Showing posts with label Kolhapuri Chappal Cluster. Show all posts
Showing posts with label Kolhapuri Chappal Cluster. Show all posts

Wednesday, 20 November 2019

कोल्हापुरी चप्पल विक्रेत्यांच्या कौशल्य विकासासाठी

विद्यापीठाचे कौशल्य प्रदाते चप्पल लाईनमध्ये!

विक्रेत्यांमध्ये कालसुसंगत विपणन बदलांसाठी विद्यापीठ प्रतिबद्ध: कुलसचिव डॉ. नांदवडेकर



शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रातर्फे चप्पल लाईन येथे आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर. शेजारी भूपाल शेट्ये, अरुण सातपुते व प्रशिक्षक.

शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रातर्फे चप्पल लाईन येथे आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी उपस्थित मान्यवरांना अवगत करताना केंद्राचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव.

कोल्हापूर, दि. २० नोव्हेंबर: कोल्हापूरचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आणि वैभव असणाऱ्या कोल्हापुरी चप्पलचे निर्माते आणि विशेषतः विक्रेते यांना बाजारामधील नवप्रवाहांची जाणीव करून देणे आणि त्यांच्या विपणन पद्धतीमध्ये कालसुसंगत बदल घडवून आणण्यासाठी शिवाजी विद्यापीठ प्रतिबद्ध आहे. त्या दृष्टीनेच विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राच्या माध्यमातून थेट कोल्हापूरच्या चप्पल लाईनमध्येच एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. एका अर्थाने या चप्पल विक्रेत्यांच्या कौशल्य विकासासाठी विद्यापीठ आपल्या दारी आले आहे, अशी भावना कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आज येथे व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने आणि कोल्हापुरी चप्पल क्लस्टरच्या सहकार्याने चप्पल लाईन येथे आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय ऑन-फिल्ड प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आज सकाळी ते बोलत होते.
यावेळी केंद्राचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव यांनी सांगितले की, केंद्राच्या दहा प्रशिक्षित प्रशिक्षकांच्या मार्फत चप्पल लाईन येथील व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायाला पूरक अशा बाबींचे प्रशिक्षण देण्याबरोबरच सध्या बाजारातील विविध प्रवाहांची माहिती देऊन त्यासाठी आवश्यक बाबींविषयी त्यांना अवगत करणे असा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे. यामध्ये विविध विपणन कौशल्यांबरोबरच प्रदर्शन कौशल्य, जाहिरात कौशल्य, प्रसिद्धी कौशल्य, ग्राहक सुसंवाद कौशल्य, विक्री मूल्य निर्धारण कौशल्य, साठा कौशल्य, ब्रँडिंग व पॅकिंग कौशल्य, वर्तन कौशल्य, स्थानिक व बाह्य ग्राहकांशी संवाद कौशल्य आदी अनेक बाबींचे प्रशिक्षण चप्पल लाइनमधील व्यावसायिकांना देण्यात येणार आहे.
या प्रसंगी कोल्हापूर क्लस्टरचे भूपाल शेट्ये म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने कोल्हापुरी चप्पल व्यावसायिकांसाठी सातत्याने सकारात्मक भूमिका घेऊन काम चालविले आहे. त्याचा परिणाम म्हणून चप्पल निर्माते आणि व्यावसायिकांमध्येही एक प्रकारची जागृती होऊ लागली आहे. जागतिक प्रवाहांचा वेध घेत त्यामध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी विद्यापीठ चप्पल व्यावसायिकांना करीत असलेली मदत स्वागतार्ह आहे. त्या दृष्टीने आजचे चप्पल लाईनमधील प्रशिक्षण हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी महेश चव्हाण यांनी आभार मानले. डॉ. केदार मारुलकर, क्लस्टरचे अध्यक्ष अरुण सातपुते यांच्यासह सर्व प्रशिक्षक उपस्थित होते.
दरम्यान, आज दिवसभरात डॉ. गुरव, डॉ. मारुलकर, श्री. चव्हाण यांच्यासह डॉ. व्ही.एस. खंडागळे, डॉ. गजानन राशिनकर, डॉ. के.बी. पाटील, डॉ. पी.एम. देवळी, शिवप्रसाद शेटे, प्रियांका नायक-तिवरे आणि श्री. लिटॉन या प्रशिक्षकांनी कोल्हापुरी चप्पल विक्रेत्यांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले.

Thursday, 11 July 2019

कोल्हापुरी चप्पल क्लस्टरसमवेत विद्यापीठाचा सामंजस्य करार

शिवाजी विद्यापीठाच्या कोल्हापुरी चप्पल क्लस्टरसमवेत झालेल्या सामंजस्य करार प्रसंगी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि क्लस्टरचे अरुण सातपुते. यावेळी (डावीकडून) व्ही.टी. पाटील, कला-दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई, डॉ. ए.एम. गुरव, उपमहापौर भूपाल शेटे, महेश काकडे आदी.


कोल्हापूर, दि. ११ जुलै: कोल्हापुरी चप्पलला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्याच्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर चप्पल क्लस्टरला सर्वोतोपरी सहाय्य करील, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे दिली.
शिवाजी विद्यापीठाचे कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र आणि कोल्हापुरी चप्पल क्लस्टर समूह यांच्यात आज सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमहापौर भूपाल शेटे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, कोल्हापुरी चप्पल ही अत्यंत दर्जेदार आहे. या चप्पलला कालसुसंगत असे आधुनिक रुप प्रदान करण्यासाठी संशोधन, तंत्रज्ञान विकास, पाणन व व्यवस्थापन आणि कौशल्य निर्मिती या चार आघाड्यांवर विद्यापीठ सक्रियपणे मदत करील. त्या दृष्टीने हा सामंजस्य करार अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
उपमहापौर तथा क्लस्टरचे अध्यक्ष भूपाल शेटे म्हणाले, कोल्हापूर चप्पलच्या निर्मितीमध्ये सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या कारागीरांवर पारंपरिक स्वरुपाची अनेक बंधने आहेत. त्या बंधनात तसेच अत्यंत वंचित स्थितीत राहून ते कोल्हापुरी चप्पलचा दर्जा आणि वैभव जपण्यासाठी कार्यरत आहेत. त्यांच्यासाठी आणि कोल्हापुरी चप्पलला तिचे पूर्ववैभव मिळवून देण्यासाठी क्लस्टर प्रयत्नशील आहे. कोल्हापुरी चप्पलच्या बरोबरीनेच कोल्हापुरी शूज सुद्धा लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत. कोल्हापुरी चप्पलचा ब्रँड कर्नाटकात नेण्याचे काही लोकांचे प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे कोल्हापुरी चप्पलला जी.आय. मिळविण्यासाठीही आम्ही प्रयत्न करतो आहोत. या सर्व बाबींमध्ये विद्यापीठाकडून सहकार्य अभिप्रेत आहे. त्या दृष्टीने हा करार महत्त्वाचा आहे.
यावेळी सामंजस्य करारावर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि अरुण सातपुते यांनी स्वाक्षरी केल्या. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक व अधिष्ठाता डॉ. ए.एम. गुरव, महेश चव्हाण आदी उपस्थित होते.

शिवबा क्राफ्ट बुकचे प्रकाशन
'शिवबा' या क्राफ्टबुकचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कला-दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई, साईप्रसाद बेकनाळकर यांच्यासह मान्यवर.

या प्रसंगी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राच्या संकल्पनेतून साईप्रसाद बेकनाळकर यांनी साकारलेल्या शिवबा या क्राफ्ट बुकचे प्रकाशन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, कला-दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शिवबा हे क्राफ्ट बुक हे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रसंगांवर बेतलेले असून गड-किल्ल्यांच्या निर्मितीसह अनेक अभिनव उपक्रम यात विद्यार्थ्यांसाठी आहेत.
या क्राफ्ट बुकची संकल्पना अत्यंत अत्यंत अभिनव असून नव्या पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार कुलगुरू डॉ. शिंदे यांनी काढले.
यावेळी साईप्रसाद बेकनाळकर यांनी अशा आणखी २३ महनीय व्यक्तीमत्त्वांवर बेतलेल्या क्राफ्ट बुकच्या निर्मितीचा हा प्रकल्प असून त्याचे विद्यार्थी-पालकांतून अत्यंत सकारात्मक स्वागत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.