Showing posts with label Barr. Balasaheb Khardekar Library. Show all posts
Showing posts with label Barr. Balasaheb Khardekar Library. Show all posts

Tuesday, 5 March 2019

शिवाजी विद्यापीठाचे सर्व शोधप्रबंध ‘शोधगंगा’वर उपलब्ध



बॅ. खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राची कामगिरी; ६ मार्चला होणार औपचारिक लोकार्पण

कोल्हापूर, दि. ५ मार्च: शिवाजी विद्यापीठाला सादर करण्यात आलेले सन २०१८अखेरपर्यंतचे एकूण ३४९६ शोधप्रबंध इन्फ्लिबनेटच्या शोधगंगा या राष्ट्रीय संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले आहेत. बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या माध्यमातून उद्या (दि. ६ मार्च) आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय परिषदेत या प्रबंधांचे औपचारिक लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत यांनी आज दिली.

डॉ. नमिता खोत यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिजिटल ग्रंथालयाच्या निर्मितीतील एक महत्वाचा टप्पा म्हणजे ग्रंथालयातील उपलब्ध अत्यावश्यक छापील/ मुद्रित पीएच.डी. प्रबंधांचे डिजिटल माध्यमात परिवर्तन होय. डिजिटायझेशन प्रक्रियेत पारंपरिक परिवर्तन करुन ते संगणकीकृत करणे व संगणकाच्या आधारे त्यावर प्रक्रिया करुन संकेतस्थळाच्या माध्यमातून ते संशोधकांना उपलब्ध करुन देणे यांचा समावेश होतो.

शिवाजी विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राकडे उपलब्ध असणाऱ्या सन १९६४पासून २०१८पर्यंतच्या ३४९६ पीएच.डी प्रबंधांचे डिजियटायझेशन करुन ते इनफ्लिबनेटच्या शोधगंगा’ (shodhganga.inflibnet.ac.in) या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहेत. शिवाजी विद्यापीठात झालेले संशोधन संशोधक, अभ्यासकांना उपयोगी पडावेत, या हेतूने विद्यापीठाने अहमदाबादच्या इन्फ्लिबनेट सेंटरशी २१ सप्टेंबर २०११ रोजी सामंजस्य करार केला. या कराराच्या अनुषंगाने विद्यापीठ अनुदान आयोग (नवी दिल्ली) यांच्याकडून सन २०१२मध्ये विद्यापीठाच्या डिजियटायझेशन प्रकल्यासाठी रू. १९ लाख २६ हजार ६५० एवढे अनुदान देण्यात आले. शोधगंगा या संकेतस्थळावर प्रबंध विषयनिहाय पाहणे, वाचणे, डाऊनलोड करून घेणे आदी सुविधा ज्ञानस्रोत केंद्राच्या संदर्भ विभागाद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

या डिजिटायझेशनचे काम गुरगावच्या प्रो-क्वेस्ट या शिखर संस्थेकडे सोपविण्यात आले होते. त्यांच्यामार्फत ज्ञानस्रोत केंद्राकडे उपलब्ध विविध विषयांच्या ३४९६ पीएच.डी प्रबंधांचे संपूर्ण स्कॅनिंग व इतर अनुषंगिक तांत्रिक कामे करून हे सर्व प्रबंध शोधगंगाया राष्ट्रीय रिपॉझिटरी पोर्टलवर उपलब्ध केले आहेत.

या डिजिटायझेशनच्या कामात उपग्रंथपाल डॉ. डी.बी सुतार, सहाय्यक ग्रंथपाल डॉ. पी. बी. बिलावर यांच्यासह वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यक व संदर्भ विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र खामकर व ग्रंथालय मदतनीस रविंद्र बचाटे यांनी मोलाचे योगदान दिल्याचेही डॉ. खोत यांनी सांगितले.

दरम्यान, उद्या, बुधवार दि. ६ मार्च रोजी ज्ञानस्रोत केंद्रातर्फे आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेत शोधगंगावर  अपलोड करण्यात आलेल्या प्रबंधांचे औपचारिक लोकार्पण करण्यात येणार असून यावेळी प्रो-क्वेस्ट कंपनीचे प्रताप दास, आनंदिता सेनगुप्ता व सचिन मोरे उपस्थित राहणार आहेत, अशी माहितीही डॉ. खोत यांनी दिली.

संशोधकांच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प: कुलगुरू डॉ. शिंदे

शिवाजी विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्राने इन्फ्लिबनेटच्या शोधगंगा पोर्टलवर सन १९६४ ते २०१८ पर्यंतचे सुमारे ३४९६ पीएच.डी.चे शोधप्रबंध अपलोड करून एक महत्त्वाचे राष्ट्रीय कर्तव्यच पार पाडले आहे. या उपक्रमामुळे विद्यापीठाकडील संशोधकीय ज्ञान जगभरातील संशोधकांना आता खुले झाले आहे. विद्यापीठात गेल्या ५५ वर्षांत विविध विषयांवर मौलिक संशोधन झाले आहे. त्याचा नवसंशोधकांना संदर्भसाहित्य म्हणून मोलाचा लाभ होणार आहे. विशेष म्हणजे राज्यात अशा प्रकारे सर्व शोधप्रबंध अपलोड करणारे शिवाजी विद्यापीठ हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या खालोखाल तिसरे आहे, ही यातील महत्त्वाची बाब आहे. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी योगदान देणारे ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत आणि त्यांचे सर्व सहकारी अभिनंदनास पात्र आहेत, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

Monday, 3 October 2016

शिवाजी विद्यापीठाकडून मातोश्री वृद्धाश्रमास ग्रंथभेट


कोल्हापूर, दि. ३ ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयातर्फे काल आर.के. नगर येथील मातोश्री वृध्दाश्रमाच्या ग्रंथालयासाठी २६८ ग्रंथ भेट देण्यात आले. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला.
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी १ जानेवारी २०१६ रोजी आपल्या मातोश्री श्रीमती नागरबाई शिंदे यांचा वाढदिवस मातोश्री वृद्धाश्रमात साजरा केला होता. त्यावेळी त्यांनी येथील ज्येष्ठ नागरिकांची वाचनाची आवड भागविण्यासाठी ग्रंथालयास मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मा. कुलगुरू यांच्या सूचनेनुसार ग्रंथपाल डॉ. नमिता खोत यांनी या संदर्भातील आवश्यक पावले उचलली आणि गांधी जयंतीचे औचित्य साधून काल हा ग्रंथ प्रदान कार्यक्रम पार पडला.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विद्यापीठातर्फे ही ग्रंथसंपदा देण्यात आली आहे. ग्रंथांच्या सान्निध्यात राहून येथील ज्येष्ठांनी आनंदाने हा काळ व्यतित करावा. यापुढेही त्यांना आवश्यक वाटणारी पुस्तके विद्यापीठामार्फत उपलब्ध करून देण्यात येतील तसेच येथील ग्रंथालयाची शास्त्रशुद्ध व्यवस्थाही ग्रंथालयशास्त्राच्या विद्यार्थ्यांकडून लावून देण्यात येईल.
कुलगुरू डॉ. शिंदे, ग्रंथपाल डॉ. खोत व उपग्रंथपाल डॉ. धंनजय सुतार यांच्या उपस्थितीत वृद्धाश्रमाचे संचालक शिवाजीराव पाटोळे यांच्याकडे हे ग्रंथ सुपूर्द करण्यात आले. श्री. पाटोळे यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ व ग्रंथभेट देवून मा. कुलगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाच्या वतीने वृद्धाश्रमात वाचनकट्टा कार्यक्रम घेण्यात आला. अभिजीत घाटे यांनी 'माझे सत्याचे प्रयोग' व मंजू देशमुख यांनी 'माझा साक्षात्कारी हृदयरोग' या पुस्तकांची माहिती दिली. यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी अत्यंत आवडीने त्यांचे श्रवण केले व उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी ग्रंथपाल डॉ. खोत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. नीता पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर अल्मास पेंढारी हिने आभार मानले. यावेळी प्रा. वाय. जे जाधव, श्री. डी. एस्. गुरव यांच्यासह ग्रंथालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Monday, 1 August 2016

प्रकाशनाची शंभर वर्षे पूर्ण केलेल्या ग्रंथांचे विद्यापीठात प्रदर्शन


बॅ. बाळासाहेब खर्डेकर जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.या प्रसंगी (डावीकडून) डॉ. डी.के. गायकवाड, डॉ. प्रकाश बिलावर, कुलगुरू डॉ. शिंदे, डॉ. नमिता खोत, डॉ. व्ही.एन. शिंदे, डॉ. डी.बी. सुतार, डॉ. डी.व्ही.मुळे,  डॉ. वासंती रासम.


प्रकाशनाची शंभर वर्षे पूर्ण केलेल्या ग्रंथांची पाहणी करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, डॉ. नमिता खोत व अन्य मान्यवर.

बॅ. बाळासाहेब खर्डेकर जयंतीनिमित्त उपक्रम

कोल्हापूर, दि. १ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयात आज बॅ. खर्डेकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त प्रकाशनाची शंभर वर्षे पूर्ण केलेल्या ग्रंथांचे प्रदर्शन हा आकर्षणाचा बिंदू ठरला.
बॅ. खर्डेकर ग्रंथालयाच्या पहिल्या मजल्यावरील आबालाल रेहमान कलादालनात आज सकाळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते खर्डेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर प्रकाशनाची शंभर वर्षे पूर्ण केलेल्या ग्रंथांच्या प्रदर्शनाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या प्रदर्शनात एकूण १६३ दुर्मिळ ग्रंथ, पुस्तके मांडण्यात आली आहेत. हे प्रदर्शन उद्या (दि. २) सायंकाळपर्यंत ठेवण्यात येणार असल्याचे ग्रंथपाल डॉ. नमिता खोत यांनी सांगितले. 'ग्रंथालयाचा हा एक अत्यंत उपयुक्त आणि अभिनव उपक्रम असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा,' असे आवाहन कुलगुरू डॉ. शिंदे यांनी केले.
या प्रसंगी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी.के. गायकवाड, प्रा. वासंती रासम, माजी कुलसचिव डॉ. डी.व्ही. मुळे, उपग्रंथपाल डॉ. डी.बी. सुतार, सहाय्यक ग्रंथपाल डॉ. प्रकाश बिलावर, ए.बी. मातेकर, एस.एम. देसाई, डी.एस. गुरव, डॉ. आर.डी. खामकर, ए.ए. देवेकर, सी.एन. गुरव, एस.आर. बिर्जे यांच्यासह ग्रंथालयातील कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuesday, 22 April 2014

भर उन्हात फुलली नेत्रसुखद हिरवळ!



शिवाजी विद्यापीठाच्या उद्यान विभागाची कामगिरी



कोल्हापूर, दि. २२ एप्रिल: अवकाळी पावसाचा मारा झाला असला तरी उन्हाचा तडाखा आणि हवेतील उष्मा मात्र कमी झालेला नाही. अशा वेळी शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात मात्र उद्यान विभागाच्या कामगिरीमुळे नेत्रसुखद हिरवळ वाढली असल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे येत्या पावसाळ्यात विद्यापीठ परिसरात लावावयाची रोपे सुद्धा इथल्याच रोपवाटिकेमध्ये (नर्सरी) जोमाने वाढत आहेत.
काही वर्षांपूर्वी विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयामोरील नूतन हिरवळयुक्त बगिचा हा विद्यार्थ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि कौतुकाचा विषय बनला होता. पण त्यावरील सदोदित वावर आणि पाण्याच्या कमतरतेमुळे ती कोमेजली आणि त्याठिकाणी भकासपणा आला होता. तथापि, यंदा मात्र विद्यापीठाच्या उद्यान विभागाचे उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन उद्यान अधीक्षक बाबा कदम आणि आता नव्याने रुजू झालेले अधीक्षक अभिजीत जाधव यांनी विद्यापीठाला हिरवे वैभव पुन्हा प्राप्त करून देण्याचा विडा उचलला आणि त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमाला यशही आल्याचे दिसत आहे.
सिंचन व्यवस्थेचे पुनरुज्जीवन



विद्यापीठात सन २००६-०७मध्ये ठिबक सिंचन यंत्रणा बसविण्यात आली होती. परंतु, दरम्यानच्या काळात मनुष्यबळाअभावी ती नादुरुस्त होती. गेल्या ऑक्टोबरमध्ये ही यंत्रणा पूर्ववत सुरू करण्यात आली आणि तिच्या माध्यमातून विद्यापीठ परिसरातील हिरवाई टवटवीत राहू लागली. विशेष म्हणजे स्वच्छ पाण्याऐवजी पूर्णतः सांडपाण्याचे शुद्धीकरण करून त्याचा वापर उद्यान व झाडांसाठी केला जातो. यासाठी विद्यार्थिनी वसतिगृहाच्या पाठीमागे सुमारे दहा हजार लीटर क्षमतेचा रिसायक्लिंग प्लँट उभारण्यात आला आहे. तिथून पाणी उचलून उद्यानातील उत्तर सर्कलमध्ये घेतले जाते. तिथून ते सर्कलमधील चिंच, आंबा, सभोवतीचा गोल्डन ड्युरांडा, ग्रंथालयासमोरील उद्यान, भूगोल विभागामागील आमराई, कर्मवीर भाऊराव पाटील उद्यान याठिकाणी सिंचन यंत्रणेमार्फत पुरविले जाते. आवश्यक तेथे स्प्रिंकलरही बसविले आहेत.
दक्षिण सर्कलमध्येही राजाराम तलावातील पाणी आणले जाते. तिथून उचलून ते रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, प्राणिशास्त्र या अधिविभागांसमोरील बगिचांबरोबरच संपूर्ण दक्षिण सर्कलमधील झाडांना ठिबक सिंचनाद्वारे पुरविले जाते. भौतिकशास्त्र विभागासमोरील बागेत स्प्रिंकलर आहेत.


रोपवाटिकाही फुलली


 उत्तम रोपवाटिका म्हणून विद्यापीठाच्या रोपवाटिकेचा लौकिक होता. एकेकाळी रोपे विकणाऱ्या रोपवाटिकेमध्ये दरम्यानच्या काळात मनुष्यबळाअभावी बाहेरून रोपे आणण्याची वेळ आली होती. पण, उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाला लागणारी सर्व रोपे इथेच तयार करण्याचा निश्चय केला आणि आजघडीला त्यांचा हा निश्चय प्रत्यक्षात उतरविण्यात त्यांना यश आले आहे.
याबाबत सांगताना डॉ. शिंदे म्हणाले, मँजिना, आवळा, चिंच, करंज, जांभूळ, शिरीष, सप्तपर्णी, कदंब अशी रोपे आपल्याला शासनाच्या सामाजिक वनीकरण उपक्रमाअंतर्गत प्राप्त होतात. त्याव्यतिरिक्त विद्यापीठाने वड, पिंपरण, चाफा तसेच बोगणवेल, रातराणी, अकालिपा, मोगरा, क्रोटॉन, पिवळा बांबू अशी रोपे वाटिकेमध्ये तयार केली आहेत. ती चांगल्या पद्धतीने तयार होत आहेत. रिसायकल्ड पाण्यावरच ती चांगली फुलली आहेत. नव्या रोपांसाठी प्लास्टिक पिशव्या वापरत असलो तरी मोठी रोपे तयार करण्यासाठी आपण रंगांच्या खराब झालेल्या बकेटचाच वापर करतो. येत्या पावसाळ्यात याच नर्सरीतील रोपे परिसरात ठिकठिकाणी लावण्यात येतील. इथली रोपे आम्ही विकणार नसलो तरी विद्यापीठाची रोपवाटिका स्वयंपूर्ण करण्यात मात्र आम्हाला निश्चितपणे यश आले आहे. यामध्ये कुलगुरू डॉ. एन.जे. पवार, प्र-कुलगुरू डॉ. ए.एस. भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड यांच्या द्वारे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत वेळोवेळी आयोजित केल्या जाणाऱ्या शिबीरांचीही मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.