Wednesday, 16 April 2014

विद्यापीठात टाकाऊपासून टिकाऊ टँकरची निर्मिती : अधिकाऱ्याची कल्पकता



सव्वादोन लाख रुपयांची केली बचत; प्रशासनाकडून प्रशंसा
 
एन.एम. आकुलवार
कोल्हापूर, दि. १५ एप्रिल : एखादा अधिकारी आपल्या कल्पकतेतून संस्थेसाठी किती उत्कृष्ट योगदान देऊ शकतो, याची प्रचिती शिवाजी विद्यापीठात आली आहे. विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एन. एम. आकुलवार यांनी आपल्या कल्पकतेतून विद्यापीठातील टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ टँकरची फेरजुळणी करत विद्यापीठातील पाणीपुरवठ्याच्या समस्येवर तोडगा तर काढलाच; शिवाय विद्यापीठाचे सव्वादोन लाख रुपये वाचवले, ते वेगळेच! विद्यापीठ प्रशासनाने याची दखल घेत आकुलवार यांच्या कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरवही केला आहे.
सहाय्यक कुलसचिव श्री. आकुलवार यांच्याकडे वाहन शाखेचा कार्यभार सोपविण्यात आला, तेव्हा विद्यापीठात पंधरा वर्षांपासून वापरात असलेल्या एका टँकरला गळती लागली होती आणि त्यामुळे पाणी वाहून आणत असताना त्यातील अर्ध्याहून अधिक पाणी वाटेतच वाया जात असे. त्यामुळे नवीन टँकर घ्यावा की काय, या दृष्टीने प्रशासनाचा विचार सुरू होता. दरम्यानच्या काळात, या टँकरचे निरीक्षण केल्यानंतर त्याची टाकी गंजलेली असली तरी चॅसिस बॉडी चांगली असल्याचे आकुलवार यांच्या लक्षात आले. त्यांनी कोटेशन काढून गंजलेली टाकी तेवढी भंगारात २० रुपये प्रतिकिलोप्रमाणे बायबॅक पद्धतीने विकली आणि पूर्वीच्या २००० लीटर क्षमतेऐवजी ३२०० लीटर क्षमतेची नवी टाकी त्या जागी बसविली. त्यामुळे टँकरच्या फेऱ्या कमी होऊन वेळ आणि इंधन खर्चही वाचण्यास मदत झाली. रंगरंगोटी करून टँकर एकदम नव्यासारखा केला. विद्यापीठाच्या इतर वाहनांच्या दृष्टीने निरुपयोगी ठरलेल्या आणि पडून असलेल्या सुस्थितीतील टायर त्याला जोडण्यात आल्या. बायबॅकची वजावट पकडून केवळ ५८ हजार रुपयांत हा टँकर तयार झाला. नव्या टँकरची किंमत १ लाख साठ हजार रुपये इतकी झाली असती.
असाच आणखी एक टँकर गळती आणि गंज यामुळे काही वर्षांपासून भंगारात पडून होता. त्याचीही चॅसिस बॉडी चांगली असल्याचे लक्षात आल्यानंतर आकुलवार यांनी वरीलप्रमाणेच फॉर्म्युला वापरून हा टँकरही वापरात आणला. त्याला २२०० लीटरची नवी टाकी बसविली. इथंही त्यांनी विद्यापीठाची एक लाख रुपयांची बचत केली.
ट्रॅक्टरवर कायमस्वरुपी बसविण्याचा एक पंपही असाच विनावापर पडून होता. नवीन पंप घ्यावयाचा झाला असता, तर किमान आठ हजार रुपये लागले असते. पण अवघ्या पाचशे रुपयांत त्याची दुरुस्ती करून हा पंपही वापरात आणला. या पंपामुळे ट्रॅक्टरच्या टाकीतील पाणी उपसून थेट बगिचातील झाडांवर फवारता येऊ शकते.
त्याशिवाय, यातील एका टँकरला त्यांनी नळ-चाव्या आणि स्प्रिंकलरही बसविले आहेत. त्यामुळे गरजेच्या वेळी कॅम्पसवरील रहिवाशांना तसेच महत्त्वाच्या कार्यक्रम प्रसंगी पाणीपुरवठा करता येऊ शकेल. क्रीडा स्पर्धांच्या वेळी मैदानावर पाणी फवारण्यासाठी स्प्रिंकलरचा वापर होऊ शकेल, अशी याची रचना आहे. त्याचप्रमाणे एक टँकर एका जागी उभा करून दुसऱ्या टँकरने त्यात आता पाणीही भरता येऊ शकणार आहे.
हे सर्व काम अगदी अल्प वेळेत आणि कमी खर्चात करण्यात आले. यातून विद्यापीठाचे साधारणतः सव्वादोन लाख रुपये वाचले आहेत. या कामगिरीबद्दल विद्यापीठ प्रशासनाने श्री. आकुलवार यांना प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन केले आहे.

Tuesday, 15 April 2014

डॉ. आंबेडकर हे निष्णात, कृतीशील शिक्षणतज्ज्ञ : डॉ. व्ही.एन. मगरे




कोल्हापूर, दि. १४ एप्रिल: शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, असे मानणारे डॉ. आंबेडकर हे एक कृतीशील व निष्णात शिक्षणतज्ज्ञ होते, असे प्रतिपादन मुंबईच्या कीर्ती महाविद्यालयाचे प्राचार्य आणि बुद्ध व आंबेडकरी विचारांचे गाढे अभ्यासक डॉ. व्ही.एन. मगरे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र आणि विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. आंबेडकर यांच्या १२३व्या जयंतीनिमित्त आयोजित डॉ. आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार या विषयावर डॉ. मगरे बोलत होते. मानव्यविद्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन.जे. पवार होते.
डॉ. मगरे म्हणाले, शिक्षणाने विद्यार्थ्याच्या अंगी शहाणपण आले पाहिजे. समाज घडविण्यासाठी आणि त्यासाठी अनुरुप अशा योजना बनविण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी प्रेरित होऊन योगदान दिले पाहिजे. सामाजिक जाणीवा निर्माण करणे हा शिक्षणाचा प्रमुख हेतू आहे, असे डॉ. आंबेडकर म्हणत. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञान संपादनाविषयी योग्य वयात आकांक्षा निर्मिती होणे आणि त्या माध्यमातून त्याचा स्वतःचा ठसा उमटविण्यासाठी सक्षम बनविणारे शिक्षण बाबासाहेबांना अभिप्रेत होते.
डॉ. आंबेडकरांनी अफाट वाचनातून स्वतःचा व्यासंग वाढविला होता आणि त्या व्यासंगातूनच त्यांनी आदर्श विद्यार्थी घडण्यासाठीची पंचसूत्री मांडल्याचे सांगून डॉ. मगरे म्हणाले, निसर्गदत्त व्यवहारज्ञानाची जाणीव अर्थात कॉमन सेन्स, विषयाची मूलभूत मांडणी समजून घेणे, ज्ञानाचा समस्यांची उकल करण्यासाठी योग्य वापर करणे, स्मरणशक्ती नव्हे, तर विषयाची आकलन क्षमता निर्माण करणे, सुसंगतता व भाषाप्रभुत्व अशी पंचसुत्री आंबेडकरांनी शंभर वर्षांपूर्वी सांगितली. त्याची प्रस्तुतता आजच्या काळातही अजिबात कमी झालेली नाही, तर उलट वाढलेली आहे. या पंचसूत्रीच्या आधारावर विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक वादविवाद प्रवृत्तीचा विकास होण्यालाही आंबेडकरांनी विशेष महत्त्व दिलेले आहे. आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये गुरू शिष्याचे नाते योग्य पद्धतीने प्रस्थापित होऊ शकत नाही, तिथे आंबेडकरांना अभिप्रेत असलेली अनुयायी घडविण्याची प्रक्रिया कशी होणार, अशी खंतही डॉ. मगरे यांनी व्यक्त केली.
यावेळी अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. एन.जे. पवार म्हणाले की, शिक्षण हे परिवर्तनाचे साधन आहे, असा विचार करत असताना त्यामागील विचारधाराही आपण समजून घेतली पाहिजे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई या दांपत्याने या विचारधारेची मूलभूत आणि कृतीशील पायाभरणी केली. कोल्हापूरनगरीचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांच्या कार्याला राजाश्रय प्रदान करत शिक्षणासाठी विशेषतः बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी भरीव कार्य उभारले आणि भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांनी प्रजासत्ताक लोकशाही भारतात सार्वत्रिक, सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाची तरतूद केली. या संपूर्ण विचारधारेचा आजच्या काळात कसा अंगिकार करता येऊ शकेल, याचा प्रत्येकानेच अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्रा. राजेश खरात, प्र-कुलगुरू डॉ. ए.एस. भोईटे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा नियंत्रक डॉ. बी.एम. हिर्डेकर उपस्थित होते. डॉ. आंबेडकर केंद्राचे समन्वयक डॉ. कृष्णा किरवले यांनी स्वागत, प्रास्ताविक केले तर डॉ. डी.के. गायकवाड यांनी आभार मानले. विवेक कोकरे यांनी सूत्रसंचालन केले.

Saturday, 29 March 2014

विद्यापीठाची वेबसाइट आता अधिक ‘युझर फ्रेंडली’!



कोल्हापूर, दि. २९ मार्च: शिवाजी विद्यापीठाच्या वेबसाइटच्या स्वरुपामध्ये कालसुसंगत बदल करण्यात आले असून ही साइट आता अधिक युझर फ्रेंडली करण्यात आली आहे.  वेबसाइटचे हे नवे रुप विद्यार्थ्यांना व वापरकर्त्यांना निश्चितपणे आवडेल, असा विश्वास कुलगुरू डॉ. एन.जे. पवार यांनी व्यक्त केला.
शिवाजी विद्यापीठाची www.unishivaji.ac.in ही वेबसाइट यापूर्वी एकाच व्यक्तीकडून केंद्रीय स्वरुपात हाताळली जात असे. तिचे आता विकेंद्रीकरण करण्यात आले असून ज्या त्या विभागाकडे आपापली माहिती अपलोड करण्यासाठी युझर आयडी व पासवर्डसह अधिकार सोपविण्यात येणार आहेत. वेबसाइटचा लूक पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक व सुटसुटीत करण्यात आला असून वापरकर्त्याला अधिक सोप्या व सुलभ पद्धतीने नेव्हीगेशन करता येणार आहे. पूर्वी साइट एचटीएमएल स्वरुपात होती. तिला आता आधुनिक डॉट नेट प्रणालीची जोड देऊन ती अधिक डायनॅमिक करण्यात आली आहे. ही साइट इंटरनेट एक्स्प्लोरर आणि गुगल क्रोम या ब्राऊझर्सशी अधिक सुसंगत आहे. पूर्वीचे होम पेज क्लिष्ट वाटायचे. त्याऐवजी आता होमपेजवरील टॅबची संख्या वाढवून वापरकर्त्यांना हव्या त्या सेक्शनमध्ये जाऊन हवी ती माहिती घेणे सहजशक्य होणार आहे. विशेषतः स्टुडंट सेक्शनमध्ये विद्यार्थ्यांना प्रामुख्याने हवी असणारी विद्यार्थी कल्याण, परीक्षाविषयक माहिती, संशोधन आणि माजी विद्यार्थी अशा महत्त्वाच्या लिंक्स एकत्रित देण्यात आल्या आहेत. नेव्हीगेशनदरम्यान उद्भवणाऱ्या बहुतांश त्रुटी या नव्या लूकमध्ये दूर करण्यात विद्यापीठाला यश आले आहे.
विद्यापीठ आता पुन्हा नव्याने नॅकला सामोरे जात असताना विद्यापीठाची साइटही अधिक युझर फ्रेंडली करण्याच्या दृष्टीने कुलगुरू डॉ. एन.जे. पवार यांनी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. डी.टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तांत्रिक समिती नियुक्त केली होती. या समितीत डॉ. आर.के. कामत, श्रीमती एस.एस. खराडे, डॉ. एम.जे. जोशी यांचा समावेश होता.

Tuesday, 25 March 2014

धर्म व विज्ञानाचे अंतिम ध्येय एकच; मांडण्याच्या पद्धतीत फरक : कुलगुरू डॉ. एन.जे. पवार




कोल्हापूर, दि. २५ मार्च: धर्म आणि विज्ञान या दोहोंच्या मुळाशी मानव आणि त्याचे विश्वाबद्दलचे कुतूहल या गोष्टी असून त्यांचे अंतिम ध्येय एकच असले तरी संकल्पना मांडण्याच्या पद्धतीमध्ये मात्र मूलभूत फरक आहे, असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.जे. पवार यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठ आणि शहाजी लॉ कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या श्री दत्ताबाळ स्मृती व्याख्यानमालेधर्म आणि विज्ञान या विषयावर ते बोलत होते. लॉ कॉलेजच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कौन्सिल ऑफ एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्षा सौ. रजनीताई मगदूम होत्या.
सुमारे दीड तास रंगलेल्या आपल्या भाषणात कुलगुरू डॉ. पवार यांनी विश्वाची निर्मिती, त्यातील मानवाचे स्थान आणि त्याच्या जीवनातील धर्म व विज्ञान यांची अतिशय शास्त्रशुद्ध मांडणी करून उपस्थितांना अंतर्मुख केले. ते म्हणाले, विज्ञान नेहमीच बुद्धिप्रामाण्यवादाला महत्त्व देते तर धर्म हा भावना आणि अंतःप्रेरणांवर अवलंबून राहतो. त्यामुळे त्यात कित्येकदा भोळसटपणाही येतो. त्याच भोळेपणाला सद्यस्थितीत अंधश्रद्धांची जोड देऊन मूळ धर्माला हरवण्याचे काम करणाऱ्या प्रवृत्ती वाढू लागल्या आहेत, हे चिंताजनक आहे. सत्याचा शोध व वेध घेण्याचे मार्गदर्शन विज्ञान करते तर आत्मिक उन्नतीचा मार्ग धर्म दाखवितो. विज्ञान कारणमीमांसा, प्रयोगशीलता आणि पुरावा याला महत्त्व देते; तर, धर्म श्रद्धा, विचारशुद्धता व नैतिक मूल्यांवर अधिष्ठित असतो. त्यामुळे निसर्गातील अद्यापही न उलगडलेल्या सुप्त शक्ती नेमक्या काय आहेत, याचे उत्तर शोधण्यासाठी धर्म आणि विज्ञान यांची सांगड घालून काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
भवतालाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन पूर्णतः मानवकेंद्री असतो, त्याऐवजी तो पृथ्वीकेंद्री असला पाहिजे, असे सांगून कुलगुरू डॉ. पवार म्हणाले, मानवाकडे मूलतः संस्कृती निर्माण करण्याची क्षमता आहे. स्वतःच्या आस्तित्वाबद्दल त्याला पडणारे प्रश्न त्याला इतर प्राणिमात्रांहून वेगळे ठरवतात. आपण कोण आहोत, इथे कसे आलो; हे सारे चक्र नेमके कुठे सुरू झाले आणि याचा शेवट काय होणार, याचे कुतूहल त्याच्या मनी आहे. स्वातंत्र्याची आणि नैतिक मूल्यांची त्याच्यात असलेली जाणीव आणि त्या जाणीवेतून तत्वज्ञानाच्या मार्गावर त्याची शोधयात्रा सुरू आहे.
विज्ञानाने मानवाला सतावत असलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात बरीच मजल मारल्याचे सांगून ते म्हणाले, साधारण १४ अब्ज वर्षांपूर्वी विश्वाची निर्मिती झाली. सूर्य आणि सूर्यमालेची निर्मिती साधारण ५०० कोटी वर्षांपूर्वी तर पृथ्वीची निर्मिती ४५० कोटी वर्षांपूर्वी झाली. पृथ्वीवर पहिला एकपेशीय सजीव निर्माण होण्यासाठी त्यानंतर २०० ते २५० कोटी वर्षे जावी लागली. त्यानंतर ५० कोटी वर्षांपूर्वी पहिला अस्थीमय प्राणी तयार झाला. ४५ कोटी वर्षांपूर्वी पाण्यात माशांचे युग अवतरले तर ३५ कोटी वर्षांपूर्वी सरिसृप वर्गातील प्राणी निर्माण झाला. साधारण २० कोटी वर्षांपूर्वी सस्तन प्राणी आणि पक्ष्यांचे युग अवतरले. त्यानंतर साडेसहा कोटी वर्षांपूर्वी पहिला मानवसदृश प्राणी (प्राइमेट) तयार झाला. त्यानंतर होमिनाइडपासून ते आजच्या होमोसेपियन-सेपियन या आधुनिक मानवापर्यंतचा प्रवास पाच वेगवेगळ्या अवस्थांमधून उत्क्रांत झाला. या उत्क्रांतीदरम्यान मानवाच्या मेंदूच्या संरचनेत, क्षमतेत सुमारे ५० टक्के इतकी वृद्धी झाली. तोपर्यंत धरातलावर धर्म ही संकल्पना आस्तित्वात नव्हती. विश्वाची व्याप्ती आणि व्युत्पत्ती धर्माने मर्यादित स्वरुपात मांडली. अग्नीसारखा प्राथमिक शोध, चक्र (चाक) आणि शेतीसारखे मूलभूत शोध लावण्यात त्याचे मोठे योगदान राहिले. विज्ञानाने मात्र साधनांच्या जोरावर पुढची मजल मारली. इथेच धर्म आणि विज्ञान यांच्यातला संघर्ष सुरू होतो. मानवी उत्क्रांतीबरोबर संस्कृतीही विकसित झाली, पण मानवी इतिहासात धर्माचा उदय खूपच उशीराने झाला. विश्वातील सुप्त शक्तींचा शोध घेण्यातील धर्माच्या मर्यादा स्पष्ट झाल्यानंतर देव आणि दैवी शक्तीया संकल्पनांचा उदय झाला. माणूस ही देवाचीच निर्मिती असल्याचा विचार प्रवाह निर्माण झाला. आता तर धर्म आणि देव या संकल्पनांचा उदय कधी झाला, याचेही उत्तर विज्ञान देऊ पाहते आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. सुभाष देसाई यांनी दत्ताबाळ यांच्या कार्याची माहिती देऊन भूमिका स्पष्ट केली. डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. आर. नारायणा यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. सविता रासम यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. यु.टी. पवार यांनी आभार मानले.