Showing posts with label Infosys. Show all posts
Showing posts with label Infosys. Show all posts

Friday, 10 November 2017

कौशल्य विकास, रोजगाराभिमुख ज्ञानरचनावादाची गरज: डॉ. विलास नांदवडेकर

डॉ. विलास नांदवडेकर

प्रशिक्षणात सहभागी शिक्षक

विद्यापीठात 'इन्फोसिस'च्या सहकार्याने फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे उद्घाटन

कोल्हापूर, दि. १० नोव्हेंबर: उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात कौशल्य विकास व रोजगाराभिमुख ज्ञानरचनावादाच्या निर्मितीची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठात इन्फोसिसच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या आठ दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे उद्घाटन आज सकाळी डॉ. नांदवडेकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. रसायनशास्त्र अधिविभागाच्या सभागृहात झालेल्याया कार्यक्रमास इन्फोसिसच्या सी.एस.आर. व डायव्हर्सिटी इनिशिएटिव्ह्ज व्यवस्थापक रिना रवी आणि ट्रेनर लीना अमृते, श्री. जोसेफ प्रमुख उपस्थित होत्या. उपक्रमात विविध महाविद्यालयांतील ४५ शिक्षक सहभागी झाले आहेत.
कुलसचिव डॉ. नांदवडेकर म्हणाले, प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांत सृजनशीलता विकास डोळ्यांसमोर ठेवून ज्ञानरचनावाद आकाराला आला. त्याच धर्तीवर उच्चशिक्षणाच्या क्षेत्रातही सृजनशीलता विकास, आऊटकम बेस्ड लर्निंग, कौशल्य विकास व उपयोजित ज्ञान देऊन हातांना काम प्रदान करणाऱ्या शिक्षणाची आणि ते देणाऱ्या शिक्षकांची गरज आहे. केंद्र सरकारने अशा प्रकारचे ३५०हून अधिक विशेष अभ्यासक्रमांची निर्मिती केली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नव्याने रुजू होणाऱ्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण देण्याची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. आजचा विद्यार्थी हा माहितीसंपन्न आहे. तथापि, त्यांच्याकडील माहितीचे ज्ञानात रुपांतर करून त्याचा पद्धतशीरपणे वापर करण्याची क्लृप्ती या शिक्षकांनी शिकविणे नव्या व्यवस्थेत अभिप्रेत आहे.
या उपक्रमाच्या आयोजनामागील हेतू अधिक स्पष्ट करून सांगताना कुलसचिव डॉ. नांदवडेकर म्हणाले, आपण निवडक शिक्षकांनी या प्रशिक्षणादरम्यान घेतलेल्या प्रशिक्षणाचा लाभ आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविला पाहिजे. संशोधनाची गरज, सृजनशीलता वृद्धी, अभिनव संकल्पना विकास व सहभाग, रोजगार व रोजगारक्षमता निर्मिती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक उत्तम नागरिक म्हणून विद्यार्थ्यांचा विकास करण्याची जबाबदारी आपणा सर्व शिक्षकांवर आहे. त्याचप्रमाणे व्यक्तीगत विकास करीत असतानाच संस्थेच्या हिताचा विचारही तितकाच महत्त्वाचा आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
उपक्रमाचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव यांनी प्रास्ताविक केले. इन्फोसिसच्या रिना रवी यांनी सुधा मूर्ती यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ट्रेन द ट्रेनर उपक्रमाचे समाजाच्या तसेच शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचे महत्त्व विषद केले. सचिन जाधव यांनी आभार मानले.

Sunday, 21 August 2016

'इन्फोसिस'मध्ये प्रशिक्षणासाठी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ५० शिक्षक रवाना




विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी
'इन्फोसिस'मधील प्रशिक्षणाचा वापर करावा
- कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचे आवाहन

कोल्हापूर, दि. २१ ऑगस्ट: माहिती तंत्रज्ञानाच्या बाबतीत केवळ देशातच नव्हे, तर जगातील अग्रगण्य अशा इन्फोसिस या कंपनीमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षकांना प्रशिक्षणाची संधी मिळणे ही अत्यंत प्रतिष्ठेची बाब आहे. या संधीचे संबंधित शिक्षकांनी सोने करावे आणि आपण मिळविलेल्या ज्ञानाचा लाभ आपल्या विद्यार्थ्यांना मिळवून द्यावा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी काल सायंकाळी येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचे कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र आणि इन्फोसिस कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ ते ३० ऑगस्ट या कालावधीत म्हैसूर येथे 'ट्रेनर्स ट्रेनिंग' कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेसाठी विद्यापीठातील तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमधील कौशल्य व उद्योजकता केंद्राचे ५० समन्वयक शिक्षक काल रात्री रवाना झाले. तत्पूर्वी, कुलगुरू डॉ. शिंदे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची त्यांनी सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी त्यांना शुभेच्छा देताना कुलगुरू बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, इन्फोसिससारख्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीसमवेत शिवाजी विद्यापीठाने केलेल्या सामंजस्य कराराअंतर्गत विद्यापीठातील निवडक शिक्षकांना थेट कंपनीच्या कार्यस्थळावर प्रशिक्षण देण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार प्रथम संधी मिळालेल्या या ५० जणांच्या चमूने त्या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा. इन्फोसिसमध्ये शिवाजी विद्यापीठाचा लौकिक वृद्धिंगत करण्याबरोबरच तेथे प्राप्त केलेल्या ज्ञानाचा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील अन्य शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी योग्य उपयोजन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.


म्हैसूर येथे आयोजित या नऊ दिवसीय ट्रेनर्स ट्रेनिंगमध्ये विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांत माहिती तंत्रज्ञानविषयक (आयसीटी) कौशल्य विकास करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले जाणार आहे. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी रवाना होत असलेल्यांमध्ये ३९ शिक्षक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांमधील असून दहा जण व्यावसायिक महाविद्यालयांमधील आहेत. प्रशिक्षणार्थींमध्ये सहा महिलांचाही सहभाग आहे. सहभागी प्रशिक्षणार्थी शिक्षक परतल्यानंतर संबंधित महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये प्रदान केली जाणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव यांनी यावेळी दिली.
यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, इंटरनेट सेलचे प्रमुख डॉ. मिलींद जोशी, महाराष्ट्र शासनाच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे सहाय्यक संचालक सचिव जाधव यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.