Showing posts with label Chh. Shivaji Maharaj. Show all posts
Showing posts with label Chh. Shivaji Maharaj. Show all posts

Monday, 6 March 2023

जनमानसातील इतिहासाची उपेक्षा दूर करणे आवश्यक: कुमार केतकर

 महान शिवाजी महाग्रंथाचे शिवाजी विद्यापीठात प्रकाशन

शिवाजी विद्यापीठात 'महान शिवाजी' महाग्रंथाचे प्रकाशन करताना ज्येष्ठ संपादक, खासदार कुमार केतकर. सोबत (डावीकडून) डॉ. जयसिंगराव पवार, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व वसंत आपटे



शिवाजी विद्यापीठात 'महान शिवाजी' महाग्रंथाच्या प्रकाशन समारंभात बोलताना ज्येष्ठ पत्रकार-संपादक व खासदार कुमार केतकर.

शिवाजी विद्यापीठात 'महान शिवाजी' महाग्रंथाच्या प्रकाशन समारंभात बोलताना ज्येष्ठ पत्रकार-संपादक व खासदार कुमार केतकर. मंचावर (डावीकडून) डॉ. जयसिंगराव पवार, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व वसंत आपटे




कोल्हापूर, दि. ६ मार्च: जनमानसातील इतिहासविषयक उपेक्षेची भावना दूर करण्यासाठी त्यांच्या मनातील आदर्श व्यक्तीमत्त्वांच्या चरित्रांचा आधार घ्यायला हवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक, पद्मश्री खासदार कुमार केतकर यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्राच्या वतीने डॉ. बाळकृष्ण लिखित शिवाजी द ग्रेट या चार खंडांच्या महाग्रंथाचा मराठी अनुवाद महान शिवाजी या नावाने करण्यात आला आहे. डॉ. जयसिंगराव पवार संपादक असून वसंत आपटे अनुवादक आहेत. याचा प्रकाशन समारंभ आज विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात आयोजित करण्यात आला. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून श्री. केतकर बोलत होते. कार्यक्रमास श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार प्रमुख उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.

इतिहासाच्या अभ्यासासाठी देशात पोषक वातावरण निर्माण होणे अत्यंत आवश्यक असून त्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता प्रतिपादन करून केतकर म्हणाले, इतिहास हा मुद्दा आपण अत्यंत काळजीपूर्वक पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. महान शिवाजी हा मूळ ग्रंथ ज्यांनी लिहीला, त्या डॉ. बाळकृष्ण यांचे मूळ मुलतान आहे, जे सध्याच्या पाकिस्तानात आहे. पण, ते पाकिस्तानात आहे म्हणून त्या ठिकाणाचा द्वेष करण्याचे कारण नाही. कारण इतिहासात मुलतान हे बौद्ध, जैन, हिंदू या सर्वच परंपरांचे पवित्र ठिकाण होते. तेथे त्यांच्या यात्रा भरत. पण इतिहासाच्या ज्ञानाअभावी ते आपल्या द्वेषाला कारण ठरते. तसे होऊ नये. तेथून महाराष्ट्रात येऊन डॉ. बाळकृष्ण महाराष्ट्रवासी झाले, ते कायमचेच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ते इतके प्रेमात पडले की, त्यांचे अस्सल साधनांनिशी चरित्र लिहीणे, हे त्यांनी आपले जीवितकार्य मानले आणि पूर्णत्वास नेले. तत्कालीन व्यवस्थेमध्ये बाळकृष्णांना महाराज हे राष्ट्रीय चळवळीचे व स्वातंत्र्याचे प्रतीक वाटले असावेत, यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. ही त्यांची महाराजांवरील अपार निष्ठा होती. जोपर्यंत आपण विद्यार्थ्यांत इतिहासाबद्दल आस्था निर्माण करीत नाही, तोवर बाळकृष्णांचे योगदान त्यांच्या ध्यानी येणार नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य या संकल्पनेचे वेगळेपण व महत्त्व अधोरेखित करताना कुमार केतकर म्हणाले, सार्वभौम स्वराज्याची संकल्पना जागतिक स्तरावर सुद्धा अस्तित्वात नसण्याच्या कालखंडात शिवाजी महाराजांनी त्या संकल्पनेवर आधारित स्वराज्य स्थापन केले. त्यांच्या प्रत्येक आदेशात, निर्णयात रयतेच्या हिताचा, कल्याणाचा विचार असे. महाराजांनी आपल्या साथीदारांना कधीही जहागिरी वाटल्या नाहीत. पिळवणुकीची, शोषणाची व्यवस्था त्यांनी स्वराज्यात कधीही निर्माण होऊ दिली नाही. आधुनिक सार्वभौम प्रजासत्ताकाच्या पद्धतीने राज्य चालविले. महाराजांनी लोकशाही मूल्ये स्वराज्यात ज्या पद्धतीने रुजविली, त्याला तोड नाही. तुलनेने लहान भूगोलावर महाराजांनी जे पेरले, त्याची दहशत त्याहून किती तरी पटींनी मोठ्या पातशाह्यांना होती. परकीय अभ्यासक, संशोधकांना त्यांचे आकर्षण होते. याचे कारण त्यांच्या राज्यपद्धतीमध्ये आहे. त्या दृष्टीने महाराजांचे रयतेच्या दृष्टीने काय योगदान होते, त्याची सातत्याने चर्चा होणे आवश्यक आहे. त्या काळात देशात अस्तित्वात असलेल्या ६५० संस्थानिकांपैकी एकाला सुद्धा आपले आरमार असावेसे वाटले नाही, पण शिवाजी महाराजांना सागरावरील अधिपत्याची आवश्यकता जाणवली होती, हे त्यांचे सर्वात मोठे वेगळेपण आहे. या सर्व बाबी समजून घेण्याची नितांत आवश्यकता आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, डॉ. बाळकृष्ण यांनी शिवाजी महाराजांचे विविध संदर्भसाधनांचा वापर करून पहिलेच विस्तृत चरित्र साकारले. महाराजांना शिवाजी द ग्रेट असे संबोधून जगज्जेता एलेक्झांडरच्या तोडीचे त्यांचे कार्य असल्याचे प्रथमच निदर्शनास आणून दिले. शंभर वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांचे नाव घेईल, तो ब्रिटीशांचा शत्रू, असे एक चित्र होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी थेट प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हातूनच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पायाभरणी करवून घेऊन त्यांच्याभोवतीचे हे अप्रसिद्धीचे कडे भेदले.

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, डॉ. बाळकृष्ण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक पैलू ससंदर्भ सामोरे आणले आहेत. मराठा आरमाराचे जनक, हिंदी राष्ट्रीयत्वाचे प्रेरणास्थान आणि भारतीय स्वातंत्र्याचा ध्रुवतारा अशी महाराजांविषयीची वर्णने डच कागदपत्रांमध्ये सतराव्या शतकामध्येच करण्यात आली आहेत. ती बाळकृष्ण येथे सविस्तर मांडतात. इंग्लीश, फ्रेंच, डच, पोर्तुगीज अशा सर्व प्रकारच्या अस्सल कागदपत्रांच्या आधारे त्यांनी महाराजांचे मोठेपण अधोरेखित केले आहे. सर्व बाजूंनी बलाढ्य शत्रूंनी घेरले गेले असताना सुद्धा शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करवून घेणे हे विस्मयजनक असल्याचे निरीक्षण डच अभ्यासकांनी नोंदविल्याचे येथे दिसते. त्याचप्रमाणे महाराजांच्या जडणघडणीतील माता जिजाऊंचे योगदानही सांगितले आहे. त्याग, सदाचार, कर्तव्यकठोरता, आदर आणि सन्मान अशी उच्चतम मूल्ये जिजाऊंनी शिवरायांच्या मनात रुजविली. मृत्यूसमयी जिजाऊंनी शिवाजी महाराजांसाठी २५ हजार पागोडे बाजूला काढून ठेवल्याची नोंदही यामध्ये आढळते. यावेळी डॉ. पवार यांनी डॉ. बाळकृष्ण व छत्रपती राजाराम महाराज यांचे शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेमधील योगदानही अधोरेखित केले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी डॉ. पवार यांच्या मागणीचा संदर्भ घेऊन या वर्षीपासून डॉ. बाळकृष्ण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ व्याख्यानमाला सुरू करण्यात येईल, याची ग्वाही दिली. त्याचप्रमाणे महान शिवाजी हा ग्रंथ राज्यातील सर्व विद्यापीठांना विशेष दूताकरवी पाठविण्यात येईल, असेही सांगितले.

यावेळी अनुवादक वसंत आपटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज व डॉ. बाळकृष्ण यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कुमार केतकर यांच्या हस्ते महान शिवाजी या द्विखंडीय महाग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. देविकाराणी पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिवप्रेमी नागरिक, अभ्यासक, संशोधक, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sunday, 19 February 2023

तरुणाईच्या आकर्षक सादरीकरणांसह

शिवाजी विद्यापीठात शिवजयंती उत्साहात

 

(शिवाजी विद्यापीठात साजऱ्या झालेल्या शिवजयंती सोहळ्याचा व्हिडिओ)

शिवाजी विद्यापीठात शिवजयंतीनिमित्त कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजास वंदन करण्यात आले.

शिवजयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवर. 

शिवाजी विद्यापीठात शिवजयंतीनिमित्त कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

शिवजयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात ढोल-ताशा वादन करताना विद्यार्थी.

शिवजयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात सादरीकरण करताना विद्यार्थिनींचे झांजपथक

शिवजयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात जरीपटका मिरविताना विद्यार्थिनींचे पथक

शिवाजी विद्यापीठात शिवजयंतीनिमित्त लेझीम प्रात्यक्षिके सादर करताना विद्यार्थिनी


कोल्हापूर, दि. १९ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठात आज शिवजयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. तरुणाईकडून उत्स्फूर्तपणे काढण्यात आलेली शोभायात्रा, लेझीम, ढोल व झांजपथकाचे उत्कृष्ट सादरीकरण, जरीपटक्याचे मिरविणे यांमुळे विद्यापीठाचा परिसर आज पूर्णपणे शिवमय होऊन गेला.

विद्यापीठात आज सकाळी ठीक साडेआठ वाजता कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजास वंदन करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. यानंतर कुलगुरू डॉ. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवरांनी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यास पुष्प वाहून अभिवादन केले, त्याचप्रमाणे शिवप्रतिमेसही पुष्पहार घालून अभिवादन केले.

या प्रसंगी विद्यापीठाच्या वसतीगृहातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसह राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी विद्यापीठ परिसरात ढोल-ताशाच्या निनादात भव्य शोभायात्रा काढली. भगवे फेटे आणि शुभ्रवस्त्रांकित तरुणाईमुळे ही शोभायात्रा लक्ष्यवेधी ठरली. शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आल्यानंतर तेथे आणि मुख्य प्रशासकीय भवन इमारतीसमोर या विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कारांचे सुमारे दोन तास सादरीकरण केले. यामध्ये झांजपथकाचे सादरीकरण, लेझीम प्रात्यक्षिके जरीपटका नाचविण्याचा उपक्रम यांचा समावेश होता. सळसळत्या तरुणाईच्या उत्साहाने विद्यापीठाचा परिसर पूर्णपणे शिवमय होऊन गेला. कुलगुरू डॉ. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांनी पूर्णवेळ उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणाला प्रोत्साहन दिले. त्याचप्रमाणे त्यांच्या उत्साहपूर्ण सादरीकरणाबद्दल कौतुकही केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रापासून प्रेरणा घेऊन, त्यांनी दाखविलेल्या मार्गावरुन आपल्याला वाटचाल करावयाची आहे, याचे भान बाळगून या तरुणांनी देशहितासाठी स्वतःस तयार करावे, असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.

यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. धनंजय सुतार, इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनिश पाटील, डॉ. प्रल्हाद माने, डॉ. प्रभंजन माने यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday, 19 February 2022

छत्रपती शिवाजी महाराज हेच सर्वार्थाने भारतीय आरमाराचे जनक: डॉ. सुरेश शिखरे

 

डॉ. सुरेश शिखरे


('छत्रपती शिवाजी महाराज यांची आरमार निती' व्याख्यानाचा व्हिडिओ)


शिवजयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात विशेष व्याख्यान

कोल्हापूर, दि. १९ फेब्रुवारी: छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या राष्ट्रीय जाणिवेतून आणि गांभीर्यपूर्वक आरमाराची उभारणी केली, ती पाहता ते सर्वार्थाने भारतीय आरमाराचे जनक आहेत, असे प्रतिपादन इतिहास संशोधक डॉ. सुरेश शिखरे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग आणि जनसंपर्क कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आज शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांची आरमार निती या विषयावर विशेष ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यावेळी विषयतज्ज्ञ व्याख्याते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील प्रमुख उपस्थित होते. विद्यापीठाच्या 'शिव-वार्ता' या युट्यूब वाहिनीवरुन व्याख्यान प्रसारित करण्यात आले.

डॉ. शिखरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमार नितीच्या प्रेरणा, कारणे आणि परिणाम या अनुषंगाने तपशीलवार चर्चा केली. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे सागरी शक्तींना शह देऊन व्यापारी नियंत्रण प्राप्त करण्यासाठी सुरवातीपासूनच पश्चिम किनारपट्टीवर बारीक लक्ष होते. पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच आदी सागरी संस्कृतीचा पुरस्कार करणाऱ्या सत्ताधीशांना शह देऊन सागरी व्यापारावर नियंत्रण प्रस्थापित करावयाचे असेल, तर स्वतःचे सक्षम आरमार असले पाहिजे, ही जाणीव त्यांना होती. त्या दिशेने त्यांनी सातत्याने मोहिमांचे नियोजन केले. आरमाराच्या बळावर गब्बर झालेल्या सिद्दी, पोर्तुगीज या सागरी सत्तांच्या गुलामगिरीतून स्थानिकांची मुक्तता करणे, हाही एक प्रमुख उद्देश त्यांच्या आरमार निर्मितीमागे होता. जहाजबांधणी तंत्रज्ञान आणि आरमारी युद्धाचे कौशल्यज्ञान हे भारतातून लुप्त झाले होते. त्याचा शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना पुनःपरिचय करून दिला. आरमार निर्मितीच्या माध्यमातून त्यांच्यात आत्मविश्वास पेरण्याचे कार्यही महाराजांनी केले. उसळलेल्या समुद्रात टिकणाऱ्या नौकांची निर्मिती करण्यासाठी महाराजांनी पोर्तुगीज आणि इंग्रजांचीही मदत घेतली. त्यासाठी आवश्यक अर्थउभारणीही केली. महत्त्वाचे म्हणजे समाजात सिंधुबंदीची मानसिकता खोलवर रुजलेली असतानाही त्यावर मात करीत महाराजांनी नेटकेपणाने आरमारनिर्मितीचे कार्य हाती घेतले आणि त्यामध्ये सर्व समाजघटकांचे सहकार्यही घेतले. हे करीत असताना आपला आश्वासक आणि लोककल्याणकारी राज्याचा मूलमंत्रही वृद्धिंगत केला. नाविकज्ञान सहजासहजी निर्माण होत नाही. त्यासाठी पिढ्यान्-पिढ्या जाव्या लागतात. असे असतानाही अत्यंत विपरित परिस्थितीतून महाराजांनी युरोपियनांच्या तोडीचे स्वतःचे आरमार निर्माण केले, ही प्रचंड कौतुकास्पद बाब आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी संस्कृतीच्या व्यापाऱ्यांची साम्राज्यशाही मानसिकता प्रकर्षाने ओळखलेली होती, हे महाराजांच्या एका आज्ञापत्राचा दाखला देऊन सांगताना डॉ. शिखरे म्हणाले, शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच आदी टोपेकरांशी कसे वागावे, हे एका आज्ञापत्रातूनच अत्यंत बारकाईने स्पष्ट केले होते. यात त्यांनी विविध सूचना केल्या होत्या. टोपेकरांना कोणीही व्यापारासाठी म्हणून सुद्धा कायमस्वरुपी जागा देऊ नये. जलदुर्गांच्या आसपासही त्यांना फिरकू देऊ नये. जागा द्यायचीच झाल्यास समुद्राच्या, दुर्गाच्या आसपास न देता आत खोलवर खाडीप्रदेशात द्यावी. त्यातही दोन शहरांच्या मधोमध निकृष्ट जागी द्यावी. त्यांना कायमस्वरुपी बांधकामास परवानगी देऊ नये. मोठी जागा देऊ नये. या सूचनांचे पालन झाले नाही, तर त्यांच्या आरमार आणि दारुगोळ्याला तुम्ही निश्चितपणे बळी ठराल, असा इशारा महाराजांनी दिला होता. आरमार हे राज्याचे स्वतंत्र अंगच आहे. ज्याचे आरमार, त्याचा समुद्र या भू-राजनैतिक धोरणाची जाणीव महाराजांच्या ठायी तीव्र होती. या दृष्टीकोनामुळेच महाराजांनी केलेल्या या सूचना पाहता या व्यापारी परकीयांना त्यांनी किती सूक्ष्मपणाने ओळखले होते, हे लक्षात येते. त्यांना या देशात पाय रोवू न देण्याची खबरदारी त्यांनी कटाक्षाने घेतलेली होती. ती खबरदारी पुढील राज्यकर्त्यांनीही घेतली असती, तर कदाचित हा देश इंग्रजांच्या ताब्यातही गेला नसता. त्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्याचा पहिला हुंकार देणारे पहिले राज्यकर्ते म्हणूनही आपल्याला छत्रपती शिवरायांकडे पाहावे लागते, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

शिवरायांनी किल्ले व दुर्गबांधणी करताना बाळगलेला शास्त्रीय दृष्टीकोन, त्यांचे स्थापत्यविषयक ज्ञान, स्वच्छतागृहे व शौचालयांच्या बांधणी करताना घेतलेली दक्षता पाहता महाराज हे एक थोर शास्त्रज्ञच होते. त्यांच्या या पैलूचा अधिक तपशीलाने अभ्यास करण्याची गरज डॉ. शिखरे यांनी अधोरेखित केली.

महाराजांचे स्त्रीदाक्षिण्य आणि धार्मिक सहिष्णुता

शिवाजी महाराज जेव्हा बसरुरच्या मोहीमेवर आरमार घेऊन गेले होते, तेव्हा परतीच्या प्रवासात कारवारची बाजारपेठ लुटण्याचा त्यांचा मानस होता. नेमकी त्याचवेळी आदिलशहाची आई बडी बेगम ही मक्केला जाण्यासाठी काही खरेदी करण्यासाठी कारवार येथे आलेली होती. तेव्हा तिच्या संरक्षणासाठी सोबत आलेल्या शेरखान याने शिवाजी महाराजांची भेट घेऊन त्यांना कारवारवर स्वारी न करण्याविषयी विनंती केली. तेव्हा तेथील व्यापाऱ्यांकडून खंडणी देण्याच्या मोबदल्यात महाराजांनी आपल्या स्वारीचा बेत रद्द केला. शत्रूच्या आईला देखील अभय देण्याच्या या प्रसंगातून महाराजांचे स्त्रीदाक्षिण्य तसेच धार्मिक सहिष्णुताही दिसून येते, असे डॉ. शिखरे यांनी सांगितले. मात्र, त्याचवेळी बार्देश येथे स्थानिक नागरिकांना सक्तीने धर्मांतर करावयास लावणाऱ्या आणि धर्मांतर न करणाऱ्या नागरिकांचा शिरच्छेद करणाऱ्या जुलमी पोर्तुगीज पाद्र्यांचा शिरच्छेद करायलाही महाराजांनी कमी केले नाही, असेही त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, भय हा शब्द शिवाजी महाराजांच्या कोषात नव्हता. कोणत्याही संकटाला न डगमगता सामोरे जाण्याचा महाराजांचा गुण अत्यंत अनुकरणीय व आदर्शवत असा आहे. समुद्रावर स्वामित्व प्राप्त करून स्वराज्याचा व्यापार विस्तार आणि संरक्षण करण्याचे ध्येय बाळगून ते सिद्धीस नेणाऱ्या महाराजांचे द्रष्टेपणच त्यातून अधोरेखित होते. महाराजांचे हे द्रष्टेपण आणि गुण आत्मसात करण्याचा आपण प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनिश पाटील यांनी स्वागत व परिचय करून दिला. जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले.