Showing posts with label Dr. Babasaheb Ambedkar. Show all posts
Showing posts with label Dr. Babasaheb Ambedkar. Show all posts

Thursday, 14 April 2022

बाबासाहेबांना लोकशाहीत नागरिकांची मूल्याधारित जीवनशैली अभिप्रेत: डॉ. सुरेंद्र जोंधळे

 

शिवाजी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ. सुरेंद्र जोंधळे.

शिवाजी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ. सुरेंद्र जोंधळे. मंचावर (डावीकडून) डॉ. एस.एस. महाजन, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे.


कोल्हापूर, दि. १४ एप्रिल: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लोकशाही म्हणजे केवळ शासनव्यवस्था नव्हे, तर नागरिकांची मूल्याधिष्ठित जीवनशैली आणि त्यामधील सामाजिक नैतिकता व बुद्धीप्रामाण्यवाद अभिप्रेत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुरेंद्र जोंधळे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने डॉ. आंबेडकर यांच्या १३१व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहाच्या समारोप समारंभात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लोकशाहीविषयक विचार या विषयावर ते बोलत होते. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते, तर प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे प्रमुख उपस्थित होते.

डॉ. आंबेडकर यांना अभिप्रेत असणारा एक व्यक्ती, एक मूल्य हा प्रवास आपल्याला घटनात्मक नैतिकतेच्या जोपासनेतून पूर्ण करावयाचा असल्याचे सांगून डॉ. जोंधळे म्हणाले, व्यक्तीस्वातंत्र्य, आत्मप्रतिष्ठा आणि व्यक्तीचे अबाधित हक्क या तीन बाबी बाबासाहेबांना राजकीय लोकशाहीमध्ये अभिप्रेत होत्या. त्यात व्यक्तीचे सार्वभौमत्व हे सामायिक असल्याखेरीज खरी लोकशाही अस्तित्वात येणार नाही, असे त्यांचे मत होते. त्यामुळेच समान नागरिकत्व आणि समान प्रतिनिधित्व यांना बाबासाहेबांच्या घटनात्मक उदारमतवादामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. भारतातील राजकीय बहुमत हे जातिभेदाने प्रेरित आहे. येथील संसदीय लोकशाहीतील अंतर्विरोधाचे निराकरण शक्य तितक्या लवकर होणे आवश्यक आहे. त्यासाठी भारतीय समाजाने विभूतीपुजेचा त्याग करून सार्वजनिक विवेक विकसित करण्याची गरजही बाबासाहेबांनी अधोरेखित केलेली होती. भारतातील लोकशाहीचे म्हणूनच राजकारण, समाजकरण व अर्थकारण या अनुषंगाने चिंतन आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

डॉ. आंबेडकर हे जागतिक प्रबुद्ध युगाचे विचारवंत असल्याचे सांगून डॉ. जोंधळे पुढे म्हणाले, स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्ये फ्रेंच राज्यक्रांतीतून नव्हे, तर बुद्धतत्त्वज्ञानापासून घेतल्याचे प्रतिपादन बाबासाहेब करतात. तथापि, भारतीय समाजात बंधुभावाचा खूप मोठा अभाव आहे. तो निर्माण करण्याची निकड बाबासाहेबांना वाटत होती. कारण बंधुभावाची भावना निर्माण झाल्याखेरीज स्वातंत्र्य व समता या मूल्यांना काहीच अर्थ नाही, याची जाणीव त्यांना होती. बाबासाहेबांच्या लोकशाहीत तसेच देशविचारात धर्मनिरपेक्षता, बहुलवाद आणि सामाजिक व राजकीय समता यांचा समावेश आहे. या राष्ट्रात लोकशाही मूल्यात्मक पातळीवर अस्तित्वात आहे, मात्र ती व्यावहारिक पातळीवरही प्रस्थापित करण्यासाठी अद्यापही दीर्घ वाटचाल करावी लागणार आहे. जगभर लोकशाहीला जे ग्रहण लागलेले आहे, त्या पार्श्वभूमीवर तर या बाबीचा अत्यंत गांभिर्याने विचार करावा लागणार आहे. बाबासाहेबांनी भारतीय लोकशाहीची संहिता आपल्याला राज्यघटनेच्या माध्यमातून केव्हाच दिलेली आहे. त्याबरहुकूम आपण अंमलबजावणी करण्याची आज मोठी गरज आहे.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत लोकशाहीच्या विचारांपासून आणि त्यांच्या अंमलबजावणीपासून आपण किती जवळ अथवा किती दूर आहोत, याचे आत्मपरीक्षण करण्याचा हा कालखंड आहे. सर्वच क्षेत्रांत निर्माण झालेल्या नैतिकतेच्या अभावाकडे आपण नागरिक म्हणून कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो, याचाही विचार केला जाणे महत्त्वाचे आहे. सांविधानिक मूल्ये जपण्याची आणि जोपासण्याची आज कधी नव्हे इतकी गरज निर्माण झाली आहे.

यावेळी केंद्राचे संचालक डॉ. एस.एस. महाजन यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. अविनाश भाले यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, डॉ. पी.एन. वासंबेकर, डॉ. भारती पाटील, डॉ. पी.एस. कांबळे, डॉ. निखिल गायकवाड, डॉ. आर.जी. सोनकवडे, डॉ. भरत नाईक, अभय जायभाये यांच्यासह अधिविभाग प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वक्तृत्व स्पर्धेत प्रसाद लोखंडे व विदिरा विभुते प्रथम

फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहाअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर केंद्रातर्फे पदवीस्तर आणि पदव्युत्तर अशा दोन गटांत वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-

पदव्युत्तर गट: प्रथम- प्रसाद सुहास लोखंडे (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), द्वितीय- तेजस्विनी संजय पांचाळ (वाणिज्य महाविद्यालय, कोल्हापूर), तृतीय- प्रिती राजेंद्र हेगडे (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), उत्तेजनार्थ १- कैलास आदित मेहाडा (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), उत्तेजनार्थ २- ऋषिकेश प्रताप घाटुगडे (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर).

पदवीस्तर गट: प्रथम- विदिरा राजाराम विभुते (विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर), द्वितीय- संकेत कृष्णात पाटील (भारती विद्यापीठाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, कोल्हापूर), तृतीय- गुरूराज लक्ष्मण रसाळ (इस्माईलसाहेब मुल्ला कायदे महाविद्यालय, सातारा), उत्तेजनार्थ १- इंद्रजा विठ्ठल गोरे (विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर), उत्तेजनार्थ २- श्रुती राजाराम कांबळे (वासंतीदेवी पाटील फार्मसी संस्था, कोडोली), उत्तेजनार्थ ३- शुभांगी दशरथ माने (राजे रामराव महाविद्यालय, जत)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती

शिवाजी विद्यापीठात उत्साहात

 



कोल्हापूर, दि. १४ एप्रिल: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती आज शिवाजी विद्यापीठात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील आणि विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर जयंती समारंभाचे प्रमुख पाहुणे राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. सुरेंद्र जोंधळे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. जी.आर. पळसे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक व अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, विज्ञान व तंत्र५न विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. भारती पाटील, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक अभय जायभाये, डॉ. पी.एस. कांबळे, डॉ. आर.जी. सोनकवडे, डॉ. के.डी. सोनवणे, डॉ. पी.एन. वासंबेकर, डॉ. अविनाश भाले यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday, 17 July 2019

द्वेषाधारित राष्ट्रवादामुळे बुद्धीप्रामाण्यवाद आंधळा: डॉ. सूरज येंगडे


माणगाव परिषद शताब्दी वर्ष व्याख्यानमाला: पुष्प दुसरे

शिवाजी विद्यापीठात आयोजित 'राष्ट्रवाद आणि आंबेडकरवाद' या विषयावर बोलताना अमेरिकेतील हार्वर्ड केनेडी स्कूल येथील डॉ. सूरज येंगडे. व्यासपीठावर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि डॉ. श्रीकृष्ण महाजन.


कोल्हापूर, दि. १७ जुलै: सध्याचा आपला राष्ट्रवाद हा द्वेषाधारित असून तिने आपला बुद्धीप्रामाण्यवाद आंधळा करून सोडला आहे, असे प्रतिपादन अमेरिकेतील हार्वर्ड केनेडी स्कूल येथील संशोधक डॉ. सूरज येंगडे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने आयोजित माणगाव परिषद शताब्दी वर्ष व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफताना राष्ट्रवाद आणि आंबेडकरवाद या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन होते, तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर उद्घाटक म्हणून उपस्थित होते.
Dr. Suraj Yengade
भारतीय राष्ट्रवादाचे अत्यंत वस्तुनिष्ठ विश्लेषण करताना डॉ. येंगडे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे भारतीय समाज हा हजारो जातीजातींत विभागला गेला आहे. त्या अंतर्गत आणखी पोटजाती आहेत. इथली प्रत्येक जात ही एक स्वतंत्र राष्ट्र आहे आणि इथला प्रत्येक नागरिक हा ज्याच्या त्याच्या जातीय-राष्ट्राशी प्रामाणिक आणि बांधील राहण्यासाठी प्रयत्नशील असतो. या प्रत्येक पोटजातीत जिचा तिचा राष्ट्रवाद आहे. ही बाब एखाद्या स्फोटकापेक्षा कमी नाही. म्हणून खऱ्या राष्ट्रवादाच्या प्रस्थापनेसाठी प्रथमतः हा जातीजातींमधील, पोटजातींमधील भेद संपूर्णतः नष्ट करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे आपला राष्ट्रवाद हा परस्पर द्वेषाबरोबरच क्रिकेट-राष्ट्रवाद आहे. यामुळे खेळामध्ये अभिप्रेत असलेल्या खिलाडूवृत्तीला हरताळ फासला जातो आणि अखिलाडू राष्ट्रवाद हा खरा राष्ट्रवाद पुढे आणला जातो.
डॉ. येंगडे पुढे म्हणाले, अंबानी, अदानी, मल्ल्या असले धनिक लोक आपल्या राष्ट्रवादाची भूमिका व दिशा ठरवितात. तो देशाचा राष्ट्रवाद म्हणून पुढे केला जातो. कष्टकरी, मजूर, महिला, शोषित, वंचित यांचा राष्ट्रवाद हा आपला कधीच होत नाही. त्याचबरोबर जुन्या काळात संस्कृतीच्या नावाखाली झालेल्या चुकीच्या, समाजविघातक गोष्टींचे नव्याने पुनरुज्जीवन आणि त्यांची बहुजनांच्या पाठिंब्यावरच पुनर्प्रस्थापना करून सांस्कृतिक राष्ट्रवाद या गोंडस नावाखाली थोपविण्याची प्रक्रियाही सुरू आहे. राष्ट्रवादाचा पुरस्कारच करावयाचा असेल तर तो आर्थिक राष्ट्रवादाचा केला पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

डॉ. सूरज येंगडे
राष्ट्रवाद या संकल्पनेच्या उगमाविषयी बोलताना डॉ. येंगडे म्हणाले, राष्ट्रवाद ही संकल्पना समूहवादातून पुढे आलेली आहे. पूर्वीच्या काळी माणूस छोट्या छोट्या समूहांतून राहायचा. त्यामुळे साहजिकच तिथे असुरक्षिततेची भावना मोठ्या प्रमाणात असायची. या असुरक्षिततेमधून त्यांना बाहेर काढण्याचे आश्वासन देणारा त्यांचा म्होरक्या असायचा. त्याच्याप्रती त्यांना वारंवार उद्घोष व जयजयकार करून आपली निष्ठा प्रदर्शित करावी लागायची. त्यातून त्या राजाचे अनुयायी मोठ्या प्रमाणावर तयार होत असत. पुढे आपले वर्चस्व टिकविण्यासाठी वेगवेगळे कायदे करून समाजघटकांवरील आपले नियंत्रण व वर्चस्व अबाधित राखण्याचा हे वरिष्ठ घटक प्रयत्न करीत. मनुस्मृती आणि तत्सदृश कायद्यांनी कनिष्ठ समाजघटकांवर असे वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्या बळावर त्यांनी हजारो वर्षे आपली सत्ता त्यांच्यावर गाजविली. भारतातील विषमतेचे मूळ या सामाजिक कारणांमध्येच दडलेले आहे. हीच असुरक्षिततेची भीती व दहशत आजच्या राष्ट्रवादातही प्रतिबिंबित झालेली दिसते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रवादाला भावनिक व मानसिक स्तरावरील दुधारी तलवार म्हणत. राष्ट्रवादासाठी तुम्हाला एक बाह्यशक्ती आणि तिची भिती यांची गरज असते. भीती नसेल तर राष्ट्रवादाचीही गरज नाही, असे ते म्हणत. खरे तर आजच्या युगात अशी भीती नसेल तर आपण उत्तम ग्लोबल सिटीझन होऊन जाऊ; मुक्त, स्वतंत्र व्यक्ती म्हणून वावरू शकू.
डॉ. येंगडे पुढे म्हणाले, जागतिकीकरणाने आपल्याला जगाशी उन्मुक्तपणे जोडले, हा सकारात्मक आणि आर्थिक बाबतीत दुय्यमत्व लादले, हा नकारात्मक, असे परिणाम आपल्यावर झाले. या काळात अशा प्रकारचे राष्ट्रवादी होणे आपल्याला परवडणारे नाही. राष्ट्रवाद हवाच असेल तर तो प्रागतिक मुक्ततावादी असायला हवा, महिला सबलीकरणाचा आग्रह धरणारा राष्ट्रवाद असायला हवा, मध्ययुगीन, पुरणमतवादी संकल्पनांतून बाहेर कढून भारतीय समाजाला आधुनिकतेच्या दिशेने घेऊन जाणारा राष्ट्रवाद हवा, भावनिक आणि मानसिक असुरक्षिततेमधून बाहेर काढणारा राष्ट्रवाद हवा, कोणाला वाचविणारा अगर कोणाला बदनाम करणारा नव्हे, तर फुले-शाहू-आंबेडकरांच्या मार्गाने जाणारा राष्ट्रवाद हवा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात डॉ. महाजन म्हणाले, भारतीय म्हणून आपली ओळख देत असताना आपण स्वतःच्या इतर ओळखी मात्र आपण सोडल्या नाहीत, ही फार मोठी चूक आहे. असे साऱ्या प्रकारचे भेद आपण सोडून दिले पाहिजेत. राष्ट्रवादापेक्षा मानवतावाद हा सर्वश्रेष्ठ आहे. मानवी मूल्याधिष्ठित, समतामूलक आणि अहिंसात्मक राष्ट्र म्हणून आपली ओळख निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी संविधानिक मूल्ये अंमलात आणण्याची खरी गरज आहे.
सुरवातीला कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तेजपाल मोहरेकर यांनी स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले, तर सचिन देठे यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक, अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday, 20 March 2019

माणगाव परिषद शताब्दीनिमित्त विद्यापीठातर्फे वर्षभर विविध उपक्रम: प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के



शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे माणगाव परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभ प्रसंगी राजर्षी शाहू महाराज व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर. यावेळी (डावीकडून) आलोक जत्राटकर, जयसिंग पाटील, डॉ. श्रीकृष्ण महाजन, प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे, आनंद खामकर आदी.
शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे माणगाव परिषदेच्या शताब्दी वर्षाचे औपचारिक उद्घाटन करताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत (डावीकडून)  प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि डॉ. श्रीकृष्ण महाजन.

शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे माणगाव परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभ प्रसंगी बोलताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. व्यासपीठावर (डावीकडून) प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. श्रीकृष्ण महाजन.

कोल्हापूर, दि. २० मार्च: माणगाव येथील ऐतिहासिक परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्ताने शिवाजी विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठासह माणगाव येथेही विविध उपक्रम राबविण्यात येतील, अशी घोषणा प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे केली.
शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने माणगाव परिषद शताब्दी वर्षाचे औपचारिक उद्घाटन आज प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे प्रमुख उपस्थित होते.
Dr. D.T. Shirke
डॉ. शिर्के म्हणाले, माणगाव परिषद ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या स्नेहबंध निर्मितीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे या दोघांचे परस्परसंबंध, मैत्रभाव दर्शविणारी कागदपत्रे, पत्रे, छायाचित्रे आदींचे संकलन करण्याबरोबरच संशोधन, चर्चासत्रे, व्याख्याने आयोजित करण्यात यावीत. माणगाव परिषदेत जे महत्त्वाचे ठराव करण्यात आले, त्यासंदर्भात गेल्या शंभर वर्षांत आपण किती प्रगती केली, याचाही संशोधकीय धांडोळा केंद्राच्या वतीने घेण्यात यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आलोक जत्राटकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांचे स्नेहबंध या विषयावर विचार मांडले. ते म्हणाले, बाबासाहेब आणि शाहू महाराज यांचा एकमेकांशी परिचय झाल्यानंतर अवघ्या तीनेक वर्षांत महाराजांचे निधन झाले. तथापि, लंडनला उर्वरित विद्याभ्यास पूर्ण करण्यास जाईपर्यंत अवघे काही महिने प्रत्यक्ष आणि त्यानंतर त्यांच्या निधनापर्यंत पत्रव्यवहाराद्वारे अप्रत्यक्ष संवाद कायम राहिला. 
Alok Jatratkar
त्या दोघांमध्ये एकमेकांप्रती निर्माण झालेला मैत्रभावाचा ओलावा त्यांच्या पत्रव्यवहारातून पाहायला मिळतो. माणगाव येथे २१-२२ मार्च १९२० रोजी बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली झालेली दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृतांची पहिली परिषद आणि त्यानंतर ३०-३१ मे १९२० रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली झालेली अखिल भारतीय अस्पृश्य परिषद या दोन परिषदा या दोघांचे विचार व स्नेहसंबंध समजून घेण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. बाबासाहेबांना मूकनायक सुरू करण्यासाठी त्या काळात सुमारे २५०० रुपयांची देणगी देणे असो की, लंडनला रवाना होत असताना त्यांना दिलेला १५०० रुपयांचा निधी असो, या घटना म्हणजे शाहू महाराजांचे त्यांच्यावरील प्रेम दर्शविणाऱ्या आणि त्यांच्याकडून असणाऱ्या अपेक्षाच व्यक्त करणाऱ्या आहेत. भारताच्या सामाजिक चळवळीला या दोन व्यक्तीमत्त्वांनी प्रदान केलेले अधिष्ठान आणि प्रेरणा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे त्यांचा संशोधकीय अभ्यास होणे नितांत गरजेचे आहे.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. या दोघांच्या स्नेहबंधाच्या अनुषंगाने ध्वनीचित्रफीतीचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केले. डॉ. अविनाश भाले यांनी आभार मानले. यावेळी विद्यापीठाच्या पद्मश्री (कै.)ग.गो. जाधव अध्यासनाचे प्राध्यापक डॉ. रत्नाकर पंडित, ज्येष्ठ पत्रकार-संपादक जयसिंग पाटील, डॉ. सर्जेराव पद्माकर, कास्ट्राईबचे आनंद खामकर यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

Dr. S.S. Mahajan
माणगाव परिषदेबाबत कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने माणगाव परिषदेबाबत कागदपत्रे, छायाचित्रे, आठवणी यांचे संकन करण्याचा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला असून ज्यांच्याकडे त्या संदर्भातील कागदपत्रे असतील, त्यांनी ती केंद्राकडे सुपूर्द करावीत, असे आवाहन डॉ. महाजन यांनी केले आहे.

शताब्दीनिमित्त पहिले व्याख्यान शनिवारी
माणगाव परिषदेच्या शताब्दीच्या निमित्ताने आंबेडकर केंद्राच्या वतीने वर्षभरात विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार आहे. या मालेतील पहिले पुष्प प्रा. विनय कांबळे गुंफणार आहेत. माणगाव परिषद आणि तिचे सामाजिक राजकीय संदर्भ या विषयावर प्रा. कांबळे यांचे व्याख्यान येत्या शनिवारी (दि. २३ मार्च) सकाळी १०.३० वाजता केंद्रात आयोजित करण्यात आले असून अध्यक्षस्थानी संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन असतील.


Tuesday, 6 December 2016

बाबासाहेब प्रखर भारतीयत्वाचे प्रतीक: डॉ. प्रकाश पवार


Dr. Prakash Pawar





शिवाजी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन

कोल्हापूर, दि. ६ डिसेंबर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रखर भारतीयत्वाचे मूर्तीमंत प्रतीक होते, असे गौरवोद्गार राज्यशास्त्र अधिविभाग प्रमुख प्रा.डॉ. प्रकाश पवार यांनी आज येथे काढले.
शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६०व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. पवार म्हणाले, बाबासाहेबांचे व्यक्तीमत्त्वच मुळी बहुआयामी स्वरुपाचे होते. त्यांच्या विविधांगी पैलूंचा वेध घेणे हे त्यामुळेच आव्हानात्मक बनले आहे. विविध विषयांमध्ये संशोधन आणि अभ्यासपूर्ण, व्यासंगी प्रतिपादन हा त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा विशेष होता. बाबासाहेब हे केवळ तुमच्या माझ्या दृष्टीनेच मोठे आहेत, असे नव्हे, तर जागतिक परिप्रेक्ष्यातून त्यांच्याकडे पाहिले असतानाही त्यांचे मोठेपण व्यापून उरते. ते केवळ दलितांचे मुक्तीदाते होते, असे म्हणून त्यांच्यावर अन्याय करणे योग्य नाही. या देशातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या संकुचित, बंदिस्त मानसिकतेतून मुक्त करण्याचे महान कार्य बाबासाहेबांनी या देशात सर्वप्रथम केले. देशातील स्त्रियांना ज्याप्रमाणे आत्मभान देण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला, त्याचप्रमाणे या देशातील पुरूषांचीही बंदिस्त पुरूषी मानसिकतेतून मुक्तता करण्याचे त्यांनी केलेले कार्यही दुर्लक्षिता न येणारे आहे.
यावेळी नेहरू अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. वासंती रासम, गांधी अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. भारती पाटील, वनस्पतीशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. डी.के. गायकवाड, वाणिज्य अधिविभाग प्रमुख डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी डॉ. आंबेडकर यांच्या विविध पैलूंचा वेध घेतला. डॉ. आंबेडकर केंद्राचे संचालक डॉ. भगवान माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. रवींद्र भणगे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. के.डी. सोनावणे, डॉ. व्ही.वाय. धुपदाळे, डॉ. चेतना सोनकांबळे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Friday, 25 November 2016

देशाला दीर्घकाळ स्थिरता, स्वातंत्र्य प्रदान करण्याचे सामर्थ्य संविधानात: डॉ. अशोक चौसाळकर






कोल्हापूर, दि. २५ नोव्हेंबर: देशाला दीर्घकाळ स्थिरता व स्वातंत्र्य प्रदान करण्याचे सामर्थ्य संविधानामध्येच आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी आज येथे केले. भारतीय संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला भारतीय संविधानाची प्रस्तुतता या विषयावर शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र आणि राज्यशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परीक्षा नियंत्रक महेश काकडे होते.
डॉ. चौसाळकर म्हणाले, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लवचिकता हे भारतीय संविधानाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असून त्यामुळे घटनेत काळानुरुप बदल करणे शक्य असल्याचे प्रतिपादन केले होते. तसेच, संविधानाचा विकास करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आपल्या संविधानात आजतागायत ११२ दुरुस्त्या, सुधारणा करण्यात आल्या आहेत. भारतीय संविधान कोणा देवाला नव्हे, तर या देशातील नागरिकांनी ते स्वतःप्रत अर्पण केले, यामधून भारतीय जनतेचे सार्वभौमत्व अधोरेखित करण्यात संविधान यशस्वी झाले. संविधानाच्या प्रास्ताविकेत स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या मूल्यांचा उद्घोष करण्यात आला आहे. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी या देशातील प्रत्येक नागरिकाची प्रतिबद्धता त्यातून प्रतीत होते. भारतात स्वातंत्र्यपूर्व काळातील सुमारे दीडशे वर्षांच्या कालखंडात झालेल्या समाजसुधारणा चळवळीची मूल्ये राज्यघटनेत सामावून घेण्यात घटनाकारांना यश आले. अशा अनेक समाजसुधारणांच्या विचारांचा परिपाक संविधानात आढळतो. प्रास्ताविकेमध्ये तर संपूर्ण संविधानाचे तत्त्वज्ञान ग्रथित झाले आहे, असेही ते म्हणाले.
भारतीय संविधानाने देशात मोठ्या प्रमाणात सायलेंट रिव्हॉल्यूशन (मूक क्रांती) घडवून आणल्याचे सांगून डॉ. चौसाळकर पुढे म्हणाले, या क्रांतीचे अर्धे चक्र पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद, सरदार पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद आणि डॉ. आंबेडकर या संविधानाच्या फाऊंडिंग फादर्सनी आधीच फिरवून ठेवले आहे. उरलेले अर्धे चक्र फिरविण्याची जबाबदारी मात्र आता आपल्यावर आहे. या बळावरच गेल्या ६६ वर्षांच्या वाटचालीत संविधानाने आपली प्रस्तुतता सिद्ध केली आहे. या काळात काश्मीर, चीन आणि पाकिस्तानशी आपली युद्धे झाली. या संकट काळातही संविधानाने देशाचे ऐक्य, स्थिरता आणि स्वातंत्र्य टिकविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. स्वातंत्र्योत्तर काळात देशाने केलेली प्रगती ही संविधानाच्या सहाय्याने साधलेली प्रगती आहे, या गोष्टीचे भान सदैव बाळगले पाहिजे. स्वातंत्र्य टिकविण्यासाठी देशाची एकता अबाधित राखणे, विभूतीपूजा टाळणे आणि सत्तेबरोबरच शहाणपणा प्राप्त करणे, असे मार्ग बाबासाहेबांनी घटना परिषदेतील भाषणात सांगितले होते. सांविधानिक नैतिकता आणि जनतेचा सारासार विवेक या गोष्टींचा आग्रह त्यासाठी बाबासाहेबांनी धरला होता. संविधानाचा विकास हा त्यायोगेच होणार आहे. देशाला पुढे नेण्यासाठी आपल्याला संविधानातील मार्गदर्शक तत्त्वेच मदत करणार आहेत. संविधानाच्या सहाय्याने देशात घडून आलेल्या सामाजिक क्रांतीची बीजे आणि लोकशाही खोलवर रुजविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निश्चय करून देशात सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्याची जबाबदारी नव्या पिढीने पेलण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन डॉ. चौसाळकर यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात परीक्षा नियंत्रक महेश काकडे म्हणाले, संविधानाने बाळगलेल्या उद्दिष्टांबरहुकूम आपण वाटचाल केली का, याचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत निर्माण करण्याचे आव्हान व्यवस्थेने पेलले का, हा आजच्या काळातला खरा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. संविधानाचा अभ्यास बुद्धिजीवींकडून म्हणावा तसा होत नाही, याची खंत आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक आपल्या सांविधानिक हक्क व कर्तव्यांबाबत सजग होत नाही, तोपर्यंत सांविधानिक नैतिकता प्रस्थापित होऊ शकणार नाही. संविधानाच्या ध्येय व उद्दिष्टांच्या सहाय्यानेच देशाची सर्वांगीण प्रगती साधणे शक्य होणार आहे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. भगवान माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. रविंद्र भणगे यांनी परिचय करून दिला. अविनाश वर्धन यांनी आभार मानले. यावेळी डॉ. जगन कराडे, डॉ. एस.एस. महाजन, डॉ. पी.एन. वासंबेकर, डॉ. विनय कांबळे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.