Friday, 14 November 2025

ग्रामीण महिलांना सक्षमीकरणाच्या संधी प्रदान करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील: प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव

शिवाजी विद्यापीठात ‘स्वरोजगारातून सक्षमीकरण’ कार्यशाळेला प्रारंभ

शिवाजी विद्यापीठात सुरू झालेल्या दोनदिवसीय कार्यशाळेस उपस्थित महिलांसमवेत प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आणि प्रशिक्षक, शिक्षक आदी.


कोल्हापूर, दि. १४ नोव्हेंबर: ग्रामीण भागातील महिलांमध्ये विविध कष्टाची आणि कौशल्याची कामे करण्याची प्रचंड क्षमता असते. त्यांना सक्षमीकरणाच्या योग्य संधी प्रदान करण्याची आवश्यकता असते. त्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठ प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या प्रबारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाची यशवंतराव चव्हाण ग्रामीण विकास प्रशाळा, बेटी बचाओ अभियान आणि कोल्हापूर जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वरोजगारातून सक्षमीकरण’ या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

ग्रामीण भागातील महिलांना स्वरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. रोटरी क्लब ऑफ एक्झिक्युटिव्ह्, इचलकरंजी यांच्या सहयोगाने विविध प्रशिक्षण सत्रांचे आयोजन केले आहे.

कार्यशाळेत जिल्हा परिषदेचे जिल्हा अभियान व्यवस्थापक दयानंद पाटील, इचलकरंजी रोटरीचे सहाय्यक गव्हर्नर गिरीश कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. प्रशाळेचे संचालक डॉ. नितीन माळी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. उर्मिला दशवंत यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले, बेटी बचाओ अभियान समन्वयक डॉ. प्रतिभा देसाई, रोटरीचे अध्यक्ष संतोष साधळे, सचिव मयूर पाटील आणि प्रोजेक्ट चेअरमन शीतल उपाध्ये यांच्यासह जिल्ह्यातील विविध स्वयंसहायता बचत गटाच्या महिला, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

 

 

Wednesday, 12 November 2025

इंद्रधनुष्य उपविजेत्यांचे कुलगुरूंकडून कौतुक

शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले यांच्यासमवेत जळगाव येथे झालेल्या इंद्रधनुष्य युवा महोत्सवात उपविजेतेपद पटकावणारा संघ.

(सदिच्छा भेटीचा व्हिडिओ)


कोल्हापूर, दि. १२ नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या संघाने राज्यस्तरीय इंद्रधनुष्य युवा महोत्सवात सलग तिसऱ्यांदा उपविजेतेपद प्राप्त करून हॅटट्रिक साधली, ही कौतुकाची आणि अभिमानाची बाब आहे. येथून पुढील काळातही कामगिरी उंचावत विजेतेपदाला गवसणी घालण्याच्या दृष्टीने परिश्रम घ्यावेत, असे आवाहन प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी आज येथे केले.

जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ५ ते ९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या २१ व्या राज्य आंतरविद्यापीठ इंद्रधुनष्य युवा महोत्सवात शिवाजी विद्यापीठाच्या संघाने तीन सुवर्ण, एक रौप्य अशा पदकांसह एकूण १६ पारितोषिके प्राप्त करण्याची कामगिरी करत सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले. या संघाने आज विद्यापीठात कुलगुरू डॉ. गोसावी यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांना आपली पारितोषिके व पुरस्कार सादर केले.

कुलगुरू डॉ. गोसावी यांनी संघातील सर्वच सहभागी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला आणि शिवाजी विद्यापीठाचा लौकिक सांस्कृतिक क्षेत्रात उंचावल्याबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. यावेळी कुलगुरूंनी विविध कलाप्रकारांत सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून त्यांचे अनुभव जाणून घेतले. त्याचप्रमाणे त्यांच्या प्रशिक्षकांच्या भावनाही जाणून घेतल्या.

प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी विद्यार्थ्यांनी यशापयशाच्या पलिकडे जाऊन आपल्या सादरीकरणाकडे लक्ष केंद्रित केले. त्यामुळे त्यांचे यश हिऱ्यासारखे लख्ख उजळले, अशी भावना व्यक्त केली. कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनीही संघातील सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी यावेळी औपचारिक स्वागत व प्रास्ताविक केले. शिवाजी विद्यापीठाने लोकसंगीत वाद्यवृंद, वक्तृत्व, वादविवाद, कातरकाम, शास्त्रीय तालवाद्य, व्यंगचित्र, नाट्यसंगीत, सुगम संगीत, सांस्कृतिक शोभायात्रा, पाश्चिमात्य समूह गीत या प्रकारांमध्ये आपला ठसा उमटविल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी अधीक्षक सुरेखा आडके, तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून बबन माने, संग्राम भालकर, प्रा. प्रमोद पाटील, शंतनू पाटील, ऋषिकेश देशमाने, नितीन शिंदे, गणेश इंडीकर, सुमंत कुलकर्णी, आकाश लिंगाडे, वरिष्ठ सहायक विजय इंगवले उपस्थित होते.

Monday, 10 November 2025

इंद्रधनुष्य युवा महोत्सवात शिवाजी विद्यापीठाला उपविजेतेपद

तीन सुवर्णपदकांसह १६ पारितोषिके प्राप्त

 

जळगाव येथे झालेल्या इंद्रधनुष्य युवा महोत्सवात उपविजेतेपदाचा फिरता चषक गायक, संगीतकार आदर्श शिंदे यांच्या हस्ते स्वीकारताना शिवाजी विद्यापीठाचा संघ. सोबत जळगाव विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एल. माहेश्वरी आणि मान्यवर.


शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. तानाजी चौगुले आणि संघ व्यवस्थापक यांच्यासमवेत इंद्रधनुष्य युवा महोत्सवातील उपविजेता संघ.

(पुरस्कार वितरण समारंभ लघुचित्रफीत)



कोल्हापूर, दि. १० नोव्हेंबर: जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात झालेल्या २१ व्या राज्य आंतरविद्यापीठ इंद्रधुनष्य युवा महोत्सवात येथील शिवाजी विद्यापीठाने सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले. तीन सुवर्ण, एक रौप्य अशा पदकांसह एकूण १६ पारितोषिके विद्यापीठाने पटकावली.

महोत्सवात मुंबई विद्यापीठ विजेते ठरले. जळगाव विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एल. माहेश्वरी, जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि प्रख्यात गायक, संगीतकार आदर्श शिंदे यांच्या हस्ते काल पुरस्कार वितरण समारंभ पार पडला.

कुलपती कार्यालयामार्फत आयोजित महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ इंद्रधनुष्य युवा महोत्सव (२०२५ – २०२६) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे दि. ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला. या महोत्सवात राज्यभरातील २४ विद्यापीठांच्या संघांनी विविध २९ कलाप्रकारांत कलाविष्कार सादर केले. महोत्सवात शिवाजी विद्यापीठाचा एकूण ५५ सदस्यांचा संघ सहभागी झाला.

शिवाजी विद्यापीठाच्या संघाने पुढीलप्रमाणे पारितोषिके पटकावली. लोकसंगीत वाद्यवृंद (प्रथम क्रमांक), वक्तृत्व (प्रथम), वादविवाद (प्रथम), कातरकाम (प्रथम), शास्त्रीय तालवाद्य (प्रथम), व्यंगचित्र (द्वितीय), नाट्यसंगीत (प्रथम), सुगम संगीत (प्रथम), सांस्कृतिक शोभायात्रा (द्वितीय), पाश्चिमात्य समूह गीत (द्वितीय), लघुपट (द्वितीय), भारतीय समूहगीत (तृतीय), शास्त्रीय गायन (तृतीय), पाश्चिमात्य एकल गायन (द्वितीय), लोकनृत्य (तृतीय), एकांकिका (तृतीय). इंद्रधुनष्य युवा महोत्सवातील सर्वसाधारण सांघिक उपविजेतेपदासाठीचा आदेश बांदेकर पुरस्कृत चंद्रकांत यशवंत बांदेकर फिरता चषक विद्यापीठास मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

शिवाजी विद्यापीठाच्या संघाला कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरु डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांचे प्रोत्साहन तर विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले, अधीक्षक सुरेखा आडके यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. सदर संघाचे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून बबन माने, संग्राम भालकर, प्रा. प्रमोद पाटील, शंतनू पाटील, ऋषिकेश देशमाने, नितीन शिंदे, गणेश इंडीकर, सुमंत कुलकर्णी आणि आकाश लिंगाडे यांनी काम पाहिले. संघासोबत डॉ. चौगले यांच्यासह संघव्यवस्थापक म्हणून प्रा. किशोर जालिंदर अदाते (शिवराज कॉलेज ऑफ आर्टस कॉमर्स अॅण्ड डी. एस. कदम विज्ञान महाविद्यालय, गडहिंग्लज), डॉ पद्मश्री वाघमारे (डी.के.ए.एस.सी. कॉलेज इचलकरंजी), वरिष्ठ सहायक विजय इंगवले यांच्यासह तज्ज्ञ मार्गदर्शक होते.




Friday, 7 November 2025

शिवाजी विद्यापीठात ‘वंदे मातरम्’ गीताची १५० वी सार्धशताब्दी उत्साहात

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे दिल्लीहून थेट प्रक्षेपण

'वंदे मातरम्' गीताच्या सार्धशताब्दीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथून देशवासियांना संबोधित केले. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण शिवाजी विद्यापीठात करण्यात आले.


'वंदे मातरम्' राष्ट्रीय गीताच्या सार्धशताब्दीच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठात झालेल्या सामूहिक गायनात प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांच्यासह शिक्षक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

'वंदे मातरम्' राष्ट्रीय गीताच्या सार्धशताब्दीच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठात झालेल्या सामूहिक गायनात प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील यांच्यासह शिक्षक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.



(कार्यक्रमाची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. ७ नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठात वंदे मातरम्या राष्ट्रीय गीताच्या १५० व्या सार्धशताब्दीनिमित्त या गीताचे सामूहिक गायन आज उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास विभागाने या कार्यक्रमाचे संयोजन केले.

शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सुरवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्ली येथे झालेल्या विशेष समारंभाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी वंदे मातरम् हा एक मंत्र असून देशवासियांसाठी ती ऊर्जा, स्वप्न आणि संकल्प असल्याचे सांगितले. या गीताचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंदमठमधील वंदे मातरम् हे केवळ एक गीत नसून भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे प्रेरक स्थान आहे. ब्रिटीशविरोधी क्रांतीची लाट या गीताने देशात निर्माण केली. चट्टोपाध्याय यांच्या लेखणीतून उमटलेला हा राष्ट्रभक्तीचा नाद आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देतो.

पंतप्रधानांच्या संबोधनानंतर सभागृहात संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थिनींच्या साथीने वंदे मातरम्गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. यावेळी सभागृह वंदे मातरम्च्या घोषणांनी दुमदुमले.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. जाधव यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजिस केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर, डॉ. महादेव देशमुख, डॉ. श्रीकृष्ण महाजन यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuesday, 4 November 2025

शिवाजी विद्यापीठाच्या १५४ विद्यार्थिनींची ‘इन्फोसिस’मध्ये निवड

केवळ विद्यार्थिनींसाठी विद्यापीठातील दुसरा सर्वात मोठा कॅम्पस ड्राईव्ह

शिवाजी विद्यापीठात कॅम्पस ड्राइव्हसाठी बहुसंख्येने आलेल्या विद्यार्थिनींसमवेत संवाद साधताना इन्फोसिसच्या अधिकारी मेधा बहुखंडी

शिवाजी विद्यापीठात कॅम्पस ड्राइव्हसाठी बहुसंख्येने आलेल्या विद्यार्थिनींसमवेत संवाद साधताना इन्फोसिसच्या मेधा बहुखंडी

शिवाजी विद्यापीठात कॅम्पस ड्राइव्हसाठी आलेल्या इन्फोसिसच्या मेधा बहुखंडी यांचे ग्रंथभेट देऊन स्वागत करताना कुलसचिव डॉ. विलास शिंदे. शेजारी डॉ. राजन पडवळ आणि डॉ. अजित कोळेकर

शिवाजी विद्यापीठात इन्फोसिसच्या कॅम्पस ड्राइव्हसाठी बहुसंख्येने उपस्थित असलेल्या विद्यार्थिनी

शिवाजी विद्यापीठात इन्फोसिसच्या कॅम्पस ड्राइव्हच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना कुलसचिव डॉ. विलास शिंदे. मंचावर (डावीकडून) डॉ. राजन पडवळ, इन्फोसिसच्या मेधा बहुखंडी आणि डॉ. अजित कोळेकर

(इन्फोसिस कॅम्पस ड्राइव्ह लघुचित्रफीत)



कोल्हापूर, दि. ४ नोव्हेंबर: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक ख्यातीच्या इन्फोसिस कंपनीच्या वतीने शिवाजी विद्यापीठात केवळ विद्यार्थिनींसाठी या कॅलेंडर वर्षातील दुसरा सर्वाधिक मोठा कॅम्पस ड्राइव्ह आयोजित केला. याद्वारे विद्यापीठाच्या १५४ विद्यार्थिनींची कंपनीमध्ये अंतिम निवड करण्यात आली आहे.

इन्फोसिसतर्फे शिवाजी विद्यापीठात या कॅलेंडर वर्षात सलग दुसरा कॅम्पस ड्राईव्ह आयोजित करण्यात आला. फेब्रुवारीमध्ये झालेल्या पहिल्या ड्राइव्हला लाभलेला प्रतिसाद पाहून कंपनीने ऑक्टोबरच्या अंतिम आठवड्यातही केवळ विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थिनींसाठी कॅम्पस ड्राइव्ह घेतला. यामध्ये अभियांत्रिकी पदवीधरांसह गणित, संख्याशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणकशास्त्र विषयांत एम.एस्सी. आणि एमसीए झालेल्या विद्यार्थिनींचा समावेश राहिला. या ड्राईव्हसाठी नोंदणी केलेल्या २१७२ विद्यार्थिनींपैकी १६३४ विद्यार्थिनी ऑनलाईन चाचणीसाठी पात्र ठरल्या. ऑनलाइन चाचणीसाठी १४३६ विद्यार्थिनी उपस्थित राहिल्या. त्यातील १७१ विद्यार्थिनींच्या मुलाखती घेऊन १५४ विद्यार्थिनींची अंतिम निवड करण्यात आली. फेब्रुवारीमध्ये नोंदणी केलेल्या २२०० विद्यार्थिनींपैकी १३०४ जणींची ऑनलाईन चाचणीसाठी निवड झाली होती. त्यातील ९४२ जणींनी चाचणी दिली. त्यामधून मुलाखतीसाठी १४५ जणींची निवड होऊन ७२ विद्यार्थिनींची अंतिम निवड करण्यात आली होती.

विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात आयोजित कॅम्पस ड्राईव्हचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. इन्फोसिसच्या सिनिअर असोसिएट लीड (टीम अॅक्विझिशन) मेधा बहुखंडी यांनी उपस्थित विद्यार्थिनींशी चाचणीपूर्व संवाद साधला आणि इन्फोसिस कंपनीविषयी माहिती दिली. याअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना इन्फोसिसच्या मैसूर येथील जगातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट प्रशिक्षण केंद्रामध्ये सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येईल आणि तेथील त्यांच्या एकूण कार्यप्रदर्शनानुसार योग्य ठिकाणी नियुक्ती देण्यात येईल. इन्फोसिस लिंगसमभावामध्ये विश्वास ठेवणारी कंपनी असून कंपनीमधील स्त्री-पुरूष गुणोत्तर हे ५०:५० करण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचेही त्यांनी अभिमानपूर्वक नमूद केले. विद्यार्थिनींच्या विविध शंकांचेही त्यांनी समाधान केले.

यावेळी डॉ. राजन पडवळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. शामल पवार यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. अजित कोळेकर, डॉ. मानसिंग टाकळे, डॉ. सोमनाथ पवार यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्रशिक्षण अधिकारी उपस्थित होते. कॅम्पस ड्राइव्ह यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यापीठाच्या संगणक केंद्राचे संचालक अभिजीत रेडेकर यांच्या नेतृत्वाखाली संगणक केंद्राची संपूर्ण टीम कार्यरत राहिली.

Friday, 31 October 2025

शिवाजी विद्यापीठामध्ये सरदार पटेल आणि इंदिरा गांधी यांना अभिवादन

  

कोल्हापूर, दि.31 ऑक्टोबर - भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन या निमित्ताने या महान नेत्यांच्या स्मृतींना आज शिवाजी विद्यापीठात अभिवादन करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासीय इमारतीमध्ये आज सकाळी सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव आणि कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.तद्नंतर, सर्व उपस्थितांना प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एकता सद्भावना यांची शपथ देण्यात आली.

यावेळी वित्त लेखाधिकारी डॉ.सुहासिनी पाटील, वाणिज्य व्यवस्थापन अधिविभागप्रमुख डॉ.श्रीकृष्ण महाजन, क्रीडा संचालक डॉ.शरद बनसोडे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ.तानाजी चौगुले, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ.रामचंद्र पवार, स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँंड टेक्नॉलॉजीचे प्र.संचालक डॉ.किरण कुमार शर्मा, डॉ.क्रांतीवीर मोरे, डॉ.राहूल माने, डॉ.सुभाष कोंबडे, उपकुलसचिव डॉ.प्रमोद पांडव, श्रीमती संध्या अडसुळ, डॉ.प्रमोद पाटील, डॉ.तुकाराम डोंगळे, डॉ.मुकेश पाडवी, डॉ.किरण पवार, डॉ.सुनिलकुमार निर्मळे, डॉ.योजना पाटील, डॉ.तेजस्वीनी भट, डॉ.सुर्यबाला सावंत, डॉ.मेघा देसाई, डॉ.कृष्णा पवार, डॉ.अखिलेश पाटील यांच्यासह अधिविभागाचे शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक, विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.

-----