Wednesday, 20 November 2019

१७ वी अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुलगुरू चषक टी-२० क्रिकेट स्पर्धा (साखळी फेरी: दिवस दुसरा):

शिवाजी विद्यापीठाचा ‘जम्मू’वर तब्बल ९२ धावांनी विजय

शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या अखिल भारतीय कुलगुरू चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत जम्मू केंद्रीय विद्यापीठाविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना मोठा फटका लगावण्याच्या पवित्र्यात शिवाजी विद्यापीठाचे खेळाडू राजेश कोळी. (छाया.: आशिष घाटे)

शिवाजी विद्यापीठाचे सामनावीर राजेश कोळी

कुलगुरू चषक क्रिकेट स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी क्रीडारसिकांची शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर मोठी गर्दी होऊ लागली आहे.



कोल्हापूर, दि. २० नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठाचे स्टार क्रिकेटपटू व कप्तान सागर पवार आणि राजेश कोळी यांच्या दमदार ९४ धावांच्या सलामी भागीदारीच्या जोरावर शिवाजी विद्यापीठाच्या संघाने जम्मू केंद्रीय विद्यापीठ संघावर तब्बल ९२ धावांनी विजय मिळविला. अन्य सामन्यांत जामिया मिलिया, जम्मू, रोहटक आदी संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविले.
सकाळच्या सत्रात नाणेपेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या शिवाजी विद्यापीठ संघाचे कप्तान सागर पवार आणि राजेश कोळी यांनी दमदार सलामी दिली. सागर पवार ५२ धावांवर बाद झाले. राजेश कोळी ५२ धावांवर नाबाद राहिले. त्यांच्या भागीदारीमुळे शिवाजी विद्यापीठाने २० षटकांत ४ बाद १५५ अशी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना जम्मू विद्यापीठाचा संघ १६.४ षटकांत अवघ्या ६३ धावांत गारद झाला. फलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावल्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या गोलंदाजांनीही पाहुण्या संघाला जखडून ठेवण्यात यश मिळविले. विश्वनाथ वरुटे याने ४ तर योगेश दळवी आणि रमेश ढोणुक्षे यांनी प्रत्येकी २ बळी मिळविले. विजयात महत्त्वाचा वाटा उचलणारे राजेश कोळी सामनावीर ठरले.
दुपारच्या सत्रातला सर्वाधिक चर्चेचा सामना जम्मू विद्यापीठ, जम्मू आणि अजमेरच्या महर्षी दयानंद सरस्वती विद्यापीठ यांच्यातला ठरला. जम्मू विद्यापीठाच्या दीपक कुमार याने धडाकेबाज फलंदाजीचे दर्शन घडविताना १०२ धावांची शतकी खेळी केली. या जोरावर जम्मू संघाने अजमेरसमोर ३ गड्यांच्या मोबदल्यात तब्बल २२८ धावांचे मोठे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरादाखल अजमेर संघाला २० षटकांत ९ बाद ८६ धावाच करता आल्या. जम्मूच्या विजयात मोलाचा वाटा उचलणारा दीपक कुमार सामनावीर ठरला.
दुपारी पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाला नवी दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाकडून पराभव स्वीकारावा लागला. पुणे विद्यापीठाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १९.५ षटकांत सर्व बाद ११२ धावा केल्या. जामिया मिलियाच्या संघाने हे आव्हान १६ षटकांत अवघ्या ३ गड्यांच्या मोबदल्यात पार केले आणि ७ गडी राखून सामना जिंकला. १५ धावांत ३ बळी मिळविणारा व १४ धावा करणारा जामिया मिलियाचा मोहम्मद अखलाख सामनावीर ठरला.
राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाला सिमल्याच्या हिमाचल प्रदेश विद्यापीठाकडून ४ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. राहुरीच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना जालंदर धनवटेच्या ६९ धावांच्या खेळीच्या जोरावर १८.१ षटकांत सर्व बाद १२८ धावांचे आव्हान सिमल्याच्या संघासमोर ठेवले. हे आव्हान सिमला विद्यापीठाने १९ षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात पार केले. ४ बळी घेऊन विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या सिमल्याच्या धरम प्रकाशला सामनावीर घोषित करण्यात आले.
तत्पूर्वी, सकाळच्या सत्रातील दुसऱ्या सामन्यात रोहटकच्या महर्षी दयानंद विद्यापीठाने चंदीगढच्या पंजाब विद्यापीठाचा ८ गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना चंदीगढच्या संघाने २० षटकांत ६ बळींच्या मोबदल्यात १४९ धावा केल्या. हे आव्हान सामनावीर नरेंद्र कुमारच्या नाबाद ९२ धावांच्या खेळीच्या बळावर रोहटक विद्यापीठाच्या संघाने १९ षटकांत अवघ्या २ बळींत पार केले.
सकाळचा तिसरा सामना दीन दयाल उपाध्याय गोरखपूर विद्यापीठ, गोरखपूर वि. लाला लजपतराय पशुविज्ञान विद्यापीठ, हिस्सार यांच्यात झाला. गोरखपूरने प्रथम फलंदाजी करताना १७ षटकांत सर्व बाद ७४ धावा केल्या. हिस्सार संघाने एकही गडी न गमावता हा अवघ्या ५.५ षटकांत अगदी लीलया एकतर्फी जिंकला. हिस्सार संघाकडून गोलंदाजी करताना गोरखपूरच्या ५ खेळाडूंना १५ धावांत पॅव्हेलियनचा रस्ता दाखविणारा विकास खरब सामनावीर ठरला.

उद्याचे सामने:
सकाळचे सत्र (सकाळी ८.३० वा.)
१)      महर्षी दयानंद सरस्वती विद्यापीठ, अजमेर वि. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला 
२)      मुंबई विद्यापीठ, मुंबई वि. पंजाबी विद्यापीठ, पतियाळा 
३)      शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर वि. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

दुपारचे सत्र (दु. १ वा.)
४)      शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठ, जम्मू वि. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
५)      हिमाचल प्रदेश विद्यापीठ, सिमला वि. महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहटक

६)      महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी वि. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर 

कोल्हापुरी चप्पल विक्रेत्यांच्या कौशल्य विकासासाठी

विद्यापीठाचे कौशल्य प्रदाते चप्पल लाईनमध्ये!

विक्रेत्यांमध्ये कालसुसंगत विपणन बदलांसाठी विद्यापीठ प्रतिबद्ध: कुलसचिव डॉ. नांदवडेकर



शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रातर्फे चप्पल लाईन येथे आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर. शेजारी भूपाल शेट्ये, अरुण सातपुते व प्रशिक्षक.

शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रातर्फे चप्पल लाईन येथे आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी उपस्थित मान्यवरांना अवगत करताना केंद्राचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव.

कोल्हापूर, दि. २० नोव्हेंबर: कोल्हापूरचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आणि वैभव असणाऱ्या कोल्हापुरी चप्पलचे निर्माते आणि विशेषतः विक्रेते यांना बाजारामधील नवप्रवाहांची जाणीव करून देणे आणि त्यांच्या विपणन पद्धतीमध्ये कालसुसंगत बदल घडवून आणण्यासाठी शिवाजी विद्यापीठ प्रतिबद्ध आहे. त्या दृष्टीनेच विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राच्या माध्यमातून थेट कोल्हापूरच्या चप्पल लाईनमध्येच एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. एका अर्थाने या चप्पल विक्रेत्यांच्या कौशल्य विकासासाठी विद्यापीठ आपल्या दारी आले आहे, अशी भावना कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आज येथे व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने आणि कोल्हापुरी चप्पल क्लस्टरच्या सहकार्याने चप्पल लाईन येथे आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय ऑन-फिल्ड प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आज सकाळी ते बोलत होते.
यावेळी केंद्राचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव यांनी सांगितले की, केंद्राच्या दहा प्रशिक्षित प्रशिक्षकांच्या मार्फत चप्पल लाईन येथील व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायाला पूरक अशा बाबींचे प्रशिक्षण देण्याबरोबरच सध्या बाजारातील विविध प्रवाहांची माहिती देऊन त्यासाठी आवश्यक बाबींविषयी त्यांना अवगत करणे असा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे. यामध्ये विविध विपणन कौशल्यांबरोबरच प्रदर्शन कौशल्य, जाहिरात कौशल्य, प्रसिद्धी कौशल्य, ग्राहक सुसंवाद कौशल्य, विक्री मूल्य निर्धारण कौशल्य, साठा कौशल्य, ब्रँडिंग व पॅकिंग कौशल्य, वर्तन कौशल्य, स्थानिक व बाह्य ग्राहकांशी संवाद कौशल्य आदी अनेक बाबींचे प्रशिक्षण चप्पल लाइनमधील व्यावसायिकांना देण्यात येणार आहे.
या प्रसंगी कोल्हापूर क्लस्टरचे भूपाल शेट्ये म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने कोल्हापुरी चप्पल व्यावसायिकांसाठी सातत्याने सकारात्मक भूमिका घेऊन काम चालविले आहे. त्याचा परिणाम म्हणून चप्पल निर्माते आणि व्यावसायिकांमध्येही एक प्रकारची जागृती होऊ लागली आहे. जागतिक प्रवाहांचा वेध घेत त्यामध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी विद्यापीठ चप्पल व्यावसायिकांना करीत असलेली मदत स्वागतार्ह आहे. त्या दृष्टीने आजचे चप्पल लाईनमधील प्रशिक्षण हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी महेश चव्हाण यांनी आभार मानले. डॉ. केदार मारुलकर, क्लस्टरचे अध्यक्ष अरुण सातपुते यांच्यासह सर्व प्रशिक्षक उपस्थित होते.
दरम्यान, आज दिवसभरात डॉ. गुरव, डॉ. मारुलकर, श्री. चव्हाण यांच्यासह डॉ. व्ही.एस. खंडागळे, डॉ. गजानन राशिनकर, डॉ. के.बी. पाटील, डॉ. पी.एम. देवळी, शिवप्रसाद शेटे, प्रियांका नायक-तिवरे आणि श्री. लिटॉन या प्रशिक्षकांनी कोल्हापुरी चप्पल विक्रेत्यांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले.

Tuesday, 19 November 2019

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुलगुरू चषक टी-२० क्रिकेट स्पर्धा: पहिला दिवस:

जामिया मिलिया, जम्मू, पुणे विद्यापीठांची विजयी सलामी




कोल्हापूर, दि.१९ नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठात आजपासून अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुलगुरू चषक स्पर्धेला सुरवात झाली. आज पहिल्या दिवशी झालेल्या बाद फेरीच्या सामन्यांत नवी दिल्लीचे जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, जम्मू विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहटक, पंजाब विद्यापीठ, चंदीगढ आणि दीनदयाल उपाध्याय विद्यापीठ, गोरखपूर या विद्यापीठांच्या संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविले.
आज दिवसभरातला सर्वाधिक प्रेक्षणीय सामना नवी दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ आणि पंजाब कृषी विद्यापीठ, लुधियाना यांच्यात झाला. काल उद्घाटनाच्या सत्रात झालेल्या प्रदर्शनीय सामन्यात तुफान फटकेबाजी करणाऱ्या जामिया मिलियाच्या संघाने आज पंजाब कृषी विद्यापीठ, लुधियाना संघाविरुद्ध खेळताना २० षटकांत ५ बाद २३२ धावांचा डोंगर रचला. त्यानंतर लुधियानाच्या संघाला सर्व बाद १३६ धावांत गुंडाळले. मात्र त्यामध्ये जामिया मिलियाच्या गोलंदाजांनी दिलेल्या ४८ अवांतर धावांचा समावेश होता. जामिया मिलियाच्या संघाच्या वाहीद मोहम्मदने स्पर्धेतील सर्वाधिक गतीमान अर्शतक आज नोंदविले. त्याने अवघ्या १६ चेंडूंत ६० धावा केल्या. तोच सामनावीर ठरला. त्याला आदिल अहमद आणि अखलाख मोहम्मह यांनी प्रत्येकी ५८ धावा करून उत्तम साथ दिली. या धावांमुळे लुधियाना संघावर त्यांनी ९६ धावांनी मात केली.
दुपारच्या सत्रातील अन्य सामन्यांमध्ये जम्मू विद्यापीठाने मुंबई विद्यापीठावर ४ गडी राखून मात केली. मुंबई विद्यापीठाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ गडी बाद १२४ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल जम्मू विद्यापीठाने ६ गड्यांच्या मोबदल्यात १८.३ षटकांत हे आव्हान गाठले. जम्मूच्या दीपक कुमारने ५८ धावा केल्या. या संघाकडून नाबाद ४३ धावा करणारा व २ बळी घेणारा राजेश मल्होत्रा सामनावीर ठरला.
याच सत्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यातील सामना पुणे विद्यापीठाने ३७ धावांनी जिंकला. पुणे विद्यापीठाचा संघ प्रथम फलंदाजी करताना जळगावच्या शशिकांत शिरसाटच्या हॅटट्रीकमुळे १५.५ षटकांत ८५ धावांवर आटोपला. तेव्हा हा सामना जळगावच्या बाजूने झुकला होता. तथापि, पुणे विद्यापीठाच्या सचिन सुर्वे विनोद नरके मोनिष गायकवाड या गोलंदाजांनी अनुक्रमे २६-३, ६-२ आणि १२-२ असे बळी घेतल्यामुळे जळगावचा संघ अवघ्या ४८ धावांतच तंबूत परतला. पुणे संघाकडून सर्वाधिक २२ धावा काढणारा दिनेश वाल्मिकी सामनावीर ठरला.
तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात रोहटकच्या महर्षी दयानंद विद्यापीठाने राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठावर ६९ धावांनी विजय मिळविला. रोहटक संघाच्या ११८ धावांचा पाठलाग करताना राहुरीचा संघ अवघ्या ४९ धावांत गारद झाला. या सामन्यात ११ धावांसह ३ धावांत ५ बळी घेणारा रोहटकचा नरेंद्र कुमार सामनावीर ठरला.
चंदीगढच्या पंजाब विद्यापीठाने नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचा ७ गडी राखून पराभव केला. नागपूरचे १०६ धावांचे आव्हान पंजाब विद्यापीठाने १४.४ षटकांत पूर्ण करताना ११० धावा केल्या. पंजाब विद्यापीठाच्या सूर्यकांत यांनी २.३ षटकांत १४ धावा देत ४ बळी घेताना स्पर्धेतील पहिली हॅटट्रीक नोंदविली, हे या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. सूर्यकांतच सामनावीर ठरला.
गोरखपूरच्या दीनदयाळ उपाध्याय विद्यापीठाने जम्मू केंद्रीय विद्यापीठावर ४ गडी राखून मात केली. अखेरच्या चेंडूपर्यंत अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या या सामन्यात जम्मू विद्यापीठाच्या १४७ धावांचे आव्हान गोरखपूर संघाने ६ गड्यांच्या मोबदल्यात पार केले. गोरखपूरकडून ३६ धावा करून विजयात महत्त्वाची कामगिरी बजावणारा सुरेंद्र यादव सामनावीर ठरला.

उद्याचे सामने:
सकाळचे सत्र (सकाळी ८.३० वा.)
१)      पंजाब विद्यापीठ, चंदिगढ वि. महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहटक
२)      शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर वि. केंद्रीय विद्यापीठ, जम्मू
३)      दीन दयाल उपाध्याय गोरखपूर विद्यापीठ, गोरखपूर वि. लाला लजपतराय पशुविज्ञान विद्यापीठ, हिस्सार
दुपारचे सत्र (दुपारी १ वा.)
१)      जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठ, दिल्ली वि. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
२)      जम्मू विद्यापीठ, जम्मू वि. महर्षी दयानंद सरस्वती विद्यापीठ, अजमेर
३)      हिमाचल प्रदेश विद्यापीठ, सिमला वि. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी


Monday, 18 November 2019

तणाव मुक्त जीवनशैलीसाठी क्रीडा कौशल्यांना प्रोत्साहन आवश्यक - माजी कुलगुरू डॉ.मधुकरराव गायकवाड

कोल्हापूर, दि.18 नोव्हेंबर - प्रशासकीय पातळीवरील कर्मचाऱ्यांचा कार्यालयीन कामकाजांमधील ताण कमी करण्यासाठी, बौध्दिक चालना मिळण्यासाठी तणाव मुक्त जीवन जगण्यासाठी क्रीडा कौशल्यांना प्रोत्साहन देणे हे अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील माजी कुलगुरू डॉ.मधुकरराव गायकवाड यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडामहर्षी मेघनाथ नोगेशकर क्रीडा संकुल येथे आयोजित केलेल्या 17 व्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कर्मचारी 'कुलगुरू चषक' टी-20 क्रिकेट स्पर्धा-2019 या स्पर्धेच्या उद्धाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी कुलगुरू डॉ. गायकवाड बोलत होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे अध्यक्षस्थानी होते.यावेळी प्र-कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के, कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर, वित्त लेखाधिकारी व्ही.टी.पाटील, अधिष्ठाता डॉ.पी.डी.राऊत, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ.डी.के.गायकवाड, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.प्रकाश कुंभार, डॉ.कोरबू यांची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी भारतीय दिव्यांग संघातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू कमलाकर कराळे यांची विशेष उपस्थिती होती.
माजी कुलगुरू डॉ.मधुकरराव गायकवाड पुढे म्हणाले, साहित्या प्रमाणेच क्रीडा ही एक उत्कृष्ट कला आहे.खेळाडू कर्मचाऱ्यांमधील सांघीक भावना, सहकार्य, समन्वय जागृत करण्यासाठी या स्पर्धा महत्वाच्या ठरतात. शिवाजी विद्यापीठाने यंदा देश पातळीवरील विद्यापीठातील कर्मचाऱ्यांसाठी टी-20 क्रिकेट स्पर्धेचे केलेेले आयोजन हे अत्यंत अभिनव आहे.
अध्यक्षीय मनोगतामध्ये कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे म्हणाले, कर्मचाऱ्यांनी क्रीडा कौशल्ये आत्मसात केल्यास आनंदी, आरोग्यमय आणि उत्साही जीवन जगता येते.या अखिल भारतीय स्पर्धा म्हणजे भाषा आणि सांस्कृतिचे आदान-प्रदान करणारे जणू केंद्रच बनलेले आहेत.प्रत्येक कर्मचाऱ्याने खिळाडूवृत्ती आणि सांंघिक भावनांचा जोपासल्यास कार्यालयीन कामकाजांमध्ये गतीमानता प्राप्त होते.
विद्यापीठ क्रीडा विभागाचे प्र.संचालक डॉ.पी.टी.गायकवाड यांनी स्वागत प्रास्ताविक केले.राज्य देशभरातून विद्यापीठीय क्रिकेट खेळाडूंचे 20 संघ दाखल झालेले आहेत.  अध्यक्षीय संघ जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, नवी दिल्ली यांच्यामध्ये प्रदर्शनीय सामना खेळविण्यात आला. यावेळी प्रशासकीय कर्मचारी, अधिकारी, खेळाडू मोठया संख्येने उपस्थित होते.
----

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कर्मचारी 'कुलगुरू चषक' टी-20 क्रिकेट स्पर्धा-2019

                   उद्याचे सामने -   (सकाळ सत्र)
सी 1 वि सी 5
:
पंजाब विद्यापीठ, चंदीगड विरूध्द राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर
सी 3 वि.सी 4
:
महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहतक विरूध्द महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
डी 2 वि.डी 3
:
दीनदयाळ उपाध्याय गोरखपूर विद्यापीठ, गोरखपूर विरूध्द केंद्रीय विद्यापीठ, जम्मू
                                                  (दुपार सत्र)
1 वि. ए 3 
:
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, नवी दिल्ली विरूध्द पंजाब कृषी विद्यापीठ, लुधियाना
4 वि. ए 5
:
सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे विरूध्द कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव
बी 1 वि. बी 2
:
जम्मू विद्यापीठ, जम्मू विरूध्द मुंबई विद्यापीठ, मुंबई
----

शिवाजी विद्यापीठाचा ५७ वा वर्धापनदिन:

पश्चिम महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात

शिवाजी विद्यापीठाचे मौलिक योगदान

- ‘नांदेड’चे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांचे प्रतिपादन

शिवाजी विद्यापीठाच्या ५७व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. शेजारी समारंभाचे प्रमुख पाहुणे व नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले.


शिवाजी विद्यापीठाच्या ५७व्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करताना नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले.

शिवाजी विद्यापीठाच्या ५७ व्या वर्धापनदिन समारंभात बोलताना प्रमुख पाहुणे व नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले. व्यासपीठावर (डावीकडून) कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

शिवाजी विद्यापीठाच्या ५७व्या वर्धापन दिन समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या प्रतिकृतीचे अनावरण प्रसंगी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व कुलगुरू डॉ. उद्धव भोसले.


शिवाजी विद्यापीठाच्या नूतन फोल्डरचे अनावरण करताना कुलगुरू डॉ. उद्धव भोसले. व्यासपीठावर कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर.


शिवाजी विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे शिव-ज्ञानसागर इन्स्टिट्यूशनल रिपॉझिटरीइंडियन रिसर्च इन्फॉर्मेशन नेटवर्क सिस्टीम (आयआरआयएनएस) आणि वॉक थ्रू लीड बॉटेनिकल गार्डन या उपक्रमांचे कळ दाबून व्हर्चुअल उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. उद्धव भोसले. व्यासपीठावर कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर.

शिवाजी विद्यापीठाच्या बॅजचे अनावरण करताना कुलगुरू डॉ. उद्धव भोसले. व्यासपीठावर कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर

शिवाजी विद्यापीठातील उत्कृष्ट अधिविभागासाठीचा पुरस्कार स्वीकारताना अधिविभाग प्रमुख डॉ. पी.एस. पाटील.

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते विद्यापीठातील गुणवंत शिक्षक पुरस्कार स्वीकारताना प्रा. डॉ. एस.एस. चव्हाण. व्यासपीठावर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर.

विद्यापीठ गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना मनोहर कुलकर्णी.

विद्यापीठ गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना लक्ष्मण परीट.

महाविद्यालयीन गुणवंत प्राचार्य पुरस्कार स्वीकारताना प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे.

बॅ. पी.जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारताना प्रा.डॉ. भरत नाईक.



कोल्हापूर, दि. १८ नोव्हेंबर: पश्चिम महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, शेक्षणिक आणि सांस्कृतिक अशा सर्वांगीण विकासामध्ये शिवाजी विद्यापीठाने मौलिक स्वरुपाचे योगदान दिलेले आहे, असे गौरवोद्गार नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी आज येथे काढले. शिवाजी विद्यापीठाच्या ५७ व्या वर्धापन दिन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते, तर प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के प्रमुख उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. भोसले म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने स्थापनेपासूनच अद्यावत अभ्यासक्रम सुरू करण्यास प्राधान्य दिले असले, तरी पारंपरिक शिक्षणाकडे जाणीवपूर्वक लक्ष पुरविले आहे. या क्षेत्राचे भौगोलिक स्थान व महत्त्व लक्षात घेऊन त्याला पूरक व पोषक असे अभ्यासक्रम राबविण्यावर या विद्यापीठाचा भर असल्याचे दिसून येते. आज सर्वत्र इनोव्हेशनचा बोलबाला आहे; तथापि, इनोव्हेशनचे खरे काम शिवाजी विद्यापीठामध्येच होत आहे. राज्यातील अन्य विद्यापीठे कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी विद्यापीठाने राबविलेल्या उपक्रमांचे अनुसरण करीत आहेत. कुलगुरू डॉ. शिंदे यांच्यामुळे राज्यभरातील विद्यापीठांमध्ये अशा प्रकारची सकारात्मक देवाणघेवाण सुरू झाली आहे. राज्यातील ज्या विद्यापीठांचे प्रभारी कुलगुरूपद त्यांनी भूषविले, तेथे त्यांनी त्यांचा अमीट ठसा उमटविला, अशा शब्दांत त्यांनी गौरव केला.
Dr. Uddhav Bhosale
भारतीय शिक्षण व्यवस्थेसमोरील आव्हानांचा वेध घेताना कुलगुरू डॉ. भोसले म्हणाले, शैक्षणिक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर आपण व्यापक प्रगती चालविली असली, तरी आजही आंतरराष्ट्रीय स्तरावरील आघाडीच्या ३०० विद्यापीठांच्या यादीत भारतातील एकही विद्यापीठ नाही, हे वास्तव आहे. काळानुरूप बदलासाठीची तयारी नसणे हे त्यामागील एक महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे कालसुसंगत बदलांसाठी भारतीय विद्यापीठांनी प्रयत्न करण्याची मोठी गरज आहे. विशेषतः परदेशी विद्यापीठांचे, महाविद्यालयांचे आमगन नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत अधोरेखित केलेले असतानाच्या काळात तर ते अत्यंत गरजेचे आहे. बेरोजगारी हे आपल्या व्यवस्थेसमोरील सर्वाधिक मोठे आव्हान आहे. नोकऱ्या देणे हे विद्यापीठांचे पहिले काम नसले तरी विद्यापीठांच्या प्राधान्यक्रमावरील हा प्रमुख विषय असायला हवा. बेरोजगारीची तीव्रता कमी करण्यात अपयशी ठरल्यास त्याचे दुष्परिणाम अखिल भारतीय समाजाला भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला. आपल्या देशातील सुमारे ३५ टक्के विद्यार्थी पदवी शिक्षणाला प्रवेश घेतात, पण ते पूर्ण करीत नाहीत, ही वस्तुस्थिती त्यांनी अधोरेखित केली.
कुलगुरू डॉ. भोसले पुढे म्हणाले, बेरोजगारीचे दुसरे प्रमुख कारण म्हणजे विद्यापीठीय व्यवस्थेमधून शिकून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांमधील रोजगारक्षमतेचा अभाव होय. आपल्याकडे खाजगीच नव्हे, तर सार्वजनिक क्षेत्रांतही भरपूर रोजगार संधी आहेत. तथापि, त्यासाठी शिक्षणाच्या बरोबरीनेच आवश्यक असणारी विविध कौशल्ये अवगत करणेही गरजेचे असते. मात्र, त्यांच्याअभावी रोजगाराच्या संधींपासून युवा वर्ग वंचित राहतो. हे चित्र बदलण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठाने चालविलेला आऊटकम बेस्ड स्कील एज्युकेशनचा उपक्रम अत्यंत स्तुत्य व अनुकरणीय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
विद्यापीठीय परीक्षा पद्धतीतही आमुलाग्र बदल करण्याची गरज अधोरेखित करताना कुलगुरू डॉ. भोसले म्हणाले, आजच्या आपल्या परीक्षा या मेमरी टेस्ट आहेत. त्यामध्ये लॉजिकल, अॅनालिटीकल, अॅटिट्यूड अगर अॅप्टिट्यूड यांना स्थान नाही. खरे तर विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेचा पूर्ण अंदाज येण्यासाठी तशा प्रकारच्या चाचण्यांची आज गरज आहे. त्यांच्या आधारावरच विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांत संशोधनाविषयीचे आकर्षण व आत्मियता शालेय शिक्षणापासूनच रुजविण्याची मोठी गरज आहे. त्या दृष्टीनेही शिवाजी विद्यापीठाने संशोधनाला प्रोत्साहन देणाऱ्या ज्या योजना जाहीर केल्या आहेत, त्या अत्यंत कालसुसंगत आहेत. विद्यार्थ्यांनी अध्ययन व नवनिर्मितीचे बीज विकसित करण्याच्या दृष्टीने सत्य, ज्ञान आणि परिश्रम या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असा संदेशही त्यांनी दिला.


कोल्हापूरमय झालो: कुलगुरू डॉ. शिंदे
यंदाचा वर्धापन दिन हा कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या कारकीर्दीतील अखेरचा आहे. त्याचे भावनिक प्रतिबिंब त्यांच्या आजच्या अध्यक्षीय भाषणात दिसून आले. साडेचार वर्षांपूर्वी शिवाजी विद्यापीठात रुजू झालो, तेव्हा माझे, माझ्या कुटुंबियांचे येथे कोणीच नव्हते; मात्र या कालावधीत विद्यापीठ परिक्षेत्रात अनेकांशी माझे जन्मभराचे ऋणानुबंध निर्माण झाले. मी पूर्णतः कोल्हापूरमय झालो, अशी हृद्य भावना कुलगुरू डॉ. शिंदे यांनी भाषणाच्या सुरवातीलाच व्यक्त केली.
Dr. Devanand Shinde
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून पुण्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि पुढे पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या तीन विद्यापीठांचा प्रभारी कुलगुरू म्हणून काम करण्याची अभूतपूर्व संधी मला लाभली, याचे सारे श्रेय शिवाजी विद्यापीठ परिवाराला आहे. आंबेडकर-शाहू यांच्यानंतर महात्मा फुले, लोकहितवादी आणि पुन्हा डॉ. आंबेडकर यांच्या कर्मभूमीकडे झालेला हा प्रवास अनुभव समृद्ध करणारा ठरला. मुंबई विद्यापीठाची जबाबदारी ही तर अत्यंत अभूतपूर्व परिस्थितीत माझ्याकडे आली होती. सुमारे नऊ महिने ती सावरण्यासाठी मी अथकपणे कार्यरत होतो. या कालावधीत माझ्या इथल्या परिवाराने माझी स्थिती समजून घेत इथला कारभार अत्यंत जबाबदारीने चालविला, कधीही तक्रारीला जागा ठेवली नाहीत, याबद्दल कौतुक करावे तितके थोडेच आहे. महापूर काळात विद्यापीठातील सहकाऱ्यांनी ज्या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पूरग्रस्तांसह पूरग्रस्त जनावरे, विद्यार्थी यांना मदतीचा हात दिला, त्याला तोड नाही, असे कौतुकोद्गारही त्यांनी काढले.
माझ्या कारकीर्दीत केलेली सर्वाधिक चांगली गोष्ट कोणती असेल, तर ती जलयुक्त विद्यापीठ योजना होय, असे सांगून कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, या कालावधीत पूर्वीच्या जलसाठ्यांच्या जोडीला काही जुन्यांचे पुनरुज्जीवन आणि नव्याने काहींची उभारणी अशा प्रकारे कॅम्पसवरील जलसाठ्यांची साठवण क्षमता आजघडीला सुमारे ३१ कोटी लीटर इतकी वाढविण्यात यश आले आहे. कॅम्पसवर तीन धरणांसह दहा शेततळी आणि नऊ विहीरी आहेत. पाण्याच्या बाबतीत विद्यापीठ पूर्णतः स्वयंपूर्ण बनले आहे. पूर्वीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या जोडीला ६००० लीटर प्रति तास इतक्या क्षमतेचा आर.ओ. प्रकल्प उभारला. या प्रकल्पाद्वारे सर्वांना समान दर्जाचे शुद्ध पाणी पुरविले जाते. परिणामी, कॅम्पसवरील विद्यार्थ्यांतील पाण्यापासून होणाऱ्या आजारांचे प्रमाण गेल्या तीन वर्षांत लक्षणीयरित्या कमी झाले आहे. या जलयुक्त मोहिमेमुळेच पूर काळात कोल्हापूर शहराला पंधरा दिवसांहून अधिक काळ दररोज शुद्ध पाण्याचा अखंडित पुरवठा करणे विद्यापीठाला शक्य झाल्याचेही त्यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, रुजू झालो, त्यावेळी काळाची पावले ओळखून विद्यापीठीय व्यवस्थेमध्ये इनक्युबेशन केंद्रांचे महत्त्व लक्षात घेऊन तशा प्रकल्पांना प्राधान्य देण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार विद्यापीठात आज शिवाजी सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन अॅन्ड लिंकेजिससह तीन इनक्युबेशन केंद्रांबरोबरच संलग्नित २१ महाविद्यालयांमध्येही इनक्युबेशन सेंटर स्थापन झाली आहेत. तेवढ्यावरच न थांबता विद्यापीठाने सेक्शन-८ कंपनी स्थापन केली. त्याखेरीज फॅकल्टी डेव्हलपमेंट सेंटर फॉर सायबर सिक्युरिटी अॅन्ड डाटा सायन्सेस (MHRD), रुसाअंतर्गत सेंटर फॉर नॅचरल प्रोडक्ट्स अॅन्ड अल्टरनेटिव्ह मेडिसीन, रिसोर्स सेंटर फॉर इन्क्लुजिव्ह एज्युकेशन, सेंटर फॉर व्हीएलएसआय सिस्टीम डिझाईन, सेंटर फॉर नॅनो-फॅब्रिक्स, स्पोर्ट्स फॅसिलिटी अॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर, स्टॅटिस्टिक्स रिसर्च लॅब यांच्यासह भाभा अणूसंशोधन केंद्राची पर्यावरणीय तरंग मापनासाठीची आयर्मोन सुविधा, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राअंतर्गत गूळ गुणवत्ता तपासणी केंद्र, सेंटर फॉर स्कील अॅन्ड आंत्रप्रिन्युअरशीप डेव्हलपमेंट, सेंटर फॉर लीडरशीप डेव्हलपमेंट, सेंटर फॉर करिअर गायडन्स अॅन्ड सायकॉलॉजिकल कौन्सेलिंग, सेंटर फॉर एक्सलन्स इन सेरिकल्चर, सेंटर फॉर एक्सलन्स इन एपिकल्चर, सेंटर फॉर एक्सलन्स इन टिश्यू-कल्चर, ‘आयजीटीआरचे अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी सेंटर इत्यादी केंद्रांची प्रस्थापना व यशस्वी कार्यान्वयन झाले आहे.
शिवाजी विद्यापीठ हे आता आयएसओ- 9001:2015 प्रमाणित असून प्रशासकीय प्रक्रियेचे स्टँडर्डायझेशन करण्याच्या दिशेने विद्यापीठाची जागतिक निकषांनुसार वाटचाल सुरू असल्याचेच त्यातून स्पष्ट होत असल्याचे सांगून कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, गतवर्षी जागतिक स्तरावर शैक्षणिक संस्थांच्या मूल्यांकनात दबदबा असलेल्या ब्रिटीश क्यू.एस. वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये भारतातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये शिवाजी विद्यापीठाची क्रमवारी ५६-६० अशी आहे; तरब्रिक्स देशांतील शैक्षणिक संस्थांमध्ये ही क्रमवारी २५१-२६० अशी आहे. शिवाजी विद्यापीठाने पंचवार्षिक बृहतआराखडा निर्माण करून अंमलबजावणीस सुरवात केली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम-२०१६च्या निर्मितीमध्ये शिवाजी विद्यापीठाचे अत्यंत मौलिक स्वरुपाचे योगदान राहिले.
विद्यापीठाने सुरू केलेल्या माहिती-संवाद तंत्रज्ञानाधारित उपक्रमांची माहितीही कुलगुरू डॉ. शिंदे यांनी दिली. ते म्हणाले, विद्यापीठातील सर्व बैठकांच्या कामकाजाचे संगणकीकृत सॉफ्टवेअर शिव-सभा, विद्यापीठाची प्रकाशने विक्रीसाठी शिव- प्रकाशन, विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी शिव-दीक्षान्त, संलग्नित महाविद्यालयांच्या नेव्हिगेशनसाठी शिव-सारथी अॅप, कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाविषयक बाबींसाठी शिव-कर्मचारी सेवा पोर्टल, विद्यापीठाचा वेब रेडिओ शिव-वाणी, फायनान्स अॅन्ड अकाऊंट सिस्टिम सॉफ्टवेअर, विद्यापीठ मतदार नोंदणीसाठी ऑनलाइन पोर्टल, पीजी विभागांत प्रवेशासाठी ऑनलाइन परीक्षा, संपूर्ण प्रवेश प्रक्रियेचे संगणकीकरण, नियुक्त्यांविषयक बाबींसाठी पोर्टल, पीएच.डी., एम.फील. संशोधक मार्गदर्शक नोंदणीसाठी पोर्टल, एनएसएस नोंदणीसाठी वेब पोर्टल असे अनेक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे मुडलअंतर्गत विविध साधन कार्यक्रमांच्या निर्मितीसाठी २४x७ सपोर्ट डेस्कही निर्माण करण्यात आला आहे.
संशोधनाला चालना देण्यासाठी विद्यापीठाने संशोधन धोरण निश्चिती केली असल्याचे सांगून कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी रिसर्च सेन्सिटायझेशन स्कीम, विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकांसाठी रिसर्च इनिसिएशन स्कीम, रिसर्च स्ट्रेन्दनिंग स्कीम, रिसर्च प्रमोशन स्कीम, रिसर्च अॅप्रिसिएशन स्कीम, शिक्षक, विद्यार्थी व रिसर्च गाईड या सर्वांसाठी बेस्ट रिसर्चर पुरस्कार, बेस्ट परफॉर्मिंग डिपार्टमेंट स्कीम, संशोधक विद्यार्थ्यांसाठी वित्तसहाय्य योजना, आयपीआर व पेटंट फाइलिंगसाठी सहायता, मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रांतील उत्तम संशोधन निबंधांच्या परकीय भाषांमध्ये अनुवादासाठी अनुदान योजना तसेच डॉक्टरल व पोस्ट डॉक्टरल कार्यक्रमांसाठी वित्त सहाय्य योजना अशा अनेक अभिनव योजना संशोधनाला प्रोत्साहनासाठी सुरू करण्यात आल्या आहेत. संशोधनासाठी बाह्य अनुदान संस्थांकडूनही विविध फेलोशीप व वित्तसहाय्य मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व मदत करण्याचे धोरणही विद्यापीठाने सातत्याने अंगिकारले असल्याचे त्यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, विद्यापीठाने कौशल्य विकासासाठी गेल्या चार वर्षांत विविध उपक्रम हाती घेतले. त्याचे परिणामही सकारात्मक दिसून आले. विद्यार्थ्यांच्या बरोबरीनेच शिक्षणबाह्य मुले, नागरिक, महिला, दिव्यांग, तृतीयपंथी, शेतकरी, उद्योजक-व्यावसायिक, बँकर आदी समाजघटकांसाठी विद्यापीठाने विविध कौशल्य विकास कार्यशाळा व  उपक्रम राबविले आहेत. यामध्ये स्कील ऑन द स्पॉट, स्कील ऑन व्हील, कौशल्य व रोजगार मेळावे, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथीयांसाठी विशेष कौशल्य विकास कार्यशाळा, मेळावे यांचा समावेश आहे. यासाठी विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयांसह विविध ठिकाणी ४००हून अधिक कौशल्य प्रदान केंद्रे चालविली आहेत. त्या ठिकाणी तीन तास ते एक वर्ष या कालावधीमध्ये २८२हून अधिक कौशल्ये प्रदान केली जातात. विद्यापीठाकडे १५० प्रशिक्षित ट्रेनर्सची फौज असून त्यांनी आजपर्यंत दोन लाखांहून अधिक जणांना विविध कौशल्ये प्रदान केली आहेत. विद्यापीठाने या कालावधीत विद्यापीठ परिक्षेत्रासह पुणे येथेही आजवर एकूण ४८ कौशल्य व रोजगार मेळावे घेतले आहेत. या रोजगार मेळाव्यांतून सुमारे ७० टक्के विद्यार्थ्यांना रोजगार संधी उपलब्ध झाल्याचेही त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या प्रतिकृतीसह विविध उपक्रमांचे उद्घाटन
शिवाजी विद्यापीठाचा मानबिंदू असलेला विद्यापीठ प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याच्या प्रतिकृतीचे आज प्रमुख पाहुणे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. बी.आर. खेडकर यांनी मूळ पुतळा साकारला आहे. त्या पुतळ्याच्या प्रतिकृती पगमार्क आर्ट गॅलरीचे रमण कुलकर्णी, अतुल डाके आणि मनोहर टॉईजचे दिपक महामुनी यांनी साकारल्या आहेत. त्यांचाही आजच्या समारंभात गौरव करण्यात आला. शिवपुतळ्याच्या प्रतिकृतीचे अनावरण करणे, हा आपल्या आयुष्यातील गौरवाचा क्षण असल्याची भावना डॉ. भोसले यांनी व्यक्त केली. यावेळी पहिली प्रतिकृती कुलगुरू डॉ. शिंदे यांनी कुलगुरू डॉ. भोसले यांना भेट देण्यात आली.
त्याचप्रमाणे विद्यापीठाचा बॅज, फोल्डर, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे शिव-ज्ञानसागर इन्स्टिट्यूशनल रिपॉझिटरीइंडियन रिसर्च इन्फॉर्मेशन नेटवर्क सिस्टीम (आयआरआयएनएस) आणि वॉक थ्रू लीड बॉटेनिकल गार्डन या उपक्रमांचेही कुलगुरू डॉ. भोसले यांच्या हस्ते व्हर्चुअल उद्घाटन करण्यात आले.
या वेळी विद्यापीठातील, महाविद्यालयांतील गुणवंत शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांची गुणवंत पाल्ये यांचा विद्यापीठ प्रशासकीय तसेच कल्याण निधी पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. तसेच, प्रशासकीय गुणवत्ता अभियानांतर्गत पुरस्कार प्राप्त प्रशासकीय विभाग व अधिविभाग यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर 'नॅक'चे '' मानांकन मिळविणाऱ्या ईस्माईलसाहेब मुल्ला लॉ कॉलेज, सातारा व आर्ट्स, कॉमर्स अॅन्ड सायन्स कॉलेज, रानंदनगर, बुर्ली या संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा सत्कार करण्यात आला.

उत्कृष्ट अधिविभागासाठीचा पहिला पुरस्कार पदार्थविज्ञानला!
शिवाजी विद्यापीठाने या वर्षीपासून उत्कृष्ट अधिविभाग पुरस्कार देण्यास सुरवात केली. विज्ञान व तंत्रज्ञान आणि सामाजिक शास्त्रे असे दोन गट करून अधिविभागांचे सर्वंकष काटेकोर मूल्यमापन करण्यात येऊन या पुरस्कार देण्यात येत असून संबंधित विभागाला पारितोषिकापोटी दहा लाख रुपये, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देण्याचे ठरले. त्यानुसार यंदाचा उत्कृष्ट अधिविभागासाठीचा पहिला पुरस्कार पदार्थविज्ञान विभागाने पटकाविला. विभागाच्या वतीने अधिविभाग प्रमुख डॉ. पी.एस. पाटील यांनी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.

वर्धापन दिन समारंभात प्रदान करण्यात आलेल्या विविध पारितोषिक विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे:
विद्यापीठातील गुणवंत शिक्षक: प्रा.डॉ. संजय शामराव चव्हाण (रसायनशास्त्र अधिविभाग)
विद्यापीठातील गुणवंत सेवक: मनोहर अनंत कुलकर्णी (सहाय्यक अधीक्षक, आस्थापना विभाग), लक्ष्मण भीमराव परीट (प्र. शाळा परिचर, रसायनशास्त्र अधिविभाग)
संलग्न महाविद्यालयांतील गुणवंत प्राचार्य: डॉ. धनाजी गोविंदराव कणसे (भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली)
बॅ. पी.जी. पाटील आदर्श शिक्षक: प्रा.डॉ. भरत आदाप्पा नाईक (महावीर महाविद्यालय, कोल्हापूर)
उत्कृष्ट फोटोग्राफी पुरस्कार: प्रथम (विभागून): शुभम रमेश हत्तरकी, संकेत उदय माळी, द्वितिय (विभागून): सुंदरकुमार कांबळे, सुभाष पोपटराव वाणी, तृतीय (विभागून): उदयणादित्य पाटील, युवराज जगताप.

यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व पसायदान सादर केले. श्रीमती नंदिनी पाटील व धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

तत्पूर्वी, विद्यापीठ प्रांगणात प्रमुख पाहुणे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते शिवपुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मधुकरराव गायकवाड, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, डॉ. पी.एस. पाटील, डॉ. भारती पाटील, डॉ. ए.एम. गुरव, आयक्यूएसी संचालक डॉ. आर.के. कामत, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड यांच्यासह अधिविभाग प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांचे कुटुंबिय, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.