Friday, 11 July 2025

विद्यार्थ्यांना रोजगार संधींच्या दृष्टीने ‘एईडीपी’ उपयुक्त: डॉ. एन.एन. वडोदे

शिवाजी विद्यापीठात एकदिवसीय विशेष कार्यशाळा

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष कार्यशाळेत मार्गदर्शन करताना बोर्ड ऑफ अप्रेंटिसशीप ट्रेनिंगचे पश्चिम विभागीय उपसंचालक डॉ. एन.एन. वडोदे. मंचावर (डावीकडून) डॉ. सागर डेळेकर, डॉ. श्रीकृष्ण महाजन, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. महादेव देशमुख आणि डॉ. ज्योती जाधव.

(कार्यशाळेची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. ११ जुलै: देशात रोजगारवृद्धी होण्याच्या अनुषंगाने अप्रेंटिसशीप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम (एईडीपी) अंमलात आणण्यात येत असून विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेमध्येच नोकरीची हमी मिळण्याच्या दृष्टीने हा उपक्रम लाभदायक ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या बोर्ड ऑफ अप्रेंटिसशीप ट्रेनिंगचे (बीओएटी) पश्चिम विभागीय उपसंचालक डॉ. एन.एन. वडोदे यांनी केले.

शिवाजी विद्यापीठात आज एईडीपीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने विद्यापीठातील शिक्षकांसह संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांसाठी एकदिवसीय विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

डॉ. वडोदे म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पदवी स्तरापासूनच विद्यार्थ्यांना रोजगार प्रशिक्षण देण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. तीन वर्षांच्या पदवीसाठी एक सत्र आणि चार वर्षांच्या पदवीसाठी दोन सत्रे विद्यार्थ्यांनी कोणत्याही व्यवसाय-उद्योगामध्ये अप्रेंटिसशीप करणे अनिवार्य आहे. अधिकतर स्थानिक पातळीवरच विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण मिळावे, यासाठी महाविद्यालयांसह विद्यापीठाने प्रयत्न करावा. कोल्हापूरच्या संदर्भात बोलावयाचे झाल्यास या परिसरात चार हजारांहून अधिक उद्योग आहेत. येथील व्यावसायिक, उद्योजकही विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशीप देण्याबाबत सकारात्मक आहेत. अनेक ठिकाणी विद्यार्थी काम करतही आहेत. अन्य विद्यार्थ्यांना अशी प्रशिक्षण संधी मिळावी, अशी अपेक्षा आहे. या विद्यार्थ्यांना द्यावयाची संधी आणि भत्ता या अनुषंगाने बीओएटी प्रभावी मध्यस्थाची भूमिका बजावेल.

बीओएटीसमवेत आजवर अनेक डिम्ड व स्वायत्त विद्यापीठांनी सामंजस्य करार केले आहेत. तथापि, शिवाजी विद्यापीठ हे अशा प्रकारचा सामंजस्य करार करणारे पहिले राज्य अकृषी विद्यापीठ ठरले आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी शिक्षकांनी सुद्धा एईडीपी ही संकल्पना उत्तम प्रकारे समजून घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना तिचे लाभ घेण्यासाठी प्रेरित करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, अनेक अभ्यासक्रमांना वरिष्ठ नियामक प्राधिकरणांचे नियम लागू असतात. त्यांच्या मान्यतेखेरीज एईडीपीसंदर्भात पुढे जाणे अशक्य असले तरी बीए, बीकॉम, बीएस्सी अशा पारंपरिक अभ्यासक्रमांच्या विनाअनुदानित तुकड्यांपासून अंमलबजावणीला सुरवात करता येणे शक्य आहे. त्या अनुषंगाने येत्या ३१ जुलैपर्यंत अभ्यासक्रमांची संरचना करावी लागेल. विद्यार्थ्यांना या उपक्रमाचे जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांनी प्रयत्न करायला हवेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर यांनी एईडीपी अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण केले. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख यांनी आभार मानले. यावेळी वित्रान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. ज्योती जाधव यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, महाविद्यालयांचे प्राचार्य, प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Thursday, 10 July 2025

यशाचे रंग उधळत चला, देशाचे नाव उज्ज्वल करा

कलर पुरस्कार समारंभातत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांचे क्रीडापटूंना आवाहन

शिवाजी विद्यापीठाच्या कलर पुरस्कार वितरण समारंभात पुरस्कारप्राप्त क्रीडापटूंसमवेत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे. 

शिवाजी विद्यापीठाच्या कलर पुरस्कार वितरण समारंभात बोलताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. मंचावर (डावीकडून) क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे,परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि  वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील.



(कलर पुरस्कार प्रदान कार्यक्रमाची लघुचित्रफीत)




कोल्हापूर, दि. १० जुलै: राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर यशाचे रंग उधळत चला, स्वतःबरोबरच विद्यापीठाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज केले. शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण अधिविभागातर्फे आयोजित कलर पुरस्कार प्रदान समारंभ २०२३-२४ कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.

शिवाजी विद्यापीठाचे क्रीडापटू दरवर्षी विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विविध पदके जिंकून चमकदार कामगिरी बजावतात. अशा क्रीडापटूंचा विद्यापीठाचे स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, रोख पारितोषिक तसेच सन्मानाचे ब्लेझर देऊन दरवर्षी गौरव करण्यात येतो. आजच्या कार्यक्रमात अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धांत विविध पदके प्राप्त करणारे ८३ क्रीडापटू, खेलो इंडिया स्पर्धेत पदक मिळविणारे २९ क्रीडापटू आणि त्यांचे प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक यांचा कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या ११ क्रीडापटूंनी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त केले, ही विद्यापीठासाठी गौरवास्पद बाब आहे. विद्यापीठाने नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यांच्या स्पर्धा परीक्षा काळात असल्या तर कारकीर्दीवर परिणाम होऊ नये म्हणून स्वतंत्र परीक्षा घेण्याचे धोरण विद्यापीठाने अवलंबले. आता तर बी.ए. स्पोर्ट्स हा स्वतंत्र पदवीस्तरीय अभ्यासक्रम सुरू करून क्रीडा हाच अभ्यास ठेवून या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संधीची कवाडे खुली केली आहेत. भव्य कुस्ती संकुल उभारले असून क्रीडा वसतिगृह उभारणीचे काम गतीने सुरू आहे. विद्यार्थी क्रीडापटूंसाठी अभिनव योजना आखण्यासाठी विद्यापीठाचे क्रीडा मंडळही उत्साही आणि आग्रही आहे, ही जमेची बाजू आहे. नजीकच्या काळात महाराष्ट्र राज्याचे विद्यापीठीय क्रीडा धोरण तयार करण्याची जबाबदारीही कुलपती महोदयांनी शिवाजी विद्यापीठाकडे सोपविली आहे, ही सुद्धा आपणा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.

प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने नेहमीच आपल्या परिक्षेत्रात क्रीडाविषयक परिसंस्था विकसित व्हावी, यासाठी प्रयत्न केले आहेत. त्याचे फलित म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रांत चमकदार कामगिरी करणारे क्रीडापटू येथे तयार झाले आहेत. आपल्या खेळाडूंतील क्रीडानैपुण्यासाठी शिवाजी विद्यापीठ सर्वदूर ओळखले जावे, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी केवळ राष्ट्रीय स्पर्धांतील यसावर समाधानी न राहता पुढे जागतिक स्तरावर जाण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावा. प्रखर जिद्द आणि लढाऊ वृत्तीने आपले संपूर्ण क्रीडाकौशल्य पणाला लावून जागतिक दर्जाचे यश मिळविण्यासाठी स्पर्धेत उतरा, असे आवाहन केले.

यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते क्रीडापटू कल्याणी पाटील, श्रुती भोसले, पृथ्वीराज पाटील, साक्षी बनसोडे, दीपाली गुरसाळे, धनंजय जाधव, श्रीधर निगडे, गिरीष जकाते यांचा उपस्थितीत तर आदिती स्वामी, ऐश्वर्या पुरी यांचा त्यांच्या अनुपस्थितीत गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय खेळाडू रोहन कांबळे यांचाही यावेळी गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला. डॉ. नीलेश पाटील, डॉ. आय.एच. मुल्ला, आर.टी. पाटील, डॉ. विक्रमसिंह नांगरे, डॉ. प्रताप जाधव, टी.आर. साबळे, बी.ए. समलेवाले, दीपक पाटील, डॉ. सुनील खराडे, शिवाजी दाभाडे, डॉ. एन.डी. पाटील या संघ प्रशिक्षक व व्यवस्थापकांचाही यावेळी गौरव करण्यात आला. पुरस्कार विजेत्यांच्या वतीने डॉ. खराडे यांनी कृतज्ञतापर मनोगत व्यक्त केले.

यावेळी क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. एन.डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर किरण पाटील यांनी आभार मानले. मंचावर परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, प्राचार्य डॉ. रमेश कुंभार, डॉ. राजेंद्र रायकर, विकास जाधव यांच्यासह क्रीडापटू, त्यांचे पालक आणि प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मध्यवर्ती रोजगार कक्षाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन

 

शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती रोजगार कक्षाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. राजन पडवळ, डॉ. प्रकाश राऊत, डॉ. विजय ककडे आदी.

शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती रोजगार कक्षाच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी वृक्षारोपण करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. राजन पडवळ, डॉ. प्रकाश राऊत, डॉ. विजय ककडे आदी.


कोल्हापूर, दि. १० जुलै: शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती रोजगार कक्ष कार्यालयाचे आज कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

रसायनशास्त्र अधिविभागाच्या जागेमधून या कक्षाचे कामकाज चालत असे. या कक्षाचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यालयासमोरील बी-४ बंगल्यामध्ये स्थलांतर करण्यात आले असून आज या कार्यालयाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन करण्यात आले. या निमित्ताने कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नूतन कार्यालयातील मांडणी पाहून कुलगुरूंसह सर्व अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

मध्यवर्ती रोजगार कक्षाचे समन्वयक डॉ. राजन पडवळ यांनी मान्यवरांचे स्वागत करून गेल्या वर्षभरात कक्षाने केलेल्या कामकाजाचा अहवाल सादर केला. नव्या जागेमधून कक्षाने अधिक गतिमानतेने कामकाज करावे, अशी अपेक्षा कुलगुरू डॉ. शिर्के यांनी व्यक्त केली.

शिवाजी विद्यापीठात सन २००६ पासून मध्यवर्ती रोजगार कक्ष कार्यान्वित आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांसह संलग्नित महाविद्यालये तसेच परिक्षेत्रातील युवा वर्गाला रोजगार संधी मिळवून देण्यासाठी कक्ष सातत्याने प्रयत्नशील राहिला आहे. गेल्या वर्षभरात विविध ७४ प्रशिक्षण कार्यक्रमांतून ३२०० विद्यार्थ्यांना कुशल व प्रशिक्षित केले. परिणामी या कालावधीत ५१४ विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारच्या नोकरीच्या संधी प्राप्त झाल्या. यामध्ये प्रामुख्याने इन्फोसिस, एनपीसीआय, सीएमएस, टॅको, पीएचएन, ॲक्सिस बँक, एसबीआय लाइफ इन्शुरन्स अशा नामवंत कंपन्यांचा समावेश आहे. वर्षभरात १२८ कंपन्यांनी त्यांचे कॅम्पस ड्राईव्ह विद्यापीठात आयोजित केले. त्यामुळेच विद्यापीठातील बहुतांशी विद्यार्थ्यांना रोजगार संधी प्राप्त झाल्या.

कार्यक्रमास डॉ. प्रकाश राऊत, डॉ. विजय ककडे, पर्यावरण शास्त्र अधिविभागाच्या प्रमुख डॉ. आसावरी जाधव, डॉ. आलोक जत्राटकर, डॉ. गजानन राशिनकर, डॉ. गणेश पाटील, डॉ. चेतन आवटी, अमर डुम, शामल पवार आदी उपस्थित होते.

Tuesday, 8 July 2025

कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांचे कृत्रिम बुद्धिमत्तेवरील पुस्तक उपलब्ध

 डॉ. सयाजी हांडेविनीत गुप्ता आणि डॉ. सोमनाथ पवार सहलेखक

पुस्तकाचे मुखपृष्ठ

पुस्तकाचे मलपृष्ठ

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी अन्य तीन सहलेखकांसह लिहीलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक पुस्तकाचे आंतरराष्ट्रीय संख्याशास्त्र परिषदेत प्रकाशन करण्यात आले होते. त्यावेळी (डावीकडून) डॉ. शशीभूषण महाडिक, डॉ. अभय बंग, डॉ. शिर्के, डॉ. प्रकाश पाटील, सहलेखक डॉ. सोमनाथ पवार व डॉ. सयाजी हांडे.


कोल्हापूर, दि. ८ जुलै: शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी तीन महत्त्वाच्या संख्याशास्त्रज्ञांसमवेत लिहीलेले कृत्रिम बुद्धिमत्तेवरील पुस्तक शिवाजी विद्यापीठामार्फत अभ्यासकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.

मॅथेमॅटिक्स बिहाइंड आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंगअसे पुस्तकाचे शीर्षक असून डॉ. शिर्के यांनी डॉ. सयाजी हांडे, विनीत गुप्ता आणि डॉ. सोमनाथ पवार यांच्यासमवेत ते लिहीले आहे. सद्यस्थितीत सर्वाधिक चर्चेत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशीन लर्निंग (एमएल) या विषयांमागील गणिती व सैद्धांतिक पाया समजावून सांगणारे हे पुस्तक अभ्यासकांसाठी उपयुक्त व मार्गदर्शक स्वरुपाचे आहे. शिवाजी विद्यापीठात नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय संख्याशास्त्र परिषदेत मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते. आता ते सर्वत्र उपलब्ध झाले आहे.

आजघडीला आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग हे परवलीचे शब्द झाले आहे. अनेकांना ते जादूस्वरुप वाटते. मात्र प्रत्यक्षात या बाबी म्हणजे सशक्त गणिती सिद्धांत व अचूक सूत्रीकरणावर आधारित प्रक्रिया आहेत. त्यामुळे कोणतेही एआय टूल वापरण्यापूर्वी, त्यामागचा विचार, सिद्धांत आणि समस्यांचे गणिती स्वरूप समजून घेणे आवश्यक आहे. या पुस्तकात याच बाबींविषयी सखोल चर्चा, चिंतन आणि मार्गदर्शन करण्यात आले आहे.

एआय ही संकल्पना केवळ वापरापुरती मर्यादित न राहता, ती कशी कार्य करते, यामागे कोणते गणित असते, याची सखोल माहिती देणारी फार कमी पुस्तके उपलब्ध आहे. हे पुस्तक ती पोकळी भरून काढते. एआय तंत्रज्ञानामध्ये वापरण्यात येणारे महत्त्वाचे अल्गोरिदम आणि त्यामागील गणिती संकल्पना पुस्तकात सुलभ आणि सविस्तर पद्धतीने उलगडून दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे पुस्तक एआयमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांपासून, एआय आणि डेटा सायन्सशी संबंधित अभ्यासक्रम शिकणाऱ्यांसाठी, नवोदित संशोधक, उद्योजक, व्यावसायिक, शिक्षणप्रेमींसह जिज्ञासू वाचकांसाठीही उपयुक्त आहे.

या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे हे पुस्तक उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी एकत्र येऊन लिहिले आहे. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी शिवाजी विद्यापीठातून एम.एस्सी., पीएच.डी. केले असून, अध्यापन व संशोधन क्षेत्रात त्यांचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी एआय व डेटा अ‍ॅनालिटिक्सविषयक अनेक प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या आहेत. डॉ. सयाजी हांडे इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटयूट, कोलकाता येथून एम.स्टॅट. पदवीधारक असून, परड्यू विद्यापीठ (अमेरिका) येथून त्यांनी पीएच.डी. पूर्ण केली आहे. त्यांना उद्योग क्षेत्रात तीन दशकांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी आयबीएम, अ‍ॅडोब यांसारख्या महत्वपूर्ण संस्थांसह भारत सरकार आणि अमेरिका सरकारसोबतही काम केले आहे. विनीत गुप्ता आयआयटी कानपूर येथून बी.टेक. आणि आयआयएम, अहमदाबाद येथून पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असून, मेटा (फेसबुक), अ‍ॅडोब, अ‍ॅडिडास यांसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये एआय क्षेत्रात कार्यरत आहेत. डॉ. सोमनाथ पवार यांनी शिवाजी विद्यापीठातून एम.एस्सी., पीएच.डी. केले असून, गेल्या दशकभरात ते अध्यापन, संशोधन व एआयशी संबंधित प्रकल्प मार्गदर्शनात सक्रिय आहेत.

शिवाजी विद्यापीठाने एआय व डेटा अ‍ॅनालिटिक्स या क्षेत्रात अभ्यासक्रम सुरु केले असून, या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यापीठाचे शैक्षणिक नवोपक्रम अधिक बळकट होतील. विद्यापीठाने केवळ शिक्षणपुरते मर्यादित न राहता, नवीन ज्ञाननिर्मिती व प्रसार करण्याचे महत्त्वाचे काम हाती घेतले आहे. हे पुस्तक सध्या शिवाजी विद्यापीठ कन्झ्युमर्स स्टोअर्स येथे आणि अमेझॉन इंडियावर ऑनलाईन स्वरूपात अत्यंत माफक किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे.

एमसीएच्या माजी विद्यार्थ्यांचा

शिवाजी विद्यापीठात स्नेहमेळावा

शिवाजी विद्यापीठात एमसीएच्या माजी विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांची सदिच्छा भेट घेतली.


शिवाजी विद्यापीठाच्या एमसीएच्या माजी विद्यार्थ्यांसमवेत कुलसचिव डॉ. विलास शिंदे, संगणकशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. कविता ओझा यांच्यासह आजी-माजी शिक्षक.
 
शिवाजी विद्यापीठ परिसरात स्नेहमेळाव्यानिमित्त वृक्षारोपण करताना एमसीएचे माजी विद्यार्थी आणि त्यांच्यासमवेत कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. कविता ओझा आदी.




एमसीएच्या माजी विद्यार्थ्यांचा

शिवाजी विद्यापीठात स्नेहमेळावा

कोल्हापूर, दि. ८ जुलै: माजी विद्यार्थ्यांचे लाभत असणारे प्रेम ही शिवाजी विद्यापीठाची मोठी संपत्ती आहे, असे गौरवोद्गार कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी काढले.

विद्यापीठाच्या संगणकशास्त्र अधिविभागातून सन २०००मध्ये एम.सी.ए. उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा ५ जुलै रोजी स्नेहमेळावा अधिविभागात पार पडला. यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. शिर्के यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचे कित्येक माजी विद्यार्थी केवळ देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःबरोबरच विद्यापीठाचे नाव चमकवित आहेत. विद्यापीठाप्रती त्यांचे प्रेमही कौतुकास्पद आहे. त्यामुळे माजी विद्यार्थी कॅम्पसवर येत राहणे आणि त्यांचे नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभत राहणे, ही बाब महत्त्वाची आहे. यावेळी कुलगुरूंनी गेल्या २५ वर्षांत शिवाजी विद्यापीठाने केलेली प्रगती, विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी राबविण्यात येत असलेल्या नवीन योजना आदींविषयीही उपस्थितांना अवगत केले.

यावेळी या विद्यार्थ्यांना शिकविणारे शिक्षकही उपस्थित होते. यामध्ये अंबुजा साळगावकर, श्री. बी.जे. जगदाळे, डॉ. ए.ए. कलगोंडा, सहाय्यक कुलसचिव सुरेश बंडगर हे प्रत्यक्ष तर श्री. रट्टीहाळी, श्री. प्रसाद ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहिले. डॉ. स्मिता काटकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. कविता ओझा यांनी अधिविभागाच्या वाटचालीविषयी माहिती दिली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनीही आपल्या बॅचमधील विद्यार्थी सध्या कुठे काम करतात, याविषयी माहिती दिली. डॉ. गायकवाड यांनी आभार मानले.

दुपारच्या सत्रात संगणकशास्त्र अधिविभागाच्या सायबर सिक्युरिटी इमारतीसमोर कुलसचिव डॉ. शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

मेळाव्याला अभिजीत जोगळेकर (सिनिअर टेक्निकल आर्किटेक्ट, एक्सेला टेक्नॉलॉजीज, पुणे), अभिजीत मराठे (प्रिन्सिपल आर्किटेक्ट, टेक्स्ट ग्लोबल, पुणे), चेतन शिंदे (संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी, एक्सपर्ट आयओएस, पुणे), नंदकिशोर जोशी (संचालक, ब्रॉडकॉम पुणे), सुहास मराठे (डिलिव्हरी तज्ज्ञ), गौरी पोतनीस (सोल्युशन आर्किटेक्ट, हिल्टाय, पुणे), संतोष गोरे (सिस्टीम आर्किटेक्ट, इंटेल, बेंगलोर), आशिष घाटे (सिस्टीम प्रोग्रामर, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), सुजीत जाधव (सिनिअर प्रिन्सिपल इंजिनिअर, डेल, बेंगलोर), शिवाजी गाढवे (असोसिएट डायरेक्टर, एलटीआय माईंडट्री, मुंबई), विद्याधर सावळे (टेक्नॉलॉजी स्पेशालिस्ट, सिनक्रॉन टेक्नॉलॉजीज) आणि सचिन घुगरदरे (प्रोजेक्ट मॅनेजर, कॅपजेमिनी, पुणे) हे माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम पार पाडण्यासाठी संगणक अधिविभागाच्या प्रमुख डॉ. कविता ओझा यांच्यासह शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Monday, 30 June 2025

‘प्राध्यापक’ दिगंबर शिर्के यांनी अधिविभागात घेतले अखेरचे लेक्चर!

 



(फोटोओळ- उपरोक्त सर्व फोटोंसाठी) शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागात शिक्षक म्हणून अखेरचे लेक्चर घेताना कुलगुरू तथा प्राध्यापक डॉ. दिगंबर शिर्के. 

(प्राध्यापक डॉ. दिगंबर शिर्के यांच्या निवृत्तीदिवशी अधिविभागातील अखेरच्या व्याख्यानाचा व्हिडिओ)


कोल्हापूर, दि. ३० जून: शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू तथा संख्याशास्त्र अधिविभागाचे प्राध्यापक डॉ. दिगंबर शिर्के यांनी त्यांच्या शिक्षक म्हणून अखेरच्या दिवशी विद्यार्थ्यांसमोर लेक्चर देऊन अधिविभागाचा निरोप घेतला. नियत वयोमानानुसार डॉ. शिर्के आज संख्याशास्त्र अधिविभागातून शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले.

आजचा काळ स्मार्ट क्लासरुम शिक्षणाचा असला तरी सच्चा हाडाच्या शिक्षकासाठी मात्र खडू, फळा आणि डस्टर या साधनांचेच आकर्षण असते. साधारण ४० वर्षांपूर्वी जून १९८५ मध्ये डॉ. शिर्के हे विद्यार्थी म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागात दाखल झाले. तेथपासून ते आजतागायत त्यांची संपूर्ण कारकीर्द शिवाजी विद्यापीठातच घडली, साकार झाली. विद्यार्थीदशेत असतानाच डॉ. शिर्के यांनी खडू, फळा आणि डस्टरधारी शिक्षक होण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्णही केले. शिक्षकापासून ते अधिविभाग प्रमुख पदापर्यंत आणि प्रशासनातील कुलसचिव पदापासून ते कुलगुरू पदापर्यंत त्यांनी सर्व पदे यशस्वीरित्या भूषविली. प्रशासनात असतानाही त्यांनी वेळोवेळी अधिविभागामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, अध्यापन केले. शिक्षक म्हणून आपल्या अखेरच्या दिवशीही आपण विद्यार्थ्यांसमोर खडू, फळ्यावर लेक्चर घ्यावयाचे, अशी सुप्त इच्छा डॉ. शिर्के यांच्या मनी होती. ती त्यांनी आज त्यांच्या शिक्षक पदाच्या अखेरच्या दिवशी पूर्ण केली.

सदर व्याख्यानासाठी ते नेहमीप्रमाणे अर्धा तास आधीच संख्याशास्त्र अधिविभागात उपस्थित झाले. शिकवावयाच्या विषयाचा अभ्यास केला. आवश्यक नोट्स तयार केल्या आणि वर्गात प्रवेश केला. त्यांनी "स्टॅटिस्टिकल सिम्युलेशन अँड इट्स अॅप्लीकेशन्स" या विषयावर अतिशय सोप्या पद्धतीने, सुसंगत उदाहरणांसह व्याख्यान दिले.

या व्याख्यानात त्यांनी अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशनच्या दि अमेरिकन स्टॅटिस्टिशियन या मान्यताप्राप्त शोधपत्रिकेमध्ये १९९१ साली प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधातील आयलस कॉन्स्टंट (e) संदर्भातील संख्याशास्त्रीय सिद्धांत, संकल्पना विद्यार्थ्यांना शिकवल्या. त्या संकल्पना सोप्या, स्पष्ट आणि विद्यार्थ्यांच्या आकलनास अनुरूप अशा शब्दांत मांडल्या.

विशेष म्हणजे, अधिविभागात स्मार्ट क्लासरुम आणि स्मार्ट बोर्ड असतानाही त्यांनी हा विषय खडू आणि फळा अशा पारंपरिक पद्धतीने शिकविण्याचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांनीही त्यांना उत्तम प्रतिसाद दिला. या विषयावर आधारित पुढील अभ्यास आणि संशोधनाच्या दिशांचे स्वरुप याविषयीही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन प्राध्यापक शिर्के यांनी आपल्या अधिविभागातील शिक्षक म्हणून अखेरच्या व्याख्यानाचा समारोप केला. कोणताही औपचारिक निरोप नाही, समारंभ नाही, पुष्पगुच्छांची देवाणघेवाण नाही, झाली ती केवळ विचारांची देवाणघेवाण. कुलगुरू पदाचा बडेजाव न मिरविता एक शिक्षक म्हणून आपले कर्तव्य बजावत असताना किती निरलस भावनेने निवृत्तीकडे सरकता येते, याचा वस्तुपाठच जणू डॉ. दिगंबर शिर्के यांनी या निमित्ताने घालून दिला.

Friday, 27 June 2025

कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांना ‘करवीर भूषण’ पुरस्कार प्रदान

 

शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांना रोटरी क्लब ऑफ करवीर यांचा 'करवीर भूषण' पुरस्कार प्रदान करताना राजूभाई दोशी. सोबत क्लबचे पदाधिकारी व सदस्य.


कोल्हापूर, दि. २७ जून: शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव तथा विज्ञान लेखक डॉ. विलास शिंदे यांना रोटरी क्लब ऑफ करवीर यांच्या वतीने नुकताच करवीर भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

रोटरी क्लब ऑफ करवीर यांच्या वतीने रेसिडेन्सी क्लब येथे ३६ व्या चार्टर नाईट सोहळा झाला. या प्रसंगी क्लबचा "करवीर भूषण" हा प्रतिष्ठेचा पुरस्कार कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांना राजूभाई दोशी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. शिंदे यांनी शिक्षण, प्रशासन व पर्यावरण या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आला.

डॉ. विलास शिंदे यांनी पुरस्काराबद्दल रोटरी क्लब ऑफ करवीरचे आभार मानले. आज खऱ्या अर्थाने आज करवीरवासी झाल्यासारखे वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

क्लबचे असिस्टंट गव्हर्नर गिरीश जोशी यांनी क्लबने वर्षभर विविध केलेल्या कार्याचा उल्लेख केला. अध्यक्षीय भाषणामध्ये प्रमुख पाहुणे राजूभाई दोशी यांनी रोटरी क्लब ऑफ करवीरने गेल्या पस्तीस वर्षांमध्ये अतिशय उल्लेखनीय कार्य केले आहे. भविष्यात क्लबमार्फत एखादा समाजोपयोगी कायमस्वरुपी भरीव प्रकल्प उभा करण्यासंदर्भात विचारविमर्ष करावा, असे आवाहन त्यांनी केले.

सुरवातीला क्लबचे अध्यक्ष कुशल पटेल यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर पर्यावरणविषयक लघुपट 'फाकड्या'चे प्रदर्शन करण्यात आले. त्याचे निर्माते व अभिनेते उत्तम पवार यांचा क्लब तर्फे मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दिलीप शेवाळे आणि डॉ. संदीप पाटील यांनी पाहुण्याचा परिचय करून दिला. निशिकांत नलवडे यांनी सूत्रसंचालन केले, तर सेक्रेटरी नारायण भोई यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमास असिस्टंट गव्हर्नर गिरीश जोशी, अध्यक्ष कुशल पटेल, सेक्रेटरी नारायण भोई, खजिनदार निलेश भादुले, माजी अध्यक्ष सुभाष आलेकर, संभाजी पाटील, दिलीप शेवाळे, दिलीप प्रधाने, निशिकांत नलवडे, हरेष पटेल, उदय पाटील, संजय पाटील, शितल दुग्गे, पंडित जाधव, चंद्रकांत कागले, क्लबचे सर्व सदस्य आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.