Thursday, 18 September 2025

विद्यापीठात विद्यार्थी विकास विभागाच्या स्वतंत्र वसतिगृहाचे उद्घाटन



शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वसतिगृह इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले यांच्यासह उपस्थित मान्यवर.

(विद्यार्थी विकास विभाग वसतिगृह उद्घाटन कार्यक्रमाची लघुचित्रफीत)




कोल्हापूर, दि. १८ सप्टेंबर: विद्यार्थी विकास विभागासाठी स्वतंत्र वसतिगृह इमारतीच्या पूर्ततेमुळे विद्यार्थ्यांची अनेद दिवसांची मागणी मार्गी लावल्याचे समाधान वाटत आहे, अशी भावना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केली.

शिवाजी विद्यापीठात विविध महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी उपक्रमांसाठी संलग्नित महाविद्यालये आणि राज्यासह देशभरातील विविध विद्यापीठांतील विद्यार्थी येत असतात. या विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेसाठी स्वतंत्र इमारत असावी, अशी मागणी विद्यार्थ्यांतून होती. त्याची दखल घेत विद्यापीठाने विद्यार्थी विकास विभागासाठी स्वतंत्र वसतिगृह इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सदर इमारत बांधण्यात आली. आज कुलगुरू डॉ. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते तिचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी कुलगुरू बोलत होते.

ते म्हणाले, विद्यार्थी विकास विभागासाठी एक देखणी आणि आदर्श अशी वास्तू उभारली आहे. ती विद्यार्थ्यांना निश्चित आवडेल. येथील निवास आणि सराव त्यांना नेहमी स्मरणात राहील. विभागाचे माजी संचालक डॉ. राजाराम गुरव यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल त्यांचेही कुलगुरूंनी अभिनंदन केले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, वास्तुविशारद आदित्य बेगमपुरे, ठेकेदार संजय पाटील, आरसीसी कन्सल्टंट अभिजीत देशमुख, विद्युत कंत्राटदार राम खन्नुकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रघुनाथ ढमकले, स्वागत परुळेकर, डॉ. राजाराम गुरव, डॉ. गिरीष कुलकर्णी, उपकुलसचिव रणजीत यादव, अमित कांबळे, विजय पोवार, वैभव आर्डेकर, शिवकुमार ध्याडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी सर्वांचे आभार मानले.

इमारतीविषयी थोडक्यात...

सदर इमारतीच्या तळमजल्याचे काम पूर्ण झाले असून तिचे क्षेत्रफळ ७७१.७९ चौरस मीटर इतके आहे. येथे एका डॉर्मिटरीसह एक उपाहारगृह आणि ४ स्वच्छतागृहे आहेत. साठ विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय येथे होऊ शकते.


विद्यार्थी विकास विभागाचे नूतन वसतिगृह


Wednesday, 17 September 2025

धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि सुधारणावाद

हेच भारतीय संविधानाचे तत्वज्ञान: डॉ. टी. एस. पाटील

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना डॉ. टी.एस. पाटील. मंचावर (डावीकडून) डॉ. रामचंद्र पवार आणि यशोधन बोकील



शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना डॉ. टी.एस. पाटील. 



कोल्हापूर, दि. १७ सप्टेंबर: धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि सुधारणावाद हेच भारतीय संविधानाचे तत्त्वज्ञान आहे, आपण ते अंगिकारले पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील यांनी केले. शिवाजी विद्यापीठाचा आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि डॉ, बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान उद्देशिकाया विषयावतील विशेष व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. भारतीय संविधान अमृतमहोत्सव वर्षानिमित्त या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

डॉ. पाटील म्हणाले, भारतीय संविधानाबद्दल देशात साक्षरता निर्माण होणे आवश्यक आहे. आपल्या संविधानाची उद्देशिका आम्हांला आमचा देश कसा निर्माण करायचा आहे, हे सांगते. विषमता तत्त्वाला नकार देऊन समतातत्त्वाचा अंगिकार करण्याची गरज ती व्यक्त करते. या देशात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने भारतीय संविधानात अत्यंत महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहे. राज्यघटनेतील मुलभूत अधिकार हा महत्त्वाचा घटक आहे. मुलभूत कर्तव्यांचे आपण पालन केले पाहिजे. सार्वजनिक संपत्ती व मालमत्तांचे संरक्षण करणे ही नागरिकांची जबाबदारी आहे. संविधानाने प्रत्येकाला व्यवसाय निवडण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. या संविधानाचे पालन व रक्षण सर्व भारतीयांनी प्राणपणाने केले पाहिजे.

यावेळी डॉ. रामचंद्र पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. यशोधन बोकील यांनी परिचय करून दिला. श्री. रविंद्र खैरे यांनी सूत्रसंचालन केले. व्याख्यानास अविनाश भाले, उदय घाटे, सुधाकर भोसले, वसंत सिंघन, डॉ. किशोर खिलारे, डॉ. अनमोल कोठडिया, आर. एम. जाधव, यश आंबोळे, दत्ता घुटूकडे आदी उपस्थित होते. 




Tuesday, 16 September 2025

'विकसित भारत २०४७' उपक्रमांतर्गत उद्यापासून विशेष व्याख्यानमालेसह विविध कार्यक्रम







कोल्हापूर, दि. १६ सप्टेंबर: विकसित भारत २०४७ या केंद्र सरकारच्या उपक्रमांतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या माध्यमातून दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ही माहिती शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी दिली.

प्राप्त माहितीनुसार, विकसित भारत २०४७ हा भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापूर्वी विकसित राष्ट्र बनण्याच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या उद्देशाने एक उपक्रम आहे. २०४७ मध्ये भारत स्वातंत्र्याच्या १०० व्या वर्षाच्या जवळ येत असताना, हा उपक्रम व्यापक आणि शाश्वत विकास साध्य करण्यासाठी आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय आणि प्रशासनिक क्षेत्रात प्रयत्नांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करतो. ही संकल्पना भारताला एक आघाडीची जागतिक शक्ती म्हणून जगासमोर आणण्याची क्षमता दर्शवितो. तरुणांमध्ये हा विचार पुढे नेण्यासाठी "विकसित भारत राजदूत - युवा कनेक्ट" कार्यक्रम भारत सरकार तर्फे आयोजित केला जाणार असून, याचा उद्देश भारताच्या विकासात्मक परिवर्तनात तरुणांचा सहभाग आणि नेतृत्व वाढवणे हा आहे. या अनुषंगाने राज्यामध्ये या संदर्भात विविध उपक्रम / कार्यक्रम आयोजित करून मा. पंतप्रधानांच्या विकसित भारताच्या दृष्टिकोनाला जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचवणे हा आहे.

या निमित्ताने उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्यातर्फे दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या दरम्यान दुपारी ५ वाजता "विकसित भारत संवाद online व्याख्यानमाला" आयोजित करण्यात येणार असून या व्याख्यानमालेत राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ञ व्यक्ती विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहे. यामध्ये सेवानिवृत्त एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी (संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता), सेवानिवृत्त राजदूत श्रीमती लक्ष्मी पुरी (भारतातील लोकशाहीचे पुनर्जागरण : मोदी युगाची क्रांती), प्रा. डॉ. मनीष दाभाडे, जवाहरलाल नेहरू केंद्रीय विद्यापीठ, नवी दिल्ली (परराष्ट्र धोरण आणि विकसित भारत),  श्री. आशिष चांदोरकर, प्रथितयश लेखक व अर्थकारणाचे अभ्यासक, जिनिव्हा, ऑस्ट्रिया (मोदी कालखंडातील आर्थिक सुधारणा आणि विकसित भारत) आणि डॉ. शान्तिश्री पंडित, कुलगुरु, जवाहरलाल नेहरू केंद्रीय विद्यापीठ, नवी दिल्ली (शिक्षणातून कौशल्य विकास : विकसित भारताचा आधार) यांची ऑनलाईन व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.

महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी आणि संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही व्याख्याने होणार आहेत.

तसेच राष्ट्रीय सेवा योजना आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्यातर्फे शिवाजी विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालयांमध्ये पुढील उपक्रम राबविण्यात येणार आहेत. रक्तदान अमृतमहोत्सवाअंतर्गत रक्तदान शिबिरे, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छयोत्सव उपक्रम, सफाई मित्र सुरक्षा शिबिर अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिरे, क्लीन, ग्रीन उत्सवाअंतर्गत शून्य कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक भांडी व साधनांचा वापर, विकसित भारत @ २०४७ मध्ये युवकांचा सहभाग याबाबत व्याख्यान, राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस (२४ सप्टेंबर, २०२५) यानिमित्त मा. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती व पुढीला वाटचाल या संदर्भात युवकांशी संवाद कार्यक्रम, "एक दिन, एक घंटा, एक साथ" राष्ट्र स्वच्छता अभियान, जागतिक पर्यावरण आरोग्य दिवसानिमित्त जनजागृती, विश्व पर्यटन दिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांबाबत व त्यांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याबाबत व्याख्यान, शहीद भगतसिंह यांच्या जयंतीनिमित्त युवकांमध्ये देशभक्ती, साहस व त्यांच्या आदर्शाचे स्मरण करण्यासाठी व्याख्यान, जागतिक हृदय दिवस निमित्त पोषण आहार / अनेमिया / हृदयरोग / मधुमेह / उच्च रक्तदाब या बद्दल कार्यशाळा / निबंध / पथनाट्य आदी उपक्रम, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम इत्यादी उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या निर्देशानुसार याच कालावधीत राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे संपूर्ण राज्यभरामध्ये "स्वच्छता ही सेवा" अभियान २०२५ हा उपक्रम विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजना एकक यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत सार्वजनिक स्वच्छता, सफाई मित्र सुरक्षा शिबीर, Clean Green उत्सव, स्वच्छ सुजल गाव, स्वच्छ आरोग्यदायी स्ट्रीट फूड इत्यादी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच दिनांक २५ सप्टेंबर, २०२५ रोजी राष्ट्रीय स्वच्छता अभियान अंतर्गत सर्व नागरिकांना हाताची साखळी करून संपूर्ण देशभरात आणि राज्यातही श्रमदान अंतर्गत "एक दिन, एक घंटा, एक साथ" हे एक तासाचे अभियान राबविले जाणार आहे. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या Apprenticeship Embedded Degree Programme (AEDP) च्या मार्गदर्शक तत्वानुसार पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी AEDP संदर्भात सर्व विद्यापीठांमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे.

तरी, विद्यापीठासह सर्व संलग्नित महाविद्यालयांनी सदरचे उपक्रमांचे नियोजन करून यशस्वीरित्या राबवावेत, त्याचप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेमध्येही सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संविधानातील मूल्यतत्त्वे समाजापर्यंत पोहोचणे आवश्यक: डॉ. श्रीकृष्ण महाजन

शिवाजी विद्यापीठात संविधान दूत कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. श्रीकृष्ण महाजन

शिवाजी विद्यापीठात संविधान दूत कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. श्रीकृष्ण महाजन. मंचावर (डावीकडून) डॉ. तानाजी चौगुले आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे


कोल्हापूर, दि. १६ सप्टेंबर: संविधानातील मूल्ये समाजापर्यंत पोहोचणे आवश्यक असून त्या दृष्टीने संविधान दूतांनी काम करणे अभिप्रेत आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान दूतकार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बीजभाषक म्हणून ते बोलत होते. कुलसचिव डॉ. विलास शिंदे अध्यक्षस्थानी होते.

डॉ. महाजन म्हणाले, तरुणाईला योग्य दिशा मिळाली, तर त्यांचे जीवन योग्यरीत्या घडते आणि पर्यायाने देश घडतो. वादाने प्रश्न वाढत जातात, मात्र समंजसपणा व चर्चेच्या मार्गाने प्रश्न सुटतात. तेव्हा संविधान दूतांनी सामंजस्याच्या मार्गाने संविधानातील मूल्यतत्त्वे समाजातील तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम करावे.

ते म्हणाले, भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि धर्मनिरपेक्षता यांसारखी उदात्त मानवी मूल्ये समाजात दृढपणे रुजावीत व भारतीय संविधानाबद्दल व्यापक जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने शिवाजी विद्यापीठाच्यावतीने भारतीय संविधान अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संविधानदूतही महत्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक महाविद्यालय व शिवाजी विद्यापीठ अधिविभागातील एका विद्यार्थी अथवा विद्यार्थिनीची संविधानदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

अध्यक्षीय मनोगतात कुलसचिव डॉ. शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांनी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मिळालेल्या ज्ञानाचा वापर आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. शिक्षणाने आयुष्य बदलते. आजचा विद्यार्थी हा उद्याचा सुजाण नागरिक असून या कार्यशाळेमध्ये मिळालेल्या ज्ञानाचा वापर आपण राष्ट्र उभारणीसाठी केला पाहिजे.

यावेळी डॉ. तानाजी चौगुले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. तेजपाल मोहरेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. किशोर खिलारे यांनी आभार मानले.

कार्यशाळेच्या भारतीय संविधानाची ओळखया पहिल्या सत्रात प्राचार्य डॉ. प्रवीण पाटील यांनी  संविधान व त्याचे महत्त्व आणि भारतीय संविधानाची प्रस्तावना व संवैधानिक मूल्ये या विषयावर तर प्रा. डॉ. प्रकाश पवार यांनी लोकशाही, समता आणि न्याय आणि मूलभूत हक्क व कर्तव्ये या विषयावर मार्गदर्शन केले. संविधान मूल्यांचे दैनंदिन जीवनातील महत्त्वया दुसऱ्या सत्रामध्ये प्रा. अविनाश भाले यांनी संविधान दूत म्हणून समाजामध्ये प्रत्यक्ष कसे काम करावे, यासबंधी मार्गदर्शन केले. कार्यशाळेला डॉ. प्रकाश कांबळे, डॉ. भारती पाटील, डॉ. सुखदेव उंदरे, डॉ. दत्ता जाधव, डॉ. लखन भोगम, जॉर्ज क्रुझ आदी उपस्थित होते.

उच्चशिक्षणविषयक सर्वेक्षणात वस्तुनिष्ठ माहितीला महत्त्व: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

विद्यापीठात अखिल भारतीय उच्चशिक्षण सर्वेक्षण प्रशिक्षण कार्यशाळा

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. मंचावर (डावीकडून) सुभाष माने, अभिजीत रेडेकर आणि डॉ. उत्तम सकट

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. 


कार्यशाळेचा उद्घाटन समारंभ (लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. १६ सप्टेंबर: अखिल भारतीय उच्चशिक्षणविषयक सर्वेक्षणामध्ये (ए.आय.एस.एच.ई.) वस्तुनिष्ठ माहितीला मोठे महत्त्व आहे. त्यामुळे महाविद्यालयांनी या संदर्भातील माहिती जबाबदारीने भरावी, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाचा सांख्यिकी कक्ष आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आज एआयएसएचईच्या महाविद्यालयीन नोडल अधिकाऱ्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात उपस्थितांना संबोधित करताना कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते.

ते म्हणाले, आज राष्ट्रीय पातळीवर अखिल भारतीय उच्चशिक्षणविषयक सर्वेक्षण अहवाल हाच अधिकृत माहितीचा स्रोत, दस्तावेज उपलब्ध आहे. त्यामुळे महाविद्यालये जितक्या जबाबदारीने वस्तुनिष्ठ माहिती येथे भरतील, तितका विश्वासार्ह डेटा देशपातळीवर उपलब्ध होईल. या माहितीच्या आधारेच राष्ट्रीय पातळीवर उच्चशिक्षणविषयक धोरणात्मक निर्णय घेतले जातात. केंद्रीय स्तरावर परवानगी घेऊन आपल्याला राज्यस्तरीय अहवाल प्रकाशित करता येईल का, या दृष्टीनेही नजीकच्या काळात विचार केला जावा. तसेच, पुढे विद्यापीठस्तरीय अहवाल निर्मिती करून या माहितीचा विद्यापीठ स्तरावरील विविध धोरणे, योजना आखण्यासाठी विनियोग करता येईल का, या दृष्टीनेही विचार करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

विद्यापीठाच्या संगणक केंद्राचे संचालक तथा सांख्यिकी अधिकारी अभिजीत रेडेकर यांनी, शिवाजी विद्यापीठ एआयएसएचई पोर्टलवर गेल्या १३ वर्षांपासून सलगपणे १०० टक्के माहिती भरणारे विद्यापीठ असून या कामी महाविद्यालयांनी केलेले सहकार्य मोलाचे ठरले असल्याचे सांगितले.

कार्यशाळेत दुपारच्या सत्रात राज्य शासनाच्या उच्चशिक्षण संचालनालयाचे सांख्यिकी अधिकारी स्वप्नील कोरडे आणि श्री. रेडेकर यांनी मार्गदर्शन केले आणि उपस्थितांचे शंकासमाधान केले. उपकुलसचिव डॉ. उत्तम सकट यांनी स्वागत केले. धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले, तर गुणवत्ता अधिकारी सुभाष माने यांनी आभार मानले. कार्यशाळेस २२१ संलग्नित महाविद्यालयांचे नोडल अधिकारी उपस्थित होते.

Saturday, 13 September 2025

दलित साहित्याने भारतीय साहित्याचा पैस वाढवला: डॉ. राजन गवस

 

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. शरणकुमार लिंबाळे यांचा शिवाजी विद्यापीठात सत्कार करताना डॉ. राजन गवस आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे. सोबत (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, डॉ. प्रभंजन माने आणि डॉ. तृप्ती करेकट्टी


शिवाजी विद्यापीठात सत्काराला उत्तर देताना डॉ. शरणकुमार लिंबाळे



 

कोल्हापूर, दि. १३ सप्टेंबर: दलित साहित्याने भारतीय साहित्याचा पैस वाढवला, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठातील मराठी, हिंदी आणि इंग्रजी अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सरस्वती सन्मान विजेते ज्येष्ठ लेखक प्रा. शरणकुमार लिंबाळे यांचेभारतीय समाजवास्तव: लेखक व लेखनदृष्टीया विषयावरील व्याख्यान आणि विशेष सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते.

डॉ. गवस म्हणाले, दलित साहित्य ही भारतीय साहित्याला लाभलेली देणगी आहे. महाष्ट्राच्या बदललेल्या वाचनसंस्कृतीचे चित्र दलित साहित्यामध्ये प्रतिबिंबित झाले आहे. आंबेडकरी विचारविश्वाचा आविष्कार आणि वर्तमानाची उलटतपासणी लिंबाळे यांच्या साहित्यात आली आहे. त्यामुळे लिंबाळे हे भारतीय स्तरावर पोहोचले.

यावेळी सत्काराला उत्तर देताना साहित्यिक प्रा. शरणकुमार लिंबाळे म्हणाले, आपल्या भोवतालचे वातावरण अस्वस्थ करणारे आहे. आपल्या भाषेवर सांस्कृतिक साम्राज्यवाद आक्रमण करतो आहे. अशा काळात  साहित्य हे सांस्कृतिक संवाद निर्माण करणारे असते. लेखकाने सामाजिक भान ठेवून तसेच निर्भय होऊन लिहायला हवे.

अध्यक्षीय मनोगतात कुलसचिव डॉ. शिंदे म्हणाले, आज माणसांच्या संवेदना संपत चाललेल्या आहेत. व्यक्त होण्यासाठी अनेक माध्यमे आपल्यासमोर आहेत. अशावेळी समाजाकडे डोळसपणे पाहून साहित्याने समाजाचे मूलभूत प्रश्न मांडले पाहिजेत.

यावेळी डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी प्रास्ताविक केले. मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी पाहुण्यांचे स्वागत आणि परिचय करून दिला. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. प्रभंजन माने यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी डॉ. गोमटेश्वर पाटील, डॉ. चंद्रकांत लंगरे, डॉ. दीपक भादले, डॉ. मच्छिंद्र गोफणे, डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांच्यासह विविध अधिविभागातील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Thursday, 11 September 2025

डॉ. प्रमोद पाटील हे विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळविणारे शिक्षक: डॉ. एस.बी. ओगले

शिवाजी विद्यापीठात तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

शिवाजी विद्यापीठात आयोजित तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलताना ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस.बी. ओगले.


शिवाजी विद्यापीठात आयोजित तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलताना ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस.बी. ओगले. समोर देशविदेशांतून उपस्थित असणारे संशोधक, शिक्षक आणि विद्यार्थी

शिवाजी विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि डॉ. एस.बी. ओगले. सोबत (डावीकडून) डॉ. तुकाराम डोंगळे, डॉ. एस.एच. पवार, प्रा. जे.एच. कीम, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रा. वाय.आर. मा, डॉ. किरणकुमार शर्मा आणि डॉ. के.डी. पवार.

शिवाजी विद्यापीठ आणि दक्षिण कोरिया येथील चोन्नम नॅशनल युनिव्हर्सिटी यांच्या दरम्यानच्या सामंजस्य कराराचे नूतनीकरण करण्यात आले. यावेळी कराराचे हस्तांतरण करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्रा. एस. डब्ल्यू. शीन. सोबत (डावीकडून) डॉ. तुकाराम डोंगळे, डॉ. एस.एच. पवार, प्रा. जे.एच. कीम, डॉ. एस.बी. ओगले, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रा. वाय.आर. मा, डॉ. किरणकुमार शर्मा आणि डॉ. के.डी. पवार.


(आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाची लघुचित्रफीत)

कोल्हापूर, दि. ११ सप्टेंबर: ज्येष्ठ संशोधक डॉ. प्रमोद तथा पी.एस. पाटील म्हणजे विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळवून टाकणारे शिक्षक आहेत, असे गौरवोद्गार पुण्याच्या आयसरचे इमॅरिटस प्राध्यापक व कोलकता येथील राइजचे संचालक डॉ. एस.बी. ओगले यांनी काढले.

शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू तथा जागतिक ख्यातीचे ज्येष्ठ संशोधक डॉ. प्रमोद पाटील यांच्या सेवानिवृत्तीप्रित्यर्थ त्यांच्या शैक्षणिक, संशोधकीय आणि संस्थात्मक विकास क्षेत्रातील अतुलनीय योगदानाच्या सन्मानार्थ विद्यापीठात 'पायोनियरिंग सायन्स अँड प्रोग्रेस: नॅनो टेक्नॉलॉजी फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट (आयसीपीएसपी-एनएसडी २०२५) या विषयावरील तीनदिवसीय परिषदेला आज प्रारंभ झाला. तिच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. ओगले बोलत होते. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के अध्यक्षस्थानी होते.

डॉ. पाटील यांच्या समग्र वाटचालीचे आपण साक्षीदार असल्याचे सांगून डॉ. ओगले म्हणाले, डॉ. पाटील हे अत्यंत शांत, निगर्वी, स्थितप्रज्ञ आणि हसतमुख व्यक्तीमत्त्वाचे धनी आहेत. मितभाषी आणि विद्यार्थीभिमुख असे ते शिक्षक आहेत. ते मृदू स्वभावाचे असले तरी त्यांच्या संशोधनकार्याच्या बाबतीत ते धडाडीचे आहेत. जिद्द, कठोर परिश्रम आणि चिकाटी या गुणांमधून त्यांनी आपली संपूर्ण कारकीर्द साकारली आहे. शिवाजी विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सामग्रीने सुसज्ज प्रयोगशाळा उभारण्याची महत्त्वाची कामगिरी त्यांच्या नावावर जमा आहे.

दक्षिण कोरियाच्या नॅशनल चोन्नम युनिव्हर्सिटीचे प्रा. जे.एच. कीम म्हणाले, डॉ. पाटील यांच्या अत्यंत लक्षणीय कारकीर्दीच्या गौरव समारंभामध्ये सहभागी होताना मनस्वी आनंद होत आहे. त्यांच्यासमवेत शंभरहून अधिक आंतरराष्ट्रीय शोधनिबंधांसाठी संशोधनकार्य करता आले. त्याचप्रमाणे वीसहून अधिक विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पांमध्ये मार्गदर्शन करता आले, ही माझ्यासाठी मोठी संधी ठरली. डॉ. पाटील यांचे शैक्षणिक आणि संशोधनाच्या बाबतीत सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले; त्यांची स्नेहपूर्ण मैत्री अनेक वर्षांपासून लाभली, याचा आनंद वाटतो. सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या संशोधकीय कारकीर्दीची एक नवी सुरवात होते आहे. त्यातही ते जागतिक दर्जाची कामगिरी बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तैवानच्या नॅशनल ड्वांग ह्वा युनिव्हर्सिटीचे प्रा. वाय.आर. मा म्हणाले, प्रा. पाटील हे जागतिक संशोधन क्षेत्रातले कोल्हापूरचे खरे पाणी आहे. शिवाजी विद्यापीठाचे नाव जागतिक स्तरावर उंचावणारे आणि विद्यापीठाला जागतिक दर्जा मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटणारे हे व्यक्तीमत्त्व आहे. अशा ध्येयनिष्ठ व्यक्तीमत्त्वाचे सान्निध्य आम्हाला लाभले, याचा अभिमान वाटतो.

डॉ. पाटील हे एक उत्तम माणूस असल्याचे सांगून अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, डॉ. प्रमोद पाटील यांनी केवळ शिक्षण आणि संशोधन या क्षेत्रांतच नव्हे, तर शैक्षणिक प्रशासक म्हणूनही अत्युच्च दर्जाची कामगिरी बजावली आहे. अधिविभाग प्रमुख, स्कूल ऑफ नॅनोसायन्सचे संस्थापक संचालक, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता आणि पुढे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू अशा सर्वच पदांवर काम करीत असताना त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटवला. शिवाजी विद्यापीठाचे जागतिक आणि राष्ट्रीय शैक्षणिक, संशोधकीय समुदायांसह व्यवसाय-उद्योगांसमवेत बंध निर्माण करण्याची अतिशय मोलाची कामगिरी त्यांनी बजावली आहे. त्यांच्या आंतरराष्ट्रीय पटलावरील वावराचा विद्यापीठाला, येथील संशोधकांना मोठा लाभ झाला आहे. व्यक्तीगत आकांक्षांपलिकडे जाऊन त्यांनी विद्यापीठाला संस्थात्मक लाभ मिळवून देण्यासाठी केलेले कार्य महत्त्वाचे आहे. व्यक्तीगत माझ्यासाठी ते एक उत्तम मित्र आहेत आणि यापुढेही राहतील, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास पाणी वाहून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर परिषदेच्या स्मरणिकेचेही मान्यवरांनी प्रकाशन केले. परिषदेचे समन्वयक तथा स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. किरणकुमार शर्मा यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. तुकाराम डोंगळे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. सुभाष माने यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. के.डी. पवार यांनी आभार मानले. परिषदेला ज्येष्ठ संशोधक डॉ. एस.एच. पवार यांच्यासह डॉ. प्रकाश वडगांवकर, डॉ. सी.डी. लोखंडे, अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, डॉ. सागर डेळेकर यांच्यासह देशविदेशांतील संशोधक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामंजस्य करार आणि टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर

या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठ आणि दक्षण कोरियातील चोन्नम नॅशनल युनिव्हर्सिटी यांच्यामध्ये असलेल्या सामंजस्य कराराला मुदतवाढ देण्यात आली. या नूतनीकृत कराराचे आज कुलगुरू डॉ. शिर्के आणि डॉ. कीम यांच्या उपस्थितीत हस्तांतरण करण्यात आले. कोरियाच्या प्रा.एस.डब्ल्यू. शीन, प्रा. एस.एच. कांग यावेळी उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठ आणि सेराफ्लक्स इंडिया प्रा.लि. यांच्या दरम्यान टेक्नॉलॉजी ट्रान्स्फरच्या अनुषंगानेही यावेळी करार करण्यात आला. कंपनीचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव तुंगतकर यावेळी उपस्थित होते.

विविध आधुनिक संशोधनाबाबत चर्चा

दरम्यान, दिवसभरात विविध सत्रांत एनर्जी, सस्टेनेबिलिटी अँड मटेरियल्स इनोव्हेशन, रिसेंट प्रोग्रेस इन अर्थ-एबन्डन्ट इलेमेंट्स-बेस्ड फोटोकेमिकल अँड इलेक्ट्रोकेमिकल वॉटर स्पिटींग, इंटरफेस कन्ट्रोल्ड स्ट्रॅटेजीस इनॅबलिंग स्टॅबिलिटी इन फोटोइलेक्ट्रोकेमिकल सोलार फ्युएल डिव्हाईसेस आणि फोटोकॅटॅलिटिक बिहेवियर ऑफ २-डी नॅनोकम्पोझिट्स फॉर व्हिजिबल लाइट ड्रिव्हन फोटोकॅटॅलिटिक डिटॉक्सिफिकेशन ऑफ ऑर्गेनिक पोल्युटंट्स इत्यादी आधुनिक संशोधन विषयांबाबत अनुक्रमे डॉ. एस.बी. ओगले, प्रा. जे.एच. कीम, प्रा. एस.एच. कांग आणि डॉ. पंकज कोईनकर यांनी मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात राजमाता जिजाऊ साहेब सभागृहात मान्यवरांच्या हस्ते पोस्टर सादरीकरण सत्राचे उद्घाटन करण्यात आले.