Friday, 10 November 2017

डॉ. आंबेडकर अखेरच्या श्वासापर्यंत विद्यार्थीच: उत्तम कांबळे


ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे

कोल्हापूर, दि. १० नोव्हेंबर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आयुष्यभर विद्यार्थी म्हणूनच राहिले. ज्ञानकण संचयाचे काम त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत उत्तम कांबळे यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या सेवा-पूर्व मार्गदर्शन केंद्रात आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शैक्षणिक परिवर्तन या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते.
श्री. कांबळे म्हणाले, बाबासाहेबांना शिक्षणाचे महत्त्व आणि प्रयोजन खूप लवकर लक्षात आले कारण या देशातील सामाजिक परिस्थिती आणि व्यवस्थेविषयी ते दररोज एका नित्यनव्या प्रश्नाला सामोरे जात होते. त्यातून त्यांना आपल्याला माणूस म्हणून समान वागणूक का दिली जात नाही, हा प्रश्न छळू लागला. त्यातून वडिलांसोबत कबीराचे दोहे गाताना किंवा केळुस्कर गुरूजींनी भेट दिलेले बुद्धचरित्राची पारायणे करताना त्यांना त्यांच्या शिक्षणाचे प्रयोजन सापडले, ते म्हणजे मला समाज बदलायचा आहे, हे होय. मी माणूस आहे आणि मला माझी सच्ची ओळख निर्माण करायची आहे, मिळवायची आहे, हा बाबासाहेबांच्या अथक संघर्षाचा महत्त्वाचा मुद्दा राहिला. त्यातूनच त्यांनी शिक्षणाचा असा काही ध्यास घेतला की, अल्पावधीत या देशातील ते सर्वाधिक उच्चशिक्षित व्यक्ती बनले. परदेशातील खडतर परिस्थितीत एकवेळ उपाशी राहून त्यांनी जी ज्ञानोपासना केली, त्याला इतिहासात तोड नाही. जो विषय अभ्यासायला घेतला तो ते संपूर्णतया आत्मसात करीत असत. त्या विषयाशी पूर्णतः तादात्म्य पावत असत. त्यामुळे बाबासाहेबांच्या शिक्षणाचा या देशातील अडाणी, निरक्षरदलित समाजमनावर अत्यंत दूरगामी परिणाम झाले. शिक्षणाचे महत्त्व त्यांच्या मनावर बिंबले. बाबासाहेबांनी केलेले हे महत्त्वाचे शैक्षणिक परिवर्तन कार्य होते.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असताना जिंकण्याची सकारात्मक ऊर्मी असणे हा सर्वात महत्त्वाचा घटक असल्याचे सांगून श्री. कांबळे म्हणाले, स्पर्धा परीक्षा किंवा कोणताही अभ्यास करीत असताना आपले पर्यावरण समजून घेणे ही अत्यंत महत्त्वाची पूर्वअट आहे. आपण आपल्या भोवतालच्या सामाजिक, राजकीय, जातीय, धार्मिक, आर्थिक आदी प्रकारच्या पर्यावरणाला गृहित धरतो किंवा त्याच्याशी संबंध नाकारतो, तिथेच मोठी चूक करतो. या पर्यावरणाचे भान आणि जाण आपल्यात विकसित झाली पाहिजे. त्यातून प्रश्न विचारण्याची ताकद निर्माण झाली पाहिजे. प्रश्न विचारणे हे व्यक्तीगत ज्ञानपिपासू वृत्तीचे आणि जागृतीचे महत्त्वाचे लक्षण आहे. गटचर्चा म्हणजे सुद्धा कोणाला संवादात हरवणे नव्हे, तर एकमेकांना समजून घेऊन एखाद्या सर्वसमावेशक निष्कर्षाप्रत येणे होय. आपल्या जगण्याला जसे प्रयोजन आवश्यक तसेच शिक्षणालाही आवश्यकच आहे. कोणत्याही अभ्यासातून अंतिमतः चौफेर व्यक्तीमत्त्व विकास होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी जिंकण्याच्या ऊर्मीनेच अभ्यास करायला हवा, असा सल्ला त्यांनी दिला.
यावेळी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला, तर सचिन कदम यांनी आभार मानले.

मरेस्तोवर मारा, खरं याच्यातला बाबासाहेब जागा करा!’
आपल्या भाषणात श्री. कांबळे यांनी बाबासाहेबांच्या शैक्षणिक साधनेचा परिणाम दर्शविणारी अनेक उदाहरणे सांगितली. त्यामध्ये त्यांच्या शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण सांगताना ते म्हणाले, मी शाळेत जायला तयार नव्हतो. पण, माझी आजी मला बदडतच शाळेत घेऊन गेली. तिथं मास्तरांसमोर मला उभा करून म्हणाली, मास्तर, याला मरेस्तोवर मारा; खरं याच्यातला बाबासाहेब जागा करा!’ ही बाबासाहेबांच्या शैक्षणिक परिवर्तनाची किमया होती. शिक्षणापासून वंचित म्हातारीमध्येही आपल्या नातवामध्ये दडलेल्या बाबासाहेबाला जागृत करण्याची तीव्र इच्छा प्रदीप्त झाली होती, हे बाबासाहेबांचे यश होते. या महामानवाच्या शाळा प्रवेशाचा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा होण्याला म्हणूनच आगळे महत्त्व आहे.

कौशल्य विकास, रोजगाराभिमुख ज्ञानरचनावादाची गरज: डॉ. विलास नांदवडेकर

डॉ. विलास नांदवडेकर

प्रशिक्षणात सहभागी शिक्षक

विद्यापीठात 'इन्फोसिस'च्या सहकार्याने फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे उद्घाटन

कोल्हापूर, दि. १० नोव्हेंबर: उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात कौशल्य विकास व रोजगाराभिमुख ज्ञानरचनावादाच्या निर्मितीची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठात इन्फोसिसच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या आठ दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे उद्घाटन आज सकाळी डॉ. नांदवडेकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. रसायनशास्त्र अधिविभागाच्या सभागृहात झालेल्याया कार्यक्रमास इन्फोसिसच्या सी.एस.आर. व डायव्हर्सिटी इनिशिएटिव्ह्ज व्यवस्थापक रिना रवी आणि ट्रेनर लीना अमृते, श्री. जोसेफ प्रमुख उपस्थित होत्या. उपक्रमात विविध महाविद्यालयांतील ४५ शिक्षक सहभागी झाले आहेत.
कुलसचिव डॉ. नांदवडेकर म्हणाले, प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांत सृजनशीलता विकास डोळ्यांसमोर ठेवून ज्ञानरचनावाद आकाराला आला. त्याच धर्तीवर उच्चशिक्षणाच्या क्षेत्रातही सृजनशीलता विकास, आऊटकम बेस्ड लर्निंग, कौशल्य विकास व उपयोजित ज्ञान देऊन हातांना काम प्रदान करणाऱ्या शिक्षणाची आणि ते देणाऱ्या शिक्षकांची गरज आहे. केंद्र सरकारने अशा प्रकारचे ३५०हून अधिक विशेष अभ्यासक्रमांची निर्मिती केली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नव्याने रुजू होणाऱ्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण देण्याची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. आजचा विद्यार्थी हा माहितीसंपन्न आहे. तथापि, त्यांच्याकडील माहितीचे ज्ञानात रुपांतर करून त्याचा पद्धतशीरपणे वापर करण्याची क्लृप्ती या शिक्षकांनी शिकविणे नव्या व्यवस्थेत अभिप्रेत आहे.
या उपक्रमाच्या आयोजनामागील हेतू अधिक स्पष्ट करून सांगताना कुलसचिव डॉ. नांदवडेकर म्हणाले, आपण निवडक शिक्षकांनी या प्रशिक्षणादरम्यान घेतलेल्या प्रशिक्षणाचा लाभ आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविला पाहिजे. संशोधनाची गरज, सृजनशीलता वृद्धी, अभिनव संकल्पना विकास व सहभाग, रोजगार व रोजगारक्षमता निर्मिती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक उत्तम नागरिक म्हणून विद्यार्थ्यांचा विकास करण्याची जबाबदारी आपणा सर्व शिक्षकांवर आहे. त्याचप्रमाणे व्यक्तीगत विकास करीत असतानाच संस्थेच्या हिताचा विचारही तितकाच महत्त्वाचा आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
उपक्रमाचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव यांनी प्रास्ताविक केले. इन्फोसिसच्या रिना रवी यांनी सुधा मूर्ती यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ट्रेन द ट्रेनर उपक्रमाचे समाजाच्या तसेच शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचे महत्त्व विषद केले. सचिन जाधव यांनी आभार मानले.

Wednesday, 8 November 2017

स्त्री जातीच्या कल्याणासाठी स्त्रियांनीही पुढे यावे: डॉ. जयसिंगराव पवार




डॉ. जयसिंगराव पवार. व्यासपीठावर डॉ. भारती पाटील.

कै. श्रीमती शारदाबाई पवार यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना डॉ. जयसिंगराव पवार. सोबत (डावीकडून) नीलांबरी जगताप, डॉ. भारती पाटील, विजयाताई पाटील, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, डॉ. अरुण भोसले,  व डॉ. विलास पवार.
कोल्हापूर, दि. नोव्हेंबर: लोकसंख्येत स्त्रियांचे प्रमाण आज बावन्न टक्क्यांहून अधिक असूनही त्यांची उपेक्षा नव्वद टक्के इतकी आहे. त्यामुळे स्त्री जातीच्या कल्याणासाठी स्त्रियांनीच पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या कै. (श्रीमती) शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासनाच्या वतीने 'कोल्हापुरातील र्तृत्ववान स्त्रिया' या विषयावर दोन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राच्या द्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बीजभाषण करताना डॉ.जयसिंगराव पवार बोलत होते. विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के होते.
डॉ. पवार म्हणाले, थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढून समाज सुधारणेचा मजबूत पाया रचला. मुली शिकल्या पाहिजेत, असे आजही समाजसुधारकांना वाटते. स्त्रियांचा इतिहास हा स्त्रियांनीच लिहिला पाहिजे. आपल्या इतिहासाची दुरुस्ती आपणच केली पाहिजे. विमलाबाई बागल यांनी कोल्हापूरमध्ये स्त्रियांचे हॉस्पिटल होण्यासाठी आमरण उपोषण केले होते. त्यामुळे स्त्रियांसाठीचे सावित्रीबाई फुले हॉस्पिटल इथे उभे राहिले. आज लोकांना त्यांच्या या कार्याचा विसर पडलेला आहे. १९६० साली विमलाबाई बागल यांना संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्यक्ष करण्यात आले होते. स्त्रिया पुरुषांपेक्षाही बुद्धिमा असतात.  कर्तबगार स्त्रिया इतिहास घडवितात. कोल्हापूरचा इतिहास स्त्रियांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा आहे. चौथ्या शिवाजी महाराजांच्या राणी आनंदीबाई यांना शिकवण्यासाठी पुण्याच्या मिचेलबाईंनी मूळच्या कोल्हापूरच्या असलेल्या रखमाबाईंच्या नावाची शिफारस केली. रखमाबाई केरुळकर कोल्हापूर राज्यातील पहिल्या नेटीव्ह एज्युकेशन ऑफिसर झाल्या.
डॉ.पवार पुढे म्हणाले, रखमाबाईंची कन्या कृष्णाबाई केरुळकरांची शिक्षण प्रक्रिया म्हणजे महाराष्ट्रातील स्त्रियांचे साधन ग्रंथ होते. शाहू महाराजांनी कृष्णाबाईंची कोल्हापूर राज्यातील पहिल्या मेडिकल ऑफिसर म्हणून नेमणूक केली. कृष्णाबाईंना पुढील शिक्षणासाठी शाहू महाराजांनी इंग्लंडला पाठविले. अशा कृष्णाबाई आपल्याला माहीतही नाहीत. कृष्णाबाईनी आत्मचरित्र लिहीले नाही. कर्तबगार स्त्रिया आत्मचरित्र लिहीत नाहीत; ते लिहीले पाहिजे. आजच्या स्त्री संशोधक पिढीने इतिहासातील वर्तमानातील विविध क्षेत्रातील कर्तबगार स्त्रियांचा मागोवा घेतल्यास तो अमूल्य ठेवा होईल.
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के म्हणाले, स्त्रियांनी सर्वच क्षेत्रात र्तृत्व सिद्ध केले आहे. क्रीडा क्षेत्रा स्त्रियांचे प्रमाण कमी होते, पण तेही चित्र आता बदलत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील सर्वच क्षेत्रातील स्त्रियांच्या कर्तृत्वाचा विचार करता त्याचे ऑडीओ- व्हिज्युअल स्वरुपातही संकलन केल्यास पुढे ते सर्वांना मार्गदर्शक ठरु शकेल. 
यावेळी डॉ.भारती पाटील यांनी स्वागत प्रास्ताविक केले, तर डॉ.निलांबरी जगताप यांनी आभार मानले. या चर्चासत्रासाठी विजयाताई पाटील, वसुधाताई पवार, दशरथ पारेकर, डॉ. विला पवार, समाजशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ.प्रकाश पवार, इतिहास अधिविभागप्रमुख डॉ.नंदा पारेकर, डॉ.अवनिश पाटील, उदय गायकवाड, सूर्यकांत गायकवाड आदी उपस्थित होते.