Showing posts with label Dr. Narendra Jadhav. Show all posts
Showing posts with label Dr. Narendra Jadhav. Show all posts

Wednesday, 10 September 2025

सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या सर्वसमावेशक अर्थनीतीची भारताला गरज: डॉ. नरेंद्र जाधव

शिवाजी विद्यापीठात डॉ. जे.एफ. पाटील स्मृती पुरस्कार प्रदान

शिवाजी विद्यापीठाचा डॉ. जे.एफ. पाटील स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांना प्रदान करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. मंचावर (डावीकडून) डॉ. जे.ए. जाधव, डॉ. महादेव देशमुख, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. राहुल म्होपरे

शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. जे.एफ. पाटील स्मृती पुरस्कार प्रदान समारंभात बोलताना ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव. मंचावर (डावीकडून) डॉ. जे.ए. जाधव, डॉ. महादेव देशमुख, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे.

शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. जे.एफ. पाटील स्मृती पुरस्कार प्रदान समारंभात बोलताना ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव. 

शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. जे.एफ. पाटील स्मृती पुरस्कार प्रदान समारंभात बोलताना ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव. 


(डॉ. जे.एफ. पाटील पुरस्कार प्रदान समारंभाची लघुचित्रफीत)

कोल्हापूर, दि. १० सप्टेंबर: कोल्हापूर, दि. १० सप्टेंबर: महान अर्थसत्ता बनण्यासाठी सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या सर्वसमावेशक अर्थनीतीचा भारताने अवलंब करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन माजी राज्यसभा सदस्य तथा ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागाच्या वतीने डॉ. जाधव यांना आज प्रा. (डॉ.) जे. एफ. पाटील स्मृती पुरस्कार कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ५१ हजार रुपये रोख, मानपत्र, शाल आणि ग्रंथभेट असे पुरस्काराचे स्वरुप होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. नरेंद्र जाधव यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे भवितव्य: संधी व आव्हाने या विषयावर अत्यंत तपशीलवार विवेचन केले. भारताच्या आर्थिक विकासाच्या जमेच्या बाजू अधोरेखित करीत असतानाच त्यावर परिणाम करणाऱ्या नकारात्मक बाजूंचा वेध त्यांनी घेतला आणि त्यावरील उपायांचेही मुद्देसूद सूचन केले. ते म्हणाले, भारत आज लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचा सर्वाधिक लाभार्थी आहे, अशी मांडणी सातत्याने केली जात आहे आणि ती खरीही आहे. कारण भारताचे सरासरी आयुर्मान आज २८ वर्षे इतके आहे, जे जगातील अन्य राष्ट्रांच्या तुलनेत कितीतरी तरुण आहे. तथापि, या लाभांशाचे मूल्य कोऱ्या धनादेशाप्रमाणे आहे. तो जर आपण वठविलाच नाही, तर त्याचा लाभ शून्य आहे. म्हणून लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचा लाभ उठवून आपण या मनुष्यबळाचा योग्य विनियोग केला पाहिजे. शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य या दोन क्षेत्रांवर सर्वाधिक लक्ष्य केंद्रित करून त्यामध्ये पुरेपूर गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. खाणारी तोंडे वाढत असताना काम करणारे हात त्या प्रमाणात न वाढल्यास सामाजिक अस्थैर्य निर्माण होऊन लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचे रुपांतर लोकसंख्याशास्त्रीय आपत्तीमध्ये होण्याचा धोका सर्वाधिक असतो, असा इशाराही त्यांनी दिला.

डॉ. जाधव पुढे म्हणाले, आपल्या देशात १० लाख लोकसंख्येचा ऑक्टोपस क्लास आहे, ज्याने देशातील ८० टक्के संपत्तीवर कब्जा केला आहे. जातिनिहाय पाहू गेल्यास २२ टक्के उच्चवर्णीयांकडे ४१ टक्के संपत्ती, तर २७ टक्के मागासवर्गीयांकडे अवघी ११ टक्के संपत्ती असे विषम वाटप दिसते. भारतातील शेती उत्पादकता जगात सर्वात कमी आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचीही सध्या अवस्था बिकट आहे. त्यांना मदतीची गरज आहे. भारतात थेट परकीय गुंतवणूक वाढताना दिसत असली, तरी देशातून बाहेर होणारी गुंतवणूक आणि परदेशातून देशात होणारी गुंतवणूक यांचे समीकरण पाहता देशात होणारी ही गुंतवणूक जवळपास शून्य आहे. या वस्तुस्थितीचा विचार करून धोरणकर्त्यांनी देशात सर्वसमावेशक अर्थनीती आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

विसाव्या शतकात अमेरिका, पश्चिम युरोप आणि जपान ही तीन आर्थिक वृद्धीची केंद्रे होती. आज एकविसाव्या शतकात मात्र अमेरिका हा ढासळता मनोरा असून चीन, रशिया आणि भारत ही नवी आर्थिक केंद्रे उदयास आली आहेत. भारताने यापुढील काळात अमेरिकेवर विसंबून राहून चालणार नाही, असेही डॉ. जाधव यांनी यावेळी सांगितले.

परमस्नेह्याच्या नावचा पुरस्कार मिळाल्याचा आनंद मोठा

डॉ. जे.एफ. पाटील हे माझे परमस्नेही होते. आम्हा मित्रमंडळींत ते ज.फा. म्हणूनच लोकप्रिय होते. पूर्णपणे कोल्हापुरी व्यक्तीमत्त्वाचा आणि सर्वांना जीव लावणारा असा हा आमचा सन्मित्र होता. माझ्या आयुष्यातील ७५ वा पुरस्कार हा या माझ्या परमस्नेह्याच्या नावे मिळाल्याचा मला मोठा आनंद वाटतो आहे, अशी भावना यावेळी डॉ. नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केली.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, शिक्षकाविषयी विद्यार्थ्यांनी कशी कॉतज्ञता व्यक्त करावी, याचा हा पुरस्कार म्हणजे वस्तुपाठ आहे. डॉ. जे.एफ. पाटील यांचे विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधकीय आणि प्रशासकीय वाटचालीमध्ये मोलाचे योगदान आहे. एक उत्तम अर्थशास्त्रज्ञ असण्याबरोबरच ते एक उत्तम माणूसही होते. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यावरील अर्थशास्त्राचा प्रभाव दाखवून देण्याची आस त्यांना कायम राहिली. म्हणूनच अत्यंत सहजसोप्या भाषेत अर्थसंकल्पाचे विश्लेषण ते अखेरपर्यंत दरवर्षी करीत राहिले. भगवान महावीर अध्यासनाची इमारत हे त्यांचे स्वप्न होते. ते आता आम्ही पूर्ण करीत आहोत. डॉ. नरेंद्र जाधव म्हणजे प्रचंड इच्छाशक्ती, संधी शोधण्याची वृत्ती आणि त्यापायी कष्ट करण्याची प्रचंड तयारी याचे प्रतीक आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांचे आमचा बाप अन् आम्ही हे आत्मचरित्र वाचलेच पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला डॉ. जे.एफ. पाटील यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. अर्थशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. महादेव देशमुख यांनी स्वागत, प्रास्ताविक व परिचय करून दिला. डॉ. राहुल म्होपरे यांनी मानपत्राचे वाचन केले. कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह माजी खासदार संजय मंडलिक, माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. बी.पी. साबळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रघुनाथ ढमकले, शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेचे डॉ. जे.ए. जाधव, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. वासंती रासम, डॉ. संजय ठिगळे, विविध अधिकार मंडळांचे सदस्य, डॉ. पाटील यांचे कुटुंबिय यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नंदिनी पाटील, धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.

Friday, 20 May 2016

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वश्रेष्ठ भारतीय: डॉ. नरेंद्र जाधव








कोल्हापूर, दि. २० मे:  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ दलितांचे नेते म्हणणे हा त्यांच्यावर अन्याय असून त्यांचे भारतीय समाजाप्रती एकूण राष्ट्रीय योगदान पाहता ते सर्वश्रेष्ठ भारतीय होते, असेच म्हणावे लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व अर्थतज्ज्ञ खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या 'पुढारीकार पद्मश्री कै. डॉ. ग.गो. जाधव स्मृती व्याख्यानमाले''महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय कार्य' या विषयावर ते बोलत होते. दसरा चौकातील शाहू स्मारक भवनात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
यावेळी व्यासपीठावर बिहार व त्रिपुराचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील, 'दै. पुढारी'चे संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव उपस्थित होते.
डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे म्हणत की, मी प्रथमतः भारतीय आहे, नंतरही भारतीय आहे आणि अंतिमतःही भारतीय आहे. स्वतःच्या भारतीयत्वाविषयी इतक्या निसंदिग्धपणे आणि अभिमानपूर्वक प्रतिपादन करणारा नेता या देशात दुसरा झाला नाही. या तीव्रतर भारतीयत्वाच्या जाणीवेतून भारतीय राज्यघटनेची अमोल देणगी त्यांनी भारतीय समाजाला प्रदान केली, हे त्यांचे भारतीय समाजावर थोर उपकार आहेत, याची जाणीव आपण बाळगली पाहिजे. डॉ. आंबेडकर हे दलितांचे नेते, कैवारी होतेच, राज्यघटनेचे शिल्पकारही होते; पण, त्यापुढे जाऊन ते एक थोर विधिज्ञ आणि महत्त्वाचे म्हणजे सर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञही होते. बाबासाहेबांनी कायद्याचा अभ्यास केला असला तरी त्यांचे सर्व प्रबंध आणि पदव्या अर्थशास्त्रातील आहेत. त्यामुळेच ते भारताचे सर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञ असल्याच्या बैठकीला एक ठोस परिमाण आहे. भारतीय स्वातंत्र्याआधी आणि स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या प्रत्येक संसदीय पदाला त्यांनी न्याय देताना सर्वसामान्य माणूस हाच समोर ठेवला होता. त्याच्या विकासाचे धोरण डोळ्यासमोर ठेवले होते.
डॉ. जाधव म्हणाले, जोपर्यंत अस्पृश्यता मानणार नाही, तोपर्यंत काँग्रेसमध्ये प्रवेश मिळणार नाही, अशी काँग्रेसचे सदस्य होऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांना अट घाला, अशी थेट मागणी महात्मा गांधी यांच्यासमोर बाणेदारपणे ठेवून अस्पृश्यतेच्या प्रश्नाची तीव्रता त्यांना पटवून देणारे बाबासाहेब आणि महात्मा गांधी यांच्यात अस्पृश्यता निवारणाच्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्या संदर्भातील भूमिकांमुळे वेळोवेळी राजकीय आणि तात्विक मतभेद उद्भवले. तरीही बाबासाहेबांचा भारतीय मंत्रीमंडळातील प्रवेश हा महात्मा गांधी यांच्या आग्रहामुळेच होऊ शकला, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. दोघांमधील संबंध कटुतेचे असले तरी, व्यक्तीपेक्षा देश मोठा हा संदेश देणारी कृती गांधीजींची राहिली, हे लक्षात घेतले पाहिजे.
डॉ. जाधव पुढे म्हणाले, १९२४ साली सार्वजनिक जीवनात प्रवेश केल्यापासून पुढे १९३५ पर्यंत हिंदू धर्माच्या चौकटीत राहून त्यात बदल घडविण्यासाठी बाबासाहेबांनी कसोशीने प्रयत्न केले. महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह, नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह ही त्याची काही उदाहरणे. पण, तरीही अस्पृश्यांविषयी सवर्ण हिंदूंच्या काळजाला पाझर फुटत नाही, हे लक्षात आल्यानंतर मात्र बाबासाहेबांनी १९३५ साली येवला येथे धर्मांतराची घोषणा केली. पण, त्यानंतरही पुढे २१ वर्षे त्यांचे या विषयावरील चिंतन सुरूच राहिले. या कालावधीत त्यांनी जगातील जवळजवळ सर्व धर्मांचा चिकित्सक अभ्यास केला आणि १९५६मध्ये बौद्ध धम्माचा स्वीकार केला. बाबासाहेबांनी मृत्यूपूर्वी केवळ ५० दिवस आधी बौद्ध म्माची दीक्षा घेतली. आपल्या पाच लाख अनुयायांनाही नागपूरच्या दीक्षाभूमीवर दीक्षा दिली. जगामध्ये झालेली धर्मांतरे ही एक तर तलवारीच्या धाकावर किंवा आमिषाच्या बळावर झाली आहेत. मात्र भारतात झालेले धर्मांतर केवळ बाबासाहेबांच्या एका शब्दावर शांतता व अहिंसेच्या मार्गाने झालेले जगातील एकमेव धर्मांतर असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. जाधव पुढे म्हणाले, १९४२ साली एकीकडे महात्मा गांधी ब्रिटीशांना 'चले जाव'चा इशारा देत असताना दुसरीकडे बाबासाहेब ब्रिटीशांच्या मंत्रीमंडळात समाविष्ट होऊन स्वतंत्र भारताच्या विकासाची पायाभरणी करीत होते. कामगार, सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, पाटबंधारे या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी बाबासाहेबांवर होती. आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी देशातील पंधरा धरणांच्या कामांची सुरुवात केली. देशातील मोठ्या नद्या एकमेकींना जोडण्याची योजना त्यांचीच. देशातील जनतेला पिण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगधंदे आणि जलप्रवास व जलपर्यटन यासाठी मुबलक पाणी मिळण्यासाठी त्यांनी योजना आखल्या. जलसाक्षरता मोहीम चालवली. वीजनिर्मितीशिवाय उद्योगधंदे वाढू शकत नाहीत आणि शेती उत्पादनही वाढू शकत नाही, म्हणून ऊर्जेच्या निर्मितीवर त्यांनी भर दिला. स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रीमंडळात कायदेमंत्री म्हणूनही त्यांनी राज्यघटना निर्मितीच्या कार्यात अमूल्य योगदान दिले. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अक्षरशः एकहाती कामकाज पार पाडले. या काळात हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून स्त्रियांना त्यांचे मूलभूत अधिकार प्रदान करण्यासाठी ते आग्रही होते. मात्र, राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या विरोधामुळे हिंदू कोड बिल संसदेत मंजूर होत नसल्याचे पाहून बाबासाहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिली. स्त्री-पुरूष समतेसाठी मंत्रीपदाचा राजीनामा देणारे बाबासाहेब हे एकमेव व्यक्ती होते, असेही त्यांनी सांगितले.
निवडक २५ व्याख्यानांचा ग्रंथ प्रकाशित करणार: कुलगुरू डॉ. शिंदे
शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये कै. ग.गो. जाधव यांनी अत्यंत कळीची भूमिका बजावल्याचे सांगून कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे अध्यक्षीय भाषणात म्हणाले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास ग.गो. जाधव यांना लाभला. त्यामुळे साहजिकच सामाजिक जाणीवेचे संस्कार त्यांच्यावर झाले. ही जाणीव त्यांच्या पत्रकारितेतून पदोपदी झळकताना दिसते. विद्यापीठाच्या निर्मितीसाठीच्या प्रयत्नांसह या परिसरावर डॉ. ग.गो. जाधव यांचे मोठे ऋण आहेत. त्यांच्या या उपकाराचे स्मरण राखण्यासाठी विद्यापीठाने ही व्याख्यानमाला सुरू केली. गेली २८ वर्षे नियमितपणे सुरू असलेल्या या व्याख्यानमालेत विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी आपले मौलिक विचार प्रकट केले आहेत. यामधील निवडक २५ व्याख्यानांचा समावेश असणारा ग्रंथ शिवाजी विद्यापीठाच्या वतीने प्रकाशित करण्याची घोषणा यावेळी त्यांनी केली.
कै. ग.गो. जाधव यांच्या सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव आणि डॉ. योगेश जाधव यांनी सक्षमपणे पुढे चालविला आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले.
विद्यापीठाचे बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले. रसिका कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.