Showing posts with label Dr. D.R. More. Show all posts
Showing posts with label Dr. D.R. More. Show all posts

Monday, 8 August 2016

अण्णाभाऊंच्या साहित्यात नवमहाराष्ट्र निर्मितीच्या प्रेरणा: उत्तम कांबळे




कोल्हापूर, दि. ८ ऑगस्ट: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे सर्वंकष योगदान आहेच; त्याचप्रमाणे नवमहाराष्ट्र निर्मितीच्या प्रेरणाही त्यांच्या साहित्याने, लोकलढ्याने महाराष्ट्राला प्रदान केल्या, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व संपादक उत्तम कांबळे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राच्या वतीने अण्णाभाऊंच्या ९६व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय चर्चासत्रात उद्घाटक या नात्याने बीजभाषण करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे होते.
उत्तम कांबळे म्हणाले, चक्रधर स्वामींनी ज्ञानेश्वरांच्याही आधी महाराष्ट्राचा तोंडी भूगोल प्रथमच सांगितला. त्या भूगोलामध्ये माणसं आणि निसर्ग यांना बसविण्याचे काम अण्णाभाऊ साठे यांनी केले. 'महाराष्ट्राची परंपरा' या लावणीत 'ही अवनी आदिवासींची, कोळी-भिल्लांची, मांग-रामोश्यांची, कैक जमातींची...' असे सांगून 'परंपरा ज्यांची अपार, तीच शाहीर पुढे गाणार..' असे स्पष्टपणे सांगितले. ही सर्व माणसं संयुक्त महाराष्ट्राचा आत्मा आहेत, याची जाणीव अण्णाभाऊंनी करून दिली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ राजकीय, सांस्कृतिक उच्चभ्रू वर्गाने सुरू केली, हे खरे असले तरी त्या चळवळीला लोकचळवळीत रुपांतरित करण्याचे कार्य अण्णाभाऊंनी केले. रस्त्यावरच्या, तळागाळातल्या माणसाला त्याच्या इतिहासाची, इतिहासातल्या स्फूर्तीस्थानांची, प्रेरणांची, विजयांची, युद्धांची आणि त्यातल्या जखमांची जाणीव करून देऊन त्याला या चळवळीत सामील करण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. फाटक्या-तुटक्या माणसाच्या हातात इतिहास देऊन त्याला लढ्यासाठी सज्ज करण्याचे काम अण्णाभाऊंच्या शाहीरीनं केलं.
'माझी मैना...' या लावणीचा अभ्यासक रोमँटिक व अनरोमँटिक अशा दोन्ही अंगांनी अभ्यास करत असले तरी या दोन्ही बाजू चुकीच्या आहेत, असं सांगून श्री. कांबळे म्हणाले, 'माझी मैना...' ही अण्णाभाऊंनी लिहीलेली महाराष्ट्राची अव्वल दर्जाची राजकीय लावणी आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर बेळगाव आणि सीमाभागाला उद्देशून लिहीलेली ती लावणी आहे. मैना आहे तिथेच राहिली आणि मुंबई तेवढी महाराष्ट्रात आली. हा प्रदेश महाराष्ट्रात सामावू न शकल्याची वेदना या लावणीतून ओसंडून वाहते. संयुक्त महाराष्ट्राचं चित्र जसं अण्णाभाऊंनी रेखाटलं, तसंच नवमहाराष्ट्राबद्दलच्या अपेक्षाही त्यांनी 'जग बदल घालुनि घाव...' या गीतामध्ये व्यक्त केल्या आहेत. गुलामगिरीच्या विळख्यातून श्रमिकांना मुक्त करणारा, धनाढ्यांकडून पिळवणूक न होता, धर्मांधांच्या कचाट्यातून सुटून समतेची प्रस्थापना करणारा, भेदभावरहित आणि एकजुटीच्या रथावर आरुढ होऊन प्रगतीपथावर वाटचाल करणाऱ्या नवमहाराष्ट्राचे स्वप्न अण्णाभाऊ उराशी बाळगून होते.
श्री. कांबळे म्हणाले, अण्णाभाऊंचं केवळ त्यांच्या साहित्याच्या अंगानं विश्लेषण करणं हा त्यांच्या उर्वरित पैलूंवर मोठा अन्याय आहे. त्यांच्या लोकजीवनाचा, लोकलढ्यांचा अभ्यास केल्याखेरीज अण्णाभाऊ खऱ्या अर्थानं समजणार नाहीत. केवळ लोकप्रियतेच्या अंगानं त्यांच्या साहित्याचा अभ्यास करणं चुकीचं आहे. अण्णाभाऊंच्या लढ्यातून निर्माण झालेल्या प्रेरणा म्हणजे त्यांचे साहित्य आहे. त्या प्रेरणांचा अभ्यास केला पाहिजे. केवळ त्यांचे साहित्य नव्हे, तर त्यांच्या सामाजिक चळवळींचा त्यातील ताण्याबाण्यासह अभ्यास अध्यासनांच्या माध्यमातून व्हायला हवा. अण्णाभाऊंच्या साहित्यातील भाषावैभव हे केवळ त्यांचेच आहे. त्यासारखी भाषा अन्यत्र कुठेही आढळत नाही. या भाषावैभवाचा अभ्यासही साहित्य संशोधकांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. डी.आर. मोरे म्हणाले, अण्णाभाऊ खरे तर लौकिकार्थाने अल्पशिक्षित माणूस; पण, प्रचंड प्रज्ञेच्या बळावर त्यांनी चालविलेल्या चळवळी आणि केलेले लेखन स्तिमित करणारे आहे. तळागाळातल्या लोकांना एकत्र येण्यासाठी प्रेरित करून चालविलेला संयुक्त महाराष्ट्राचा लढा होता. या कामी अण्णाभाऊ यांच्यासह शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर आदी शाहीरांनी दिलेल्या योगदानाची नोंद घेतल्याखेरीज या लढ्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. किंबहुना, हा लढा उभारण्यात त्यांचे महान योगदान होते.
कार्यक्रमात सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक अध्यासनाचे संचालक डॉ. एम.एल. जाधव यांनी केले. डॉ. शरद गायकवाड यांनी परिचय करून दिला. डॉ. सी.ए. लंगरे यांनी आभार मानले.
--००--

Thursday, 14 July 2016

एम.फील./पीएच.डी.साठी युजीसीची नवी अधिसूचना जारी




महाविद्यालयीन मार्गदर्शकांना पुनश्च मान्यता;

शिवाजी विद्यापीठाचा सातत्याने पाठपुरावा; देशपातळीवरील पेच सोडविण्यात महत्त्वाची भूमिका
कोल्हापूर, दि. १४ जुलै: एम.फील./ पीएच.डी.साठी मार्गदर्शकांना मान्यता देण्यासाठीची विद्यापीठ अनुदान आयोगाची (युजीसी) नवी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. युजीसीने गतवर्षी केवळ पदव्युत्तर संस्थांमधील नियमित शिक्षकांनाच मार्गदर्शक म्हणून मान्यता देण्याचा निर्णय घेतल्याने महाविद्यालय स्तरावरील मार्गदर्शकांची तसेच संशोधक विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली होती. ती या नव्या अधिसूचनेमुळे दूर झाली आहे. या संदर्भात शिवाजी विद्यापीठाने गेले वर्षभर सातत्याने या विषयी युजीसीकडे पाठपुरावा केला. यामुळे देशातील ६००हून अधिक विद्यापीठांसह हजारो महाविद्यालयांसमोर निर्माण झालेला संशोधन मार्गदर्शकाविषयीचा पेच दूर झाला आहे. या मध्ये शिवाजी विद्यापीठाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.

युजीसीने 'एम.फील./ पीएच.डी. पदवी प्रदान करणेबाबत किमान मानदंड व प्रक्रिया विनिमय-२०१६' ही सन २००९च्या अधिसूचनेला अधिक्रमित करणारी अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये एम.फील./ पीएच.डी. प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पात्रता, मानके आणि प्रक्रियेचे नियम निर्धारित करण्यात आले आहेत. त्यामध्ये एम.फील./पीएच.डी. मार्गदर्शकांच्या पात्रतेचे निकषही स्पष्ट करण्यात आले आहेत. त्यानुसार-

·         मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणताही नियमित शिक्षक, ज्याचे संदर्भित पत्रिकेमध्ये किमान पाच शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत; आणि विद्यापीठ/स्वायत्त विद्यापीठ, संस्था/ महाविद्यालय येथील कोणीही नियमित सहयोगी/ सहाय्यक प्राध्यापक, जो पीएच.डी. धारक असेल, आणि संदर्भित पत्रिकांमध्ये ज्याचे किमान दोन शोधनिबंध प्रकाशित झाले असतील, त्यांना मार्गदर्शक म्हणून मान्यता देण्यात आली आहे. ज्या विषयांत अशा शोधपत्रिका नसतील वा ठराविक ठिकाणीच त्या असतील, अशा वेळी लेखी स्वरुपात सशर्त परवानगी देता येईल.

·         केवळ संबंधित विद्यापीठ/ महाविद्यालय येथील पूर्णवेळ शिक्षकच मार्गदर्शक म्हणून काम करू शकतील. बाह्य मार्गदर्शकास परवानगी नाही. तथापि, आंतरविद्याशाखीय संशोधनाच्या बाबतीत संशोधन सल्लागार समितीच्या मान्यतेने सह-मार्गदर्शक म्हणून त्याच संस्थेतील अथवा संबंधित संस्थेमधील शिक्षकास मान्यता देता येईल.

·         निवडलेल्या संशोधक विद्यार्थ्यास मार्गदर्शक देण्याची जबाबदारी संबंधित विभागाची असेल. त्यावेळी मार्गदर्शकाकडील विद्यार्थ्यांची संख्या, त्यांचे मार्गदर्शनाचे विषय, विद्यार्थ्याच्या संशोधनाचे क्षेत्र, मुलाखतीवेळी त्यांनी दाखविलेली रुची आदी बाबींचा साकल्याने विचार व्हावा.

·         आंतरविद्याशाखीय संशोधनाच्या संदर्भात ज्यावेळी संबंधित विभागास बाहेरील मार्गदर्शकाची जरुरी भासेल, अशा वेळी विभागातील संशोधक मार्गदर्शकाची नियुक्ती करावी आणि त्याच्या जोडीला बाहेरील विभाग/ विद्याशाखा/ महाविद्यालय/ संस्था येथील शिक्षकाची सह-मार्गदर्शक म्हणून संबंधित संस्था/ महाविद्यालयाच्या मान्यतेने नियुक्ती करता येईल.

·         संशोधक मार्गदर्शक/ सह-मार्गदर्शक हा प्राध्यापक असल्यास तो एकाच वेळी जास्तीत जास्त ३ एम.फील. व ८ पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकेल. सहयोगी प्राध्यापक जास्तीत जास्त दोन एम.फील. व ६ पीएच.डी. संशोधकांना तर सहाय्यक प्राध्यापक हा एक एम.फील. व ४ पीएच.डी. संशोधकांना मार्गदर्शन करू शकेल.

·         एम.फील./पीएच.डी. करणाऱ्या महिला संशोधकास विवाह अथवा अन्य कारणांनी संशोधनाचे ठिकाण बदलून हवे असल्यास या अधिसूचनेतील पात्रतेच्या नियम व अटींशी अधीन राहून स्थानबदलास मातृसंस्थेने परवानगी द्यावी. संशोधक महिलेनेही मातृसंस्था आणि तेथील मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केलेल्या संशोधनाचे श्रेय प्रबंधात नमूद करावे.

युजीसीच्या या नूतन अधिसूचनेचे स्वागत करत असताना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू आणि बीसीयुडी संचालक म्हणून या अधिसूचनेसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे डॉ. डी.आर. मोरे म्हणाले, या संदर्भात जुलै २०१५मध्ये युजीसीने केवळ पदव्युत्तर संस्थांमधील नियमित शिक्षकच मार्गदर्शक म्हणून काम करू शकतील, असे कळविले होते. त्यामुळे महाविद्यालयीन (पदवी) स्तरावर काम करणाऱ्या कोणाही शिक्षकास मार्गदर्शक म्हणून मान्यता देणे अथवा त्यांना संशोधक विद्यार्थी देणे विद्यापीठास अशक्य बनले होते. साहजिकच, यंदा विद्यापीठाने राबविलेल्या एम.फील./पीएच.डी. प्रवेश प्रक्रियेमधील संशोधक विद्यार्थ्यांचा इनटेकही सुमारे ९० टक्क्यांनी खालावला होता. तरीही, विद्यापीठाने विद्यार्थी हितास प्राधान्य देताना कॅम्पस स्तरावर जास्तीत जास्त संशोधक विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला आणि हे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत वाढविले. आता नूतन अधिसूचनेतील उपरोक्त स्वयंस्पष्ट नियमावलीमुळे आता विद्यापीठांबरोबरच महाविद्यालयातील शिक्षकही एम.फील./ पीएच.डी. संशोधन मार्गदर्शक म्हणून काम करू शकणार आहेत. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. या अनुषंगाने विद्यापीठाच्या सद्य नियमावलीचा आढावा घेऊन आवश्यक ते बदल संबंधित अधिकार मंडळांच्या मान्यतेने करण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

या संदर्भात शिवाजी विद्यापीठाने युजीसीकडे वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यासंदर्भात माहिती देताना डॉ. मोरे म्हणाले, युजीसीच्या दि. ६ जुलै २०१५ रोजीच्या पत्रामुळे केवळ शिवाजी विद्यापीठच नव्हे, तर संलग्नित महाविद्यालये असणाऱ्या देशभरातील ६००हून अधिक विद्यापीठांपुढे संशोधन वृत्तीस चालना देण्याचा मोठा पेच निर्माण झाला होता. या गोष्टीचे गांभीर्य आणि होणारे दूरगामी परिणाम लक्षात घेऊन  शिवाजी विद्यापीठाने सप्टेंबर २०१५ पासून युजीसीकडे इ-मेल, पत्र, दूरध्वनीद्वारे सातत्याने पाठपुरावा केला. विद्यापीठाचे नोडल ऑफिसर उपकुलसचिव संजय कुबल, पीजी-बीयुटीआर विभागाचे उपकुलसचिव डॉ. नीलेश बनसोडे यांनी नवी दिल्ली येथे जाऊन व्यक्तीशः या विषयासंदर्भात सविस्तर भूमिका मांडली. युजीसीचे अतिरिक्त सचिव डॉ. पी. प्रकाश कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांच्यासह त्यांना प्रत्यक्ष भेटूनही सारी परिस्थिती विषद केली होती. त्यामुळे देश पातळीवर निर्माण झालेला शैक्षणिक व संशोधकीय पेच सोडविण्यात शिवाजी विद्यापीठाने कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत कळीची भूमिका बजावली, याचा अत्यंत अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.



अधिसूचनेची यंदापासूनच अंमलबजावणी

शिवाजी विद्यापीठाने यंदाची एम.फील./ पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया युजीसीच्या निर्णयासाठी स्थगित ठेवली होती. युजीसीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळविण्यासाठी सातत्याने संपर्क साधून पाठपुरावा करण्यात येत होता. आता प्राप्त अधिसूचनेबाबत बीयुटीआर (बोर्ड ऑफ युनिव्हर्सिटी टीचिंग ॲन्ड रिसर्च) तसेच अन्य अधिकार मंडळांची मान्यता घेऊन या वर्षीपासूनच (सन. २०१६-१७) अंमलात आणण्यात येईल. यामुळे महाविद्यालयीन मार्गदर्शक, संशोधक विद्यार्थी यांचा मोठा लाभ होईल, असे प्रभारी कुलगुरू डॉ. डी.आर. मोरे यांनी सांगितले.

Monday, 11 July 2016

अभियांत्रिकीचा आंतरविद्याशाखीय अभ्यास गरजेचा: प्रा. मनुकीड



'ग्यान' उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात बोलताना ए.आय.टी. (थायलंड)चे प्रा.मनुकीड. व्यासपीठावर (डावीकडून) समन्वयक उदय पाटील, ग्यान समन्वयक डॉ. आर.के. कामत,  तंत्रज्ञान अधिविभाग संचालक डॉ. जे.एस. बागी, प्रभारी कुलगुरू डॉ. डी.आर.मोरे, श्री. एस.डी. प्रधान व कुमार रामचंद्रन.



शिवाजी विद्यापीठात मॅकेट्रॉनिक्ससंदर्भातील 'ग्यान' कार्यशाळेस प्रारंभ

कोल्हापूर, दि. ११ जुलै: अभियांत्रिकीच्या क्षेत्रात आता स्पेशलायझेशनबरोबरच सर्वच अभियांत्रिकी शाखांचा सीमाविरहित आंतरविद्याशाखीय अभ्यास करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन थायलंड येथील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील प्रा. मनुकीड पार्निच्कून यांनी आज येथे केले.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे प्रायोजित 'ग्लोबल इनिशिएटीव्ह फॉर ॲकेडेमिक नेटवर्क्स' (ग्यान) या उपक्रमांतर्गत आजपासून शिवाजी विद्यापीठात 'मेकॅट्रॉनिक्स: सिनर्जिक इंटिग्रेशन ऑफ मॅकेनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी' या विषयावरील कार्यशाळेस प्रारंभ झाला. या उद्घाटन प्रसंगी कार्यशाळेचे प्रमुख तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रा. मनुकीड बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉ. डी.आर. मोरे होते.

टाटा टेक्नॉलॉजीज्‌चे संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी व इक्विनॉक्स कंपनीचे संस्थापक अध्यक्ष एस.डी. प्रधान यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. यावेळी टाटा टेक्नॉलॉजीज्‌चे माजी उपाध्यक्ष कुमार रामचंद्रन प्रमुख उपस्थित होते.

मॅकेट्रॉनिक्स व रोबोटिक्स विषयातील जागतिक दर्जाचे तज्ज्ञ असलेल्या प्रा. मनुकीड यांनी कार्यशाळेतील मार्गदर्शनाविषयी आपली भूमिका थोडक्यात विषद केली. ते म्हणाले, आज जगातील कोणत्याही अभियंत्याला अभियांत्रिकीच्या अन्य शाखांचे वावडे असता कामा नये. मॅकेनिकल अभियंत्याने त्याला आवश्यक असलेल्या हार्डवेअरसाठीचा प्रोग्राम स्वतःच तयार केला, तर त्याला हवा तो निकाल मिळू शकतो. यांसारख्या समस्यांवर मॅकेनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान यांच्या संगमातून निर्माण झालेल्या मॅकेट्रॉनिक्स या आंतरविद्याशाखेच्या माध्यमातून उपाय शोधता येणे शक्य झाले आहे.

थायलंडची ए.आय.टी. आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या दरम्यान या पूर्वीच झालेल्या सामंजस्य कराराला 'ग्यान' उपक्रमामुळे पुनरुज्जीवन लाभले असून या पुढील काळात दोन्ही शैक्षणिक संस्था व देशांतील संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास प्रा. मनुकीड यांनी व्यक्त केला. थायलंडवर भारतीय संस्कृतीचा मोठा प्रभाव असून महाराष्ट्रात आणि कोल्हापुरात आपण प्रथमच आलो असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बरीच माहिती ऐकण्यात आली. त्यामुळे आता येथून गेल्यानंतर शिवाजी महाराजांच्या इतिहासाचाही आपण अभ्यास करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

श्री. एस.डी. प्रधान यांनी आपल्या भाषणात 'बाऊंड्रीलेस इंजिनिअर' या संकल्पनेची जगाला विशेषतः भारताला मोठी गरज असल्याचे सांगितले.  ते म्हणाले, आतापर्यंत अभियांत्रिकीने वाफ, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स व आयटी तसेच आता कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स- ए.आय.), बायोटेक्नॉलॉजी असा व्यापक प्रवास केला आहे. ए.आय. संकल्पनेमुळे पूर्वीच्या अनेक मूलभूत संकल्पनांकडे नव्या दृष्टीने अभ्यासण्याची गरज निर्माण झाली आहे. तंत्रज्ञानातील सातत्यपूर्ण बदल, त्यांचा स्वीकार आणि उपयोजन हेच केवळ अभियांत्रिकीचे वास्तव आहे. ए.आय.मुळे निम्न व मध्यम दर्जाचे रोजगार संपुष्टात येणार आहे. यामुळे अभियांत्रिकीचे भवितव्यच बदलणार आहे. या बदलांच्या स्वीकारासाठी आपण तयार असले पाहिजे. त्यासाठी शिक्षण व उद्योग क्षेत्रांतील सुसंवाद वाढविण्यावर भर देण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

कुमार रामचंद्रन यांनीही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बळावर गेल्या चारशे वर्षांत झाले नाहीत, इतके गतिमान बदल येत्या तीस ते चाळीस वर्षात होणे अपेक्षित असल्याचे सांगितले. त्यासाठी अभियांत्रिकी शाखांचा एकात्मिक दृष्टीकोनातून अभ्यास करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. नजीकच्या काळात शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागात टाटा टेक्नॉलॉजीज्‌च्या माध्यमातून विद्यार्थी, नव-अभियंत्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

अध्यक्षीय भाषणात प्रभारी कुलगुरू डॉ. डी.आर. मोरे म्हणाले, शैक्षणिक क्षेत्रात विशेषतः अभियांत्रिकीच्या क्षेत्रात मानवी जीवनावर आणि जीवनशैलीवर दूरगामी परिणाम करणारे बदल कधी नव्हे इतक्या गतीने होत आहेत. या बदलांशी पूरक अशा पद्धतीने जुळवून घेण्यासाठी प्रत्येकालाच अनुषंगिक बदल करवून घ्यावे लागतील. याला कोणतेही क्षेत्र अपवाद नाही. या गतिमान युगात आपले अस्तित्व टिकवायचे असेल, तर या बदलांशी जुळवून घ्यावे लागेल. त्या दृष्टीने उपयुक्त दृष्टीकोन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांत विकसित करण्यात ही कार्यशाळा निश्चित यशस्वी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सुरवातीला श्री. प्रधान यांच्या हस्ते कार्यशाळेचे डिजीटल उद्घाटन करण्यात आले. तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जे.एस. बागी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. 'ग्यान' प्रकल्पाविषयी समन्वयक डॉ. आर. के. कामत यांनी सविस्तर माहिती दिली. कार्यशाळा समन्वयक उदय पाटील यांनी परिचय करून दिला. जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांनी आभार मानले. यावेळी डॉ. जी.एस. कुलकर्णी, डॉ. ए.एम. गुरव, विद्याधर कांबळे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Monday, 6 June 2016

'ग्यान'च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय ज्ञानाची देवाणघेवाण गतिमान: मंत्री चंद्रकांतदादा पाटील


शिवाजी विद्यापीठात 'ग्यान' उपक्रमाचे डिजीटल उद्घाटन करताना कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील. शेजारी (डावीकडून) डॉ. पी.डी. राऊत, प्रभारीक लुसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर.मोरे, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, अमेरिकेच्या पर्ड्यू विद्यापीठाचे डॉ. व्यंकटेश मेरवाडे आणि डॉ. आर.के. कामत.

शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातील नूतन कार्यशाळेचे उद्घाटन करताना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील.

शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातील नूतन कार्यशाळेतील यंत्रांची पाहणी करताना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील. 


शिवाजी विद्यापीठात 'ग्यान' उपक्रम, तंत्रज्ञान अधिविभाग वर्कशॉपचे उद्घाटन

कोल्हापूर, दि. ६ जून: शिवाजी विद्यापीठात आजपासून सुरू झालेल्या 'ग्यान' (ग्लोबल इनिशिएटीव्ह ऑफ ॲकेडेमिक नेटवर्क्स) उपक्रमाच्या माध्यमातून विद्यापीठाची आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्ञानाच्या देवाणघेवाणीची प्रक्रिया गतिमान होईल, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज येथे केले.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे पुरस्कृत 'ग्यान' उपक्रमाचे तसेच तंत्रज्ञान अधिविभागाच्या नूतन वर्कशॉपचे आज मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासह अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठातील डॉ. व्यंकटेश मेरवाडे, बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, 'ग्यान' समन्वयक डॉ. आर.के. कामत, संयोजक डॉ. पी.डी. राऊत होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले, विद्यापीठाने 'जीआयएस प्रणाली आणि जलस्रोतांचे व्यवस्थापन' हा 'ग्यान'च्या प्रथम सत्रासाठी निवडलेला विषयही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सध्या हा विषय महाराष्ट्र शासनाच्याही चिंतेचा आणि चिंतनाचा बनला आहे. पर्जन्यमान कमी-अधिक असणे ही बाब आपल्या हातात नसली, तरी पाऊस जमिनीत जिरवणे हे निश्चितपणे आपण करू शकतो. या सात दिवसांच्या अभ्यासक्रमात या विषयावर अत्यंत उपयुक्त चर्चा होईल, अशी आशा आहेच. पण, विद्यापीठाने एवढ्यावरच न थांबता पाण्याचे नियोजन या विषयाचा सर्वंकष अभ्यास करणारा स्वतंत्र विभाग किंवा यंत्रणा उभी करावी आणि शासनाला त्यासंदर्भात मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र शासनाने जलसंवर्धनाची मोहीम अत्यंत गांभीर्यपूर्वक हाती घेतली असून गेल्या वर्षभरात राज्यातल्या ६,५०० गावांत एक लाखांहून अधिक पाणी साठवण क्षेत्रे विकसित केली केली आहेत. अशा प्रकारे पाच वर्षांत सुमारे ३२,५०० गावांपर्यंत ही मोहीम शासन राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

डॉ. मेरवाडे यांनी सांगितली जलस्रोत माहिती व्यवस्थापनाची चतुःसूत्री
या प्रसंगी अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठातील डॉ. व्यंकटेश मेरवाडे यांचे 'भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) व जलस्रोतांचे व्यवस्थापन' या विषयावर बीजभाषण झाले. पुढील आठवडाभर ते 'ग्यान' उपक्रमांतर्गत विद्यापीठात या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करणार आहे. ते म्हणाले, पाणी प्रश्नाविषयी चर्चा करीत असताना विविध स्रोतांच्या माध्यमातून आपल्याकडे नेमके किती पाणी उपलब्ध आहे, याची माहिती असणे अनिवार्य आहे. त्याखेरीज त्यांचे व्यवस्थापन अशक्य आहे. तालुक्यापासून ते देश आणि खंड अशी ही व्याप्ती वाढत जाईल, तितकी या माहितीची अनिवार्यता वाढत जाते. पर्यावरणीय बदल आणि जमिनीच्या वापरातील बदल या दोन बाबींमुळे जलस्रोतांचे व्यवस्थापन अधिक जिकीरीचे बनत आहे. कोणत्याही विभागातील जलप्रवाहांकडे पाहून त्या-त्या परिसरातील पाण्याच्या एकूण अवस्थेचा अंदाज येत असतो. याच आधारावर संबंधित प्रवाहांचे, स्रोतांचे संगणकीय सिम्युलेशन मॉडेल तयार करण्यात येते. आणि त्या आधारे त्यांच्या व्यवस्थापनाचे नियोजन करता येऊ शकते. मात्र त्यासाठी हार्ड इन्फ्रास्ट्रक्टर, सॉफ्ट इन्फ्रास्ट्रक्चर, आधुनिक व अद्यावत डाटा सिम्युलेशन व नॉलेज शेअरिंग ही चतुःसूत्री अत्यंत कळीची भूमिका बजावते. जितका अद्यावत व गतिमान डाटा उपलब्ध होईल, तितकी त्यासंदर्भातील अनिश्चितता आपल्याला कमी करता येऊ शकते आणि जास्तीत जास्त अचूक, वस्तुनिष्ठ माहिती देता येऊ शकते.
पाण्याच्या संदर्भातील अनेक एजन्सी देशपातळीवर कार्यरत असतात. त्यांच्यामध्ये योग्य समन्वय राखण्याबरोबरच समाजमाध्यमांच्या सहाय्यानेही पाण्याच्या माहितीचे संकलन व आदान प्रदान आता 'हायड्रो-शेअर'सारखे प्लॅटफॉर्म उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात कुलगुरू डॉ. शिंदे यांनी विद्यापीठाने राबविलेल्या विविध विद्यार्थीभिमुख योजना, उपक्रमांची तसेच राष्ट्रीय उपक्रमांत विद्यापीठाने दिलेल्या योगदानाची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, केवळ विद्यापीठ स्तरावरच नव्हे, तर महाविद्यालयीन स्तरावरही संशोधनास चालना देण्यासाठी काही महत्त्वपूर्ण योजना हाती घेतल्या आहेत. पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी 'रिसर्च सेन्सिटायझेशन ग्रँट' घोषित करणारे शिवाजी विद्यापीठ हे राज्यातील पहिले आणि एकमेव विद्यापीठ आहे. त्याचप्रमाणे कोणतीही फेलोशीप नसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'रिसर्च स्टुडंट फायनान्शियल असिस्टंन्स' योजना विद्यापीठाने घोषित केली आहे. संशोधक विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर 'बेस्ट रिसर्चर' पुरस्कार देण्याचेही विद्यापीठाने ठरविले आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या पन्हाळा येथील अवकाश संशोधन केंद्रामध्ये इस्रोच्या 'INRSS' उपग्रह मालिकेतील संदेशग्रहण करणारा रिसिव्हर स्थापित करण्यात आला आहे. अशी सुविधा उपलब्ध असणारे आणि या उपक्रमात सहभागी होण्याची संधी प्राप्त झालेले शिवाजी विद्यापीठ हे देशातील एकमेव अकृषी विद्यापीठ आहे.
शिवाजी विद्यापीठास सात दिवसाच्या विक्रमी वेळेमध्ये सात आंतरराष्ट्रीय ग्यान कोर्सेस मंजूर झाले असल्याचे सांगून कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, IIT, IIM, IISCR या नामांकित शैक्षणिक संस्थांच्या बरोबरीने शिवाजी विद्यापीठ हे प्रकल्प मिळविण्यात यशस्वी झाले आहे. चालू शैक्षणिक वर्षा जगाच्या कानाकोपऱ्यातून सात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक, शिक्षक शिवाजी विद्यापीठात येऊन येथील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. डॉ. व्यंकटेश मेरवाडे यांच्याबरोबरच  मेकॅट्रॉनिक्ससारख्या प्रगत विषयावर ए.आय.टी., थायलंड येथील डॉ.पर्चीकून, 'अठराव्या शतकातील दख्खन' या मराठा इतिहासासंबंधीच्या विषयावर मिशीगन येथील प्रा.गॉर्डन, हिंदी ही आपली राष्ट्रभाषा परदेशात कशी शिकवावी, यासंबंधी इटलीच्या डॉ.कॉन्सोलारो, पश्चिम घाटातील जैवविविधतेविषयी रशियामधील डॉ.सुकोलॉफ आणि पाण्यासारख्या ज्वलंत प्रश्नावर दक्षिण कोरियामधील डॉ.ली हे सात दिवसांचे विशेष सत्र घेणार आहेत.
कार्यक्रमाच्या सुरवातीला कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते ग्रंथ व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. डॉ. आर.के. कामत यांनी परिचय करून दिला. सौ. नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास परीक्षा नियंत्रक महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी.के. गायकवाड, क्राडी विभागप्रमुख पी.टी. गायकवाड, तंत्रज्ञान अधिविभागाचे प्रभारी संचालक डॉ. जी.एस. कुलकर्णी, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अभयकुमार साळुंखे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.