Tuesday, 4 October 2016

औषध निर्मितीवरील खर्च व कालावधी कमी करण्याचे संशोधकांसमोर आव्हान: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे






कोल्हापूर, दि. ४ ऑक्टोबर: औषध निर्मितीच्या क्षेत्रात लागणारा पैसा व कालावधी कमी करण्याचे मोठे आव्हान संशोधकांसमोर आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे केले.
आंतरविद्याशाखीय संशोधनाची सर्व शाखांतील शिक्षक व विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी विद्यापीठात सुरू करण्यात आलेल्या रिसर्च कॉलोक्वियमचे आज कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या ड्रग डिस्कव्हरी या विषयावरील व्याख्यानाने उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
सुमारे दीड तासांहून अधिक काळ आपल्या संशोधनाचे क्षेत्र असलेल्या औषध निर्माण शास्त्राच्या अनुषंगाने संशोधनाचे महत्त्व त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मानवी जीवनातील औषधांचे, त्याच्या शास्त्राचे आणि त्याविषयीच्या संशोधनाचे महत्त्वही कुलगुरू डॉ. शिंदे यांनी विविध उदाहरणांसह स्पष्ट केले.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, एक औषध बाजारात येईपर्यंत त्याच्या विविध चाचण्यांवर सुमारे १ अब्ज डॉलर इतका खर्च आणि सर्वसाधारण १५ वर्षांचा कालावधी लागतो. अथक संशोधनानंतर एक लाख रेणूंमधून हाती आलेल्या दहा हजार रेणूंच्या चाचण्या केल्यानंतर त्यातील दहा औषधाच्या निर्मितीसाठी पात्र ठरतात. त्यानंतर आणखी काटेकोर चाचण्यांमधून त्यातील एकाचे औषधामध्ये रुपांतर होते. अशा प्रकारे सुमारे लाखभर चाचण्या पार केल्यानंतर एक औषध तयार होते. त्यांच्यावर खर्चही मोठा होतो. हे चाचण्यांचे प्रमाण व त्यावरील खर्च कमी करण्याच्या दृष्टीने अधिक संशोधन करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
संशोधनाच्या संदर्भात कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, अत्याधुनिक साधनांच्या बळावर संशोधन करणे ही तुलनेत सोपी बाब आहे. तथापि, संशोधकांनी उपलब्ध साधनसामुग्रीच्या सहाय्याने भरीव संशोधन करून पुढे जाण्याची जिद्द बाळगून त्या दृष्टीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आपण प्रभावी अध्यापन प्रणालींच्या संदर्भात जितक्या गांभिर्याने विचार करतो, तितक्याच गांभिर्याने प्रभावी अध्ययन पद्धतींचा विचार करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
परदेशी विद्यापीठांमधील एक अविभाज्य घटक असणारा रिसर्च कॉलोक्वियमचा उपक्रम शिवाजी विद्यापीठात सुरू होतो आहे, याबद्दल समाधान व्यक्त करून कुलगुरू डॉ. शिंदे यांनी या उपक्रमाचा विद्यापीठातील सर्व शाखांचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

हा उपक्रम विद्यापीठात दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी राबविण्यात येणार असल्याचे उपक्रमाचे सह-समन्वयक डॉ. एस.डी. डेळेकर यांनी प्रास्ताविकात सांगितले. डॉ. एस.बी. सादळे यांनी या उपक्रमाविषयी उपस्थितांना अवगत केले. समन्वयक डॉ. प्रल्हाद माने यांनी आभार मानले. यावेळी बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Monday, 3 October 2016

शिक्षणाची जगण्याशी सांगड घालण्यास शिकविणाऱ्या शिक्षकांची गरज: कुलगुरू प्रा. वरुण साहनी


कोल्हापूर, दि. ३ ऑक्टोबर: शिक्षण आणि जगणे यांची तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सांगड घालण्याची शिकवण देणाऱ्या शिक्षकांची मोठी गरज आजच्या आणि उद्याच्या विद्यार्थ्यांना आहे, असे प्रतिपादन गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. वरुण साहनी यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षातर्फे नवीन शैक्षणिक धोरण-२०१६: उच्च शिक्षण क्षेत्रातील शिक्षक विकास या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात बीजभाषण करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
प्रा. साहनी म्हणाले, माहिती संवाद तंत्रज्ञानामध्ये (आय.सी.टी.) प्रत्येक समाजघटकापर्यंत शिक्षण नेण्याची क्षमता आहे. बदलत्या शिक्षण व्यवस्थेचा कणा म्हणजे माहिती संवाद तंत्रज्ञान आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना हवे ते शिक्षण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. कोणतेही तंत्रज्ञान शिक्षकाला कधीही पर्यायी ठरू शकत नाही, मात्र तंत्रज्ञानामुळे शिक्षकांना आपली शिकविण्याची मूलभूत पद्धती बदलणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक ठिकाणी तंत्रज्ञान हेच उत्तर नसले तरी त्याला मानवी संवेदनांचा स्पर्श असणेही अत्यंत आवश्यक आहे.
आता सन २०२५ नव्हे, तर २०३५मधील आव्हानांचा व बदलांचा वेध घेऊन शैक्षणिक धोरणे आखण्याची गरज असल्याचे सांगून प्रा. साहनी म्हणाले, सन २०३५पर्यंत सध्याची शिक्षण व्यवस्था पूर्णतः नव्याने बदलली नाही, तर ती कुचकामाची ठरुन जाईल. भविष्यातील रोजगाराच्या संधींचाच विचार केला, तर जीवनभर शिक्षण (लाइफलाँग लर्निंग) हा भावी जीवनाचा नित्याचा भाग बनलेला असेल. या पार्श्वभूमीवर, प्रत्येक विद्यार्थ्याला २४X७ शिक्षण देणारी ॲप्लीकेशन्स आणि तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे. पूर्वनिर्धारित अभ्यासक्रम हा सुद्धा या नवीन व्यवस्थेत भूतकाळ बनून जाईल. विद्यार्थीच त्यांना काय शिकायचे हवे ते ठरवतील आणि शिकतील. शैक्षणिक आणि पूरक अशा दोन्ही बाबतीत विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्त्व विकासाला आणि भावी आयुष्यासाठी उपयुक्त अशा गोष्टी ते स्वतःच निर्धारित करतील. पुढील काळात विद्यार्थी विविध ऑनलाइन साधनांच्या सहाय्याने अध्ययन करून वर्गात येतील आणि त्यातून निर्माण झालेल्या शंकांचे निरसन करण्याची जबाबदारी शिक्षकांची असेल. विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याबरोबर दिशादर्शन करण्याची महत्त्वाची भूमिका त्यांना पार पाडावी लागेल.
ते म्हणाले, तंत्रज्ञानामुळे होत जाणारे बदल, आव्हाने शिक्षक म्हणून आपल्याला स्वीकारावीच लागतील. तंत्रज्ञानाच्या आधारे दर्जेदार शिक्षण आणि दर्जेदार अभ्यासक्रम यांची निर्मिती करण्याबरोबरच ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांमधील दरी सांधण्याची संधीही शिक्षकांना आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना शैक्षणिक उन्नतीसाठी आवश्यक असणारी ॲप्लीकेशन आणि साधनांची निर्मिती करण्याची जबाबदारी त्यांनी उचलायला हवी. व्यावसायिक शिक्षणाला मुख्य प्रवाहातील शिक्षण बनविण्याचे आणि गुरू-शिष्य परंपरा जपण्याचे आणि जोपासण्याचे आव्हानही आपल्यासमोर असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, तंत्रज्ञानासह आजच्या शिक्षण प्रणालीच्या संदर्भात निर्माण होणारी नवनवीन आव्हाने पेलण्याची क्षमता शिक्षकांनी स्वतःमध्ये विकसित करावी. नवनवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास आणि अंगिकार करून त्या साधनांचा अध्यापन प्रक्रियेमध्ये समावेश करण्याचा प्रयत्न त्यांनी करावा. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसमवेत सुसंवाद प्रस्थापित करण्याला त्यांचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
चर्चासत्रात सुरवातीला समन्वयक व शिक्षणशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. श्रीमती प्रतिभा पाटणकर यांनी स्वागत केले. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. आर.के. कामत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे यांनी प्रास्ताविक केले तर, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव यांनी आभार मानले. यावेळी प्राचार्य, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठाकडून मातोश्री वृद्धाश्रमास ग्रंथभेट


कोल्हापूर, दि. ३ ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयातर्फे काल आर.के. नगर येथील मातोश्री वृध्दाश्रमाच्या ग्रंथालयासाठी २६८ ग्रंथ भेट देण्यात आले. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला.
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी १ जानेवारी २०१६ रोजी आपल्या मातोश्री श्रीमती नागरबाई शिंदे यांचा वाढदिवस मातोश्री वृद्धाश्रमात साजरा केला होता. त्यावेळी त्यांनी येथील ज्येष्ठ नागरिकांची वाचनाची आवड भागविण्यासाठी ग्रंथालयास मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मा. कुलगुरू यांच्या सूचनेनुसार ग्रंथपाल डॉ. नमिता खोत यांनी या संदर्भातील आवश्यक पावले उचलली आणि गांधी जयंतीचे औचित्य साधून काल हा ग्रंथ प्रदान कार्यक्रम पार पडला.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विद्यापीठातर्फे ही ग्रंथसंपदा देण्यात आली आहे. ग्रंथांच्या सान्निध्यात राहून येथील ज्येष्ठांनी आनंदाने हा काळ व्यतित करावा. यापुढेही त्यांना आवश्यक वाटणारी पुस्तके विद्यापीठामार्फत उपलब्ध करून देण्यात येतील तसेच येथील ग्रंथालयाची शास्त्रशुद्ध व्यवस्थाही ग्रंथालयशास्त्राच्या विद्यार्थ्यांकडून लावून देण्यात येईल.
कुलगुरू डॉ. शिंदे, ग्रंथपाल डॉ. खोत व उपग्रंथपाल डॉ. धंनजय सुतार यांच्या उपस्थितीत वृद्धाश्रमाचे संचालक शिवाजीराव पाटोळे यांच्याकडे हे ग्रंथ सुपूर्द करण्यात आले. श्री. पाटोळे यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ व ग्रंथभेट देवून मा. कुलगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाच्या वतीने वृद्धाश्रमात वाचनकट्टा कार्यक्रम घेण्यात आला. अभिजीत घाटे यांनी 'माझे सत्याचे प्रयोग' व मंजू देशमुख यांनी 'माझा साक्षात्कारी हृदयरोग' या पुस्तकांची माहिती दिली. यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी अत्यंत आवडीने त्यांचे श्रवण केले व उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी ग्रंथपाल डॉ. खोत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. नीता पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर अल्मास पेंढारी हिने आभार मानले. यावेळी प्रा. वाय. जे जाधव, श्री. डी. एस्. गुरव यांच्यासह ग्रंथालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Sunday, 2 October 2016

‘स्वच्छ भारत’ अभियानाला विद्यापीठात लक्षणीय प्रतिसाद


In front of Main Administrative Building

Vice Chancellor Dr. Devanand Shinde along with other Officers participated in cleanliness drive

Vice Chancellor Dr. Devanand Shinde along with other Officers participated in cleanliness drive

Vice Chancellor Dr. Devanand Shinde and BCUD Director Dr. D.R. More

Staff of Press

Staff of Establishment Section

Staff of Accounts Department

Staff of Zoology Department

Botany Department

Physics Department

Electronics Department

Hands at work

Environment Department

Examination Department

Ladies Staff participation

Tribute to Mahatma Gandhi and Lal Bahadur Shastri

Pledge to peace, non-violence and cleanliness

Pledge to peace, non-violence and cleanliness


कोल्हापूर, दि. २ ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठात दरवर्षीप्रमाणे यंदाही राबविण्यात आलेल्या परिसर स्वच्छता अभियानाला शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक तसेच विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गतवर्षी स्वच्छता अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टीकमुक्ती करण्यात आली होती. यंदाच्या सफाईदरम्यान मात्र अत्यल्प प्लास्टीक व काचा सापडल्या, हे आजच्या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. रस्त्याकडेला वाढलेली काटेरी झुडपे, गवत, परिसरात पडलेला कचरा अशा प्रकारचा कचरा आज मोठ्या प्रमाणात साफ करण्यात आला.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, प्रभारी कुलसचिव डॉ.व्ही.एन. शिंदे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, विद्यार्थी सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड  यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी साडेसात ते दहा या कालावधीत स्वच्छ भारत अभियानांतर्गत विद्यापीठ परिसर स्वच्छता अभियान यशस्वीरित्या राबविण्यात आले.
कोणत्याही औपचारिकतेशिवाय कुलगुरू डॉ. शिंदे यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांनी हातात खराटे घेऊन स्वच्छतेला सुरवात केली. मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रशासकीय सेवकांनी त्यांना नेमून दिलेल्या एनसीसी भवन गेटपर्यंतच्या परिसरामध्ये तर अधिविभागांनी आपापल्या परिसराची स्वच्छता केली. गतवर्षी राबविलेल्या स्वच्छता मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टीक कचरा व काचसामान साफ करण्यात आले होते. यंदाच्या मोहिमेदरम्यान विद्यापीठ परिसरातील प्लास्टीक व काचेच्या कचऱ्याचे प्रमाण लक्षणीयरित्या घटल्याचे स्पष्ट झाले. स्वच्छता मोहिमेतून विद्यार्थ्यांसह नागरिकांत झालेल्या जागृतीचेच हे लक्षण आहे, असे म्हणावे लागेल.
कुलगुरू डॉ. शिंदे, बीसीयुडी संचालक डॉ. मोरे, प्रभारी कुलसचिव डॉ. शिंदे व राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. गायकवाड यांनी मुख्य प्रशासकीय इमारतीपासून ते भूगोल अधिविभागापर्यंतच्या रस्त्याची स्वच्छता केली. त्यानंतर त्यांनी परीक्षा भवनसह कॅम्पसवरील प्रत्येक अधिविभागाला प्रत्यक्ष भेट देऊन स्वच्छता अभियानाची पाहणी केली. सहभागी विद्यार्थ्यांचे कुलगुरू डॉ. शिंदे यांनी मनापासून अभिनंदन व कौतुक केले.
अभियानानंतर मुख्य प्रशासकीय इमारतीच्या पोर्चमध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले. त्यानंतर नेहरू अभ्यास केंद्राच्या संचालक डॉ. वासंती रासम यांनी उपस्थितांना अहिंसा व शांततेची तर कुलसचिव डॉ. शिंदे यांनी स्वच्छतेची शपथ दिली. विद्यार्थी कल्याण विभागाच्या वतीने सर्व उपस्थितांसाठी नाष्ता व चहापानाची सुविधा करण्यात आली.

Saturday, 1 October 2016

अस्थिर जातींच्या अभ्यासाकडे समाजशास्त्रज्ञांनी वळणे गरजेचे: उत्तम कांबळे





कोल्हापूर, दि. १ ऑक्टोबर: समाजशास्त्र हे अद्यापही स्थिर जातींभोवती फिरते आहे. आता अस्थिर जातींच्या अभ्यासाकडे समाजशास्त्रज्ञांनी वळणे नितांत गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र अधिविभागातर्फे फिरस्ती: एक समाजशास्त्र या विषयावर श्री. कांबळे यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे होते.
श्री. कांबळे म्हणाले, दहा वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या फिरस्तीच्या माध्यमातून शोषित व वंचित घटकांना मराठी साहित्यामध्ये स्थान देता आले. या घटकांना कोणत्याही क्रमिक पुस्तकात कधीही स्थान मिळालेले नव्हते. त्यांच्या अस्तित्वाची दखल अथवा जाणीवही कोणाला नव्हती. हाकेच्या अंतरावर सुरू असलेल्या प्रगती नामक बाबींपासून तो कोसो दूर होता. समाजामध्ये स्थिर आणि अस्थिर अशा दोन प्रकारच्या जाती आहेत. अस्थिर जाती भटक्या असतात. त्यांना ना घर, ना शेती, ना ठिकाणा अशी परिस्थिती आहे. त्यांचे नाव ना सातबाऱ्यावर आहे, ना रेशन कार्डावर, ना मतदार यादीमध्ये. तथापि, आपले समाजशास्त्र मात्र अद्यापही स्थिर जातींभोवतीच केंद्रित झाले आहे. या समाजशास्त्राच्या परीघात अस्थिर जातींचा समावेश होणे गरजेचे आहे. फिरस्तीदरम्यान सापडलेल्या या अस्थिर जाती-जमातींनी मला इतके हरविले आहे की विजयाची शक्यता दूरवर दिसत नाही. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे आपल्या व्यवस्थेकडे नाहीत. जाती कशा टिकवायच्या, यापेक्षा त्या मोडायला शिकविणाऱ्या पुस्तकांची आजच्या समाजाला मोठी गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
श्री. कांबळे म्हणाले, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये उदयास आलेल्या अर्थव्यवस्थेने गुलामांची नवी व्यवस्था निर्माण केली आहे. पूर्वीच्या गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव तरी होती; मात्र या नवीन गुलामांना गुलामीची जाणीवच होऊ न देण्याची दक्षता व्यवस्थेने घेतली आहे. त्यामुळे माणसाचे रुपांतर यंत्रात आणि यंत्रमानवामध्ये होते आहे. या सायबरयुगात आपल्यातला माणूस जिवंत ठेवणे हेच आपल्यासमोरचे खरे मोठे आव्हान आहे. जागतिकीकरणामुळेच ग्राहक आणि अ-ग्राहक अशी फळी आणि त्यांच्यातील संघर्ष उद्भवला आहे. भौतिक आणि शारीर गोष्टींचे भांडवल करून त्या प्रत्येक अवयवाचं मार्केटिंग हा या नव्या ग्राहक युगाचा फंडा आहे. याला अगदी गर्भाशय सुद्धा अपवाद राहिलेले नाही. अशा परिस्थितीत नवा समाज, नव्या संस्कृती आणि त्या संस्कृतींमधील संघर्ष आकाराला येतो आहे. संस्कृतीकरणाचे हे नवे प्रवाह जर आपण वेळीच ओळखू आणि रोखू शकलो नाही, तर मानवी मूल्यांच्या ऱ्हासाला आपण कारणीभूत ठरू, असेही ते म्हणाले.
ते म्हणाले, जेव्हा समाजात निर्मितीची, उत्पादनाची साधने बदलतात, तेव्हा नवनिर्मितीची शक्यता निर्माण होते. सध्याही आपण एका अशाच टप्प्यावर उभे आहोत. शेषनागाच्या फण्यावरुन श्रमिकांच्या तळहातावर सरकलेल्या दुनियेचं नवं शिफ्टिंग आता संगणकाच्या पडद्यावर, मोबाईलच्या स्क्रीनपर्यंत झालेलं आहे. यामुळं ग्लोबलायझेशन ऑफ लिंग्विस्टीक्सही बदलून गेलं. भाषा बदलली, भाषेची प्रतीके, चिन्हे बदलली. भाषेतून आणि भाषेपलिकडेही जीवन बदलत गेले. भाषेची उपयुक्तता जोपर्यंत असते, तोपर्यंतच ती टिकते. कोणाच्याही भाषणावर नव्हे, तर उपयुक्ततेवर भाषेचे जीवन-मरण अवलंबून असते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. व्ही.एन. शिंदे म्हणाले, उत्तम कांबळे यांनी फिरस्तीमधून समाजातील शोषित, वंचितांचे जगणे मांडले, त्यातील भीषणता मांडली. या सदराच्या माध्यमातून अखंडित समाजसेवेचेव्रतच त्यांनी सांभाळले. समाजाच्या भावनांना हात घालून जनमानसामध्ये दातृत्वाची भावना जागृत करण्याचे काम त्यांनी केले. त्यातून अनेक वंचितांना मदतीचा हात तर मिळवून दिलाच, त्याचबरोबरच समाजाची संवेदनशीलता जागृत असल्याचा प्रत्ययही दिला. ही फिरस्ती अशीच अखंडित सुरू राहो, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी अधिविभाग प्रमुख डॉ. जगन कराडे यांनी ग्रंथ व स्मृतिचिन्ह देऊन श्री. कांबळे यांचे स्वागत केले. डॉ. प्रल्हाद माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. प्रतिमा पवार यांनी परिचय करून दिला. डॉ. श्रीमती पी.बी. देसाई यांनी आभार मानले. यावेळी प्रा. विजय मारुलकर, प्रा. आर.बी. पाटील, डॉ. शशिकांत चौधरी, डॉ. एस.एस. महाजन यांच्यासह शिक्षक, अधिकारी, प्रशासकीय सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Thursday, 29 September 2016

विद्यापीठाच्या अंध विद्यार्थ्यांसाठीच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल; आय.ए.बी.कडून पुरस्कार

शिवाजी विद्यापीठामध्ये आयोजित आय.सी.टी. विषयक कार्यशाळेत सहभागी झालेले अंध विद्यार्थी. (फाईल फोटो) 

कोल्हापूर, दि. २९ सप्टेंबर: शिवाजी विद्यापीठाने अंध विद्यार्थ्यांसाठी चालविलेल्या कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली असून मदुराई (तमिळनाडू) येथे स्थित इंडियन असोसिएशन फॉर द ब्लाइंड (आय.ए.बी.) या संस्थेने आय.एय.बी. एम्पॉवरमेंट चॅम्पियन्स-२०१६ (सिल्व्हर झोन) हा पुरस्कार देऊन विद्यापीठाचा गौरव केला आहे.
शिवाजी विद्यापीठाने गेली काही वर्षे सातत्याने अंध विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी प्रयत्न चालविले आहेत. विशेषतः माहिती तंत्रज्ञानाच्या युगात हा विद्यार्थी केवळ त्या क्षेत्रातील माहितीअभावी मागे पडू नये, यासाठी विद्यापीठाने जॉज (जॉब एक्सेस विथ स्पीच) हे विशेष सॉफ्टवेअर बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयात अंध विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केले आहे. विद्यापीठाच्या इंग्रजी अधिविभागातील अंध शिक्षक डॉ. मनोहर वासवानी हे स्वतः या सॉफ्टवेअरवर काम करतात आणि विद्यार्थ्यांना ते वापरण्याचे प्रशिक्षण देतात. विद्यापीठाने या ठिकाणी ब्रेल प्रिंटरही उपलब्ध केला आहे, जेणे करून आवश्यक माहितीची प्रिंट आऊट घेऊन विद्यार्थ्यांना नंतरही वाचता येऊ शकेल. विद्यापीठाचे बॅ. खर्डेकर ग्रंथालय आणि राष्ट्रीय अंध संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने वेळोवेळी अंध विद्यार्थ्यांसाठी माहिती तंत्रज्ञानविषयक प्रशिक्षण तसेच करिअर संधी यांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा, शिबीरेही आयोजित करण्यात येतात.
या पुरस्काराच्या अनुषंगाने माहिती देताना ग्रंथपाल डॉ. नमिता खोत म्हणाल्या, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विद्यापीठ सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. त्या दृष्टीने राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) अंतर्गत विद्यापीठास सर्वसमावेशक शिक्षणाचा पथदर्शी प्रकल्प उभारण्यासाठी १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यातून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. अंध विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयाच्या विस्तारित इमारतीमध्ये अभ्यासाला बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे त्यांना जास्तीत जास्त वाचन करता यावे, या दृष्टीने ब्रेल ग्रंथालयही टप्प्याटप्प्याने विकसित करण्यात येत आहे.

योग्य दिशेने काम सुरू असल्याची पोचपावती: कुलगुरू डॉ. शिंदे

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी विद्यापीठाने अंध विद्यार्थ्यांसाठी चालविलेल्या कार्याची दखल राष्ट्रीय संस्थेने घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, विद्यापीठ अंध व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी करीत असलेले प्रयत्न हे योग्य दिशेने असल्याची पोचपावती या पुरस्काराच्या रुपाने मिळाली आहे. त्याबद्दल आय.ए.बी.ला मनापासून धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे ग्रंथपाल डॉ. नमिता खोत, डॉ. वासवानी आणि त्यांचे सर्व सहकारी यांचेही मनापासून अभिनंदन करतो. विद्यापीठ या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून कार्यरत आहे, यापुढील काळातही अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा या पुरस्कारामुळे मिळाली आहे.