Thursday, 20 December 2018

औषधी वनस्पतींच्या लागवडीतून

शेतकऱ्यांना आर्थिक विकासाची संधी

- डॉ. एस.एस. बर्वे यांचे प्रतिपादन

शिवाजी विद्यापीठात आयोजित औषधी व सुगंधी वनस्पतीविषयक शेतकरी प्रशिक्षणाचे उद्घाटन करताना डॉ. एस.एस. बर्वे. सोबत (डावीकडून) डॉ. डी.के. गायकवाड, डॉ. अकल्पिता अरविंदेकर, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.

शिवाजी विद्यापीठात आयोजित शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. एस.एस. बर्वे.

शिवाजी विद्यापीठात आयोजित शेतकरी प्रशिक्षणाच्या निमित्ताने औषधी व सुगंधी वनस्पतींच्या प्रदर्शनाची पाहणी करताना डॉ. एस.एस. बर्वे यांच्यासह डॉ. अकल्पिता अरविंदेकर, डॉ. डी.के. गायकवाड व डॉ. मानसिंगराज निंबाळकर.


कोल्हापूर, दि. २० डिसेंबर: भारतातील शेतकऱ्यांना औषधी व सुगंधी वनस्पतींची लागवड करण्याची मोठी संधी उपलब्ध असून त्याद्वारे त्यांनी आर्थिक विकास साधण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुलुंड (मुंबई) येथील सायंटिफिक रिसर्च सेंटरचे उपसंचालक डॉ. एस.एस. बर्वे यांनी आज येथे व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाचा वनस्पतीशास्त्र अधिविभाग, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, आत्माचे प्रकल्प संचालक यांच्या संयुक्त विद्यमाने औषधी व सुगंधी वनस्पती संवर्धन व प्रक्रिया या विषयावर एकदिवसीय जिल्हांतर्गत शेतकरी प्रशिक्षण आज झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक डी.डी. तांबाळे प्रमुख उपस्थित होते तर प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के अध्यक्षस्थानी होते. विद्यापीठाच्या नीलांबरी सभागृहात हा कार्यक्रम झाला.
डॉ. बर्वे म्हणाले, औषधी व सुगंधी वनस्पतींच्या क्षेत्रात शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या संधी आहेत. जगभरातील औषध, सुगंधी द्रव्य आणि सौंदर्यप्रसाधने निर्माण करणाऱ्या उद्योगांना त्यांची मोठ्या प्रमाणात गरज भासत असते. नैसर्गिक साधनसंपत्तीने भारत अतिशय समृद्ध आहे, तथापि, जागतिक स्तरावर या क्षेत्रातील भारताचा वाटा हा अवघा एक टक्का इतका अत्यल्प आहे. तो आणखी किमान दोन टक्क्यांनी तर आपण सहजरित्या वाढवू शकतो. केवळ पश्चिम घाटावर लक्ष केंद्रित केले तरी बराच पल्ला गाठता येऊ शकतो. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना औषधी व सुगंधी लागवडीची मोठी संधी आहे. केवळ जिरॅनियमच्या लागवडीमधूनही एकरी एक लाख रुपयांपर्यंतचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो, इतकी त्याची मागणी आहे.
औषधी व सुगंधी वनस्पतींच्या लागवडीचे फायदे सांगताना डॉ. बर्वे म्हणाले, या वनस्पतींना सहजासहजी कोणत्याही प्रकारची कीड लागत नाही. त्यांना जनावरे तोंड लावत नाहीत किंवा त्यांचा भाजी म्हणूनही वापर होत नाही. त्यामुळे ज्या हेतूसाठी त्या लावल्या जातात, त्यासाठीच वापरल्या जात असल्याने त्यातून होणारा फायदा मोठा असतो. तसेच, या क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्या अगर संस्था शेतकऱ्यांना त्याचे प्रक्रिया तंत्रज्ञान मोफत देऊ करतात आणि तयार माल व तेलखरेदीची हमी असते. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतीमाल खपविण्यासाठीची अतिरिक्त यातायात करावी लागत नाही.
डॉ. डी.टी. शिर्के
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने आपल्या संशोधनाचा लाभ व्यापक समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न चालविले आहेत. प्रयोगशाळेकडून शेतीकडे या धोरणाच्या अंगिकारातून विद्यापीठाने शेतकरी वर्गाला जोडण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. औषधी व सुगंधी वनस्पतींच्या संदर्भातही विद्यापीठाने शेतकऱ्यांना सर्वोतोपरी सहाय्य करण्याचे ठरविले असून जे शेतकरी अशा वनस्पतींची लागवड करतील, त्यांच्या वनस्पतींपासून तेल निर्मिती करण्यासाठीचा प्रायोगिक प्रकल्पही विद्यापीठाने उभारण्याचे ठरविले आहे. त्याचा शेतकऱ्यांना निश्चितपणे लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी वनस्पतीशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. डी.के. गायकवाड, डॉ. अकल्पिता अरविंदेकर यांच्यासह वनस्पतीशास्त्र अधिविभागातील शिक्षक, शासकीय अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. मानसिंगराज निंबाळकर यांनी या उपक्रमाचे आयोजन केले.


Saturday, 15 December 2018

संस्कृतीचा अभ्यास करणे हे युवकांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी गरजेचे - पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख



कोल्हापूर, दि.15 डिसेंबर - देशातील विविध प्रांतातील संस्कृतीचा एकत्रितपणे अभ्यास करणे हे युवकांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन कोल्हापूरचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी आज येथे केले.

राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय कार्यालय, युवा आणि खेल मंत्रालय, भारत सरकार शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दि.15 ते 21 डिसेंबर या कालावधीमध्ये संपन्न होणाऱ्या 'राष्ट्रीय एकात्मता शिबीर - 2018' च्या उद्धाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.  वि.स.खांडेकर भाषा भवन सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे होते.  यावेळी राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय कार्यालय, पुणे येथील विभागीय संचालक डी.कार्तिकेयन, प्र-कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के, प्रभारी कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे, शैक्षणिक सल्लागार डॉ.डी.आर.मोरे, वित्त लेखाधिकारी व्ही.टी.पाटील, रा.से.यो.चे संचालक डॉ.डी.के.गायकवाड, आर.सईदानायक, अजय शिंदे यांची उपस्थिती होती.
     
 पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख पुढे बोलताना म्हणाले, भारत सरकारच्या रा.से.यो.चे उपक्रम नेहमीच उल्लेखनीय असतात.विविध उपक्रमांमधून देशातील युवकांसाठी शिस्तीचे, नियमांचे जबाबदारीचे पालन करण्यासाठीचे मौलीक शिकवण दिले जाते.यामुळे या विद्यार्थ्यांनी देशामध्ये एक विशिष्ट स्थान प्राप्त केलेले आहे.  देशातील महाराष्ट्रातील सांस्कृतिक ठेवा जपणारे कोल्हापूर हे फार मोठे एेतिहासिक शहर आहे.लोकांमध्ये मिसळून विविध ठिकाणची संस्कृती अभ्यासण्याची संधी या मध्यामातून देशातील युवकांना प्राप्त होते.देशातील बोलीभाषा मौलोगणीक बदलत जाते, तरीही आपली संस्कृती एकजूट, अखंड ठेवण्यामध्ये लोकशाहीचे फार मोठे योगदान आहे.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय कार्यालय, पुणे येथील विभागीय संचालक डी.कार्तिकेयन आपल्या मनोगतामध्ये म्हणाले, रा.से.यो.च्या माध्यमातून देशपातळीवर युवा शक्तीला संघटीतपणे मार्गदर्शन करण्याचे कार्य केले जाते.या शिबिरांमधून युवकांच्या अंगभूत कला गुणांना वाव मिळतो. भारत सरकारची रा.से.यो.ही देशपातळीवरील फार मोठे कुटुंब आहे.आज, या कुटुंबामध्ये चाळीस लाखांहून अधिक युवाशक्तीचे मूठ बांधण्याचे कार्य झालेले आहे.
अध्यक्षीय मनोगतामध्ये बोलताना कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे म्हणाले, भारता देश हे विशाल सांस्कृतिक ठेवा जपणारे केंद्र आहे.  राष्टृीय एकतेमुळेच आपली एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे.  भारतासारख्या विशाल राष्टृाची अखंडता टिकवून ठेवण्याची मोठी जबाबदारी युवकांवर आहे.धार्मिक, सांस्कृृतिक विचारधारा भिन्न असूनही आपणांस एकसंध राहण्यासाठी रा.से.यो.चे विविध उपक्रम बळकटी प्राप्त करून देतात.
विद्यापीठामध्ये निघालेल्या राष्ट्रीय एकात्मता फेरी मधून देशातील विविध भागांच्या संस्कृतीचे दर्शन घडले. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात, तामिळनाडू, पदुच्चेरी, केरळ, राजस्थान, आसाम, गोवा आदी राज्यातील विद्यापीठांचे संघ, शिबिरार्थी, संघव्यवस्थापक यांचेसह कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे, पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, विभागीय संचालक डी.कार्तिकेयन, प्र-कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के, प्रभारी कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे, शैक्षणिक सल्लागार डॉ.डी.आर.मोरे, वित्त लेखाधिकारी व्ही.टी.पाटील, रा.से.यो.चे संचालक डॉ.डी.के.गायकवाड, आर.सईदानायक, अजय शिंदे सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला डॉ.चांगदेव बंडगर प्रविण साळोखे लिखित राष्ट्रीय सेवा योजना-संकल्पना युवक विकास या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 
तद्नंतर, राष्ट्रीय एकात्मता शिबीरासाठी तयार करण्यात आलेल्या डायरीचे प्रकाशन झाले.
रा.से.यो.चे संचालक डॉ.डी.के.गायकवाड यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला, समन्वयक डॉ.डी.जी.चिघळीकर यांनी आभार मानले.  यावेळी विविध राज्यातील रा.से.यो.विद्यार्थी, संघ व्यवस्थापक मोठया संख्येने उपस्थित होते.
-----

Wednesday, 12 December 2018

स्त्रियांच्या चित्रणामध्ये माध्यमांची भूमिका महत्वाची - ज्येष्ठ पत्रकार संध्या नरे पवार



 कोल्हापूर, दि.12 डिसेंबर - देशपातळीवरील विविध माध्यमांमधून स्त्रियांचे जे चित्रण होत असते त्यामध्ये माध्यमे ही महत्वाची भूमिका पार पाडत असतात, असे प्रतिपादन मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार संध्या नरे पवार यांनी आज येथे केले.
            शिवाजी विद्यापीठाच्या कै.श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन केंद्राच्यावतीने 'माध्यमे स्त्रिया' या विषयावर आयोजित एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्धाटन प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार संध्या नरे पवार बोलत होत्या.मानव्यशास्त्र इमारतीच्या सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.निशा मुडे पवार होत्या.यावेळी डॉ.सुनिता डी. शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती.
            ज्येष्ठ पत्रकार पवार पुढे म्हणाल्या, सामाजीकरणाच्या प्रक्रीयेत माध्यमांचे प्रभाव अधिक आहे.आपल्या जगणाच्या आणि मनोरंजनाच्या प्रक्रीया ठरविण्यामध्ये माध्यमांचा मोठा वाटा आहे.विविध घटक लिंगभावातील असमानतेचा नकळतपणे अथवा जाणीवपूर्वक वापर करीत असतात.त्यामुळे माध्यमे ही काही वेळेस स्त्री-पुरूषांमधील असमानतेचे बळकटीकरण करतात.माध्यमे ही पितृसत्तेची भूमिका कधी जाणीवपूर्वक तर कधी नकळतपणे पार पाडीत असतात.स्त्रीवाद आणि माध्यमे यामध्ये कायम द्वंद्व पहायला मिळते.कोल्हापूर अथवा मुंबईमधील कष्टकरी कामगार स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराविषयी माध्यमांना आस्था असतेच, असे नाही.परंतु, अशा प्रकारचा अन्याय जर हॉलीवूड किंवा बॉलीवूडमध्ये होत असेल तर माध्यमे त्याची लगेच दखल घेतात, कारण त्याचे बातमी मूल्य मिळते.माध्यमे संस्कृतीचे भडक प्रकटीकरण करताना पुरूष सत्तावादी विचारांवर अधारलेली असतात.तसेच, भाषेचे राजकारणही माध्यमांच्या माध्यमातून होत असते.स्त्रीच्या जगण्याचा, कर्तुत्वाचा उल्लेख बातमीत असला तरी मुख्य चौकट पुरूष प्रधान संस्कृतीची असते.आजही, महिला पत्रकार मुख्य धारेतील माध्यमांमध्ये उपसंस्कृतीचा भाग बनत आहेत.अशा वेळी समाजातील वंचित घटक परिघाबाहेरच राहतात.प्राथमिक पातळीवरच जगणाऱ्या समुहांच्याकडे दुर्लक्ष होते.कष्टकरी, शेतीकरी स्त्रियांच्या रोजगाराचे अधिकाधिक अवमूल्यन होत आहेे.जो पर्यंत माध्यमांमधील मुख्य बातम्यांमध्ये स्त्रियांना स्थान मिळत नाही तो पर्यंत समान पातळीवर स्त्रिया आलेत, असे वाटणार नाही.
अध्यक्षस्थानावरून बोलताना वृत्तपत्र संवादशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ.निशा मुडे पवार म्हणाल्या, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर माध्यमे स्त्रिया हा विषय फार महत्वाचा राहिलेला आहे.उत्तर प्रदेशमध्ये स्त्रिया स्वत:चे वर्तमानपत्र आणि रेडिओ चॅनेल चालवत आहेत.ही पर्यायी व्यवस्था का निर्माण झाली यावर विचार करण्याची आवश्यकता आहे.महिलांचे रोजगार, त्यांचे प्रश्न, निर्णय प्रक्रीयेतील त्यांचा सहभाग यावर माध्यमांमध्ये विस्तृत चर्चा होणे गरजेचे आहे.
अध्यासन केंद्राचे समन्वयक अधिष्ठाता डॉ.भारती पाटील यांनी प्रास्ताविक परिचय करून दिला.शितल पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ.कविता वड्राळे यांनी आभार मानले.यावेळी दशरथ पारेकर, वसंत भोसले, डॉ.मेघा पानसरे, डॉ.वाळवेकर, डॉ.राजन गवस, डॉ.प्रकाश पवार यांचेसह विविध विभागातील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.
------