Saturday, 18 October 2025

शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांकडून दीपोत्सव उत्साहात

दिवाळीच्या पूर्वसंध्येला दीपोत्सव साजरा करताना शिवाजी विद्यापीठात शिकणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थिनी.

शिवाजी विद्यापीठात दिवाळीच्या पूर्वसंध्येला आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसमवेत दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, डॉ. शिवाजी सादळे, डॉ. मीना पोतदार आणि अमित कांबळे यांच्यासमवेत आंतरराष्ट्रीय विद्यार्थी-विद्यार्थिनी.

(शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा दीपोत्सव: लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. १८ ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी व विद्यार्थिनींनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला विद्यापीठ परिसरात पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी केली. विविध देशांतून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचा अनुभव घेत पारंपरिक पोशाख, दिवे, रांगोळी व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आनंदोत्सव साजरा केला.

या वेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राचे समन्वयक डॉ. एस.बी. सादळे, डॉ. मीना पोतदार, विद्युत अभियंता अमित कांबळे यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठात सध्या दक्षिण आफ्रिका, सुदान, मालावी, तुवालू, फिजी, पेरू, मॉरिशस, इंडोनेशिया, मादागास्कर, बांगलादेश, नेपाळ या देशांतील विद्यार्थी विविध अधिविभागांत उच्चशिक्षण घेत आहेत. विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहात राहणाऱ्या या विद्यार्थ्यांना भारतीय परंपरा व सणांमध्ये सामावून घेतले जाते. देशातील सर्वांत मोठ्या व प्रकाशरुपी ज्ञानाचा उत्सव असणाऱ्या दिवाळी सणही दरवर्षी या विद्यार्थ्यांसमवेत साजरा करण्यात येतो. यंदाही दिवाळीच्या पूर्वसंध्येला साजऱ्या करण्यात आलेल्या या दीपोत्सवात विद्यार्थ्यांनी पारंपरिक गाणी आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. दिवे, पणत्या प्रज्वलित करत दिवाळीचा सण साजरा केला. यावेळी उपस्थितांना आपला परिचय करून देत आपले विद्यापीठातील अनुभवही सांगितले.

कुलसचिव डॉ. शिंदे म्हणाले, “भारतीय संस्कृती जगभरातील लोकांना आपलेसे करते. विविध देशांतून आलेले विद्यार्थी जेव्हा आपल्या सणांमध्ये सहभागी होतात, तेव्हा खऱ्या अर्थाने 'वसुधैव कुटुंबकम्' ही संकल्पना साकार होते.

यावेळी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना भारतीय पारंपरिक फराळासह मिठाईचे वाटप करण्यात आले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Thursday, 16 October 2025

धरणफुटीचा धोका ओळखणाऱ्या यंत्रणेला जर्मन पेटंट मंजूर

शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांचे अभिनव संशोधन


डॉ. सचिन पन्हाळकर

शुभम गिरीगोसावी

परेश मट्टीकल्ली


डॉ. तुकाराम डोंगळे

डॉ. गणेश न्हिवेकर




कोल्हापूर, दि. १६ ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी धरणफुटीचा धोका ओळखून इशारा देणाऱ्या यंत्रणेविषयी केलेल्या संशोधनाला जर्मन पेटंट मंजूर झाले आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागातील संशोधक शुभम तानाजी गिरीगोसावी, भूगोल अधिविभाग प्रमुख डॉ. सचिन पन्हाळकर, इचलकरंजीच्या दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयातील प्रा. परेश मट्टीकल्ली, सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागातील डॉ. गणेश सुनील न्हिवेकर आणि विद्यापीठाच्या नॅनो विज्ञान व तंत्रज्ञान स्कूलचे डॉ. तुकाराम डोंगळे यांनी या संदर्भातील संशोधन केले. या संशोधकांनी अॅन इंटिग्रेटेड सिस्टीम फॉर दि डिटेक्शन ऑफ डॅम ब्रिचेस, अर्ली वॉर्निंग अँड इव्हॅक्युएशन असिस्टंन्स या शीर्षकाने आपले अभिनव संशोधन केले. या अत्याधुनिक प्रणालीद्वारे धरण फुटीचा धोका लवकर ओळखता येतो. त्याद्वारे नागरिकांना तात्काळ इशारा देणे आणि नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतरास मदत करणे या बाबी तातडीने करता येऊ शकतात. या तंत्रज्ञानामुळे भविष्यात धरणभंग आणि पूर आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे. या संशोधनाला जर्मन सरकारकडून पेटंट मंजूर झाले आहे.

प्रकल्प संशोधक शुभम गिरीगोसावी यांनी या मॉडेलचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रात्यक्षिक सादर केले असून या अभिनव प्रणालीला विविध तज्ज्ञ संस्थांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या कार्यासाठी त्यांना दोन राष्ट्रीय आणि एक आंतरराष्ट्रीय असे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.

या संशोधकांचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. 

एम.बी.ए.च्या विद्यार्थ्यांकडून सामाजिक बांधिलकीची ‘चेतना’

विशेष विद्यार्थ्यांनी दिवाळीसाठी बनविलेल्या ८० हजार रुपयांहून अधिक वस्तूंची विक्री

 

चेतना अपंगमती विकास संस्थेच्या विशेष विद्यार्थ्यांनी दिवाळीसाठी बनविलेल्या विविध वस्तूंच्या प्रदर्शन व विक्री स्टॉलचे शिवाजी विद्यापीठाच्या 'शिव-बाजार' येथे उद्घाटन प्रसंगी संचालक डॉ. दीपा इंगवले यांच्यासह एमबीए युनिटचे शिक्षक आणि विद्यार्थी

चेतना अपंगमती विकास संस्थेच्या विशेष विद्यार्थ्यांनी दिवाळीसाठी बनविलेल्या विविध वस्तूंच्या प्रदर्शन व विक्रीसाठी जिल्हा परिषदेत लावलेल्या स्टॉलला मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी आपल्या अधिकाऱ्यांसह आवर्जून भेट दिली आणि वस्तूंची खरेदीही केली.

कोल्हापूर, दि. १६ ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठाच्या एम.बी.. विभागाने सामाजिक बांधिलकी जपत दिवाळीनिमित्तचेतनाअपंगमती विकास संस्थेच्या विद्यार्थ्यांसोबत एक अनोखा उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत संस्थेच्या विशेष विद्यार्थ्यांनी चेतना व्यवसाय प्रशिक्षण उत्पादन केंद्रात दिवाळीसाठी बनविलेल्या सुमारे ८० हजार रुपयांहून अधिक किंमतीच्या विविध वस्तू एम.बी..च्या विद्यार्थ्यांनी अवघ्या चारच दिवसांत विकल्या.

चेतनासंस्थेमध्ये सध्या २२० विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यांच्यासाठी शैक्षणिक पुनर्वसनात्मक उपक्रम राबवले जातात. ‘चेतनासंस्थेच्या विशेष विद्यार्थ्यांनी दिवाळीसाठी तयार केलेल्या विविध वस्तूंमध्ये गिफ्ट बॉक्स, आकर्षक पणत्या, धुप-अगरबत्ती, लक्ष्मीपूजन पुडा, आकाशकंदील, अभ्यंगस्नानासाठी उटणे, साबण, सुवासिक तेल यांचा समावेश होता. एमबीए विभागाच्या विद्यार्थ्यांनी आपली विपणन व विक्री कौशल्ये पणाला लावत १३ ते १६ ऑक्टोबर या चार दिवसांच्या कालावधीत या वस्तूंची ठिकठिकाणी विक्री केली. शिवाजी विद्यापीठाच्या शिवबाजारसह विविध अधिविभाग, दूरशिक्षण केंद्र, एन.सी.सी. गेट, रसायनशास्त्र विभाग, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि गांधीनगर येथे स्टॉल लावून तसेच वाहनातून विक्री करण्यात आली. या उपक्रमाला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

चेतनाच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि विशेष विद्यार्थ्यांच्या कार्यकौशल्यांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यवस्थापन, विपणन, आणि ग्राहक संवाद कौशल्यांचा प्रत्यक्ष वापर करता आला. विद्यार्थ्यांनी प्रभावी विक्रीसाठी व्यावसायिक पद्धतीने योजना आखली आणि डिजिटल मार्केटिंगचा प्रभावी वापर केला. त्यामुळे अत्यल्प कालावधीत अपेक्षेपेक्षा अधिक विक्री झाली.

या उपक्रमाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्यासह कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, डॉ. संतोष चौगुले यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनीही कौतुक केले. ॲस्टर आधार हॉस्पिटलसह विद्यापीठातील अधिकारी  आणि शिक्षक यांनी विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तू खरेदी केल्या आणि विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेचे सामाजिक बांधिलकीचे विशेष कौतुक केले. एम.बी.. विभागाच्या संचालक डॉ. दीपा इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला डॉ. तेजश्री घोडके, जयश्री लोखंडे, स्मिता कांबळे आणि अनिता पाटील यांचे सहकार्य लाभले.