Showing posts with label Dr. Jyoti Jadhav. Show all posts
Showing posts with label Dr. Jyoti Jadhav. Show all posts

Thursday, 9 July 2026

“राष्ट्रीय क्वांटम मिशनमुळे विज्ञान क्षेत्रात मोठ्या रोजगारसंधी निर्माण होणार”

आपण सारेच क्वांटम विश्वाचे रहिवासी: पद्मश्री डॉ. एच. सी. वर्मा


शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. एच.सी. वर्मा.


शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. एच.सी. वर्मा.

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. एच.सी. वर्मा. समोर मोठ्या संख्येने उपस्थित असणारे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी.

शिवाजी विद्यापीठात ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. एच.सी. वर्मा यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसमवेत डॉ. वर्मा यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. राजेंद्र सोनकवडे, डॉ. मानसिंग टाकळे आदी.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत. मंचावर (डावीकडून) डॉ. मानसिंग टाकळे, डॉ. राजेंद्र सोनकवडे, डॉ. एच.सी. वर्मा, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे.

(पद्मश्री डॉ. एच.सी. वर्मा यांच्या व्याख्यानाची लघुचित्रफीत)



कोल्हापूर, दि. ९ जुलै: संपूर्ण विश्व हे प्रचलित शास्त्रीय (क्लासिकल) नियमांपेक्षा पुंज भौतिकीय (क्वांटम) नियमांवर चालते. प्रकाशाचे वर्तन, अणूंची रचना, चुंबकत्व, विद्युतवाहकता, अर्धसंवाहक, अणुऊर्जा, सूर्याची ऊर्जा आणि आधुनिक संगणक तंत्रज्ञान यामागे क्वांटम भौतिकशास्त्र कार्यरत आहे. त्यामुळे क्वांटम भौतिकशास्त्र केवळ प्रयोगशाळेतील विषय नसून आपल्या दैनंदिन जीवनाचा पाया आहे. राष्ट्रीय क्वांटम मिशनमुळे विज्ञानाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगारसंधींची निर्मिती होणार आहे. आपण सारेच क्वांटम विश्वात जगत आहोत, असे प्रतिपादन पदार्थविज्ञानाचे ज्येष्ठ संशोधक, शिक्षक आणि आयआयटी कानपूरचे प्राध्यापक पद्मश्री डॉ. एच. सी. वर्मा यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचा भौतिकशास्त्र विभाग आणि दि इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टिचर्स यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात आज डॉ. वर्मा यांचे "क्वांटम भौतिकशास्त्र आणि भौतिकशास्त्रातील रोजगार संधी" या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. कुलगुरू डॉ. राजनीश कामत अध्यक्षस्थानी होते, तर प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित होते.

पद्मश्री डॉ. एच. सी. वर्मा यांनी विद्यार्थ्यांना क्वांटम भौतिकशास्त्राची संकल्पना अत्यंत सोप्या उदाहरणांतून समजावून सांगितली. त्यांनी आपल्या विद्यार्थीजीवनातील आयआयटी कानपूरमधील अनुभव, संशोधनातील संघर्ष, संगणक प्रोग्रामिंगची सुरुवात आणि विज्ञानातील जिज्ञासेचे महत्त्व यांचीही प्रेरणादायी मांडणी केली.

डॉ. वर्मा म्हणाले, न्यूटनचे नियम, गुरुत्वाकर्षण, विद्युतचुंबकत्व किंवा ऊष्मागतिकीचे नियम अनेक घटना स्पष्ट करतात; मात्र तांबे वीज का वाहून नेतो, प्लास्टिक विद्युतरोधक का असते, लोखंडच चुंबकीय का असते किंवा काच पारदर्शक आणि पारा अपारदर्शक का असतो, याचे उत्तर केवळ पारंपरिक शास्त्रीय (क्लासिक) भौतिकशास्त्र देऊ शकत नाही. या सर्व घटनांचे स्पष्टीकरण क्वांटम भौतिकशास्त्रामध्ये मिळते. क्वांटम भौतिकशास्त्रातील ऊर्जा क्वांटीकरण, वेव्ह-पार्टिकल द्वैधस्वरूप, अनिश्चितता, क्वांटम टनेलिंग, सुपरपोझिशन यांसारख्या संकल्पना त्यांनी दैनंदिन जीवनातील उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केल्या. अणुभट्टीतील अणुभंजन, सूर्याच्या केंद्रातील अणुसंम्मीलन, स्कॅनिंग टनेलिंग मायक्रोस्कोप आणि आधुनिक सेमीकंडक्टर तंत्रज्ञान ही क्वांटम सिद्धांताची यशस्वी उदाहरणे असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, भौतिकशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षणानंतर केवळ अध्यापन किंवा संशोधन हेच पर्याय उपलब्ध नसतात. भारत सरकारच्या राष्ट्रीय क्वांटम मिशनअंतर्गत देशात क्वांटम संगणन, क्वांटम माहितीशास्त्र, क्वांटम संप्रेषण आणि क्वांटम सुरक्षा या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू असून आगामी काळात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतील. या मिशनसाठी केंद्र सरकारने सुमारे सहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून विविध आयआयटी, संशोधन संस्था आणि प्रयोगशाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज निर्माण होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

याशिवाय, इस्रो, सीएसआयआर, भाभा अणुसंधान केंद्र, भौतिकी संशोधन प्रयोगशाळा, प्लाझ्मा रिसर्च इन्स्टिट्यूट, यांसह विविध राष्ट्रीय प्रयोगशाळा, वैज्ञानिक संस्था, डेटा विश्लेषण, कृत्रिम बुद्धिमत्ता, विज्ञान व्यवस्थापन, संशोधन प्रशासन तसेच उद्योग क्षेत्रात भौतिकशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये विश्लेषणात्मक विचारसरणी विकसित होत असल्यामुळे उद्योगक्षेत्र त्यांना प्राधान्य देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

वेतनापेक्षा योगदानाचा विचार महत्त्वाचा

मोठ्या वेतनाच्या तुलनेत स्वतःच्या क्षमतेचा आणि समाजासाठीच्या योगदानाचा विचार करा. देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी सक्षम शिक्षक, संशोधक आणि वैज्ञानिक तयार होणे ही काळाची गरज आहे, असे सांगतानाच त्यांनी विद्यार्थ्यांनी विज्ञानातील करिअरकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे, असे आवर्जून सांगितले. व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी क्वांटम भौतिकशास्त्रातील विविध संकल्पना, संशोधन आणि करिअरच्या संधींबाबत प्रश्न विचारले. डॉ. वर्मा यांनी त्यांची सविस्तर आणि सोप्या भाषेत उत्तरे देत विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी भौतिकशास्त्र हे सर्व आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाचा पाया असल्याचे सांगितले. ते म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, एज कॉम्प्युटिंग आणि उच्च कार्यक्षम संगणन (High Performance Computing) यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या केंद्रस्थानी क्वांटम भौतिकशास्त्र असून, भविष्यातील वैज्ञानिक क्रांतीचे नेतृत्व हे याच क्षेत्रातून होणार आहे. मूलभूत विज्ञान आणि उपयोजित विज्ञान यांतील दरी भरून काढल्याशिवाय देशाचा वैज्ञानिक विकास अशक्य असून विद्यार्थ्यांनी मूलभूत विज्ञानातील संशोधनाकडे वळण्याचे आवाहन त्यांनी केले. पद्मश्री डॉ. वर्मा यांच्या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानातील नवीन दिशा आणि करिअरच्या संधींबाबत प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी भौतिकशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र सोनकवडे आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनीही मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. मानसिंग टाकळे यांनी स्वागत, प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. नीलेश तरवाळ यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विद्यापीठातील शिक्षक, अधिविभाग प्रमुख, महाविद्यालयीन प्राचार्य, शिक्षक, विद्यापीठातील विज्ञानाचे विद्यार्थी, विविध महाविद्यालयांसह शहरातील शालेय विद्यार्थ्यांचीही संख्या लक्षणीय होती.

Thursday, 7 November 2019

वैद्यकीय माहिती व्यवस्थापन क्षेत्रात जागतिक करिअरच्या संधी: डॉ. गेरहार्ड फोर्टवेंगेल



शिवाजी विद्यापीठातील एम.एस्सी.-मेडिकल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट या आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाचे उद्घाटन करताना जर्मनीच्या होश्युल हॅनोव्हर विद्यापीठाचे प्रा. गेरहार्ड फोर्टवेंगेल. सोबत कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, डॉ. ज्योती जाधव, अश्विनी दाणीगोंड, डॉ. के.डी. सोनावणे, डॉ. अतुल कापडी.


शिवाजी विद्यापीठातील एम.एस्सी.-मेडिकल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट या आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या उद्घाटन समारंभात बोलताना प्रा. गेरहार्ड फोर्टवेंगेल. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. ज्योती जाधव, अश्विनी दाणीगोंड, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, डॉ. ज्ञानेश लिमये, डॉ. अतुल कापडी, डॉ. के.डी. सोनावणे.
 

कोल्हापूर, दि. नोव्हेंबर - सध्याच्या परिस्थितीमध्ये औषध निर्माण क्षेत्रामध्ये व्यवसाय वृध्दींगत करण्यासाठी त्याचबरोबर रोजगार निर्मितीसाठी एम.एस्सी.-मेडिकल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त आहे. यात जागतिक करिअरच्या संधी आहेत, असे प्रतिपादन युनेस्को बायोएथिक्सचे प्रमुख तथा जर्मनी येथील होश्युल हॅनोव्ह युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायन्सेस अँड आर्टस् प्रा.डॉ.गेरहार्ड फोर्टवेंगेल यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या बायोकेमिस्ट्री अधिविभागा एम.एस्सी.- मेडीकल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाचे द्घाटन आज करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. फोर्टवेंगेल बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे अध्यक्षस्थानी होते. यावेळी हॅनोव्ह विद्यापीठाचे डॉ.ज्ञानेश लिमये, पुण्याच्या सीडीजीएमआयचे संचालक प्रा.डॉ. अतुल कापडी, कोल्हापूरच्या मनोरमा इन्फो-सोल्युशनच्या कार्यकारी संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी दाणीगोंड यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. गेरहार्ड फोर्टवेंगेल
डॉ. गेरहार्ड फोर्टवेंगेल म्हणाले, मेडीकल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाअंतर्गत उत्साहाने व चिकित्सक पद्धतीने संशोधक वृत्ती जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक पातळीवर रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण झालेल्या आहेत. स्वत:च्या प्रगतीबरोबरच देशाचे नाव ज्ज्वल करण्यासाठी हा अभ्यासक्रम राजमार्ग आहे. या अभ्यासक्रमाद्वारे आंतरराष्ट्रीय कंपनी कोर्स शिकण्याची योग्य प्रशिक्षणाअंती आरोग्य क्षेत्रामधील तज्ज्ञ होण्याची संधी संशोधक, विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे.
यावेळी डॉ.ज्ञानेश लिमये बोलताना म्हणाले, वैद्यकीय माहिती व्यवस्थापन क्षेत्रा कुशल प्रशिक्षित मनुष्यबळाची अत्यंत निकड आहे. महानगरांमध्ये सहा महिने, वर्षभराच्या प्रशिक्षणानंतर अधिक मानधनासाठी नोकऱ्या बदलण्याचे प्रमाण मोठे आहे. या क्षेत्रा दीर्घकालीन यश मिळवायचे असल्यास असे घडता कामा नये.  आज उद्योग क्षेत्राला कुशल, निष्ठावान, जिज्ञास संशोधक वृत्ती जोपासणाऱ्या मनुष्यबळाची फार गरज आहे. ती या माध्यमाधून पूर्ण करण्याची संधी विद्यार्थ्यांना निश्चितपणे आहे.
अध्यक्षीय भाषणा कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, शिवाजी विद्यापीठ आणि होश्युल हॅनोव्ह विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा अभ्यासक्रम राबविला जात आहे. शिवाजी विद्यापीठातला हा तशा अर्थाने पहिलाच आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम आहे. असा आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम शिकण्याची संधी आपल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेली आहे. जागतिक पातळीवर, देशाचे, विद्यापीठाचे नाव लौकिक उंचावण्याची संधी या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आहे. ज्ञानाबरोबरच कला, क्रीडा आणि संस्कृतीचे आदान-प्रदान होणेही महत्वाचे आहे. सध्याच्या काळा जागतिक पातळीवर निभाव लागण्यासाठी बदलत्या तंत्रज्ञानाच्या वापराचे कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. आज, माहिती तंत्रज्ञान आधुनिक काळाची भाषा आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील कवाडे याद्वारे विद्यार्थ्यांना विद्यापीठाने उघडे करून दिलेली आहेत.
या प्रसंगी डॉ. अतुल कापडी, अश्विनी दाणीगोंड यांनीही मनोगत व्यक्त केले. एम.एस्सी.-मेडीकल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ. के.डी. सोनवणे यांनी स्वागत प्रास्ताविक केले. बायोकेमिस्ट्री अधिविभागप्रमुख डॉ. जे.पी. जाधव यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी विद्यार्थी, विद्यार्थींनी संशोधन विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.