Thursday, 26 February 2026

समावेशन आणि शाश्वततेची कास धरल्यास भारतीय अर्थव्यवस्थेचे भवितव्य उज्ज्वल: डॉ. एस. महेंद्र देव

शिवाजी विद्यापीठात तीनदिवसीय राष्ट्रीय अर्थमिती परिषदेस प्रारंभ

शिवाजी विद्यापीठात आयोजित तीनदिवसीय राष्ट्रीय अर्थमिती परिषदेच्या उद्घाटन समारंभात दीपप्रज्वलन करताना पंतप्रधान कार्यालयाच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. एस. महेंद्र देव. सोबत (डावीकडून) डॉ. अनिल कुमार गुप्ता, डॉ. नीरज हातेकर, डॉ. महादेव देशमुख आणि प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव.

शिवाजी विद्यापीठात आयोजित तीनदिवसीय राष्ट्रीय अर्थमिती परिषदेच्या उद्घाटन समारंभात मार्गदर्शन करताना पंतप्रधान कार्यालयाच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. एस. महेंद्र देव. मंचावर (डावीकडून) डॉ. महादेव देशमुख, डॉ. के. षण्मुगन, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, डॉ. नीरज हातेकर आणि डॉ. अनिल कुमार गुप्ता.

शिवाजी विद्यापीठात आयोजित तीनदिवसीय राष्ट्रीय अर्थमिती परिषदेच्या उद्घाटन समारंभात मार्गदर्शन करताना पंतप्रधान कार्यालयाच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. एस. महेंद्र देव.

(शिवाजी विद्यापीठात आयोजित तीनदिवसीय राष्ट्रीय अर्थमिती परिषदेच्या उद्घाटन समारंभाची लघुचित्रफीत.)



कोल्हापूर, दि.२६ फेब्रुवारी: भारताने समावेशक आणि शाश्वत विकासाचा मार्ग स्वीकारल्यास भारतीय अर्थव्यवस्थेचे भवितव्य अत्यंत उज्ज्वल असून सन २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न निश्चितपणे साकार होईल, असा विश्वास भारताच्या पंतप्रधान कार्यालयाच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. एस. महेंद्र देव यांनी केले.

शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र अधिविभाग (स्वायत्त), भारतीय अर्थमिती संस्था आणि डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग आणि टेक्नोलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय अर्थमिती संस्था हीरक महोत्सवी (६० व्या) वार्षिक राष्ट्रीय परिषदेस आज शिवाजी विद्यापीठात प्रारंभ झाला. परिषदेच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नीरज हातेकर अध्यक्षस्थानी होते. विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव उद्घाटक म्हणून तर डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण समूहाचे कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता प्रमुख उपस्थित होते.

डॉ. देव यांनी यावेळी भारतीय अर्थव्यवस्था: काल, आज आणि उद्या या विषयावर सविस्तर विवेचन केले. ते म्हणाले, जागतिक स्तरावर अनिश्चितता आणि अनेक आव्हाने असली तरी मजबूत देशांतर्गत मागणी, राजकीय स्थैर्य आणि व्यापक आर्थिक स्थैर्य यामुळे भारतीय अर्थव्यवस्था लवचिक  राहिली आहे. मात्र, केवळ सकल राष्ट्रीय उत्पन्नवाढ पुरेशी नसून समावेशक आणि पर्यावरणपूरक विकासावर भर देणे आवश्यक आहे.

डॉ. देव म्हणाले की, विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी उत्पादन क्षेत्राचा विस्तार, विशेषतः श्रमप्रधान उद्योगांना प्रोत्साहन देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे रोजगारनिर्मिती वाढेल, निर्यात मजबूत होईल आणि संरचनात्मक परिवर्तनाला गती मिळेल. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला बळकटी देणे, संशोधन व विकास मध्ये गुंतवणूक वाढविणे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अर्थव्यवस्थेसाठी तयारी करणे हे भविष्यातील यशाचे प्रमुख घटक ठरतील. भारताच्या विकासात राज्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून प्रत्येक राज्याने आपल्या क्षमतेनुसार विकासाचे स्वतंत्र उद्दिष्ट निश्चित करणे आवश्यक आहे. देशातील विविध राज्यांमध्ये विकासाची असमानता असल्याने संतुलित प्रादेशिक विकासावर विशेष भर देणे गरजेचे आहे. भारतातील लोकसंख्यात्मक लाभांश ही मोठी संधी असून तिचा योग्य वापर करण्यासाठी कौशल्य विकास, दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.

हवामान बदल हा भारताच्या दीर्घकालीन विकासासाठी गंभीर आव्हान असून हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे आणि स्वच्छ ऊर्जा वापर वाढविणे ही काळाची गरज आहे. पर्यावरणपूरक आणि हवामान-संवेदनशील विकास धोरण स्वीकारल्यास भारत आर्थिक प्रगतीसोबतच पर्यावरणीय संतुलनही राखू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

उद्घाटनपर मनोगतात प्र-कुलगुरू डॉ. जाधव म्हणाल्या, भारतीय अर्थमिती संस्थेने देशाच्या आर्थिक विकासामध्ये मार्गदर्शकाची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. येथून पुढच्या काळात जनुकीय परिवर्तनाधारिक पिके तसेच नवऔषध निर्माणाला जगाच्या अर्थकारणात मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे. कोविड-१९च्या साथीने त्याची चुणूक आपल्याला दाखविली आहे. त्यामुळे आधुनिक जैवतंत्रज्ञानाच्या युगामध्ये औषधनिर्माण शास्त्रातील संशोधन व विकास या बाबींना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीनेही अर्थशास्त्रज्ञांनी आता विचार व कृती करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. नीरज हातेकर यांनी संशोधकांना सूक्ष्म आणि स्थानिक आकडेवारीच्या अभ्यासाकडे वळण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या प्रचंड अशा स्थाननिहाय आकडेवारीतून अर्थव्यवस्थेतील महत्त्वपूर्ण प्रवृत्ती आणि विषमता अधिक अचूकपणे समजून घेता येतात; मात्र, यासाठी प्रगत सांख्यिकी व अर्थमिती तंत्रांसह प्रचंड संगणकीय क्षमतेची आवश्यकता असते. भविष्यात संशोधनातील सर्वात मोठे आव्हान हे सॉफ्टवेअर किंवा डेटा नव्हे, तर संगणकीय क्षमता, इंटरनेट गती आणि हार्डवेअर असेल. तसेच, मोठ्या डेटावर आधारित संशोधनासाठी संशोधकांमध्ये व्यापक सहकार्य आणि नेटवर्किंग अत्यावश्यक असून या क्षेत्रात अधिकाधिक संशोधकांनी सहभागी होण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला अर्थशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. महादेव देशमुख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. देशमुख यांच्या ‘दि थ्री डीज्’ या पुस्तकाचे तसेच परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. भारतीय अर्थमिती संस्थेचे सचिव डॉ. के. षण्मुगन यांनी आभार मानले. या तीनदिवसीय परिषदेसाठी २२ राज्यांतून ३०० पेक्षा अधिक शिक्षक, अर्थशास्त्रज्ञ, संशोधक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित आहेत.

  

Wednesday, 25 February 2026

राज्यस्तरीय नोकरी महामेळाव्यात निवड झालेल्या १९८६ उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान

शिवाजी विद्यापीठात आयोजित नोकरी महामेळाव्यात निवड झालेल्या उमेदवारास नियुक्तीपत्र प्रदान करताना प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव. सोबत कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. ज्ञानेश्वर मुळे, सिद्धार्थ शिंदे, डॉ. एन.डी. पाटील, स्वागत परुळेकर, डॉ. सुभाष कोंबडे आदी


कोल्हापूर, दि. २५ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठाचा मध्यवर्ती रोजगार कक्ष, डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाऊंडेशन आणि विद्यापीठ विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या रविवारी (दि. २२ फेब्रुवारी) विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय नोकरी महामेळाव्याअंतर्गत निवड झालेल्या १९८६ उमेदवारांना त्या सायंकाळी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

रविवारी विद्यापीठ कॅम्पसवरील विविध अधिविभागांमध्ये मुलाखती पार पडल्या. मुलाखतीमध्ये निवड झालेल्या १९८६ युवक-युवतींना त्याच दिवशी सायंकाळी नियुक्ती पत्रे देण्यात आली.  तसेच, ४९३७ उमेदवारांना मुलाखतीच्या पुढील फेरीसाठी निवडण्यात आले. ४६८० उमेदवारांची शैक्षणिक पात्रता व अनुभवाची कागदपत्रे कंपनीच्या प्रतिनिधींनी पुढील कार्यवाहीसाठी जमा करून घेतली.

या रोजगार मेळाव्याअंतर्गत विविध १३७ कंपन्या व आस्थापनांच्या एकूण ९००० जागांसाठी १७,८७२ इतके उमेदवार उपस्थित राहिले. यामध्ये प्रामुख्याने इंजिनीअरिंग, मेडिकल, फार्मा, मॅन्युफॅक्चरिंग, बँकिंग, फायनान्स, विमा, अकाउंटिंग, आरोग्यसेवा, ऑटोमोबाईल, आयटी, नर्सिंग या क्षेत्रांतील संधींचा समावेश आहे.

नोकरी महामेळावा आयोजनासाठी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव, कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे, विद्यापीठ विकास मंचचे प्रदेशाध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे, स्वागत परुळेकर, प्रशिक्षण अधिकारी शामल पवार, डॉ. ज्ञानेश्वर मुळे फौंडेशनचे प्रतिनिधी नितीन माने, नेहा कुंभार यांचे सहकार्य लाभले.  मेळावा यशस्वी करण्यासाठी मध्यवर्ती रोजगार कक्षाचे समन्वयक डॉ. सुभाष कोंबडे यांनी नेटके नियोजन केले. या कामी विद्यापीठाच्या अधिसभा व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, आधिविभागप्रमुख, शिक्षक, प्लेसमेंट अधिकारी, स्वयंसेवक यांनी योगदान दिले.

Tuesday, 24 February 2026

ज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील मराठी साहित्याच्या पिकाचे राखणदार - डॉ.राजन गवस

 


 

कोल्हापूर,दि.24 फेब्रुवारी - ज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील मराठी साहित्याच्या पिकाचे राखणदार, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ.राजन गवस यांनी आज येथे केले.

            शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या डॉ.म.सु.पाटील समीक्षा पुरस्कार, 2026 चे आयोजन करण्यात आले होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिवडॉ.विलास शिंदे उपस्थित होते.

            डॉ.गवस पुढे म्हणाले,खेडयापाडयातील लिहित्या मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम चंद्रकांत पाटील यांनी केले.अफाट वाचनामुळे साहित्याविषयीची त्यांची भूमिका पक्की होती.

            पुरस्कारस उत्तर देताना ज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील म्हणाले, माणसांवर प्रेम करणाऱ्या समीक्षक म.सु.पाटील यांच्या नांवे दिला जाणारा पुरस्कार मला मिळणे हे गौरवास्पद आहे.नव्याने लिहिणाऱ्यांनी आपला आत्मा गहाण टाकता समग्र अवकाशाविषयी जागरूकतेने लिहिले पाहिजे.

            अध्यक्षीय मनोगतामध्ये कुलसचिव डॉ.विलास शिंदे म्हणाले, पुस्तक परीक्षणाच्या पातळीवरील समीक्षेपेक्षा सैधांतिक पातळीवरील पातळीची समीक्षा चंद्रकांत पाटील यांची आहे.

            या पुरस्कार वितरण सोहळयाचे प्रास्ताविक मराठी अधिविभागप्रमुख डॉ.रणधीर शिंदे यांनी केले.  मानपत्राचे वाचन डॉ.नंदकुमार मोरे यांनी केले.  आभार डॉ.सुखदेव एकल यांनी मानले तर सुत्रसंचालन प्रांजली क्षीरसागर यांनी मानले.या कार्यक्रमासाठी डॉ. दिलीप धोंडगे, प्रा.प्रवीण बांदेकर, कृष्णात खोत, डॉ.एकनाथ पगार, आशुतोष पाटील, विरधवल परब, डॉ.अवनिश पाटील, डॉ.मेघा पानसरे, गौतमी पुत्रकांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

-----

डॉ.म.सु.पाटील वैश्विक दृष्टिकोन अंगीकारलेले समीक्षक - प्राचार्य डॉ.दिलीप धोंगड

 


कोल्हापूर, दि.24 फेब्रुवारी - डॉ.म.सु.पाटील यांची समीक्षा व्रतस्थ आणि प्रमेयदर्शी आहे. त्यांनी निष्ठापूर्व गांभीर्यपूर्वक समीक्षा लिहिली. प्रबंधात्मक ग्रंथ लिहिले. सुक्ष्म आणि नेटके वाचन करीत असताना आदिबंधात्मकनिष्ठ समिक्षेचा वापर केला.कलाकृतीकेंद्री समीक्षा करावी, असे त्यांचे म्हणणे होते.ते वैश्विक दृष्टिकोन अंगीकारलेले समीक्षक होते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.दिलीप धोंगडे (नाशिक) यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहामध्ये मराठी अधिविभाग, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासन नव-अनुष्टुभ प्रतिष्ठान, येवला (नाशिक) यांच्या वतीने 'डॉ.म.सु.पाटील यांचा समीक्षाविचार' या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विलास शिंदे होते. डॉ.म.सु.पाटील यांच्या कन्या-मराठीतील प्रसिध्द लेखिका नीरजा यांची प्रमुख उपस्थिती होती.


                पुढे बोलताना डॉ.धोंगडे म्हणाले, आदिबंधात्मक समीक्षा ही मानसशास्त्रातून आलेली आहे.डॉ.पाटील यांनी उपयोजन केले आणि आकलनाचा पैस विस्तीर्ण केला. यामुळे त्यांनी लेखकाभ्यासाला एक नवी प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांनी कर्तव्यबुध्दीने विपुल समीक्षा लिहून समीक्षेचा विस्तार मोठया प्रमाणात केला. त्यांंना साहित्य अकादमीचे दोन पुरस्कार मिळाले आहेत. समीक्षेचा प्रदेश हा साकल्याचा आहे तो त्यांनी कधीही आखडू दिला नाही.ते कधीही कोणत्याही एका पंथाचे झालेले नाही.  त्यांच्या आधारवाटातील लेखन विद्यार्थ्यांच्या आणि समीक्षकांच्या उपयोगी पडत आहे.सामप्रदायकतेचे व्रतधारण केल्याशिवाय ग्रंथांचे वाचन आणि आकलन करणे शक्य नाही. ज्ञानेश्वरीच्या आकराव्या अध्ययनामध्ये रसांची पंगत बसलेली आहे. ज्ञानेश्वरीचे उत्तम विवेचन त्यांनी केले आहे.श्रीमद्भगवद्गीतेचे आकलन त्यांना झालेले होते.तृष्णेचा खरा सिध्दांत त्यांना गीतेमध्ये सापडला.तृष्णाक्षयसुख त्यांनी अनुभवला आहे.त्यांनी समीक्षेची अनेक बलस्थाने मांडण्याचा प्रयत्न केला.मराठीमध्ये स्वतंत्र साहित्यशास्त्र असावे याचा आग्रह करणे योग्य नाही, तसे इंग्रजीमध्येही ते नाही.  साहित्य ही एक वैश्विक गोष्ट आहे.जगभरातील गोष्टी एकत्र करून जे तयार होते ते साहित्यशास्त्र.  वैश्विक साहित्यशास्त्राचे आदान-प्रदान होत रहात असते.एक छोटा समुह परिभाषिकतेचा वापर करून दुसऱ्या समुहाशी बोलत असतो.

                अनुष्टुभ प्रतिष्ठान (येवला) डॉ.प्रविण बांदेकर मनोगतामध्ये म्हणाले, पाच दशकांपूर्वी अनुष्टुभच्या माध्यमातून वाड्मयीन चळवळ सुरू झाली.मागील काही वर्षांमध्ये खेडयापाडयातील लिहित्या मंडळींना एक व्यासपीठ मिळवून दिले आहे.आपली परंपरा पुन्हा नव्याने पुढे आणण्याचा प्रयत्न होत आहे.

                याप्रसंगी ज्येष्ठ लेखक डॉ.राजन गवस म्हणाले, डॉ.धोंगडे प्रशासनात असताना तुकारामांबाबत चिंतन करीत होते. डॉ.पाटील माणूस म्हणून उत्तुंग व्यक्तिमत्वाचे होते. त्यांची समीक्षा सहज, सोपी, सर्जनात्मक आहे.

                अध्यक्षीय मनोगतामध्ये कुलसचिव डॉ.विलास शिंदे म्हणाले, ज्ञानेश्वरी, तुकाराम या साहित्यांकडे डॉ.म.सु.पाटील पहिल्यांदा गेलेले दिसतात.ते विवेकीय आणि विज्ञाननिष्ट दृष्टीकोन असलेले मातृहृदयी उत्तम समीक्षक होते.त्यांचे जीवन कार्य या दोन्ही गोष्टींचा विद्यार्थ्यांनी साक्षेपाने अध्ययन करणे आवश्यक आहे.

                तत्पूर्वी, डॉ.अशोक केळकर मराठी भाषा पुरस्कार मिळाल्याबद्दल मराठी अधिविभागाच्या वतीने प्राचार्य डॉ.दिलीप धोंडगे यांचा सत्कार डॉ.राजन गवस यांच्या हस्ते करण्यात आला.  तसेच, नव-अनुष्टुभ प्रतिष्ठानच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

                कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक डॉ.रणधीर शिंदे यांनी केले.पाहुण्यांचा परिचय डॉ.नंदकुमार मोरे यांनी केला तर प्रांजली क्षीरसागर यांनी आभार मानेल.याप्रसंगी ज्येष्ठ लेखिका प्रतिभा कनेकर, एकनाथ पगार, अशितोष पाटील, वीरधवल परब उपस्थित होते.

------