Showing posts with label Workshop. Show all posts
Showing posts with label Workshop. Show all posts

Tuesday, 16 September 2025

उच्चशिक्षणविषयक सर्वेक्षणात वस्तुनिष्ठ माहितीला महत्त्व: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

विद्यापीठात अखिल भारतीय उच्चशिक्षण सर्वेक्षण प्रशिक्षण कार्यशाळा

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. मंचावर (डावीकडून) सुभाष माने, अभिजीत रेडेकर आणि डॉ. उत्तम सकट

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. 


कार्यशाळेचा उद्घाटन समारंभ (लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. १६ सप्टेंबर: अखिल भारतीय उच्चशिक्षणविषयक सर्वेक्षणामध्ये (ए.आय.एस.एच.ई.) वस्तुनिष्ठ माहितीला मोठे महत्त्व आहे. त्यामुळे महाविद्यालयांनी या संदर्भातील माहिती जबाबदारीने भरावी, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाचा सांख्यिकी कक्ष आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आज एआयएसएचईच्या महाविद्यालयीन नोडल अधिकाऱ्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात उपस्थितांना संबोधित करताना कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते.

ते म्हणाले, आज राष्ट्रीय पातळीवर अखिल भारतीय उच्चशिक्षणविषयक सर्वेक्षण अहवाल हाच अधिकृत माहितीचा स्रोत, दस्तावेज उपलब्ध आहे. त्यामुळे महाविद्यालये जितक्या जबाबदारीने वस्तुनिष्ठ माहिती येथे भरतील, तितका विश्वासार्ह डेटा देशपातळीवर उपलब्ध होईल. या माहितीच्या आधारेच राष्ट्रीय पातळीवर उच्चशिक्षणविषयक धोरणात्मक निर्णय घेतले जातात. केंद्रीय स्तरावर परवानगी घेऊन आपल्याला राज्यस्तरीय अहवाल प्रकाशित करता येईल का, या दृष्टीनेही नजीकच्या काळात विचार केला जावा. तसेच, पुढे विद्यापीठस्तरीय अहवाल निर्मिती करून या माहितीचा विद्यापीठ स्तरावरील विविध धोरणे, योजना आखण्यासाठी विनियोग करता येईल का, या दृष्टीनेही विचार करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

विद्यापीठाच्या संगणक केंद्राचे संचालक तथा सांख्यिकी अधिकारी अभिजीत रेडेकर यांनी, शिवाजी विद्यापीठ एआयएसएचई पोर्टलवर गेल्या १३ वर्षांपासून सलगपणे १०० टक्के माहिती भरणारे विद्यापीठ असून या कामी महाविद्यालयांनी केलेले सहकार्य मोलाचे ठरले असल्याचे सांगितले.

कार्यशाळेत दुपारच्या सत्रात राज्य शासनाच्या उच्चशिक्षण संचालनालयाचे सांख्यिकी अधिकारी स्वप्नील कोरडे आणि श्री. रेडेकर यांनी मार्गदर्शन केले आणि उपस्थितांचे शंकासमाधान केले. उपकुलसचिव डॉ. उत्तम सकट यांनी स्वागत केले. धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले, तर गुणवत्ता अधिकारी सुभाष माने यांनी आभार मानले. कार्यशाळेस २२१ संलग्नित महाविद्यालयांचे नोडल अधिकारी उपस्थित होते.

Friday, 27 September 2019

तृतीयपंथीयांना सामाजिक हक्कांसाठी विद्यापीठ कटिबद्ध: प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

शिवाजी विद्यापीठातर्फे तृतीयपंथीयांसाठी आयोजित कौशल्य विकास कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. व्यासपीठावर (डावीकडून) विशाल पिंजानी, मयुरी आळवेकर, डॉ. भारती पाटील, डॉ. ए.एम. गुरव.


शिवाजी विद्यापीठातर्फे तृतीयपंथीयांसाठी आयोजित कौशल्य विकास कार्यशाळेत प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासमवेत सहभागी तृतीयपंथी नागरिक व विद्यार्थी-विद्यार्थिनी.

कोल्हापूर, दि. २७ सप्टेंबर: समाजातील प्रत्येक घटकाला शैक्षणिक सेवा पुरवणे ही विद्यापीठाची जबाबदारी आहे. शिक्षणासह सामाजिक हक्कांपासून तृतीयपंथीय नागरिक वंचित राहणार नाहीत, यासाठी प्रयत्न करण्यास शिवाजी विद्यापीठ कटिबद्ध आहे, अशी ग्वाही शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांनी आज येथे दिली.
विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रातर्फे तृतीयपंथी व्यक्तींसाठी आयोजित केलेल्या कौशल्य विकास कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. भारती पाटील, कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक डॉ. ए. एम. गुरव, कौशल्य विकास अधिकारी महेश चव्हाण, मैत्री फौंडेशनच्या अध्यक्ष मयुरी आळवेकर आणि विशाल पिंजानी उपस्थित होते.
डॉ. शिर्के यावेळी म्हणाले की, अशी कार्यशाळा विद्यापीठात प्रथमच होत असून तृतीयपंथी व्यक्तींमधील कौशल्य विकासासाठी सुरु झालेला हा उपक्रम या पुढील काळातही निरंतर आणि व्यापक स्वरुपात विद्यापीठ राबवेल. या लोकांना सर्वांनी समतेची आणि समानतेची वागणूक दिली पाहिजे. ही आपली सार्वजनिक जबाबदारी आहे. यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तृतीयपंथीय लोकांच्या समस्यांचे स्वरुप लक्षात येण्यासाठी विविध संशोधन प्रकल्पही हाती घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. विद्यापीठाच्या बृहत-आराखड्यामध्ये तृतीयपंथी व्यक्तींसाठी विविध उपक्रम राबविण्यासाठीही तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी या प्रसंगी दिली.
यावेळी मयुरी आळवेकर म्हणाल्या की, तृतीयपंथीयांचे प्रश्न विद्यापीठ प्रशासन समजावून घेत आहे आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी, दिलासा देण्यासाठी विद्यापीठ पुढे आले आहे, ही अत्यंत स्तुत्य बाब आहे. एक माणूस म्हणून जगण्याचा हक्क विद्यापीठाच्या माध्यमातून तृतीयपंथीयांना मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या कार्यशाळेत दिवसभरात कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्यासह आंतरराष्ट्रीय व्याख्याते कौस्तुभ बंकापुरे, डॉ. विद्यानंद खंडागळे, डॉ. कृष्णा पाटील, पद्मश्री मादनाईक, डॉ. ए. एम. गुरव यांनी विविध विषयांवर कौशल्य प्रशिक्षण दिले. कार्यशाळेसाठी कोल्हापूर परिसरातील बहुसंख्य तृतीयपंथी नागरिक उपस्थित होते.

Thursday, 14 September 2017

बालहक्कांविषयी जागृतीसाठी माध्यम प्रतिनिधींचे योगदान महत्त्वाचे: डॉ. विलास नांदवडेकर



विद्यापीठात युनिसेफच्या सहकार्याने पत्रकारांसाठी कार्यशाळा

कोल्हापूर, दि. १४ सप्टेंबर: बालहक्कांच्या संदर्भात जागृतीसाठी प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी कृतीशील योगदान देणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचा वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभाग आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण पत्रकारांसाठी आयोजित बालहक्कविषयक जागृतीपर एकदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. नांदवडेकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या मानव्यविद्या सभागृहात ही कार्यशाळा झाली.
डॉ. नांदवडेकर म्हणाले, बालहक्कांचा विषय माध्यमांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी योग्य पद्धतीने मांडल्यास हजारो हात मदतीसाठी पुढे सरसावतील. आज आपल्या देशातील साधारण निम्म्या बालकांना पुरेसा आहार मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या बालकांचे योग्य संगोपन होऊन त्यांना देशाच्या विकासातील भागीदार बनवायचे असेल तर बाल आरोग्याचा प्रश्न प्राधान्याने हाताळायला हवा. आरोग्य चांगले राहण्यासाठी उत्तम आहार आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उत्तम शिक्षण सुविधांची उपलब्धता करून देणे हे आपल्यापुढील प्राधान्यक्रमाचे मुद्दे असायला हवेत. अन्न आणि शिक्षणाच्या बरोबरीनेच बालमजुरीला प्रतिबंध करण्यासाठी पत्रकारांबरोबरच प्रत्येक समाजघटकाने कृतीशील पुढाकार घ्यायला हवा. असे बालमजूर आढळल्यास त्यांच्याशी संवाद साधून, योग्य मार्गदर्शन करून त्यांना शाळेत जायला प्रवृत्त करायला हवे. केंद्र सरकारने त्यांना प्रदान केलेल्या शिक्षणाच्या अधिकारांतर्गत मोफत शिक्षण आणि माध्यान्ह पोषण आहार याविषयीची माहिती देऊन शिक्षणाच्या प्रवाहात त्यांना सामील होण्यास प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी मध्य आफ्रिकेतील रवांडा या देशाला भेट दिली होती. तेथील बालकांची विदारक परिस्थिती त्यांनी यावेळी सभागृहासमोर मांडली. ते म्हणाले, सकाळ-संध्याकाळ पाऊस होणाऱ्या या देशातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. एका कुटुंबात किमान दहा मुले असतात. साहजिकच त्यांच्या दारिद्र्यपूर्ण परिस्थितीत त्यामुळे भरच पडते. मुलांच्या अंगावर धड कपडेही नसायची, तर कित्येक मुले अक्षरशः रस्त्यावरील माती खाताना नजरेस पडायची. या पार्श्वभूमीवर तेथे बालहक्कांचे काम सुरू होते. मुलांच्या मूलभूत अन्न, वस्त्राच्या गरजा भागवून त्यांना शिक्षण आणि आरोग्य सुविधांची उपलब्धता करणे हे प्रत्येक शासनाचे आद्य कर्तव्य आहे. तथापि, सन २०१०च्या एका आकडेवारीनुसार, आपल्या देशात एका मुलामागे आपण दैनंदिन ४.४४ रुपये खर्च करतो, तर विकसित देशांत हा आकडा त्याहून चौपट आहे. विकसित आणि विकसनशील देशांमधील ही मोठी दरी सांधण्यासाठी सर्व घटकांनी आपापल्या परीने योगदान देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी अधिविभाग प्रमुख डॉ. निशा मुडे-पवार यांनी स्वागत, प्रास्ताविक व परिचय करून दिला. चंद्रशेखर वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी युनिसेफ (महाराष्ट्र)चे संवाद सल्लागार तानाजी पाटील, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. सुमेधा साळुंखे यांच्यासह जिल्ह्यातील ग्रामीण पत्रकार, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, दिवसभरात कार्यशाळेत सी.डब्ल्यूसी (कोल्हापूर)चे अतुल देसाई, युनिसेफचे तानाजी पाटील आणि कोल्हापूरच्या शहाजी विधी महाविद्यालयाचे डॉ. प्रवीण पाटील यांनी बालहक्कांच्या विविध पैलूंवर प्रकाशझोत टाकला.


Friday, 6 May 2016

बाजार व उपलब्ध संधींच्या शोधातून यशस्वी उद्योजक होणे शक्य: अशोक मोरे



विद्यापीठाच्या उद्योजकता विकास कार्यशाळेस उत्साही प्रतिसाद

Shri. Ashok More
Vice Chancellor Dr. Devanand Shinde
Workshop received huge response from Students

कोल्हापूर, दि. मे: गुणवत्ता, कौशल्य, आत्मविश्वास, बाजाराचा शोध आणि उपलब्ध संधी या पंचसूत्रीच्या जोरावर यशस्वी उद्योजक होणे शक्य आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उप-सरव्यवस्थापक अशोक मोरे यांनी आज येथे केले. 

शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य उद्योजकता विकास केंद्र, युवक कल्याण कक्ष आणि विद्यापीठ कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मानव्यशास्त्र इमारतीत झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.

या कार्यशाळेस युवक-युवतींचा अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद लाभला. सुमारे २१ जण या एकदिवसीय कार्यशाळेत सहभागी झाले.

अशोक मोरे म्हणाले, बँकांच्या माध्यमातून निधी, पतपुरवठा करण्यात तांत्रिक अडचणी उद्भवतात. अशा इच्छुक, गरजू व्यक्तींना आर्थिक मदत करण्याचे काम महामंडळ ते. महामंडळाचा मुख्य उद्देश तळागाळातील सर्व लोकांना समान हक्क प्रदान करण्याचे आहे. बाजारामध्ये कोणत्या स्तूची मागणी अधिक आहे पण उपलब्धता कमी आहे, याचा शोध नवउद्योजकांनी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
 
यावेळी त्यांनी महात्मा फुले महामंडळ, ओबीसी महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, मौलाना आझाद महामंडळ यांच्याकडून दिले जाणारे सूक्ष्म, लघु, दीर्घ मुदतीचे कर्ज तसेच विविध योजना याची माहिती दिली. तसेच गृह उद्योग, लघु उद्योग, शैक्षणिक कर्ज यांची उपलब्धता शी होते, त्यासाठीची अर्ज प्रक्रिया, कालावधी उपलब्ध होणारे निधी यांची उपयुक्त माहिती दिली.
 
Mr. M.I. Garodia
करिअर मार्गदर्शक एम.आय. गरोदीया म्हणाले, अत्यंत परिश्रमपूर्वक केलेल्या प्रयत्नांमधूनच यशाचा जन्म होतो.  प्रत्येकाच्या वेदनांचा विचार करणाराच जीवनात यशस्वी उद्योजक होतो. भारता इंग्रज दाखल होण्यापूर्वी भारतीय बाजारपेठेतील स्तूंची जगभर निर्यात होत असे. त्यावेळी भारतातील साठ टक्के लोक उद्योजक होते. हे प्रमाण त्यावेळी शेजारील चीनपेक्षा अधिक होते. उत्पादन, वित्त, ग्राहक, मार्केट यांचा प्रथम विचार करावा. त्यानंतर केलेले नियोजन लिहून काढावे. केलेल्या लिखाणावर चर्चा करावी आणि अंमलबजावणीसाठी सज्ज व्हावे. छोट्या छोट्या प्रयोगांतून प्रथम प्रयत्न करावे. त्यानंतर मोठी झेप घेण्यास सज्ज व्हावे, असा उपदेश त्यांनी केला.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणाच्या जोडीनेच आता उद्योजकीय धडे गिरवण्याची गरज आहे. प्रत्येकामध्ये क्षमता असते. त्या क्षमतेचा उपयोग कुटुंबाचा आणि समाजाचा विकास करण्यासाठी करावा. काही दिवसांपूर्वी विद्यापीठाने आयोजित केलेल्या जॉब फेअरचा दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. एकाच दिवसा ८०० तरुणांना रोजगार उपलब्ध झाले, ही लक्षणीय बाब आहे. शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील युवकांचा एम्प्लॉएबिलीटी रेशो वाढविण्यासाठी विद्यापीठ सातत्याने विविध उपक्रम राबवित आहे. त्यांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कौशल्य उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव यांनी स्वागत प्रास्ताविक केले.  विद्यापीठ कौशल्य विकास रोजगार उद्योजकता माहिती मार्गदर्शन केंद्राचे संचालक सचिन जाधव यांनी आभार मानले.
दरम्यान, दिवसभरात बँक ऑफ इंडियाच्या कोल्हापूर शाखेचे व्यवस्थापक एम.जी. कुलकर्णी, उद्योजक संग्राम पाटील, डीआयसीचे सरव्यवस्थापक एस.डी. शेळके, एमसीईडीचे प्रकल्प संचालक वनिता पाटील यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.