Showing posts with label 2018. Show all posts
Showing posts with label 2018. Show all posts

Thursday, 21 June 2018

विद्यापीठातील योग शिबिरात ११०० साधकांचा सहभाग

चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष योग शिबिराचे रोपास पाणी घालून उद्घाटन करताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह मान्यवर.

योग शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.

योग शिबिराविषयी मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र टाइम्सच्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक विजय जाधव.
योग शिबिरात सहभागी झालेल्या अनिता शिंदे यांच्यासह अरुंधती महाडिक, रेखा सारडा आदी

योग साधक








योग साधक


संलग्न महाविद्यालयांतून ३० हजार जणांचा सहभाग
कोल्हापूर, दि. २१ जून: शिवाजी विद्यापीठ, श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ (कणेरी) आणि दै. महाराष्ट्र टाइम्स यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठात आज सकाळी चौथा आंतरराष्ट्रीय योग दिन योग साधकांच्या उत्साही प्रतिसादामध्ये साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या लोककला केंद्रात झालेल्या या उपक्रमात सुमारे ११०० योग साधक सहभागी झाले. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांपासून ते शिक्षक, अधिकारी, महिला यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांचाही लक्षणीय सहभाग होता. येथील भागीरथी महिला संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांनीही या उपक्रमात सहभाग नोंदविला. संलग्नित महाविद्यालयांतून झालेल्या योग शिबिरांत सुमारे ३० हजार साधकांनी सहभाग नोंदविला.
संयुक्त राष्ट्र संघाच्या घोषणेनुसार २१ जून जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने आज शिवाजी विद्यापीठात सकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत पार पडला. पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसापासून म्हणजे २१ जून, २०१५ पासून 'योगशक्ती - योगयज्ञ'अंतर्गत योग प्रशिक्षण कार्यक्रम विद्यापीठात सलग तीन वर्षे राबविण्यात येत आहे. या योग उपक्रमाचा दैनंदिन २००हून अधिक साधक लाभ घेतात. त्याची यंदा यशस्वीरित्या त्रिवर्षपूर्ती झाली.
या वेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने जगभरातील नागरिकांत योगसाधनेविषयी जागृती निर्माण झाली आहे. स्थानिक पातळीवर नागरिकांना दैनंदिन स्वरुपात योगसाधना करण्यास प्रवृत्त करण्यात शिवाजी विद्यापीठ यशस्वी झाले आहे, याचे समाधान वाटते.
यावेळी महाराष्ट्र टाइम्सचे संपादक विजय जाधव म्हणाले, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या या उपक्रमातून शिवाजी विद्यापीठ आणि दै. महाराष्ट्र टाइम्सने कोल्हापूरच्या नागरिकांशी आरोग्याचे नाते निर्माण केले असून हे सहसंबंध अधिक दृढ झाले आहेत.
यावेळी कणेरी मठाच्या योग प्रशिक्षकांनी सुमारे दीड तास विविध योग प्रात्यक्षिके साधकांकडून करवून घेतली. कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास पाणी घालून उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, क्रीडा विभागप्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड, महाराष्ट्र टाइम्सच्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक विजय जाधव, मुख्य वार्ताहर गुरूबाळ माळी, सौ. अनिता शिंदे, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, रेखा सारडा यांच्यासह मठाचे अन्य साधक, तसेच विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, विविध अधिकार मंडळांचे सदस्य, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी सेवक उपस्थित होते.

संलग्न महाविद्यालयांतील शिबिरांत सुमारे ३० हजार जणांचा सहभाग
चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयांमधूनही योग शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार संलग्नित महाविद्यालयांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपापल्या आवारात योग शिबिरांचे नियोजन केले. या शिबिरांमध्ये सुमारे ३० हजार योग साधकांनी आपला सहभाग नोंदविला, अशी माहिती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड यांनी दिली.


Tuesday, 3 April 2018

शिवाजी विद्यापीठाचा कणबरकर राष्ट्रीय पुरस्कार

ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक जब्बार पटेल यांना जाहीर

डॉ. जब्बार पटेल

१३ एप्रिल रोजी पुरस्कार प्रदान सोहळा

कोल्हापूर, दि. ३ एप्रिल: शिवाजी विद्यापीठाच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा प्राचार्य आर.के. कणबरकर राष्ट्रीय पुरस्कार यंदा ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक जब्बार पटेल यांना आज जाहीर करण्यात आला. येत्या १३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता श्री. पटेल यांना सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू (स्व.) प्राचार्य रा.कृ. कणबरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार निर्मितीसाठी त्यांच्या कुटुंबियांनी शिवाजी विद्यापीठाकडे २५ लाख रुपयांची ठेव प्रदान केली आहे. श्रीमती शालिनी कणबरकर यांच्यासमवेत झालेल्या सामंजस्य करारातून शिवाजी विद्यापीठाच्या या माजी कुलगुरूंच्या स्मृतिप्रित्यर्थ 'प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार'ची संयुक्त निर्मिती करण्यात आली. देशातील शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा तसेच अन्य क्षेत्रांत अत्युत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तीला प्राचार्य कणबरकर यांच्या स्मृतिदिनी दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. रुपये लाख ५१ हजार रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यापूर्वी प्रथम पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. सी.एन.आर. राव यांना तर गतवर्षी दुसरा पुरस्कार रयत शिक्षण संस्थेला प्रदान करण्यात आला. यंदा ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी पुरस्कारासंदर्भात अधिक माहिती देताना शोध समितीचे सदस्य डॉ. जे.एफ. पाटील म्हणाले की, कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली शोध समितीने यंदा डॉ. जब्बार पटेल यांच्या भारतीय नाट्य-चित्रपट क्षेत्रातील योगदानाची आणि त्या माध्यमातून भारतीय समाजासाठी केलेल्या सेवेची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी एकमताने निवड केली. येत्या १३ एप्रिल २०१८ रोजी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शोध समितीचे सदस्य प्राचार्य डॉ. बी.ए. खोत, डॉ. भालबा विभुते, डॉ. एन.व्ही. चिटणीस, उपकुलसचिव विलास सोयम उपस्थित होते.
--
डॉ. जब्बार पटेल यांच्याविषयी थोडक्यात...
Dr. Jabbar Patel
पंढरपूर येथे दि. २३ जून १९४२ रोजी जन्मलेल्या डॉ. जब्बार पटेल यांची एक अत्यंत प्रतिभाशाली आणि सर्जनशील दिग्दर्शक ओळख आहे. घाशीराम कोतवाल, तीन पैशांचा तमाशा, अशी पाखरे येती यांसारख्या अजरामर नाटकांद्वारे जब्बार पटेल यांनी मराठी नाट्यसृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम केले. उत्तम अभिनेते, निर्माते आणि प्रयोगशील दिग्दर्शक अशा बहुआयामी कर्तृत्वाच्या डॉ. पटेल मराठी रंगभूमीच्या वाटचालीत अतुलनीय योगदान दिले आहे.  त्याचप्रमाणे सामना, सिंहासन, जैत रे जैत, मुक्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण: बखर एका वादळाची असे मराठीतील संस्मरणीय चित्रपट पटेल यांनी दिग्दर्शित केले आहेत. वेगळा विषय, वेगळा आशय नि वेगळी मांडणी हे पटेल यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
डॉ. पटेल यांनी पुण्याच्या बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेतले तरी त्यांनी कारकीर्द मात्र चित्रपट क्षेत्रातच करावयाचे ठरविले. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी लेखन, दिग्दर्शनात अनेक प्रयोग केले. अनेक एकांकिका, नाटके बसवली. नाट्य स्पर्धा गाजवल्या. अनिल अवचट यांच्यापासून ते कुमार सप्तर्षी यांच्यासारख्या मंडळींचा त्यांना सहवास लाभला. या काळात त्यांचा नाट्यसंस्था व कलावंतांशी संपर्क आला. डॉ. पटेलांनी त्यानंतर संपूर्णतः नाट्य व चित्रपट क्षेत्राला वाहून घेताना एकापेक्षा एक सरस नाटक व चित्रपट दिग्दर्शित केले. राजकीय सारीपाटावरचे शह काटशह मांडणारे सामना, सिंहासन, गो. नी. दांडेकरांच्या कादंबरीवर आधारित जैत रे जैत, मुक्ता, पु.ल. देशपांडेनी लिहिलेला 'एक होता विदूषक' असे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील चित्रपट त्यांच्या कारकिर्दीवर कळस चढविणारा ठरला. अनेक पैलू असणार्‍या आंबेडकरांचा जीवनपट अवघ्या तीन तासांत मांडणे ही अवघड बाब त्यांनी अत्यंत कौशल्याने साधली.
डॉ. पटेल यांनी थिएटर अॅकेडमी नावाच्या प्रायोगिक नाट्यसंस्थेची स्‍थापना केली आहे. सत्तरच्या दशकात विजय तेंडुलकर यांच्या 'घाशीराम कोतवाल' या नाटकाने देशातील सामाजिक, सांस्कृतिक वातावरण ढवळून काढले. या नाटकाचे दिग्दर्शन करून पटेलांनी ते परत रंगमंचावर आणले. या नाटकाने विक्रमी प्रयोगांची नोंद केली आहे. त्यांनी अनेक लघुपटही निर्माण केले आहेत. कुसुमाग्रजांवरील लघुपटासह इंडियन थिएटर, लक्ष्मण जोशी, मी एस. एम. असे काही महत्त्वाचे लघुपट सांगता येतील. अभिनेता म्हणूनही डॉ. पटेल यांनी काही नाटकांमधून कामे केली आहेत.