Wednesday, 11 September 2024

परीघाबाहेरील वंचित विद्यार्थ्यांसाठी सागर बगाडे यांचे कार्य महत्त्वाचे: कुलगुरू डॉ. शिर्के

 

राष्ट्रपती पुरस्कार विजेते कलाशिक्षक सागर बगाडे यांचा शिवाजी विद्यापीठाच्या वतीने सत्कार करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत (डावीकडून) प्रभाकर हेरवाडे, डॉ. तानाजी चौगुले, प्राचार्य सूर्यकांत चव्हाण, डॉ. महादेव देशमुख, डॉ. वैभव ढेरे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. सुहासिनी पाटील, डॉ. अजितसिंह जाधव, डॉ. शिवाजी जाधव आणि डॉ. आलोक जत्राटकर.


कोल्हापूर, दि. ११ सप्टेंबर: सागर बगाडे यांनी परीघाबाहेरील वंचित विद्यार्थ्यांसाठी चाकोरीबाहेर जाऊन महत्त्वाचे शैक्षणिक, सांस्कृतिक कार्य केले. त्याची पोचपावती त्यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराद्वारे मिळाली आहे, असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे काढले.

कोल्हापूर येथील कलाशिक्षक सागर बगाडे यांना नुकताच नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आदर्श शिक्षक म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्त आज शिवाजी विद्यापीठ परिवाराच्या वतीने श्री. बगाडे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, कोल्हापूरच्या शिक्षकाला राष्ट्रीय पुरस्कार मिळून सोळा वर्षे लोटली. त्यानंतर हा पुरस्कार बगाडे यांना मिळाला. तथापि, देशात कलाशिक्षकाला हा पुरस्कार प्राप्त होण्याचा हा दुर्मिळ प्रसंग आहे, म्हणूनच तो महत्त्वाचा आहे. बगाडे यांनी कोल्हापूरच्या सामाजिक, सांस्कृतिक वर्तुळात वावरत असताना केवळ कलाशिक्षक म्हणून न वावरता जबाबदार नागरिकाची भूमिका निभावली. सातत्याने परीघाबाहेरील वंचित विद्यार्थ्यांचा विचार केला. ते एक जाणिवासमृद्ध शिक्षक तर आहेतच, शिवाय त्यांची सामाजिक बांधिलकी उच्च कोटीची आहे. करवीरनगरीचे कलानगरी हे नामाभिधान सार्थ ठरविताना त्यावर या पुरस्काराच्या रुपाने राजधानी दिल्लीची मोहोर उमटविण्यात बगाडे यशस्वी झाले आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या विविध उपक्रमांशी ते जोडलेले आहेतच. यापुढील काळातही त्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमांना विद्यापीठाचे सर्वोतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली.

सत्काराला उत्तर देताना सागर बगाडे म्हणाले, आयुष्यामध्ये कोणतेही काम पुरस्कारासाठी केले नाही. या पुरस्काराचा अर्जही माझ्या विद्यार्थ्यांनी भरला. आता हा पुरस्कार मिळाल्यामुळे जबाबदारीची जाणीव अधिक तीव्र झाली आहे. येथून पुढील काळातही निरपेक्ष भावनेने आणि स्वान्तसुखाय काम करीत राहायचे आहे. भावी काळात काही शैक्षणिक प्रकल्पांवर काम करणार आहे. त्याला शिवाजी विद्यापीठाचे पाठबळ लाभावे, तसेच विद्यापीठाने शालेय विद्यार्थ्यांसाठी संस्कृती संवर्धन निवासी शिबिरे घेण्याबाबत विचार करावा, असेही त्यांनी सुचविले.

यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते श्री. बगाडे यांचा शाल, श्रीफळ, ग्रंथभेट आणि अभिनंदन पत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे त्यांच्या पाठीशी उभे राहणारे न्यू एज्युकेशन सोसायटीचे प्रभाकर हेरवाडे आणि प्राचार्य सूर्यकांत चव्हाण यांचाही ग्रंथभेट देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजी जाधव, उपकुलसचिव डॉ. वैभव ढेरे उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.


मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांनी घेतली मुलाखत 

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते सागर बगाडे यांची त्यांच्या वाटचालीविषयी आणि कार्याविषयी शिवाजी विद्यापीठाच्या एम.ए. मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांनी विशेष मुलाखत घेतली आहे. ती सर्वांना https://youtu.be/GZY4aRwZh2o?si=yvX9kDAeKTU_YNRS या लिंकवर जाऊन पाहता येईल. 


शिवाजी विद्यापीठात १३पासून खगोलशास्त्रावरील राष्ट्रीय कार्यशाळा

गुरुत्वाकर्षण तरंगांवरील संशोधनाच्या नव्या दिशांविषयी होणार चर्चा 

प्रा. (डॉ.) आर. श्रीआनंद, संचालक, आयुका, पुणे


कोल्हापूर, दि. ११ सप्टेंबर: शिवाजी विद्यापीठात खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्रातील समकालीन समस्या-२०२४ या महत्त्वपूर्ण विषयावर येत्या १३ ते १५ सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. विद्यापीठाचा भौतिकशास्त्र अधिविभाग, पुणे येथील आयुका (इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या परिषदेचे उद्घाटन १३ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता आयुकाचे संचालक प्रा. (डॉ.) आर. श्रीआनंद यांच्या हस्ते आणि कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली होईल. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित असतील, अशी माहिती अधिविभाग प्रमुख डॉ. राजेंद्र सोनकवडे यांनी दिली आहे.

डॉ. सोनकवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकीच्या सतत विस्तारणाऱ्या संशोधनाच्या क्षेत्रामध्ये लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल-वेव्ह ऑब्झर्व्हेटरी (लिगो) हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुरुत्वाकर्षणाचे तरंग शोधण्यासाठी समर्पित असा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे विश्वातील कृष्णविवरांच्या आणि न्युट्रॉन ताऱ्यांच्या टक्करांसारख्या महत्त्वाच्या घटनांचा अभ्यास करता येतो. या अनुषंगाने सदर राष्ट्रीय परिषदेत चर्चा होईल. परिषदेत गुरुत्वाकर्षण तरंगलहरींच्या अनुषंगाने आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनाची माहिती दिली जाईल. राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षकांसह आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञही यात सहभागी होणार आहेत.

१४ सप्टेंबर हा दिवस गुरुत्वाकर्षण लहरींच्या संशोधनातील महत्त्वाचा टप्पा असल्याने लिगो दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर सदर परिषद होत असून तिचे प्रमुख उद्दिष्ट हे विद्यार्थी, संशोधक आणि तरुण-शास्त्रज्ञांना खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्रातील अत्याधुनिक विषयांमध्ये सखोल अभ्यासासाठी व्यासपीठ प्रदान करणे हे आहे. परिषदेत गुरुत्वाकर्षण लहरी, लिगो-इंडियाच्या सहयोगाशिवाय इस्रोच्या आदित्य-L1 मोहिमेवरील सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप (SUIT), एस्ट्रोसॅट आणि संक्षिप्त ताऱ्यांचे भौतिकशास्त्र आदी विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.

परिषदेत बिट्स पिलानी, हैदराबाद, सरदार वल्लभभाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सुरत, भूपेंद्र नारायण मंडळ विद्यापीठ, मधेपुरा, बिहार, बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रांची, झारखंड, बर्दवान विद्यापीठ, पश्चिम बंगाल, गुजरात विद्यापीठ, तिरुवरूर विद्यापीठ, तमिळनाडू यासह देशभरातील विविध  नामांकित शैक्षणिक संस्थांमधील शंभरहून अधिक संशोधक सहभागी होणार आहेत. या कार्यशाळेचा सर्व संशोधकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सोनकवडे यांनी केले आहे.

काय आहे लिगो’?

लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल-वेव्ह ऑब्झर्व्हेटरी (लिगो) हा प्रकल्प अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ किप थॉर्न आणि रेनर वेइस यांनी प्रथम प्रस्तावित केला. एकविसाव्या शतकातील हा सर्वात महत्त्वाचा वैज्ञानिक प्रकल्प असून  लिगोने  गुरुत्वाकर्षण लहरींना शोधून खगोल भौतिकशास्त्रात क्रांती घडवून आणली. या लहरींचे भाकीत प्रख्यात वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाईन यांनी सन १९१५ मध्येच प्रथम केले होते. १४ सप्टेंबर २०१५ रोजी लिगोने १.३ अब्ज प्रकाश-वर्षे दूर असलेल्या कृष्णविवराच्या विलीनीकरणातून गुरुत्वीय लहरी शोधून काढल्या आणि आइन्स्टाईनचे भाकित खरे असल्याचे सिद्ध केले. हा विज्ञानाच्या क्षेत्रातील एक महत्त्वाचा इतिहास ठरला.


Thursday, 5 September 2024

शिवाजी विद्यापीठामध्ये चक्रधर स्वामी जयंती उत्साहात

 


कोल्हापूर, दि.05 सप्टेंबर - भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांची जयंती शिवाजी विद्यापीठात आज उत्साहात साजरी करण्यात आली.


विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के यांच्या हस्ते भगवान सर्वज्ञ श्री. चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.यावेळी वित्त लेखाधिकारी डॉ.सुहासिनी पाटील, आजीवन अध्ययन विस्तार विभागाचे संचालक डॉ.रामचंद्र पवार, सूक्ष्मजीवशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ.पी.एम.गुरव, डॉ.एन.एच.नदाफ, पदार्थविज्ञान विभागप्रमुख डॉ.राजेंद्र सोनकवडे, डॉ.के.वाय.राजपुरे, डॉ.आर.एस.व्हटकर, डॉ.एन.व्ही.मोहळकर, एन.एम.नाईक, एच.बी.कांबळे यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.

-----

Wednesday, 4 September 2024

‘डॉ. आर.व्ही. भोसले स्मृती पारितोषिका’साठी

शिवाजी विद्यापीठास दीड लाख रुपयांची देणगी

 

डॉ. आर.व्ही. भोसले स्मृती पारितोषिकासाठी दीड लाख रुपयांचा निधी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे सुपूर्द करताना श्रीमती विजया भोसले. सोबत (डावीकडून) पंजाबराव भोसले, डॉ. विजय मारुलकर, शिवप्रकाश भोसले, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व प्राचार्य शशिकांत शिंदे.


कोल्हापूर, दि. ४ सप्टेंबर: जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. राजाराम विष्णू तथा आर. व्ही. भोसले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शैक्षणिक पारितोषिक देण्यासाठी त्यांच्या पत्नी श्रीमती विजया भोसले यांनी शिवाजी विद्यापीठास काल दीड लाख रुपयांची देणगी दिली. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे त्यांनी धनादेश सुपूर्द केला.

शिवाजी विद्यापीठाच्या खगोलशास्त्र विभागाचे माजी प्रमुख असलेल्या डॉ. भोसले यांचे सन २०२०मध्ये वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे खगोलशास्त्रातील संशोधन जागतिक पातळीवर मान्यताप्राप्त होते. भारताचा पहिला रेडिओस्कोप तयार करण्याची कामगिरी त्यांच्या नावावर आहे. शिवाजी विद्यापीठाचे पन्हाळा येथे अवकाश संशोधन केंद्र व्हावे, यासाठी डॉ. भोसले यांचा पाठपुरावा महत्त्वाचा ठरला. डॉ. भोसले यांच्या स्मृती शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून चिरंतन राहाव्यात, यासाठी त्यांच्या पत्नी श्रीमती विजया भोसले यांनी पदार्थविज्ञान विभागातील एम.एस्सी. भाग-२ खगोलविज्ञान या विषयात प्रथम आणि द्वितिय येणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनीस डॉ. राजाराम वि. भोसले स्मृती पारितोषिक देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी दीड लाख रुपयांची देणगी त्यांनी आज कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याकडे सुपूर्द केली. या प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह प्राचार्य शशिकांत शिंदे, पंजाबराव भोसले, डॉ. विजय मारुलकर आणि शिवप्रकाश भोसले उपस्थित होते.

 

Saturday, 31 August 2024

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या झंझावातात खऱ्या बुद्धिमत्तेचा ऱ्हास चिंताजनक: डॉ. शिरीष शेवडे

 विद्यापीठात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट केंद्राचे उद्घाटन


शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना बेंगलोरचे प्राध्यापक डॉ. शिरीष शेवडे. मंचावर (डावीकडून) प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि डॉ. शशीभूषण महाडिक.


कोल्हापूर, दि. ३१ ऑगस्ट: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या झंझावातामध्ये मानवाच्या खऱ्या बुद्धिमत्तेचा ऱ्हास होत जाणे चिंताजनक आहे, असे प्रतिपादन बेंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे प्राध्यापक डॉ. शिरीष शेवडे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागामध्ये नव्याने स्थापन करण्यात येत असलेल्या सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या केंद्राचे उद्घाटन डॉ. शेवडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानिमित्ताने आयोजित विशेष व्याख्यानात ए.आय. ते जेन-ए.आय.: संधी आणि आव्हाने या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

डॉ. शेवडे म्हणाले, तंत्रज्ञानावर विसंबून राहण्याचे प्रमाण सार्वत्रिकरित्या वाढले आहे. हे खूप धोकादायक आहे. तंत्रज्ञान हे मानवी बुद्धीला सहाय्यभूत स्वरुपाचे आहे, त्याला तसेच राहू द्यावे. तंत्रज्ञानाच्या आहारी जाणे योग्य नाही. चॅटजीपीटीसारखे जनरेटिव्ह ए.आय. अनेकदा आपल्याला चुकीची माहिती पुरविते आणि त्या माहितीचे समर्थनही करते. वापरकर्त्याला जर ही माहिती चुकीची असल्याचे ठाऊक नसेल, तर पुन्हा दिशाभूल होऊ शकते. त्यामुळे ही सर्व माध्यमे अत्यंत काळजीपूर्वक आणि जबाबदारपूर्वक वापरावीत. सृजनशीलता हा यामधील अत्यंत कळीचा मुद्दा आहे.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विविध साधनांचे आपण केवळ वापरकर्ते बनून न राहता सर्जक निर्माते बनणे आवश्यक आहे. या सर्व बाबी इतक्या गतीने बदलत आहेत की विद्यार्थ्यांना, वापरकर्त्यांना त्या गतीनुसार अगदी दररोज बदलावे लागेल. त्यासाठी सातत्याने नवनवीन बाबी शिकत राहणे आणि विश्लेषणाची सवय लावून घेणे फार महत्त्वाचे आहे. समाजाला भेडसावणाऱ्या विविध प्रकारच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी या नवतंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांनी वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी संख्याशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. शशीभूषण महाडिक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. सुकुमार राजगुरू यांनी आभार मानले. कार्यक्रमास ज्येष्ठ संख्याशास्त्रज्ञ डॉ. आर.एन. रट्टीहाळी, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. सरिता ठकार, इनोव्हेशन, इनक्युबेशन केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर, डॉ. कविता ओझा, डॉ. सोमनाथ पवार यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Friday, 30 August 2024

नवनिर्मितीच्या शक्यता जिज्ञासेतूनच साकार: प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील

सांगलीतील उद्योजकता विकास कार्यशाळेस उत्साही प्रतिसाद


सांगली येथे शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित उद्योजकता विकास कार्यशाळेत बोलताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील


सांगली/कोल्हापूर, दि. ३० ऑगस्ट: उद्योग-व्यवसाय निर्मिती आणि विकासामध्ये जिज्ञासा महत्त्वाची भूमिका बजावते. जिज्ञासेतूनच नवनिर्मितीच्या शक्यता पुढे येतात, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद पाटील यांनी आज सांगली येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचे सामाजिक वंचितता व सामवेशक धोरण अभ्यास केंद्र व यलो सिटी आंत्रप्रिन्युअरशिप फोरम, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उद्योजकता विकास आणि युवकया कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. दीपस्तंभ सांस्कृतिक भवन येथे झालेल्या या कार्यक्रमास वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता तथा केंद्र संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन प्रमुख उपस्थित होते. या कार्यशाळेला नवउद्योजक, व्यावसायिकांसह स्थानिक विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्साही प्रतिसाद लाभला.

प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, युवकांना जो उद्योग अथवा व्यवसाय सुरु करावयाचा आहे, त्याचा परिपूर्ण अभ्यास करून ज्ञान मिळवावे. आपापल्या क्षेत्रातील नवीन कल्पना व संशोधनाद्वारे स्वतला अद्ययावत करीत राहावे. ग्रामीण भागातील विद्यार्थी व युवकांच्या व्यावसायिक क्षमता वाढविण्यासाठी विद्यापीठ कटीबद्ध असून महिलांनीही उद्योजक बनण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या आसपासच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घ्या. त्यामुळे व्यवसाय व उद्योगाची वृद्धी होईल.

कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात युवा उद्योजकता विकास आणि पालकत्वया विषयावर डॉ. सुहास खामले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. जगन कराडे अध्यक्षस्थानी होते. दुसऱ्या सत्रात ऍड. पिराजी मिठारे यांनी बँकिंग संबंध व कागपत्रे आणि युवा उद्योजकया विषयावर मार्गदर्शन केले. कुंदन शिनगारे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. तिसऱ्या सत्रात अविनाश भाले यांनी उद्योजकता विकासातील परस्पर संबंध या अनुषंगाने सहभागी युवा उद्योजकांना मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या समारोपाला सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर डॉ. श्रीकृष्ण महाजन अध्यक्षस्थानी होते. कार्यशाळेस सांगली जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, विविध क्षेत्रांत काम करणारे युवा उद्योजक आणि व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Thursday, 29 August 2024

सामाजिक न्यायासक्त समाजनिर्मितीबाबत शाहू महाराज दृढनिश्चयी: डॉ. अरूण भोसले

 शिवाजी विद्यापीठात राजर्षी शाहू छत्रपती विचारवेध ग्रंथाचे प्रकाशन

शिवाजी विद्यापीठात डॉ. अवनीश पाटील संपादित 'राजर्षी शाहू छत्रपती विचारवेध' या ग्रंथाचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. अशोक चौसाळकर, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. अरूण भोसले व डॉ. अवनीश पाटील.


शिवाजी विद्यापीठात डॉ. अवनीश पाटील संपादित 'राजर्षी शाहू छत्रपती विचारवेध' या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना डॉ. अरुण भोसले.

शिवाजी विद्यापीठात डॉ. अवनीश पाटील संपादित 'राजर्षी शाहू छत्रपती विचारवेध' या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना डॉ. अशोक चौसाळकर. मंचावर (डावीकडून) प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. अरुण भोसले व डॉ. अवनीश पाटील.




कोल्हापूर, दि. २९ ऑगस्ट: समताधिष्ठित आणि सामाजिक न्यायासक्त समाजनिर्मिती करण्याबाबत दृढनिश्चयी असणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे स्वतंत्र प्रज्ञेचे राजपुरूष होते, असे गौरवोद्गार इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. अरूण भोसले यांनी आज येथे केले.

राजर्षी शाहू छत्रपती शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग, समाज प्रबोधन पत्रिका आणि शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आज डॉ. अवनीश पाटील संपादित राजर्षी शाहू छत्रपती विचारवेध या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. मानव्यशास्त्र सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर प्रमुख उपस्थित होते.

डॉ. भोसले म्हणाले, एतद्देशीय समाजातील पिढ्यानपिढ्यांची शोषण परंपरा नष्ट करून समताधारित समाज घडविण्याचा निर्धार राजर्षी शाहू महाराजांनी केलेला होता. बहुजनांच्या अगतिकतेवर शिक्षण हीच मात्रा आहे, या विषयी त्यांच्या मनात तीळमात्र शंका नव्हती. सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी त्यांनी सर्वोतोपरी प्रयत्न केले. त्याद्वारे त्यांना पुरोगामी सामाजिक बदल अपेक्षित होते. तथापि, शाहू महाराजांच्या विचारवारशाशी आपण नाते जपले आहे का, ते नाते विसरण्याचा द्रोह कोणी केला, या प्रश्नांची उत्तरे शोधून महाराजांच्या स्वप्नातील मराठी मुलूख अस्तित्वात आणण्याची जबाबदारी आजच्या समाजाने घ्यायला हवी, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. अवनीश पाटील यांनी संपादित केलेला हा ग्रंथ अत्यंत मौलिक स्वरुपाचा असून अनेकार्य़ांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. राजर्षी शाहूंविषयी संशोधन करणाऱ्या संशोधकांच्या तीन पिढ्यांचे लेखन या ग्रंथात समाविष्ट आहे, ही बाब अत्यंत महत्त्वाची असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.

समाज प्रबोधन पत्रिकेचे संपादक तथा ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले, शाहू महाराजांना समर्पित समाज प्रबोधन पत्रिकेचा विशेषांक काढला होता. तथापि मासिकांचे आयुर्मान आणि वाचक मर्यादित असतात. त्यामुळे या विशेषांकाचे ग्रंथरुपांतरण करण्यात आले. पत्रिकेमध्ये आलेले लेखन चिरस्थायी करण्याच्या दृष्टीने हे ग्रंथरुप महत्त्वाचे आहे. शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेनंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात राजर्षी शाहू महाराजांच्या संदर्भातील पुनरुज्जीवन घडून आले, ही वस्तुस्थिती आहे. प्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार, डॉ. विलास संगवे यांनी त्यांच्याबाबत मूलभूत स्वरुपाचे संशोधनकार्य उभे केले. यापुढील काळातही महाराजांच्या विचारकार्याच्या विविध पैलूंच्या अनुषंगाने नवसंशोधन व्हावे. आपत्ती व्यवस्थापन, प्रशासकीय सुधारणा, ब्राह्मणेतर चळवळीचे पुनरुज्जीवन आदी विषयांच्या अनुषंगाने हे संशोधन व्हावे, यासाठी शिवाजी विद्यापीठाने जबाबदार भूमिका बजावावी, असेही त्यांनी सूचित केले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, सदर ग्रंथात ज्येष्ठ इतिहास संशोधकांबरोबर नवसंशोधकांच्या लेखनाचा समावेश होणे ही वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. शाहूकार्यामागील त्यांच्या विचारांचा वेध घेणारा महत्त्वाचा ग्रंथ त्यातून साकारला आहे. महाराजांच्या विचारकार्यामधील सर्जनशीलता, प्रयोगशीलता, अभिनव उपक्रमशीलता आणि गतिमानता या गुणविशेषांचा अभ्यास करून त्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. शिक्षण, औद्योगिक व्यवस्थापन आदी अंगांनीही शाहूकार्याचा वेध घेण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते राजर्षी शाहू छत्रपती विचारवेध या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. इतिहास अधिविभागाचे प्रमुख तथा संपादक डॉ. अवनीश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. दत्तात्रय मचाले यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. टी.एस. पाटील, डॉ. भारती पाटील, डॉ. केशव हरेल, डॉ. ईस्माईल पठाण, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. शरद गायकवाड, डॉ. भारतभूषण माळी, डॉ. सुरेश शिखरे, डॉ. प्रभंजन माने, डॉ. अक्षय सरवदे आदी उपस्थित होते.