Tuesday, 16 December 2025

शिवाजी विद्यापीठातर्फे तंजावर येथे २२ पासून राष्ट्रीय चर्चासत्र

तंजावर मराठी राज्याच्या सर्वंकष अभ्यासाला मिळणार चालना

तमिळ विद्यापीठ, तंजावर


कोल्हापूर, दि. १६ डिसेंबर: तंजावर मराठी राज्याचा इतिहास, भाषा, साहित्य आणि संस्कृती यांचा अभ्यास व संशोधनाला चालना देण्यासाठी शिवाजी विद्यापीठातर्फे तंजावर येथे येत्या २२ ते २४ डिसेंबर २०२५ या कालावधीत राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मराठी अधिविभागाचे डॉ. नंदकुमार मोरे आणि इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी दिली आहे.

शिवाजी विद्यापीठ आणि तंजावरचे तमिळ विद्यापीठ यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार इतिहास व मराठी अधिविभाग यांच्यासह कोल्हापूरचे महावीर महाविद्यालय, अर्जुननगरचे देवचंद महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ आणि शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हे चर्चासत्र होत आहे. तमिळ विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात होणाऱ्या या चर्चासत्राचे उद्घाटन तंजावरचे श्रीमंत शिवाजीराजे भोसले यांच्या हस्ते २२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता होईल. तंजावरचे अभ्यासक, संशोधक डॉ. विवेकानंद गोपाळ यावेळी बीजभाषण करतील.

यानंतरच्या तीन दिवसांत चर्चासत्रात अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर अभ्यासक व संशोधक मांडणी करतील. त्यांची नावे आणि कंसात विषय याप्रमाणे असे:- डॉ. समीर जाधव, मुंबई (तंजावरचे मराठी नाटक), डॉ. राकेश साळुंखे, सातारा (तमिळनाडूतील अप्रकाशित हस्तलिखिते), बी. रामचंद्र, तंजावर (सरस्वती महाल ग्रंथालयातील अप्रकाशित हस्तलिखिते), डॉ. धनंजय होनमाने, कुंडल (तंजावरची मराठी कीर्तन परंपरा), डॉ. एम. बावानी, तंजावर (तमिळनाडूतील मराठा शिलालेख), डॉ. एस. कविथा, तंजावर (तमिळ साहित्याच्या विकासात मराठ्यांचे योगदान), डॉ. व्ही. सेल्वकुमार, तंजावर (तमिळनाडूमध्ये मराठ्यांचे आगमन आणि योगदान), डॉ. टी. कन्नन, तंजावर (मराठ्यांनी तयार केलेली ऐतिहासिक कागदपत्रे), श्री. मणिमारन, तंजावर (मराठा काळातील ताडपत्रावरील हस्तलिखिते), डॉ. अरुण शिंदे (मध्ययुगीन तंजावरी मराठी साहित्य), डॉ. प्रकाश दुकळे (तंजावरची स्वयंवर काव्ये), डॉ. अशोक शिंदे (आद्य नाटककार शाहाराजे भोसले), डॉ. तेजस चव्हाण, दिल्ली (तंजावरचे मराठी साहित्य), डॉ. सुभाष पाटील, सांगली (तंजावरचे आद्य वाङ्मयसेवक), डॉ. सुखदेव एकल, कोल्हापूर (तंजावर नाटकाचे लेखनतंत्र), डॉ. अशोक तवर, सातारा (तंजावरच्या कलाक्षेत्रातील प्रगती), डॉ. धोंडीराम दमामे, ईश्वरपूर (तंजोर चित्रकला शैली), प्रा. परसू गावडे, बेळगाव (तंजावरच्या नाटकातील प्रयोगशीलता), प्रा. प्रतीभा पाटणे, खंडाळा (तंजावरची संस्कृती), डॉ. तानाजी हवालदार, शिराळा (मराठा काळातील तंजावरमधील महसूल व्यवस्था), डॉ. सतीश चौगुले, वाळवा (तंजावरची मराठेकालीन प्रशासन व्यवस्था), डॉ. संतोष जेटीथोर (रेव्हरंड ख्रिश्चन फ्रेडरिक श्वार्ट्झ यांचे तंजावरमधील कार्य), डॉ. अवनीश पाटील (तंजावर मराठ्यांचा इतिहास), डॉ. संघमित्रा सरवदे (मराठा-तंजावर संबंध), डॉ. सुवर्णा पाटील (मराठी व तमिळ भाषेचा अनुबंध), डॉ. मनोहर कोळसेकर (तंजावरचे राजे सरफोजी द्वितिय), डॉ. ऊर्मिला क्षीरसागर (तंजावरचे राजे व नाट्यकला). याखेरीज, सहभागी संशोधक व शिक्षक सरस्वती महाल ग्रंथालयाला भेट देतील. तंजावरचे श्रीमंत आबाजीराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत २४ डिसेंबरला दुपारी ४ वाजता चर्चासत्राचा समारोप होईल. 

शब्दांच्या समृद्धीने माणूस अभिव्यक्तीसंपन्न: शिवाजी राऊत

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात बोलताना शिवाजी राऊत.

शिवाजी विद्यापीठात पी.एम. उषाअंतर्गत आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन करताना डॉ. आलोक जत्राटकर. सोबत ज्येष्ठ पत्रकार शिवाजी राऊत आणि डॉ. तृप्ती करेकट्टी. 




कोल्हापूर, दि. १६ डिसेंबर: शब्दांची समृद्धी माणसाला अभिव्यक्तीसंपन्न बनवते. शब्दांचा जितका काटेकोर वापर तितकी अभिव्यक्ती परिणामकारक होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार शिवाजी राऊत यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी अधिविभागामार्फत आयोजित कंटेण्ट रायटिंग फॉर मीडिया या मूल्यवर्धित पाठ्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते काल (दि. १५) बोलत होते. आशयपूर्ण लेखन, भाषण शैली स्वरूप व महत्व याविषयी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अधिविभाग प्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी उपस्थित होत्या.

श्री. राऊत यांनी माध्यमांसाठी आवश्यक आशय, शब्दांची निवड, वाक्यांची मांडणी, शैलीची स्पष्टता, मोजकेपणा आदींची माहिती दिली. ते म्हणाले, शब्द माणसाला माणूस बनवतात, ज्ञान देतात, सुसंस्कृत करतात. त्यामुळे त्यांचा वापर जपून आणि तोलामोलाने करणे गरजेचे आहे. शब्दांची समृद्धी अभिव्यक्तीसंपन्नता वाढविते. ही समृद्धी वाचनाने वाढते. लिहिण्याने तिचा पैस विस्तारतो. म्हणून आशयपूर्ण लेखनासाठी भाषा, शब्द, मेंदू यांची सांगड घातली पाहिजे. जितका शब्दांवर प्रभाव तितके सरस लेखन होते. शब्दातून बोध होतो. अनेक शब्दांमधून वाक्यबोध, वाक्यांतून तत्वबोध आणि तत्वबोधातून ज्ञानबोध होत असतो. वास्तवता, आवाज, चित्रमयता, व्यक्तीवाचकता, वस्तूवाचकता, वर्णनात्मकता या सर्व गोष्टी कंटेण्ट रायटिंगमध्ये आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. माध्यमांच्या वर्तमानकालीन विस्ताराचा वेध त्यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात घेतला. माध्यमांनी, विशेषतः समाजमाध्यमांनी सर्वसामान्य माणसांच्या जगणे व्यापले असून त्यांचा वापर करताना सदैव आपला सद्सद्विवेक जागृत ठेवण्याची आवश्यकता आहे. समाजात पोषक वातावरण निर्मितीसाठी समाज माध्यमांचा तरुणांनी जबाबदार वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी जबाबदार नागरिक घडवण्यामध्ये माध्यमे मोलाची भूमिका बजावतात, असे सांगितले. डॉ. जयसिंग कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. गीता दोडमणी यांनी परिचय करून दिला, तर डॉ. प्रकाश निकम यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Monday, 15 December 2025

स्त्री-पुरूष समानतेची सुरवात घरापासून व्हावी: के. मंजुलक्ष्मी

महाराणी ताराराणींच्या कार्याचा विद्यापीठात जागर

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक के. मंजुलक्ष्मी.

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक के. मंजुलक्ष्मी. मंचावर (डावीकडून) डॉ. सुषमा पाटील, डॉ. प्रतिभा देसाई, डॉ. सुहासिनी पाटील, डॉ. विलास शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड.


(कार्यक्रमाची लघुचित्रफीत)




कोल्हापूर, दि. १५ डिसेंबर: स्त्री-पुरूष समानतेची सुरवात घरापासून झाली, तरच समाजात समानतेचे बीज रुजेल. त्या दृष्टीने महाराणी ताराराणी यांचे जीवनचरित्र स्त्रियांच्या कर्तृत्वासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी आज केले.

शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आणि बेटी बचाव अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यापीठात करवीर राज्य संस्थापिका छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या ३५० व्या जयंती वर्षानिमित्त महाराणी ताराराणी यांच्या शिवशाहीचा तेजस्वी जागर या उपक्रमांतर्गत व्याख्यान, कर्तृत्ववान महिलांचा सत्कार आणि मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव उपस्थित होत्या.

मुलींनी मोठी स्वप्ने पाहणे आवश्यक असल्याचे सांगताना श्रीमती मंजुलक्ष्मी म्हणाल्या, एकीकडे शिक्षणामध्ये मुलींचा टक्का खूप मोठा आणि वाढता आहे. त्याच वेळी विविध खासगी, शासकीय आस्थापना आणि सेवांमध्ये मात्र त्यांचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी आहे. ही तफावत दूर करण्याची गरज आहे. कुटुंबातील प्रत्येकाने घरामध्ये मुलगा- मुलगी असा भेद न करता दोघांचेही समान पद्धतीने संगोपन करणे आवश्यक आहे. तरच त्यांच्या मनावर लहानपणापासून समानतेचे मूल्य रुजेल.

पेठवडगावच्या बी.एड. कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य श्वेता चौगुले म्हणाल्या, ताराराणी या केवळ लढवय्या नव्हत्या, तर त्या एक आदर्श सून, पत्नी आणि माताही होत्या. ही भूमिकाही त्यांनी समर्थपणे पार पाडली.

महिलेला घरचे पाठबळ महत्त्वाचे

गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी आपल्या आयुष्याच्या वाटचालीचा हृद्य आढावा घेतला. कष्टकरी घरात जन्मलेल्या गायकवाड यांनी घरच्यांच्या पाठिंब्यावर शिक्षण घेतले आणि अवघ्या एकोणीसाव्या वर्षी विवाहानंतर सासरच्यांच्या पाठिंब्यावर राज्यसेवा आणि केंद्रीय सेवा परीक्षा पहिल्याच प्रयत्नांत उत्तीर्ण केल्या. इच्छाशक्ती, कष्ट करण्याची तयारी आणि त्यामध्ये सातत्य यांच्या जोडीला कुटुंबियांचे पाठबळ ही बाब सुद्धा महिलेच्या प्रगतीसाठी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, महाराणी ताराराणी यांचे कर्तृत्व केवळ करवीरपुरते मर्यादित नव्हते, तर त्या खऱ्या अर्थाने स्वराज्य रक्षक होत्या. इथल्या प्रत्येक मुलीने त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न करावा.

अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव म्हणाल्या, लहानपणापासून महाराणी ताराराणी यांचा पुतळा माझे प्रेरणास्रोत राहिला आहे. या पुतळ्यासमोर नतमस्तक होताना कृतज्ञतेमुळे डोळ्यांतून अश्रू ओघळल्याशिवाय राहात नाहीत. त्या प्रजाहितदक्ष रणरागिणी होत्याच, त्याच बरोबरीने कुशल प्रशासक व राजकारणी होत्या. त्यांचा पराक्रम आणि मुत्सद्देगिरी यामुळे मराठा सत्ता टिकून राहिली.

यावेळी वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, पुराभिलेख अधिकारी दिपाली पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. प्रतिभा देसाई यांनी केले, तर डॉ. सुषमा पाटील यांनी आभार मानले.

यानंतर झालेल्या दुसऱ्या सत्रात व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. वर्षा मैंदर्गी, डॉ. मंजिरी मोरे, अधिसभा सदस्य श्वेता परुळेकर, डॉ. माधुरी वाळवेकर, डॉ. विनिता रानडे, अॅड. अनुष्का कदम, दुर्गाली गायकवाड यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यानंतर राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात मर्दानी खेळांच्या प्रत्यक्षिकांनी कार्यक्रमाची सांगता झाली.

Friday, 12 December 2025

'लॅब टू फॅब्रिकेशन' मंत्रासह संशोधनाला उद्योगाची जोड देण्याची गरज: 'ॲल्युमिनियम मॅन' भरत गीते

शिवाजी विद्यापीठात ५ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र परिषदेची यशस्वी सांगता

भरत गीते


कोल्हापूर, दि. १२ डिसेंबर: केवळ प्रयोगशाळेतील चार भिंतींच्या आत संशोधन करून थांबणे आता उपयोगाचे नसून त्या संशोधनाचे रूपांतर प्रत्यक्ष उत्पादनात आणि व्यापारात झाले पाहिजे. देशाला खऱ्या अर्थाने स्वावलंबी आणि विकसित बनवण्यासाठी 'ॲकॅडेमिया आणि इंडस्ट्री' यांच्यात थेट संवाद होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पुण्याच्या तरुल इंडिया प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक आणि भारताचे 'ॲल्युमिनियम मॅन' म्हणून ओळखले जाणारे भरत गीते यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभागामार्फत आयोजित तीन दिवसीय "५ व्या आंतरराष्ट्रीय परिषद: फिजिक्स ऑफ मटेरियल्स अँड मटेरियल्स बेस्ड डिव्हाइस फॅब्रिकेशन" (ICPM-MDF-2025) च्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. शुक्रवारी राजर्षी शाहू सिनेट हॉलमध्ये या आंतरराष्ट्रीय परिषदेची मोठ्या उत्साहात सांगता झाली. समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रा. राजेंद्र सोनकवडे होते.

यावेळी भारताला ॲल्युमिनियम कास्टिंग आणि फॅब्रिकेशन क्षेत्रात जागतिक स्तरावर नेऊन ठेवणाऱ्या भरत गीते यांनी विद्यार्थ्यांनी संशोधनाचे रूपांतर उद्योगात कसे करावे, याविषयी मार्गदर्शन केले. आपल्या अनुभवाचा दाखला देत त्यांनी विद्यार्थ्यांना 'लॅब टू फॅब्रिकेशन' हा मंत्र दिला. केवळ पेटंट मिळवून न थांबता त्याचे व्यापारीकरण कसे करावे आणि यशस्वी स्टार्टअप्स कसे उभे करावेत, याचे व्यावहारिक धडे त्यांनी दिले.

दरम्यान, आज परिषदेच्या अखेरच्या दिवशी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रगत संशोधनांची सादरीकरणे झाली. सकाळच्या सत्रात दक्षिण अमेरिकेतील चिली येथील डॉ. संतोष नंदी यांनी नॅनो स्ट्रक्चर्समधील अद्ययावत बदलांची माहिती दिली. अध्यक्षस्थानी डॉ. मानसिंग टाकळे होते.

अध्यक्षीय भाषणात डॉ. सोनकवडे म्हणाले, "भौतिकशास्त्र अधिविभाग नेहमीच अशा जागतिक दर्जाच्या उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन देत आला आहे. यातूनच उद्याचे शास्त्रज्ञ घडणार आहेत." यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून आयर्लंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ लिमरिकचे डॉ. नानासाहेब थोरात उपस्थित होते. समन्वयक डॉ. नीलेश तरवाळ यांनी तीन दिवसांच्या कामकाजाचा आढावा सादर केला. डॉ. सत्यजित पाटील यांनी आभार मानले. परिषदेच्या यशस्वितेसाठी खजिनदार डॉ. राजीव व्हटकर, सचिव डॉ. आण्णासाहेब मोहोळकर, डॉ. केशव राजपुरे, डॉ. मानसिंग टाकळे, डॉ. एस. पी. दास, डॉ. एम. आर. वाईकर, डॉ. ए. आर. पाटील यांच्यासह सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

भाऊ पाध्ये अनुभववादी साहित्यिक: प्रा. अविनाश सप्रे

शिवाजी विद्यापीठात दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन

शिवाजी विद्यापीठात भाऊ पाध्ये यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात बीजभाषण करताना प्रा. अविनाश सप्रे.



शिवाजी विद्यापीठात भाऊ पाध्ये यांच्या 'राडा' या कादंबरीच्या हिंदी अनुवादाचे प्रकाशन करताना (डावीकडून) डॉ. नंदकुमार मोरे, प्रा. अविनाश सप्रे, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, अनुवादकार गोरख थोरात, चंद्रकांत पाटील आणि डॉ. रणधीर शिंदे

(भाऊ पाध्ये राष्ट्रीय चर्चासत्राची लघुचित्रफीत)



कोल्हापूर, दि. १२ डिसेंबर: भाऊ पाध्ये हे मराठी साहित्यातील एक महत्त्वाचे अनुभववादी, मानवतावादी लेखक होते. समस्त प्रस्थापित मांडणी व संकेतांना छेद देणारे आणि प्रस्थापित चौकटी झुगारून देत जगण्याचे अराजक मांडणारे लेखन हे त्यांच्या समग्र साहित्यव्यववहाराचे वैशिष्ट्य होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक व समीक्षक प्रा. अविनाश सप्रे यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागातर्फे पी.एम.-उषा योजनेअंतर्गत साठोत्तरी काळातील अग्रगण्य लेखक भाऊ पाध्ये यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भाऊ पाध्ये यांचे वाङ्मय: आकलन आणि पुनर्विचार या विषयावरील दोनदिवसीय चर्चासत्रास आज प्रारंभ झाला. चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात बीजभाषण करताना प्रा. सप्रे बोलत होते. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ कवी, अनुवादक व समीक्षक प्रा. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन झाले.

प्रा. सप्रे यांनी आपल्या बीजभाषणात पाध्ये यांच्या समग्र साहित्याचे चिकित्सक आकलन मांडले. ते म्हणाले, भाऊ पाध्ये यांचे साहित्य समजून घेण्यास प्रचलित वादसंकल्पना अपुऱ्या ठरतात. अत्यंत चौफेर आणि खुलेपणाने, अनुभवाला थेट भिडणारे लेखन भाऊंनी केल्याने ते अनुभववादी लेखक ठरतात. त्यांनी स्वतःच्या लेखनाला कोणतीही प्रचलित संदर्भचौकट स्वीकारली नाही. रचनेपेक्षा विरचनेवर अधिक भर दिला. टोकाचा व्यक्तीवाद टाळून ते समूहाच्या दृष्टीने भोवतालाकडे पाहतात. कृतीप्राधान्यतेबरोबरच आदिम प्रेरणांचे मुक्त आविष्कार त्यांच्या लेखनात आढळतात. आशय, भाषा, विषय यांची असांकेतिकतेसह अनुत्कट शैली असली तरी त्यात कोरडेपणा नाही, हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. वर्गीय जाणीवा समजून घेतानाच त्यापलिकडे जाऊन एका विशिष्ट तटस्थ बिंदूवरुन ते त्याविषयीचे लेखन करतात. त्या अर्थाने ते अवर्गीय आणि व्यापक अंगाने मानवतावादी लेखक ठरतात. त्यांच्या लेखनात कोणताही पूर्वग्रह आढळत नाही. मानवी समाजात अस्तित्वात असलेल्या सर्व विसंगतींसह निर्माण झालेल्या अनेक आवाजांचे मिश्रण त्यांच्या साहित्यात आढळते म्हणून ते वेगळे आणि श्रेष्ठ ठरते. ते समजून घेण्यासाठी भाऊंच्या समग्र साहित्याचे पुनर्वाचन आवश्यक ठरते, असेही सप्रे म्हणाले.

वाचकांची अभिरुची घडविणारा पत्रकार, लेखक

चंद्रकांत पाटील यांनी भाऊ पाध्ये यांच्या सहवासातील अनेक मैत्रीपूर्ण प्रसंगांना उजाळा देऊन त्यामधून त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक अलक्षित पैलू श्रोत्यांसमोर मांडले. ते म्हणाले, लघुनियतकालिक चळवळीला बळ देणारा प्रणेता भाऊ पाध्ये होते. कामगार चळवळीत त्यांचे संपूर्ण आयुष्य गेले. त्यामुळे येथील अधोसंस्कृतीकडे पाहण्याची त्यांची म्हणून एक वेगळी दृष्टी होती. ती दृष्टी पुढे मनोहर ओक, नामदेव ढसाळ यांच्यात आढळते. सिनेमापासून राजकारणापर्यंत विविध विषय त्यांनी पत्रकार, लेखक म्हणून हाताळले. त्याद्वारे सिनेमाविषयी जाणीवा निर्माण करीत असतानाच वाचकांची उच्च अभिरुची त्यांनी घडविली. नवे लेखक त्यांच्या लेखनापासून, शैलीपासून प्रेरणा घेत आहेत, ही समाधानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, भाऊ पाध्ये यांनी उघड्या डोळ्यांनी, संवेदनशील मनाने भोवताल टिपला आणि तो जसाच्या तसा लिहीला, म्हणून ते लेखन वाचकांना भिडले. त्यांच्या साहित्यात माणसाचे खरे दर्शन घडते, त्याचा विद्यार्थ्यांनी मुळापासून अभ्यास केला पाहिजे.

मान्यवरांच्या हस्ते भाऊ पाध्ये यांच्या राडा या गोरख थोरात अनुवादित हिंदी कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी थोरात यांच्यासह दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी निवड झाल्याबद्दल प्रा. सप्रे यांचा आणि उत्कृष्ट शोधप्रबंध पुरस्कार प्राप्त करणारे डॉ. राजेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले. समारंभास डॉ. माया पंडित, डॉ. उदय नारकर, डॉ. श्रीराम पवार, सचिन परब, डॉ. शरद नावरे, डॉ. प्रकाश पवार, डॉ. अवनीश पाटील, डॉ. प्रभंजन माने, डॉ. नीलांबरी जगताप, डॉ. किरण गुरव, अमित नारकर, अवधूत डोंगरे, प्रसाद कुमठेकर यांच्यासह शिक्षक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Thursday, 11 December 2025

भौतिकशास्त्र आंतरराष्ट्रीय परिषद: दिवस दुसरा

नवसंशोधकांनी नवा ज्ञानप्रवाह निर्माण करावा: डॉ. नानासाहेब थोरात

जर्मनी, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरियाच्या शास्त्रज्ञांनी उलगडली संशोधनाची नवी क्षितिजे

शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत मार्गदर्शन करताना प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात.


कोल्हापूर, दि. ११ डिसेंबर: संशोधकांनी बहुआयामी ज्ञान संपादन करून विविध ज्ञानशाखांच्या संगमातून नवा ज्ञानप्रवाह निर्माण करण्यासाठी परिश्रम घेतले पाहिजेत, असे प्रतिपादन आयर्लंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ लिमरिक येथील प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभागामध्ये सुरू असलेल्या "५ व्या आंतरराष्ट्रीय परिषद: फिजिक्स ऑफ मटेरियल्स अँड मटेरियल्स बेस्ड डिव्हाइस फॅब्रिकेशन"मध्ये उपस्थित संशोधकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी जागतिक स्तरावरील संशोधकांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले आणि नवसंशोधनाच्या क्षितिजांचा उपस्थितांना परिचय करून दिला. आज विविध तांत्रिक सत्रांमध्ये जर्मनी, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरिया येथील नामवंत शास्त्रज्ञांनी आरोग्य, ऊर्जा आणि प्रगत तंत्रज्ञान या विषयी अत्यंत महत्त्वपूर्ण स्वरुपाचे मार्गदर्शन केले.

आज पहिल्या सत्रात मुंबई विद्यापीठाचे डॉ. पी. बी. सरवदे आणि इंदूर येथील राजा रामण्णा सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीचे शास्त्रज्ञ डॉ. पुष्पेन मंडल यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे डॉ. केशव राजपुरे होते. यावेळी भारतीय संशोधकांनी प्रगत साधनसामुग्री व उपकरणांचा वापर करून देशांतर्गत तंत्रज्ञान विकसित करण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. मंडल यांनी सांगितले.

दुपारच्या सत्रात आयर्लंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ लिमरिकचे डॉ. नानासाहेब थोरात आणि दक्षिण कोरियाच्या चोन्नम नॅशनल युनिव्हर्सिटीचे डॉ. मयूर गायकवाड यांनी 'बायो-मटेरियल्स' आणि त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील उपयोजन याविषयी सविस्तर माहिती दिली. अध्यक्षस्थानी डॉ. अण्णासाहेब मोहोळकर होते.

त्यानंतर जर्मनीतील कील युनिव्हर्सिटीचे डॉ. अमर पाटील, ऑस्ट्रेलियाच्या युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्सचे डॉ. एम. पी. सूर्यवंशी आणि दक्षिण कोरियाच्या सुंगक्युकवान युनिव्हर्सिटीचे डॉ. रवींद्र बुलाखे यांनी सौर ऊर्जा आणि बॅटरी तंत्रज्ञानातील नवनवीन प्रवाहांची माहिती दिली. तसेच, जपानमधील हिरोशिमा विद्यापीठाचे डॉ. विनायक पारळे यांनी एरोजेल पदार्थांच्या आधुनिक उपयोजनाविषयी मार्गदर्शन केले. डॉ. हेमराज यादव अध्यक्षस्थानी होते. परदेशातील संशोधन संधी आणि आव्हाने याविषयीही या वक्त्यांनी मार्गदर्शन केले. सायंकाळी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्राची लोककला आणि परंपरा दर्शविणारी नृत्ये व गायन सादरीकरण झाले.

उद्या परिषदेच्या अखेरच्या दिवशी चिली (दक्षिण अमेरिका) येथील डॉ. संतोष नंदी, पुण्याच्या 'टॉरल इंडिया प्रा. लि.'चे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ भरत गीते हे 'संशोधन आणि उद्योग' यावर मार्गदर्शन करतील. त्यानंतर परिषदेचा समारोप होईल.

Wednesday, 10 December 2025

आयात-निर्यात क्षेत्रातील संधींविषयी

शिवाजी विद्यापीठातर्फे कार्यशाळा

शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित आयात-निर्यात कार्यशाळेत बोलताना डॉ. योगेश शेटे. (मंचावर) सलोनी पंडितविषयतज्ज्ञ अक्षय राणेडॉ. रामचंद्र पवारप्रा. पी. डी. उकेसिद्धार्थ पंडित आणि रोहन कांबळे.


कोल्हापूर, दि. १० डिसेंबर: विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाबरोबरच उद्योजकता वृद्धीसाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबविणारे शिवाजी विद्यापीठाचे कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र, लेव्हलअप अकॅडमी, कोल्हापूर आणि डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चरल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, तळसंदे (कोल्हापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने “लोकल टू ग्लोबल ऑपॉर्च्युनिटीज: एक्स्पोर्ट–इम्पोर्ट” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा काल (दि. ९) डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजच्या सभागृहात झाली. कार्यशाळेला युवकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक अक्षय राणे (EXIM WALA – एक्स्पोर्ट व इम्पोर्ट तज्ज्ञ) यांनी भारतीय युवकांसाठी आयात-निर्यात क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींबाबत सविस्तर माहिती दिली. जागतिक व्यापारातील वाढत्या शक्यता, उद्योगातील आवश्यक कौशल्ये, व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया, परकीय बाजारपेठेतील मागणी यावर त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.

शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार केंद्र आणि कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक डॉ. रामचंद्र पवार यांनी कौशल्याधिष्ठित शिक्षणाबरोबरच जागतिक पातळीवरील संधींचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी चौफेर ज्ञान घेऊन सुसज्ज व्हायला हवे, असे सांगितले.

कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. पी. डी. उके, प्लेसमेंट ऑफिसर प्रा. योगेश शेटे, लेव्हलअप अकॅडमीचे संचालक सिद्धार्थ पंडित आणि संचालिका सौ. सलोनी पंडित यांनीही विद्यार्थ्यांना रोजगार व उद्योजकतेच्या संधींबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना एक्स्पोर्ट–इम्पोर्ट क्षेत्रातील नव्या दिशा, कौशल्यविकासाच्या संधी आणि जागतिक व्यापारातील करिअर मार्गांविषयी अद्यावत माहिती प्राप्त होण्यास मदत झाली.