Showing posts with label Aurangabad. Show all posts
Showing posts with label Aurangabad. Show all posts

Monday, 3 June 2019

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे

औरंगाबाद विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार



Dr. Devanand Shinde
कोल्हापूर, दि. ३ जून: शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त प्रभारी कार्यभार सोपविण्यात येत असल्याचा आदेश कुलपती कार्यालयाकडून आज प्राप्त झाला आहे. कुलगुरू डॉ. शिंदे उद्या (दि. ४ जून) कार्यभार स्वीकारतील.
शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या कार्यकाळात डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे तिसरे विद्यापीठ आहे. यापूर्वी त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ या दोन विद्यापीठांच्या प्रभारी कुलगुरू पदाचा कार्यभारही सांभाळला आहे. औरंगाबाद विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने पुढील आदेश होईपर्यंत डॉ. शिंदे यांच्याकडे तेथील प्रभारी कार्यभार असणार आहे.
या अनुषंगाने प्रतिक्रिया व्यक्त करताना कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, ज्या मातृसंस्थेत मी शिकलो, जिथे वाढलो, जिच्या बळावर कुलगुरू पदापर्यंत मजल मारू शकलो, त्या मातृसंस्थेच्या कुलगुरूपदी काम करण्याची संधी मा. कुलपती श्री. चे. विद्यासागर राव यांनी दिली, हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. त्यासाठी कुलपती महोदयांचा मी मनापासून ऋणी आहे. ही संधी मिळण्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा मोलाचा वाटा आहे, हे आवर्जून नमूद करावेसे वाटते. त्यामुळेच मला अन्यत्रही कुलगुरू म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे, याविषयी मी कृतज्ञ आहे. विशेष म्हणजे फुले-शाहू-आंबेडकर या त्रयींच्या कर्मभूमीमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली. त्यांनी दिलेली समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांची पालखी घेऊन ज्ञानमार्गावरुन वाटचाल करता येते आहे, याचे मोठे समाधान वाटते, अशी भावना कुलगुरू डॉ. शिंदे यांनी व्यक्त केली.

Monday, 6 November 2017

शिवाजी विद्यापीठात ' ऍडव्हान्सड टेक्नॉलॉजी सेंटर'ची स्थापना

उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी विद्यापीठाने घेतला पुढाकार




औरंगाबादच्या इंडो जर्मन टूल रूमसमवेत झालेल्या सामंजस्य करारास मूर्त स्वरूप

कोल्हापूर. दिनांक ०५ नोव्हेम्बर, २०१७ - पश्चिम महाराष्ट्रातील उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबरोबरच अभियांत्रिकीतील अत्याधुनिक संशोधनाकरिता  शिवाजी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व इंडो जर्मन टूल रुम, औरंगाबाद यांच्यात झालेल्या  सामंजस्यकरारानुसार विद्यापीठात 'ऍडव्हान्सड टेक्नॉलॉजी सेंटर' - ए सेंटर फॉर ट्रेनिंग, रिसर्च अँड डेव्हलपमेंटची स्थापना करण्यात आली आहे. विद्यापीठ या सेंटरच्या माध्यमातून कौशल्याधारित प्रशिक्षण, समाजोपयोगी संशोधन व मनुष्यबळ विकास अश्या प्रशिक्षण - संशोधन - विकास या तीन घटकांवर भरीव काम करणार असल्याचे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ) देवानंद शिंदे यांनी सांगितले. 
            नॅक मार्फत 'A' मानांकित शिवाजी विद्यापीठाने गतवर्षी संशोधन व गुणवत्तेच्या जोरावर 'एन. आय. आर. एफ.' मध्ये देशभरातून अठ्ठाविसावे स्थान पटकाविले आहे. नुकतेच राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान ​(रुसा) अंतर्गत ३२ विद्यापीठातील यादीत शिवाजी विद्यापीठाचा समावेश झाला आहे. भरीव संशोधनाच्या पायावर शिवाजी विद्यापीठ भारतातील एक अग्रगण्य विद्यापीठ बनले आहे. विद्यापीठ स्थानिक उदयॊगाच्या समस्या सोडविण्याकरिता तसेच मनुष्यबळाची रोजगारक्षमता वाढविण्याकरिता प्रयत्न करीत आहे.  ऍडव्हान्सड टेक्नॉलॉजी सेंटरच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठाने महत्वाचे पाऊल उचललेले आहे. कोल्हापुरातील विविध औद्योगिक वसाहतींमधील उदयॊगांच्या आवश्यक गरजांना  समजून घेऊन  नीड बेस्ड कोर्सेस या सेंटरच्या माध्यमातून दिले जातील. कौशल्य विकास ही देशासाठी काळाजी गरज आहे. या सेंटरमध्ये  विद्यापीठ परिक्षेत्र तसेच परिक्षेत्राबाहेरील ​विविध  अभियांत्रिकी व इतर ​विद्याशाखांचे विद्यार्थी, प्राध्यापक, उद्योजक व संशोधक याना भारत सरकारच्या एम. एस. एम. ई. मंत्रालयाअंतर्गत इंडो जर्मन टूल रूम औरंगाबादच्या सहाय्याने अप्लाईड कोर्सेसच्या माध्यमातून कौशल्ये प्रदान केली जातील. भारत सरकारच्या स्टार्ट अप प्रकल्पाअंतर्गत आय. जी.  टी. आर. औरंगाबाद येथेही  प्रगत संशोधनाची सोय उपलब्ध करून दिली जाईल. याद्वारे भविष्यात विद्यापीठात डिपार्टमेंटऑफ टेक्नॉलॉजी येथे पदव्युत्तर अभ्यासक्रमांची सुरुवात करता येईल, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ) देवानंद शिंदे यांनी दिली.  
            येथील कोर्सेस १० वी पास, १२ वी पास, आय.टी.आय, डिप्लोमा, डिग्री आदी विविध शैक्षणिक अर्हतांधारकांसाठी असून या सर्व कोर्सेसची विस्तृत माहिती ​​विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध ​आहे. उद्योगांना आवश्यकतेनुसार टेलरमेड कोर्सेसदेखील हे सेंटर देणार आहे. या सेंटरच्या माध्यमातून नव संशॊधानाला तसेच विद्यार्थ्यांमधील उद्योजकतेला प्रोत्साहन मिळणार आहे. हॅन्ड्स ऑन ट्रेनिंग विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे असल्याचे ​​डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी​चे ​संचालक ​​प्रा. (डॉ) जयदीप बागी​ ​यांनी  सांगितले. 


या पत्रकारपरिषदेस विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा.(डॉ) .डी.टी.शिर्के, कुलसचिव प्रा.(डॉ).व्ही.डी. नांदवडेकर,  परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक श्री. एम. ए. काकडे, वित्त व ले​खा  अधिकारी श्री. ए. बी. चौगुले, ​​​​डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी​चे  संचालक ​​प्रा. (डॉ) जयदीप बागी तसेच ऍडव्हान्सड टेक्नॉलॉजी सेंटरचे समन्वयक श्री. हर्षवर्धन पंडित आदी उपस्थित होते. 

काय आहे इंडो जर्मन टूल रूम ?- 
देशातील उद्योगांच्या, विशेषतः सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या वाढ व विकासाला चालना देण्याकरिता भारत सरकारने इंडो जर्मन टूल रूमची स्थापना केली. आय.जी.टी.आर औरंगाबाद उद्योगांना जागतिक दर्जाचे उत्पादन व सेवा प्रदान करते. भारत सरकार, जर्मनीचे संघीय प्रजासत्ताक सरकार व महाराष्ट्र सरकार यांचा एकत्रित प्रकल्प असलेले इंडो जर्मन टूल रूम, औरंगाबाद आंतरराष्ट्रीय दर्जाची गुणवत्ता साधने, प्रशिक्षित कर्मचारी तसेच कन्सल्टन्सी देते. महाराष्ट्रात पुणे, नागपूर व मुंबई येथे आय.जी.टी.आरची तीन उपकेंद्रे असून महाराष्ट्रातील चौथे उपकेंद्र कोल्हापूर येथे ऍडव्हान्सड टेक्नॉलॉजी सेंटरच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठात सुरु झाले आहे. 
--------

"शिवाजी विद्यापीठाने ज्ञानदान व प्रगत संशोधनाबरोबरच स्थानिक उद्योगांच्या विकास व सक्षमीकरणाकरिता अत्यंत महत्वाचा पुढाकार घेतला आहे. कोल्हापुरातील विविध औद्योगिक वसाहतीतील उद्योगाच्या तांत्रिक अडचणी समजून घेऊन त्यावर उपाय योजनाकरिता प्रशिक्षित कौशल्यपूर्ण मनुष्यबळ उपलब्ध करून पश्चिम महाराष्ट्रातील उद्योगाला विकासाच्या नवीन उंचीवर नेण्याकरीता विद्यापीठ कटिबद्ध आहे." 
--- प्रा. (डॉ) देवानंद शिंदे, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ


कोर्सेसची माहिती : 
  • विविध शॉर्ट टर्ममेडीयम टर्म व लॉन्ग टर्म कोर्सेस 
  • विविध इंजिनियरिंग सॉफ्टवेर्सच्या कोर्सेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढणार 
  • स्किलबेस्ड कोर्सेसमुळे नोकरीच्या संधी वाढतील 
  • महिलांना व्होकेशनल स्किल्स देण्याची सोय
  • कोल्हापूर व आजूबाजूच्या परिसरातील उद्योगांना टेक्निकलटेस्टिंग व ऍनालिसिस आदींची कन्सल्टन्सी उपलब्ध होणार 
  • विविध व्होकेशनल कोर्सेस तसेच वर्किंग प्रोफेशनल्स आदींसाठी एक्सलुसीव्ह कोर्सेस 
  • टेक्निकल डोमेन्समधील लेटेस्ट डेव्हलपमेंट समजून घेता येणार 
  • अद्ययावत उपकरणांवर 'हॅन्ड्स ऑन ' ट्रेनिंग आय.जी.टी.आर प्रशिक्षक देणार 
  • संशोधन व प्रकल्पांवर संयुक्तपणे काम होणार 
  • विद्यार्थ्यांनी अद्ययावत तांत्रिक ज्ञानकौशल्य व क्षमता मिळवाव्या याकरीता प्रयत्न  
  • अभियांत्रिकीच्या Mechanical Engineering, Production Engineering, Automobile Engineering, Civil Engineering, Electronics  and Telecommunication Engineering,  Computer Science and Technology आदी शाखांमध्ये विविध कार्यशाळाचर्चासत्रे होणार 
  • कोर्सेस:अटोकॅडसॉलिडवर्क्सकटियायुनिग्राफिक्सडेलकॅममास्टरकॅमअँसिसरेव्हीट आर्किटेक्चरपी. एल. सी. प्रोग्रामिंगस्काडाव्ही. एल. एस. आय. , टूल डिझाईन आदी शॉर्ट टर्म (७२-९६ तास)मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन टूल डिझाईनमास्टर सर्टिफिकेट कोर्स इन कॅड/कॅम असे मेडीयम टर्म तसेच पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन टूल डिझाईन अँड कॅड/कॅमपोस्ट डिप्लोमा इन टूल डिझाईन अँड कॅड/ कॅम असे लॉन्ग टर्म कोर्सेस 

Thursday, 19 May 2016

'आयजीटीआर'च्या सहकार्याने औद्योगिक व्यवस्थेस पूरक मनुष्यबळ पुरविणार : कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे




शिवाजी विद्यापीठ आणि आयजीटीआर, औरंगाबाद यांच्यात सामंजस्य करार

कोल्हापूर दि. 17 मे: इंडो जर्मन टूल रुम, औरंगाबाद यांच्या सहकार्याने विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील तिन्ही जिल्ह्यांमधील औद्योगिक व्यवस्थेस पूरक मनुष्यबळ पुरविण्याचे प्रयत्न सामंजस्य कराराच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.डॉ.देवानंद शिंदे यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन सभागृहामध्ये विद्यापीठ आणि औरंगाबाद येथील आयजीटीआर या संस्थेमध्ये झालेल्या सामंजस्य करार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बीसीयुडी संचालक डॉ.डी.आर.मोरे, प्र.कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, डॉ.अजित थेटे, डॉ.अजित थेटे, डॉ.जी.एस.कुलकर्णी, गोपाळ बेलूरकर आदी उपस्थित होते.
कुलगुरु डॉ. शिंदे म्हणाले, भविष्यामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स विद्यापीठामध्ये उभारले जाणार आहे. आयजीटीआर, औरंगाबाद यांच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठीचे आवश्यक ते शिक्षण विद्यापीठामध्ये दिले जाईल. त्याचे प्रशिक्षण आयजीटीआर, औरंगाबाद येथे विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनाही दिले जाणार आहे. उद्योग व्यवस्थेनेही कोणत्या क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे हे विशद करणे आवश्यक आहे. यासाठी उद्योजकांचे सहकार्य आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या भागातील विद्यार्थ्यांना तशा प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध होईल.
          इंडो जर्मन टूल रुम औरंगाबादचे व्यवस्थापकीय संचालक हेमंत कापसे यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्राचार्य उद्योजक यांना आयजीटीआर, औरंगाबाद या संस्थेचे कार्य प्रेझेंटेशनद्वारे सादर केले. हेमंत कापसे पुढे म्हणाले, उद्योग क्षेत्रास कुशल मनुष्यबळ पुरविणे हा या कराराचा एक भाग असून उद्योगक्षेत्रामध्ये नवतंत्रज्ञानामुळे सातत्याने होणारे बदल हे तळागाळातील लोकांपर्यंत आवश्यकतेप्रमाणे पोहचविण्याचे कार्य केले जाईल. आयजीटीआरचे केंद्र तसेच विद्यापीठातील संशोधकांसाठी औरंगाबाद येथे प्रगत संशोधनाची सोय उपलब्ध होणार आहे. शिवाजी विद्यापीठ आणि आयजीटीआर, औरंगाबाद यांच्या एकत्रित प्रयत्नातून येथील विद्यार्थ्यांना विविध तंत्रकौशल्य आत्मसात करण्याच्या संधी उपलब्ध होणार आहे. तसेच, या प्रयत्नातून उद्योगांच्या आवश्यकतेप्रमाणे कमी कालावधीचे सर्टिफिकेट कोर्सेस प्रशिक्षणार्थींना उपलब्ध होणार आहे.
           या वेळी अनेक उद्योजकांनी कुशल प्रशिक्षणार्थीची अत्यंत निकड असल्याचे सांगून संबंधि विषयांवर चर्चा केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योग तंत्रसंस्था आंतर क्रिया कक्षाचे समन्वयक हर्षवर्धन पंडित यांनी केले. तर आभार मेकॅनिकल इंजिनिअरींगचे समन्वयक अजित कोळेकर यांनी मानले. या प्रसंगी विविध अभियांत्रिकी विभागाचे समन्वयक, शिक्षक उद्योजक उपस्थित होते.