Monday, 24 February 2025

देशभरातल्या लोकवाद्यांनी निनादले शिवाजी विद्यापीठ

वाद्यमहोत्सवाला विद्यार्थी, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद



शिवाजी विद्यापीठाच्या वाद्यमहोत्सवाचे हलगी वाजवून उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. यावेळी डॉ. नितीन कांबळे, डॉ. महादेव देशमुख, डॉ. तानाजी चौगुले, डॉ. विनोद ठाकूरदेसाई



शिवाजी विद्यापीठातील वाद्यमहोत्सवात तिबेटियन गाँगमधून स्वरतरंग निर्माण करून पाहताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत उपस्थित रसिक नागरिक





(फोटोओळ- उपरोक्त पाच फोटोंसाठी) शिवाजी विद्यापीठातील वाद्यमहोत्सवांतर्गत ठिकठिकाणी सुरू असलेल्या वादनाचा आस्वाद घेताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्यासह उपस्थित रसिक नागरिक

(शिवाजी विद्यापीठ वाद्यमहोत्सवाचा व्हिडिओ)


कोल्हापूर, दि. २४ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठात विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने सुरू असलेल्या तीनदिवसीय शिवस्पंदन महोत्सवात आज (दि. २४) दुसऱ्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या वाद्य महोत्सवामुळे विद्यापीठ परिसर विविध लोकवाद्यांच्या सूरतालांनी निनादला. ज्या वाद्यांचा आवाज आणि संगीत केवळ ध्वनीफीती अथवा चित्रपटांमधूनच कानी पडतात, अशा वाद्यांना प्रत्यक्ष पाहण्याची आणि ऐकण्याची संधी यामुळे नागरिकांना लाभली. या लोकवाद्य वादन कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शविली आणि त्याचा आनंद लुटला.

गतवर्षी भारताच्या स्वातंत्र्यास ७५ वर्षे पूर्ण होत असताना देशभरातील लोकवाद्यांचे वादन आणि प्रदर्शन शिवाजी विद्यापीठात आयोजित करण्याचा कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांचा मानस होता. त्यांच्याच संकल्पनेतून गतवर्षीपासून या लोकवाद्य महोत्सव व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. आज सकाळी ७.३० ते ९.३० वा. या कालावधीत हा लोकवाद्य वादन महोत्सव साजरा झाला. या उपक्रमांतर्गत देशाच्या चार दिशांकडील राज्यांतील वाद्ये विद्यापीठ परिसराच्या चार दिशांना वाजविण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील परिसरात सकाळी साडेसात वाजता कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी हलगी वाजवून या उपक्रमाचे सांगितिक उद्घाटन केले. त्याखेरीज कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यासमोरील परिसर, संगीत व नाट्यशास्त्र विभागाशेजारील तलाव आणि क्रांतीवन या ठिकाणीही विविध वाद्यांचे वादन करण्यात आले. सर्व मान्यवरांनी संयोजन समितीच्या सदस्यांसह सदर सादरीकरणांचा आस्वाद घेतला आणि वादक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. या सर्व लोकवाद्यांचे सायंकाळी राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात प्रदर्शनही मांडण्यात आले. त्यामध्ये प्रत्येक वाद्याची माहिती देण्यात आली. ऋषीकेश देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन शिंदे, कौस्तुभ शिंदे, अभय हावळ, अनिकेत देशपांडे, प्रेम भोसले, ओम शिंदे, सुमंत कुलकर्णी, मयुरेश शिखरे, तेजस गोविलकर, सौरभ आदमाने यांनी या विविध वाद्यांचे सादरीकरण केले. संयोजन समितीच्या सर्व सदस्यांनी उपक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात प्राणीशास्त्र अधिविभाग सभागृहात शिवस्पंदन महोत्सवातील मूकनाट्य, नकला आणि लघुनाटिका स्पर्धा पार पडल्या. त्यानंतर दुपारच्या सत्रात शिक्षक, प्रशासकीय सेवक यांचाही सांस्कृतिक कार्यक्रम राजर्षी शाहू सभागृहात रंगला.

भारतीय संगीत परंपरेच्या परिचय व संवर्धनासाठी उपक्रम

शिवाजी विद्यापीठाने देशाच्या विविध प्रांतात, राज्यांत वाजविल्या जाणाऱ्या लोकवाद्यांचा महोत्सव आयोजित करून त्यांचे वादन आणि प्रदर्शन या माध्यमातून भारतीय संगीत परंपरेचा आपल्या विद्यार्थी व नागरिकांना परिचय व संवर्धन करण्यासाठी गतवर्षीपासून या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. लोकांचाही त्याला उत्तम प्रतिसाद लाभतो आहे, ही बाब उत्साहवर्धक असल्याचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले.

यावेळी अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. तानाजी चौगुले, समन्वयक डॉ. नितीन कांबळे, डॉ. मीना पोतदार, डॉ. विनोद ठाकूरदेसाई, डॉ. के.डी. कुचे, डॉ. एस.टी. कोंबडे आदींसह संगीतरसित मोठ्य़ा संख्येने उपस्थित होते.

या लोकवाद्यांचे झाले वादन

शिवाजी विद्यापीठात आयोजित लोकवाद्य वादन व प्रदर्शनात पुढील वाद्यांचा समावेश राहिला. ढोलकी, ढोल, दिमडी, चौंडके, हलगी, संबळ, घुमके, थविल, चेंडा, इडक्का, कोट्टू, मुरासू, थमारू, पंबई ईसाई, उरुमी, उडुक्काई, मोडा, पराई, पंजाबी ढोल, चिमटा, टोका, कैची, दद्द, बुगचू, तुंबी, ढोलक, भपंग, खोळ, मोंडल, एकतारी, खमख, बिहू ढोल, तिबेटियन गाँग, बडुंगदुप्पा, पेपा, गोंगना ही देशाच्या विविध प्रांतात वाजविली जाणारी वाद्ये वाजविण्यात आली.

 महोत्सवात उद्या...

उद्या, मंगळवारी (दि. २५) शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सवाचा अखेरचा दिवस असून राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात एकल नृत्य, समूह नृत्य स्पर्धा होतील. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ होईल.


Sunday, 23 February 2025

शिवाजी विद्यापीठात ‘शिवस्पंदन’ला शोभायात्रेने जल्लोषी प्रारंभ

राजमाता जिजाऊंसह छत्रपती शिवराय, शाहू महाराज, लता मंगेशकर, बाबूराव पेंटर अवतरले

शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सवाचे नटराजाच्या मूर्तीस पुष्प वाहून उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. तानाजी चौगुले, डॉ. नितीन कांबळे आदी


शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात बोलताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के.

शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात बोलताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. मंचावर (डावीकडून) डॉ. नितीन कांबळे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. तानाजी चौगुले आणि डॉ. मीना पोतदार.

शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन महोत्सवाच्या शोभायात्रेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. प्रकाश गायकवाड यांच्यासह डॉ. नितीन कांबळे, शाहीरविशारद डॉ. आझाद नायकवडी, डॉ. मीना पोतदार आणि संयोजन समितीचे सदस्य.




फोटोओळ (उपरोक्त तीन फोटोंसाठी)- शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन महोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत ऐतिहासिक तसेच प्रसिद्ध व्यक्तीमत्त्वांच्या वेशभूषेत सहभागी झालेले विद्यार्थी-विद्यार्थिनी

शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन महोत्सवात गुजराती नृत्य सादर करताना विद्यार्थिनी

शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन महोत्सवात महाराष्ट्रातील फुगडीसह पारंपरिक नृत्य सादर करताना विद्यार्थिनी




फोटोओळ (उपरोक्त तीन फोटोंसाठी)- शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन महोत्सवानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेत सहभागी विद्यार्थिनी

शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन महोत्सवात स्थळचित्रण काढताना विद्यार्थी.

(शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन व शोभायात्रा- व्हिडिओ)


कोल्हापूर, दि. २३ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सवाला आज सकाळी शोभायात्रेने मोठ्या जल्लोषाच्या वातावरणात प्रारंभ झाला. महोत्सवात विद्यापीठाच्या विविध अधिविभागांतील सुमारे ५०० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग दर्शविला आहे. या शोभायात्रेच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ साहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्यासह लता मंगेशकर, आशा भोसले, पंडित भीमसेन जोशी, तबलानवाज झाकीर हुसैन, बालगंधर्व, चित्रमहर्षी बाबूराव पेंटर, फाल्गुनी पाठक, राधाकृष्ण, वासुदेव, मीरा अशा व्यक्तीरेखाही पारंपरिक वेशभूषेद्वारे विद्यापीठात अवतरल्या.

आज सकाळी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शोभायात्रेस प्रारंभ करण्यात आला. विद्यार्थी विकास विभागाचे माजी संचालक डॉ. प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते शोभायात्रेचे उद्घाटन करण्यात आले.  मुख्य इमारतीपासून पुतळ्यास प्रदक्षिणा घालून प्राणीशास्त्र अधिविभागातील कार्यक्रम स्थळापर्यंत हलगी व ढोलताशाच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. मुख्य इमारतीसमोर सहभागी संघांनी आपापल्या विषयाच्या अनुषंगाने सादरीकरणही केले.

विविध अधिविभागांच्या संघांनी अतिशय कल्पकतेने प्रबोधनपर विषयांचे सादरीकरण शोभायात्रेद्वारे केले. यामध्ये संविधान एक है; सब के लिए सेफ है, ग्रामीण व कृषीसंस्कृतीचे दर्शन, चित्रपटाचे चित्रीकरण, बालमजुरी निर्मूलन, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आणि कर्करोग, योग-प्राणायामाचे महत्त्व, सामाजिक सलोखा, स्त्री भ्रूण हत्या निर्मूलन अशा अनेक विषयांवरील सादरीकरण शोभायात्रेदरम्यान करण्यात आले. राजस्थानी, बंगाली, जराती, पंजाबी वेशभूषेतील विद्यार्थिनींनी त्या त्या राज्यांतील पारंपरिक नृत्यांची झलक सादर केली. जोतिबाची सासनकाठीही नाचवण्यात आली. विविध गायक कलाकारांच्या वेशभूषेतील कलाकारांनी त्यांच्या गायन कलेचेही दर्शन घडविले. राम गणेश गडकऱ्यांच्या एकच प्यालामधील तळीरामही शोभायात्रेत अवतरला.

विद्यार्थ्यांनी कलागुणांबरोबरच संवादसंपन्न व्हावे: कुलगुरू डॉ. शिर्के

शोभायात्रेनंतर प्राणीशास्त्र अधिविभाग सभागृहात शिवस्पंदन महोत्सवाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांच्या विकासाबरोबरच संवादकौशल्याच्या वृद्धीकडेही जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. जे विद्यार्थी कलागुणसंपन्न असतात, ते सादरीकरण करतातच; पण, अंगी कला असूनही सादरीकरणाबाबत संभ्रमित असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आत्मविश्वास देऊन सामावून घेणे, हे शिवस्पंदनचे खरे प्रयोजन आहे.

प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, दर शंभर मैलांवर संस्कृती बदलते, पण मानवी जीवनमूल्ये मात्र कायम राहतात. ही मूल्ये टिकवून ठेवण्याची जबाबदारी नव्या पिढीवर आहे. विज्ञान आणि संस्कृती यांच्या मिलाफातून ही जीवनमूल्ये वृद्धिंगत करण्याविषयी कुतूहल असणे गरजेचे आहे. त्यातूनच नवनिर्मितीची शक्यता असते. भारताचे विविधतेतून एकतेचे मूल्य शिवस्पंदनसारख्या उपक्रमांतून अधोरेखित केले जाते.

यावेळी महोत्सवाचे समन्वयक डॉ. नितीन कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. मीना पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी आभार मानले. यावेळी क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, शाहीरविशारद आझाद नायकवडी, मनिषा नायकवडी, डॉ. मदनलाल शर्मा, डॉ. प्रल्हाद माने, डॉ. सुनील गायकवाड, डॉ. एस.आर. यन्कंची, डॉ. के.डी. कुचे, डॉ. विनोद ठाकूरदेसाई, डॉ. एस.एम. भोसले, डॉ. प्रतिभा देसाई, डॉ. कविता वड्राळे, डॉ. सुखदेव उंदरे, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. एस.टी. कोंबडे, डॉ. सुमेधा साळुंखे, संग्राम भालकर, दीपक बीडकर, विजय टिपुगडे, बबन माने, सुरेखा अडके आदींसह शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वच स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद

उद्घाटन समारंभानंतर प्राणीशास्त्र सभागृहात दिवसभर सुगम गायन, एकल लोकवाद्य वादन आणि समूहगीत स्पर्धा पार पडल्या. त्याचप्रमाणे रांगोळी आणि स्थळचित्रण स्पर्धा संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात पार पडल्या. या सर्वच स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

महोत्सवात उद्या...

उद्या, सोमवारी (दि. २४) सकाळी ७.३० वाजता वाद्यमहोत्सव साजरा करण्यात येईल. मुख्य इमारतीसमोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील परिसरात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या उपस्थितीत वाद्यमहोत्सवास प्रारंभ होईल. त्याखेरीज क्रांतीवन परिसर (गेट क्र. ८ जवळ), संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाशेजारील तलाव परिसर, कर्मवीर भाऊराव पाटील पुतळ्यासमोरील उद्यान या ठिकाणीही देशभरातील विविध लोकवाद्यांच्या वादनाचा रसिकांना आनंद घेता येईल. या दिवशी मूकनाट्य, नकला आणि लघुनाटिका या स्पर्धा प्राणीशास्त्र अधिविभाग सभागृहात होतील.

 


Saturday, 22 February 2025

शिवचरित्राच्या प्रेरणेतून राष्ट्रउभारणीस सिद्ध व्हावे: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

सांस्कृतिक कार्यक्रम, दीपोत्सवाने राष्ट्रीय एकात्मता शिबिराची विद्यापीठात सांगता

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय एकात्मता शिबिराच्या समारोप समारंभात बोलताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. समोर देशभरातून आलेले राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय एकात्मता शिबिराच्या समारोप समारंभात बोलताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. समोर देशभरातून आलेले राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक


शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय एकात्मता शिबिरात स्वयंसेवकांनी आपल्या सादरीकरणातून राष्ट्राला अभिवादन केले.

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय एकात्मता शिबिरात वीरभद्र नृत्य सादर करताना कलाकार विद्यार्थी

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय एकात्मता शिबिरात गोेव्याचे पारंपरिक नृत्य सादर करताना विद्यार्थी

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय एकात्मता शिबिरात पारंपरिक नृत्य सादर करताना कर्नाटक विद्यापीठाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय एकात्मता शिबिरात पारंपरिक नृत्यकला सादर करताना विद्यार्थिनी

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय एकात्मता शिबिराच्या निमित्ताने समारोपाच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला.

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय एकात्मता शिबिराच्या निमित्ताने समारोपाच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला.

(राष्ट्रीय एकात्मता शिबीर समारोप समारंभाची लघुचित्रफीत)



कोल्हापूर, दि. २२ फेब्रुवारी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्राचे वाचन करून नवयुवकांनी त्यापासून प्रेरणा घ्यावी आणि राष्ट्रउभारणीच्या कार्यामध्ये योगदान देण्यास सिद्ध व्हावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज केले.

शिवाजी विद्यापीठात १६ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या राष्ट्रीय एकात्मता शिबिराचा आज समारोप समारंभ झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. या शिबिरात महाराष्ट्रासह १२ राज्यांतील २१ विद्यापीठांतील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक सहभागी झाले. पुणे येथील राष्ट्रीय सेवा योजना प्रादेशिक संचालनालय आणि शिवाजी विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या शिबिराचा समारोप विविध राज्यांच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, दीपोत्सव आणि पारितोषिक वितरण आदी कार्यक्रमांनी झाला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रादेशिक संचालनालयाचे प्रादेशिक संचालक अजय शिंदे, यूथ ऑफिसर सुमंतकुमार यादव प्रमुख उपस्थित होते.

यावेळी अनेक सहभागी कार्यक्रम अधिकारी आणि स्वयंसेवक यांनी आपल्या मनोगतांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्यात सहभागी होता आले आणि त्यामुळे शिवाजी महाराजांविषयी अधिक जाणून घेता आले, याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. त्याचा धागा पकडून कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे राष्ट्र उभारणीतील योगदान, त्यांचा सर्वधर्मसमभाव, त्यांची सहिष्णु वृत्ती, सर्वांना समानतेची वागणूक देत स्वराज्यकार्यात सामावून घेण्याची वृत्ती, स्त्रियांप्रती आदरभाव या सर्व गोष्टी आपल्याला विकसित भारताची उभारणी करण्यासाठी प्रेरणादायी आणि आदर्शवत आहेत. हे आदर्श घेऊन भावी जीवनात वाटचाल केल्यास आपण आपल्या समाजाच्या आणि देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देऊ शकतो.

प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, एकमेकांशी निकोप स्पर्धा असणे आवश्यक असतेच, पण त्याहूनही सर्वांनी एकत्र येऊन जिंकण्यातील आनंद हा अधिक निर्मळ असतो. स्पर्धेपेक्षा सहकार्यशील वृत्तीला महत्त्व दिल्यास देशकार्य आणि मानवतावादाची सेवा करणे सहजशक्य आहे. संस्कृतीमधील प्रतीकांमागील वैज्ञानिक तथ्ये समजून घेण्याच्या अनुषंगानेही उपक्रम राबविण्याची आवश्यकता त्यांनी विषद केली.

यावेळी अजय शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुमंतकुमार यादव यांनी अहवाल सादरीकरण केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सहभागी विद्यापीठांच्या संघांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच, विविध स्पर्धांमधील विजेत्यांनाही पारितोषिके प्रदान करण्यात आली. डॉ. पी.एच. विद्यानंद, डॉ. के. सुखुना, डॉ. के. जयप्पा, डॉ. प्रदीप औसेकर, डॉ. कावेरी या विविध विद्यापीठांच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांसह शानूर शेख (गोवा), आदित्य कुमार (दिल्ली), गीतांजली मांगो (पश्चिम बंगाल), मोहिनी पटेल (गुजरात), काव्या (आंध्र प्रदेश) या स्वयंसेवकांनीही शिबिराच्या यशस्वी आयोजनाविषयी आपली मनोगते व्यक्त केली. शिवाजी विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी आभार मानले.

शिवाजी विद्यापीठाला दोन पारितोषिके

शिवाजी विद्यापीठाच्या स्वयंसेवकांना पारंपरिक वेशभूषेमध्ये द्वितिय आणि पोस्टर सादरीकरणामध्ये तृतीय क्रमांक मिळाला. पारंपरिक वेशभूषेत कोलकता येथील पश्चिम बंगाल विद्यापीठास प्रथम व भुवनेश्वर विद्यापीठ, ओडिशा यांना तृतीय क्रमांक मिळाला. पोस्टर सादरीकरणात पश्चिम बंगालला प्रथम आणि भारती विद्यापीठ, पुणे यांना द्वितिय क्रमांक मिळाला. समूह नृत्य स्पर्धेत जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठास प्रथम, धारवाडच्या कर्नाटक विद्यापीठास द्वितिय आणि केरळच्या तिरुअनंतपूरम विद्यापीठास तृतीय क्रमांक मिळाला.

सांस्कृतिक कार्यक्रम आणि दीपोत्सवाचा उत्साह

काल सायंकाळच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण आणि दीपोत्सवाने राष्ट्रीय एकात्मता शिबिरातील उपक्रमांची सांगता करण्यात आली. यावेळी विविध विद्यापीठाच्या स्वयंसेवकांनी आपापल्या राज्याच्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या एकल, समूह नृत्यांचे तसेच प्रबोधनपर लघुनाटिका, नकलांचे सादरीकरण केले. याला सर्वच राज्यांच्या स्वयंसेवकांचा मोठा उत्साही प्रतिसाद लाभला. त्यानंतर विद्यापीठ प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोर भारताच्या नकाशाची रांगोळी काढण्यात आली आणि त्याभोवती दीपांची आरास करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ. शिंदे, संचालक डॉ. चौगुले यांच्यासह अजय शिंदे, सुमंतकुमार यादव आणि कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक उपस्थित होते.

 

Friday, 21 February 2025

राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव: शिवाजी विद्यापीठाचा ऋषीप्रसाद देसाई स्पर्धेतील वेगवान धावपटू

राज्य आंतरविद्यापीठ स्पर्धेत सुवर्णपदकासह स्पर्धेतील वेगवान धावपटूचा किताब पटकावणारा शिवाजी विद्यापीठाचा ऋषीप्रसाद देसाई.




राज्य आंतरविद्यापीठ स्पर्धेत उंच उडीत सुवर्णपदक प्राप्त करणारी शिवाजी विद्यापीठाची समीक्षा अडसूळ.

गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठात सुरू असलेल्या राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत बास्केटबॉलच्या अंतिम फेरीत पोहोचलेला शिवाजी विद्यापीठाचा महिला बास्केटबॉल संघ.

(ऋषीप्रसाद देसाई याच्या १०० मीटर धावणे स्पर्धेतील सुवर्णपदक विजयाचा व्हिडिओ)


कोल्हापूर, दि. २१ फेब्रुवारी: महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करत विद्यापीठाच्या ऋषीप्रसाद देसाई याने स्पर्धेतील वेगवान धावपटूचा किताबही मिळविला. विद्यापीठाच्या 4X400 मीटर रिले पुरुष आणि महिला संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तसेच महिला बास्केटबॉल संघानेही अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठात १८ फेब्रुवारीपासून २६ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव सुरू आहे. या महोत्सवातील मैदानी स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या ऋषीप्रसाद देसाई याने १०० मीटर धावणे क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला. त्याने सुवर्णपदकासह या स्पर्धेतील वेगवान धावपटूचा किताब मिळवला. उंच उडीत समीक्षा अडसूळ हिने १.५५ मीटर उडी मारून सुवर्णपदक मिळवले. धैर्यशील गायकवाड याने २.०० मीटर उंच उडी मारून सुवर्णपदक तर अथर्व धज याने १.९० मीटर उडी मारून रौप्य पदक मिळवले. तितिक्षा पाटोळे हिने १०० मीटर धावण्यात तृतीय क्रमांक मिळविला.

गोळाफेकीत ऋषिकेश साखरे याने १५.३६ मीटर फेक करत द्वितीय क्रमांक मिळविला. प्रफुल्ल थोरात याने १४.५१ मीटर फेक करत तृतीय क्रमांक मिळविला. थाळीफेकीत निकिता शेवाळे हिने ३४.०२ मीटर फेक करत प्रथम क्रमांक मिळविला.

बॅडमिंटनमध्ये विद्यापीठाच्या मुलींच्या संघाने आज सकाळच्या सत्रात अमरावतीच्या संत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या संघावर २-० असा विजय मिळवला. त्यानंतर संध्याकाळच्या सत्रात मुंबईच्या डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठावर २-० असा विजय मिळवला. सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठावरही २-० असा विजय मिळवित उपांत्य फेरीत प्रवेश केला.

टेबल टेनिस (पुरुष) स्पर्धेमध्ये विद्यापीठाच्या संघाने बलाढ्य नागपूरच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ संघाला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. महिला बास्केटबॉल संघाने उपांत्य फेरीत मुंबई विद्यापीठावर ५१-३९ असा १२ गुणांनी विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला.

सर्व खेळाडूंना पथक प्रमुख डॉ. एन.डी. पाटील, प्रशिक्षक डॉ. सुनिल चव्हाण, डॉ. राजेंद्र रायकर, डॉ. संजय पाटील, डॉ. आकाश बनसोडे, डॉ. श्रीदेवी पवार, डॉ. गणेश सिंहासने, डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. रमेश पाटील, डॉ. संदीप पाटील, रुद्रेश शिवपूलजी आदींचे मार्गदर्शन लाभत आहे.

२.      

३.      

 

विसंगती टिपणे हे चांगल्या विनोदी लेखकाचे लक्षण: अभिनेते प्रसाद खांडेकर

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय एकात्मता शिबिरात बोलताना अभिनेते, दिग्दर्शक प्रसाद खांडेकर. मंचावर (डावीकडून) अभिनेता रोहित माने, निर्माते सुनील नारकर, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. अजय शिंदे व सुमंतकुमार यादव.

(कार्यक्रमाची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. २१ फेब्रुवारी: जीवनातील, मानवी वर्तनातील विसंगतीमधून विनोदाची निर्मिती होते. ही विसंगती नेमकेपणाने टिपणे हे चांगल्या विनोदी लेखकाचे लक्षण असते, असे लेखक, अभिनेते, दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांनी आज सांगितले.

शिवाजी विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या राष्ट्रीय एकात्मता शिबिरासाठी आलेल्या स्वयंसेवकांशी संवाद साधताना ते आज बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते. लेखक, अभिनेते प्रथमेश शिवलकर, रोहित माने यांच्यासह निर्माते-दिग्दर्शक सुनील नारकर यावेळी उपस्थित होते.

कोल्हापूरला अनेकदा आलो, पण यावेळी प्रथमच शिवाजी विद्यापीठात येत असल्याचा मोठा आनंद असल्याचे सांगून अभिनेते खांडेकर म्हणाले, चांगल्या विनोदनिर्मितीसाठी लेखक आणि अभिनेत्याकडे उत्तम निरीक्षणकला असावी लागते. त्यामधून माणसांचे वागणे, बोलणे, त्यांच्या लकबी इत्यादींचे त्याला ज्ञान होते. महत्त्वाचे म्हणजे या वागण्या-बोलण्यातली विसंगती टिपता आली पाहिजे. त्यातूनच चांगल्या विनोदाची निर्मिती होण्याची शक्यता वाढते. ते लेखनामध्ये उतरले की अभिनेत्यांनाही त्यावर काम करणे शक्य होते.

अभिनेते प्रथमेश शिवलकर म्हणाले, मी स्वतः विद्यार्थी जीवनात पाच वर्षे राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक होतो. अनेक राष्ट्रीय एकात्मता शिबिरांतही सहभागी झालो आहे. या शिबिरांनी माझ्यामध्ये मोठा आत्मविश्वास निर्माण केला. त्या बळावरच माझी अभिनय क्षेत्रातली वाटचाल सुरू आहे.

निर्माते-दिग्दर्शक सुनील नारकर म्हणाले, सुमारे ३८ वर्षे अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये राहिल्यानंतर आपण आपल्या मायभूमीचे, अभिजात मराठी भाषेचे काही देणे लागतो, या भावनेतून देशात परतलो असून त्या भावनेतून येथे चित्रपट निर्मिती करण्याचा निर्णय घेतला.

अध्यक्षीय मनोगतात कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, आपल्या हास्यमालिकेतील अनेक प्रहसनांमधून जीवनातील व्यंगांवर नेमकेपणाने बोट ठेवण्याचे काम ही सर्व अभिनेते मंडळी करीत आहेत. त्याचप्रमाणे दिवसभर काम करून श्रमलेल्यांना दोन घटका विरंगुळा देण्याचे फार महत्त्वाचे कामही त्यांच्या हातून होत आहे. त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्र त्यांचा ऋणी आहे.

यावेळी संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी स्वागत केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रादेशिक संचालक डॉ. अजय शिंदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. जी.के. कीर्दत यांनी आभार मानले. यावेळी केंद्रीय युवा मंत्रालयाचे यूथ ऑफिसर सुमंतकुमार यादव यांच्यासह एन.एस.एस.चे विविध राज्यांतील कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भूगोलाच्या क्षेत्रीय अभ्यासात आधुनिक तंत्रज्ञान अनिवार्य: डॉ. सचिन पन्हाळकर

 

शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागात जीआयएस प्रयोगशाळेत प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थिनी.

शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागात आयोजित कार्यशाळेत सहभागी शिक्षक आणि विद्यार्थिनी


कोल्हापूर, दि. २१ फेब्रुवारी: भूगोलाच्या अभ्यासकांच्या क्षेत्रीय अभ्यासात जी.आय.एस. आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानासह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब अनिवार्य आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागाचे प्रमुख डॉ. सचिन पन्हाळकर यांनी केले.

विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागाच्या वतीने भौगोलिक माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीशीलता या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा नुकतीच झाली. कार्यशाळेत कोल्हापूर जिल्ह्यातील न्यू कॉलेज, राजाराम महाविद्यालय, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय (वारणानगर) आणि श्री विजयसिंह यादव महाविद्यालय (पेठ वडगाव) या महाविद्यालयांच्या निवडक शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना आधुनिक जी.आय.एस. तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान आणि थ्रीडी- मॅपिंग आदी अत्याधुनिक संकल्पनांचा प्रात्यक्षिकांसह परिचय करून देणे या हेतूने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

डॉ. पन्हाळकर उद्घाटन सत्रात म्हणाले की, भूगोलाच्या विद्यार्थ्यांनी या आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. हे तंत्रज्ञानच भविष्यातील स्पर्धात्मक जगात अधिक संधी मिळवून देईल. त्या दृष्टीने सातत्याने नवतंत्रज्ञान आत्मसात करीत राहिले पाहिजे.

उद्घाटन सत्रात समन्वयक डॉ. अभिजीत पाटील यांनी जिओस्पॅशियल तंत्रज्ञानाच्या प्रभाव आणि संधी याविषयी माहिती दिली. त्यानंतर सर्व सहभागी विद्यार्थ्यांसाठी भूगोल अधिविभागातील जीआयएस प्रयोगशाळेत प्रत्यक्ष हाताळणी सत्र घेण्यात आले. यानंतर दिवसभर विविध सत्रांत वेब-जीआयएस, थ्रीडी-मॅपिंग, ड्रेन तंत्रज्ञान, थ्रीडी मॉडेलिंग, याविषयी डॉ. अभिजीत पाटील, डॉ. सुधीर पोवार, ओंकार बिद्रे यांनी मार्गदर्शन केले. समारोप सत्रात डॉ. राजेखान शिकलगार, डॉ. राजाराम पाटील, डॉ. दिनेश भंडारे, डॉ. एस. एस. टिकेकर आणि डॉ. एन. डी. काशीद-पाटील यांनी अनुभव व्यक्त केले.