Thursday, 15 August 2024

शिवाजी विद्यापीठात स्वातंत्र्यदिन उत्साहात

 


कोल्हापूर, दि. १५ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठात ७८ वा स्वातंत्र्यदिन आज रॅली, सेल्फी पॉइंट्स आदी उपक्रमांसह मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.



आज सकाळी ठीक आठ वाजता कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते विद्यापीठाच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रध्वजास वंदन करण्यात आले. राष्ट्रीय छात्र सेनेच्या परेडद्वारे राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. यावेळी राष्ट्रगीत व विद्यापीठ गीत यांचे सामूहिक गायन करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यास पुष्प वाहून अभिवादन केले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील विविध ठिकाणी ^आज़ादी का अमृत महोत्सव* उपक्रमांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने ^सेल्फी पॉइंट्स* तयार करण्यात आले होते.  सेल्फी पॉइंट्सवर छायाचित्रे घेण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनीनसह शिक्षक, अधिकारी आणि प्रशासकीय सेवकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तत्पूर्वी, आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यदिन  रॅलीस कुलगुरू डॉ. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ.  पाटील यांनी फ्लॅग-ऑफ करून  रॅली मध्ये सहभाग घेतला.



याप्रसंगी, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ.सुहासिनी पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचार्य विभागाचे संचालक डॉ.सागर डेळेकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य स्वागत परूळेकर, सुरक्षा अधिकारी वसंत एकले यांच्यासह विविध अधिकार मंडळांचे सदस्य, शिक्षक, अधिविभाग प्रमुख, विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमामध्ये प्रवेशित झालेले परदेशी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चहापानाने या उपक्रमांची सांगता झाली.

-----

Friday, 9 August 2024

शिवाजी विद्यापीठात क्रांतीवीरांना अभिवादन




कोल्हापूर, दि. ९ ऑगस्ट: ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आज शिवाजी विद्यापीठात भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीसाठी बलिदान देणाऱ्या क्रांतीवीरांना मनोभावे अभिवादन करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठाच्या क्रांतीवन उद्यानात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी कुसुमाग्रजांच्या अनाम वीरा... या कवितेचे वाचन करून हुतात्म्यांच्या स्मृती जागविल्या. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Thursday, 8 August 2024

शिवाजी विद्यापीठाचे सेट परीक्षेत घवघवीत यश

 पदार्थविज्ञान अधिविभागाचे सर्वाधिक २९ विद्यार्थी उत्तीर्ण



कोल्हापूर, दि. ८ ऑगस्ट: एप्रिल-२०२४मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा तथा सेट परीक्षेमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिविभागांतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले असून पदार्थविज्ञान अधिविभागाचे सर्वाधिक २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

सहाय्यक प्राध्यापक पदासाठी महत्त्वाची असलेली महाराष्ट्र- राज्यस्तरीय पात्रता चाचणी (एम.एच.-सेट) ७ एप्रिल २०२४ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आली. या परीक्षेमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी भरीव यश मिळविले. पदार्थविज्ञान अधिविभागाखालोखाल गणित अधिविभागाचे २७ आणि संख्याशास्त्र अधिविभागाचे २४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याखालोखाल शिक्षणशास्त्र अधिविभागाचे १०, सूक्ष्मजीवशास्त्र, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र अधिविभागाचे प्रत्येकी ८, रसायनशास्त्र अधिविभागाचे ७, इलेक्ट्रॉनिक्सचे ६, पर्यावरणशास्त्र व इतिहासाचे प्रत्येकी ५, समाजकार्य विषयाचे ३, समाजशास्त्र, जीवरसायनशास्त्र आणि वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागांचे प्रत्येकी २ तर जैवतंत्रज्ञान व मानसशास्त्राचे प्रत्येकी १ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे यंदा दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रामधून शिकलेल्या विद्यार्थ्यांनीही सेट परीक्षेत उत्तम यश मिळविले आहे. या केंद्राचे एकूण १४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यामध्ये अर्थशास्त्राचे ५, राज्यशास्त्राचे ४, समाजशास्त्राचे ३ आणि इतिहासाचे २ विद्यार्थी आहेत.

सर्व उत्तीर्ण विद्यार्थी-विद्यार्थिनींसह त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह सर्व संबंधित अधिविभाग प्रमुखांनी अभिनंदन केले आहे.

Wednesday, 7 August 2024

विद्यार्थी सुविधा केंद्राच्या सुविधा आता ‘ऑनलाईन’ उपलब्ध

 शिवाजी विद्यापीठाच्या संगणक केंद्राची महत्त्वपूर्ण कामगिरी





शिवाजी विद्यापीठाच्या ऑनलाईन सुविधा पोर्टलचे विविध स्क्रीनशॉट्स



कोल्हापूर, दि. ७ ऑगस्ट: विद्यार्थ्यांना लागणाऱ्या विविध शैक्षणिक दस्तावेजांची उपलब्धता करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने नवीन ऑनलाईन पोर्टलची निर्मिती केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता केवळ तेवढ्यासाठी विद्यार्थी सुविधा केंद्राकडे प्रत्यक्ष भेट देण्याची आवश्यकता उरणार नाही. ही माहिती संगणक केंद्राचे प्रभारी संचालक अभिजीत रेडेकर यांनी दिली आहे.

कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या निर्देशानुसार अभिजीत रेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाचे संगणक केंद्र आणि परीक्षा विभागाकडील आयटी कक्ष यांनी संयुक्तपणे काम करून ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे. या पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे पदवी प्रमाणपत्र, तात्पुरते पदवी प्रमाणपत्र, दुबार गुणतक्ता, उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र, रॅंक प्रमाणपत्र, गुणवत्ता प्रमाणपत्र आणि विशेष प्रमाणपत्र अशी सात प्रकारची कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची ऑनलाईन सुविधा विकसित करण्यात आली आहे. आतापर्यंत सदर सेवांसाठी विद्यापीठाच्या विद्यार्थी सुविधा केंद्रास प्रत्यक्ष भेट देऊन त्यासंबंधीचे अर्ज व पैसे भरावे लागत असत. या ऑनलाईन पोर्टलमुळे उपरोक्त सात सेवांसाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठात येण्याची आवश्यकता भासणार नाही.

या पोर्टलद्वारेच विद्यार्थ्यांना सदर दस्ताऐवजांसाठीचा अर्ज आणि पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सन २००५ पासून पुढे उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा पर्मनंट रजिस्ट्रेशन क्रमांक (पी.आर.एन.) आणि उत्तीर्ण झाल्याचे वर्ष इतक्या माहितीवर ऑनलाईन लॉगीन करता येऊ शकेल. सन २००५ पूर्वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मॅन्युअल फॉर्म भरावा लागणार असून तोही येथे उपलब्ध आहे. या मागील विद्यार्थ्यांच्या माहितीचा समावेश करण्याची प्रक्रियाही प्रगतीपथावर आहे.

सदर प्रणालीचे प्रमुख वैशिष्ट्य असे की, विद्यार्थ्यांना एकाच लॉगिनमधून सर्व दस्तावेजांकरिता अर्ज करण्याची तसेच, त्या सर्वांसाठी एकत्र ऑनलाइन पैसे भरण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. सदर प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या वेळेची व पैशाची बचत होणार आहे. सदर प्रणालीमध्ये Sukapps.unishivaji.ac.in/sfcapp/#/login या लिंकद्वारे प्रविष्ट होता येते. सदर प्रणाली तयार करण्यासाठी आशिष घाटे, शशिकांत हुक्केरी, विजय पाटील आणि सागर आंबेकर यांचे तांत्रिक सहाय्य लाभले आहे. 

या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार असल्याने संगणक केंद्रातील सर्व सहकारी अभिनंदनास पात्र असल्याची प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केली. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव आणि वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील यांनीही श्री. रेडेकर यांच्यासह सर्वांचे अभिनंदन केले.

 

Tuesday, 6 August 2024

जगावरील महायुध्दाचे विनाशकारी संकट टाळणे आवश्यक - डॉ.राजन पडवळ


कोल्हापूर, दि.6 ऑगस्ट - मानवाच्या कल्याणासाठी जगावरील महायुध्दाचे विनाशकारी संकट टाळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या बैंक ऑफ इंडिया चेअरचे समन्वयक डॉ.राजन पडळव यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आणि बैंक ऑफ इंडिया चेअर गुरूवर्य लक्ष्मणराव इनामदार सहकार प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये 'हिरोशिमा दिन' 'हिरोशिमावरील बॉम्बस्फोट आणि त्यामागील इतिहास' या विषयावर माहितीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी बैंक ऑफ इंडिया चेअर गुरूवर्य लक्ष्मणराव इनामदार सहकार प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक डॉ.पडवळ बोलत होते.अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के उपस्थित होते.प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांची विशेष उपस्थिती होती.

           डॉ.पडवळ पुढे म्हणाले,जपानच्या हिरोशिमावर 6 ऑगस्ट, 1945 साली मानवजातीवर पहिला अणुबौंम्ब टाकण्याचा विनाशकारी प्रयोग केला गेला.त्यानंतर, तीन दिवसांनी 9 ऑगस्टला दुसरा अणुबॉम्ब नागासाकीवर टाकला आणि युरोपपासून सुरू झालेल्या महायुध्दाचा प्रवास जपान पर्यंत येवून थांबला.पहिले महायुध्द 28 जुलै, 1914 ला सुरू झाले. आणि येथूनच म्हणजे पहिल्या महायुध्दामध्येच दुसऱ्या महायुध्दाची पाळेमुळे रोवली गेली.सव्वाचार वर्षे हे महायुध्द सुरू होते.सैबेरीयन नागरिकाने ऑस्ट्रेयीन नागरिकाची बोसनियामध्ये हत्या केली. बोसनिया आणि सैबेरिया एकत्र येवून युगोस्लाव्हीया देश निर्माण व्हावे म्हणून बोसनिया हा प्रदेश सैबेरियन प्रदेशाचा भाग असला पाहिजे असे हत्या करण्याऱ्या सैबेरीयन नागरिकाचा उद्देश होता.सैबेरियाने या हत्येबाबत माफी मागावी असे ऑस्ट्रीयाचे म्हणणे होते.यास सैबेरियाने नकार दिल्यानंतर युध्दास सुरूवात झाली.  रशिया हा सैबेरियाचा मित्र होता म्हणून रशियाने ऑस्ट्रीयावर हल्ला केला.फ्रान्स, ऑस्ट्रेया, जर्मनी यांचे नंतर ग्रेट ब्रिटनही या महायुध्दात सामील झाले.जर्मनीने बेल्जीयमवर हल्ला केला आणि ग्रेट ब्रिटनने जर्मनीवर हल्ला केला. युध्दाचे केंद्र बिंदू जर्मनी होते.त्यावेळच्या साम्राज्यशाहीमुळे महायुध्दास सुरूवात झाली.पहिल्या महायुध्दामध्ये ब्रिटनच्या बाजूने भारताकडून दहा लाख लोक युध्द लढले आणि एक लाख वीस हजार लोक मृत्युमुखी पडले.प्रमुख राष्ट्रांकडून आपल्या अधिपत्याखाली असलेले प्रदेश या युध्दामध्ये ओढले गेले आणि पहिल्या महायुध्दामध्ये तीन कोटी सत्तर लाख लोख बाधित झाले. त्यापैकी एक लाख सत्तर हजार लोक मरण पावले.पहिल्या महायुध्दा नंतर युरोपचा नकाशा बदलला आणि युगोस्लाव्हीया हा देश अस्तित्वात आला.पुढे तह होवून जर्मनीस फार मोठी किंमत मोजावी लागली.युध्दामुळे सन 1920 ते 1930 या काळात जर्मनीमध्ये फार मोठी बेरोजगारी निर्माण झाल्याने जर्मन नागरिकांमध्ये असंतोष पेटत होता. 1933 मध्ये ॲडॉल्फ हिटलर पुढे आले.त्यांनी ज्यू लोकांचा मोठया प्रमाणावर नरसंहार केला.  जर्मनीने 1 सप्टेंबर, 1939 रोजी पोलंड बरोबर युद्धास सुरूवात केली आणि याच ठिकाणी दुसऱ्या महायुध्दाला सुरूवात झाली.अमेरिका पहिल्या महायुध्दापासून दुसऱ्या महायुध्दा पर्यंत सहभागी नव्हती.परंतु, दुसऱ्या महायुध्दामध्ये जपानने अमेरिकेवर हल्ला केला. ग्रेटर अशिया स्थापन करण्यासाठी जपानने 1931 साली नॉर्दर्न चायनावर हल्ला केला.जवळपासच्या सर्व बेटांवर जपानचे अधिराज्य गाजत होते.भारताचा प्रदेश काबीज करण्याचा जपानच्या राजाचा उद्देश होता.अमेरिकेने जपानवर काही निर्बंध घातली. जपानने पुढे मलेशिया, इंडोनेशिया आणि फिलिपीन्सचा प्रदेश काबीज करून घेतला.तो पर्यंत अमेरिका युध्दात प्रत्यक्ष सामील झाली नव्हती. जपानने, 7 डिसेंबर, 1941 साली अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या पर्ल हार्बर या बेटांवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला.या ठिकाणी हवाई बेटांचा समूह आणि अमेरिकेच्या नौदलाचे तळ होते. शांततेचे बोलणे सुरू असल्यामुळे अमेरिका गाफील होती. याच दरम्यान सहा विमान वाहतूक करणाऱ्या मोठया नौकांवर 350 विमाने लादून जपानने 7 डिसेंबरला पर्ल हर्बरवर हल्ला केला.183 विमाने सकाळी 6.05 वाजता आणि 8.30 वाजता उर्वरित विमानांनी हल्ला केला. या युध्दामध्ये अमेरिकेचे ॲरिओना या महाकाय युध्दनौकेसह 21 युध्द नौका हानीग्रस्त होवून बुडाले.पुढे अमेरिकेने टोकियोसह 66 मुख्य शहरांवर हल्ला चढविला.मॅनहटन या ठिकाणी महाकाय ॲटोंबॉम्ब तयार करण्यास सुरूवात झाली.पहिल्या ॲटोंबॉम्बची चाचणी घेतल्यानंतरयाचा वापर केला जावू नये असे प्रत्येक शास्त्रांचे म्हणणे होते.यामध्ये प्रचंड प्रमाणात विध्वंसक शक्ती होती.ज्या बेटावर याची चाचणी झाली तो बेट नष्ट झाला. कुठल्याही परिस्थितीमध्ये जपानवर सुड उगविण्याची मानसिकता अमेरिकेची झालेली होती. त्यामधूनच हिरोशिमा आणि नागासाकीवर अनुक्रमे लिटल बॉय आणि फॅटमॅन या अजस्त्र अणुबॉम्बचा वापर केला गेला.

यावेळी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये बोलताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के म्हणाले, पहिल्या आणि दुसऱ्या महायुध्दामध्ये मोठया प्रमाणात सैनिकांबरोबरच सामान्य नागरिकांनाही याची झळ बसली. महायुध्दामध्ये बेचिराख झालेल्या जपानने आज फिनिक्स पक्षाप्रमाणे नवीन उभारी घेतलेली आहे.

याप्रसंगी पर्ल हर्बरवरील हल्ल्याची हिरोशिमा आणि नागासाकीवरील हल्ल्याची संग्रहीत चित्रफीत दाखविण्यात आली.

यावेळी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.प्रकाश गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.  विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विलास शिंदे, आजीवन अध्यासन कंेद्राचे संचालक डॉ.रामचंद्र पवार यांचेसह शिक्षक, प्रशासकीय सेवक, नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.

_______