिकाहे पुस्तक नजरेस पडले. ते त्यांनी कुतुहलाने हातात घेऊन चाळले असता त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्याचे कारण असे की, त्यांच्या पत्नी विजया यांनी २०१५च्या व्हॅलेंटाईन डे ला त्यांना हे पुस्तक भेट दिले होते. त्यावर त्यांनी नितीन यांचे नाव लिहून स्वाक्षरी केली होती. त्यांच्याकडून कोणी तरी हे पुस्तक वाचण्यासाठी म्हणून घेऊन गेले होते, मात्र परत न करता रद्दीत घातले होते. तेच पुस्तक यशवंत बुक स्टॉलवर आठ वर्षांनी परत मिळाल्याचा आनंद डॉ. रणदिवे यांनी व्यक्त केला मात्र पुस्तक नेणाऱ्याच्या कृतीबद्दल त्यांना विषादही वाटला. ही बाब समजताच यशवंत बुक स्टॉलच्या नेताजी कदम यांनी त्यांच्याकडून कोणतीही किंमत न आकारता ते त्यांना पुन्हा भेट दिले. अशा प्रकारे डॉ. रणदिवे यांना त्यांची व्हॅलेंटाईन गिफ्ट विद्यापीठाच्या ग्रंथमहोत्सवामुळे आठ वर्षांनी परत मिळाली.

हीरकमहोत्सवी दीक्षान्त समारंभासाठी शिवाजी विद्यापीठ सज्ज

 

शिवाजी विद्यापीठाच्या ६० व्या दीक्षान्त समारंभाच्या दीक्षान्त मिरवणुकीसाठी उभारण्यात आलेली स्वागत कमान

शिवाजी विद्यापीठाच्या ६० व्या दीक्षान्त समारंभासाठी सुसज्ज असलेले राजमाता जाजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृह 

शिवाजी विद्यापीठाच्या ६० व्या दीक्षान्त समारंभासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला आहे. 

शिवाजी विद्यापीठाच्या ६० व्या दीक्षान्त समारंभासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या ६० व्या दीक्षान्त समारंभाच्या तयारीचा कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी पूर्वसंध्येला कार्यक्रमस्थळी जाऊन आढावा घेतला.

शिवाजी विद्यापीठाच्या ६० व्या दीक्षान्त समारंभाच्या तयारीचा कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी पूर्वसंध्येला कार्यक्रमस्थळी जाऊन आढावा घेतला.


कोल्हापूर, दि. १७ डिसेंबर: हीरकमहोत्सवी अर्थात ६० व्या दीक्षान्त समारंभासाठी शिवाजी विद्यापीठ जय्यत तयारीनिशी सज्ज झाले आहे.

विद्यापीठाचा ६० वा दीक्षान्त समारंभ उद्या (दि. १८) सकाळी ११.३० वाजता राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात होत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस हे समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन (ए.आय.सी.टी.ई.) या राष्ट्रीय नियामक संस्थेचे माजी चेअरमन डॉ. एस.एस. मंथा उपस्थित राहणार आहेत. या समारंभात राष्ट्रपती सुवर्णपदक विजेती साईसिमरन हिदायत घाशी आणि कुलपती सुवर्णपदक विजेती बिल्कीस हिदायत गवंडी यांच्यासह निवडक पुरस्कार व पीएचडी पदवीधारक स्नातकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके तथा पदवी प्रदान करण्यात येतील. या दीक्षान्त समारंभात एकूण ४९,४३८ इतकी पदवी प्रमाणपत्रे वितरित करण्यात येणार असून त्यामध्ये विद्यार्थिनींची संख्या २७,४७५ इतकी लक्षणीय आहे.

दीक्षान्त मिरवणुकीसाठी राजमाता जिजाऊसाहेब सभागृहापासून मुख्य इमारतीपर्यंत भव्य स्वागतकमान उभारण्यात आली आहे. प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवी प्रमाणपत्रे स्वीकारणाऱ्या स्नातकांना पदवी वितरणासाठी परीक्षा भवन क्रमांक २ च्या प्रांगणात मंडप घालून ३३ बूथ उभारण्यात आले आहेत. त्या प्रत्येक बूथवर ३०० पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येईल. नोंदणीकृत स्नातकांना त्यांच्या पदवीच्या बूथविषयीची माहिती एसएमएसद्वारे कळविण्यात आली आहे. त्याखेरीज विद्यापीठ परिसरात सहा ठिकाणी क्यूआर कोडचीही व्यवस्था केली. ते स्कॅन करून स्नातकाने त्याचा मोबाईल क्रमांक अथवा पीआरएन क्रमांक टाकल्यानंतर त्याला त्याचा दीक्षान्त क्रमांक तसेच बूथ क्रमांकही समजणार आहे.  

दरम्यान, आज सायंकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांच्यासह समारंभस्थळी जाऊन सर्व तयारीचा सविस्तर आढावा घेतला आणि संबंधित अधिकारी, समितीप्रमुखांना कार्यक्रम सुनियोजितरित्या पार पडण्यासाठी आवश्यक त्या सूचना केल्या. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाच्या वतीनेही सकाळी संपूर्ण परिसराची बारकाईने तपासणी करण्यात आली. दुपारपासूनच समारंभस्थळासह विद्यापीठ परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

समारंभास उपस्थित राहू इच्छिणाऱ्या स्नातकांसह सर्वांनी सुमारे एक तास आधी स्थानापन्न व्हावे, अशा सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.