Showing posts with label Pune. Show all posts
Showing posts with label Pune. Show all posts

Friday, 18 January 2019

उत्कृष्ट संशोधनासाठी संयुक्त प्रकल्पांची गरज: डॉ. पी.पी. वडगावकर

शिवाजी विद्यापीठाने पुणे येथील सीएसआयआर-एनसीएल या संस्थेशी संशोधनविषयक सामंजस्य करार केला. या प्रसंगी कराराच्या प्रतींचे हस्तांतरण करताना विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे आणि एनसीएलचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. पी.पी. वडगावकर. सोबत (डावीकडून) डॉ. अकल्पिता अरविंदेकर, अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, डॉ. ए.एम. गुरव, डॉ. पी.एस. पाटील आणि डॉ. जे.एस. बागी.


शिवाजी विद्यापीठाचा सीएसआयआर-एनसीएलशी संशोधनविषयक सामंजस्य करार

कोल्हापूर, दि. १८ जानेवारी: प्रयोगशाळेत संशोधकाने एकट्याने संशोधन करण्याचे दिवस आता मागे पडले असून उत्कृष्ट संशोधन कार्यासाठी विविध संस्थांनी संयुक्त प्रकल्प हाती घेण्याची गरज आहे. त्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठ आणि सीएसआयआर-एनसीएल यांच्या दरम्यानचा सामंजस्य करार दोन्ही संस्थांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एनसीएल) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. पी.पी. वडगावकर यांनी आज येथे व्यक्त केला.

शिवाजी विद्यापीठ आणि सीएसआयआर-एनसीएल यांच्यात आज संशोधनविषयक सहकार्याचा सामंजस्य करार झाला. त्यावेळी ते बोलत होते.

डॉ. वडगावकर म्हणाले, उत्कृष्ट संशोधनासाठी संयुक्त प्रकल्प हाती घेणे आज आवश्यक झाले आहे. त्यासाठी संशोधन संस्थांनी, तेथील संशोधकांनी एकत्र येऊन एकमेकांशी चांगला परिचय करून घेतला पाहिजे. आपापल्या संशोधन क्षेत्राची माहिती एकमेकांना दिली पाहिजे. त्यातून संशोधनाच्या नवनव्या संधी सामोऱ्या येतील. यामध्ये आंतरविद्याशाखीय संशोधन प्रकल्पांचेही महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. केवळ पायाभूत सुविधाच नव्हेत, तर मानवी स्नेहबंधही अशा संयुक्त प्रकल्पांमधून वाढीस लागतात, हे अशा करारांचे महत्त्वाचे फलित असते, हे दुर्लक्षून चालणार नाही.

यावेळी डॉ. वडगावकर यांनी आपणही शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाचे १९७९च्या बॅचचे विद्यार्थी असल्याचा अभिमानपूर्वक उल्लेख केला. एनसीएलच्या प्रगतीमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या अनेक विद्यार्थ्यांचे, संशोधकांचे योगदान लाभले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.एस. पाटील म्हणाले, या सामंजस्य करारामुळे संशोधन, संयुक्त प्रकल्प, प्रयोगशाळा सहकार्य या बाबींविषयी एनसीएलबरोबर संवाद आणि साहचर्य वाढेलच, पण त्याचबरोबर आपल्या संशोधनाचे पेटंट मिळविण्याच्या कामी एनसीएलच्या अनुभवी संशोधकांचे मार्गदर्शन विद्यापीठाच्या संशोधकांना लाभेल. त्याचप्रमाणे संशोधनाचे तंत्रज्ञानात रुपांतरण आणि औद्योगिक साहचर्य वृद्धी या दृष्टीनेही त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी सामंजस्य करारावर विद्यापीठाच्या वतीने प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी, तर एनसीएलच्या वतीने डॉ. वडगावकर यांनी स्वाक्षरी केल्या. या वेळी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. ए.एम. गुरव, आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, डॉ. अकल्पिता अरविंदेकर, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जे.एस. बागी यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक उपस्थित होते.

Monday, 11 July 2016

अभियांत्रिकीचा आंतरविद्याशाखीय अभ्यास गरजेचा: प्रा. मनुकीड



'ग्यान' उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात बोलताना ए.आय.टी. (थायलंड)चे प्रा.मनुकीड. व्यासपीठावर (डावीकडून) समन्वयक उदय पाटील, ग्यान समन्वयक डॉ. आर.के. कामत,  तंत्रज्ञान अधिविभाग संचालक डॉ. जे.एस. बागी, प्रभारी कुलगुरू डॉ. डी.आर.मोरे, श्री. एस.डी. प्रधान व कुमार रामचंद्रन.



शिवाजी विद्यापीठात मॅकेट्रॉनिक्ससंदर्भातील 'ग्यान' कार्यशाळेस प्रारंभ

कोल्हापूर, दि. ११ जुलै: अभियांत्रिकीच्या क्षेत्रात आता स्पेशलायझेशनबरोबरच सर्वच अभियांत्रिकी शाखांचा सीमाविरहित आंतरविद्याशाखीय अभ्यास करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन थायलंड येथील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील प्रा. मनुकीड पार्निच्कून यांनी आज येथे केले.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे प्रायोजित 'ग्लोबल इनिशिएटीव्ह फॉर ॲकेडेमिक नेटवर्क्स' (ग्यान) या उपक्रमांतर्गत आजपासून शिवाजी विद्यापीठात 'मेकॅट्रॉनिक्स: सिनर्जिक इंटिग्रेशन ऑफ मॅकेनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी' या विषयावरील कार्यशाळेस प्रारंभ झाला. या उद्घाटन प्रसंगी कार्यशाळेचे प्रमुख तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रा. मनुकीड बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉ. डी.आर. मोरे होते.

टाटा टेक्नॉलॉजीज्‌चे संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी व इक्विनॉक्स कंपनीचे संस्थापक अध्यक्ष एस.डी. प्रधान यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. यावेळी टाटा टेक्नॉलॉजीज्‌चे माजी उपाध्यक्ष कुमार रामचंद्रन प्रमुख उपस्थित होते.

मॅकेट्रॉनिक्स व रोबोटिक्स विषयातील जागतिक दर्जाचे तज्ज्ञ असलेल्या प्रा. मनुकीड यांनी कार्यशाळेतील मार्गदर्शनाविषयी आपली भूमिका थोडक्यात विषद केली. ते म्हणाले, आज जगातील कोणत्याही अभियंत्याला अभियांत्रिकीच्या अन्य शाखांचे वावडे असता कामा नये. मॅकेनिकल अभियंत्याने त्याला आवश्यक असलेल्या हार्डवेअरसाठीचा प्रोग्राम स्वतःच तयार केला, तर त्याला हवा तो निकाल मिळू शकतो. यांसारख्या समस्यांवर मॅकेनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान यांच्या संगमातून निर्माण झालेल्या मॅकेट्रॉनिक्स या आंतरविद्याशाखेच्या माध्यमातून उपाय शोधता येणे शक्य झाले आहे.

थायलंडची ए.आय.टी. आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या दरम्यान या पूर्वीच झालेल्या सामंजस्य कराराला 'ग्यान' उपक्रमामुळे पुनरुज्जीवन लाभले असून या पुढील काळात दोन्ही शैक्षणिक संस्था व देशांतील संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास प्रा. मनुकीड यांनी व्यक्त केला. थायलंडवर भारतीय संस्कृतीचा मोठा प्रभाव असून महाराष्ट्रात आणि कोल्हापुरात आपण प्रथमच आलो असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बरीच माहिती ऐकण्यात आली. त्यामुळे आता येथून गेल्यानंतर शिवाजी महाराजांच्या इतिहासाचाही आपण अभ्यास करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

श्री. एस.डी. प्रधान यांनी आपल्या भाषणात 'बाऊंड्रीलेस इंजिनिअर' या संकल्पनेची जगाला विशेषतः भारताला मोठी गरज असल्याचे सांगितले.  ते म्हणाले, आतापर्यंत अभियांत्रिकीने वाफ, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स व आयटी तसेच आता कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स- ए.आय.), बायोटेक्नॉलॉजी असा व्यापक प्रवास केला आहे. ए.आय. संकल्पनेमुळे पूर्वीच्या अनेक मूलभूत संकल्पनांकडे नव्या दृष्टीने अभ्यासण्याची गरज निर्माण झाली आहे. तंत्रज्ञानातील सातत्यपूर्ण बदल, त्यांचा स्वीकार आणि उपयोजन हेच केवळ अभियांत्रिकीचे वास्तव आहे. ए.आय.मुळे निम्न व मध्यम दर्जाचे रोजगार संपुष्टात येणार आहे. यामुळे अभियांत्रिकीचे भवितव्यच बदलणार आहे. या बदलांच्या स्वीकारासाठी आपण तयार असले पाहिजे. त्यासाठी शिक्षण व उद्योग क्षेत्रांतील सुसंवाद वाढविण्यावर भर देण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

कुमार रामचंद्रन यांनीही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बळावर गेल्या चारशे वर्षांत झाले नाहीत, इतके गतिमान बदल येत्या तीस ते चाळीस वर्षात होणे अपेक्षित असल्याचे सांगितले. त्यासाठी अभियांत्रिकी शाखांचा एकात्मिक दृष्टीकोनातून अभ्यास करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. नजीकच्या काळात शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागात टाटा टेक्नॉलॉजीज्‌च्या माध्यमातून विद्यार्थी, नव-अभियंत्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

अध्यक्षीय भाषणात प्रभारी कुलगुरू डॉ. डी.आर. मोरे म्हणाले, शैक्षणिक क्षेत्रात विशेषतः अभियांत्रिकीच्या क्षेत्रात मानवी जीवनावर आणि जीवनशैलीवर दूरगामी परिणाम करणारे बदल कधी नव्हे इतक्या गतीने होत आहेत. या बदलांशी पूरक अशा पद्धतीने जुळवून घेण्यासाठी प्रत्येकालाच अनुषंगिक बदल करवून घ्यावे लागतील. याला कोणतेही क्षेत्र अपवाद नाही. या गतिमान युगात आपले अस्तित्व टिकवायचे असेल, तर या बदलांशी जुळवून घ्यावे लागेल. त्या दृष्टीने उपयुक्त दृष्टीकोन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांत विकसित करण्यात ही कार्यशाळा निश्चित यशस्वी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सुरवातीला श्री. प्रधान यांच्या हस्ते कार्यशाळेचे डिजीटल उद्घाटन करण्यात आले. तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जे.एस. बागी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. 'ग्यान' प्रकल्पाविषयी समन्वयक डॉ. आर. के. कामत यांनी सविस्तर माहिती दिली. कार्यशाळा समन्वयक उदय पाटील यांनी परिचय करून दिला. जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांनी आभार मानले. यावेळी डॉ. जी.एस. कुलकर्णी, डॉ. ए.एम. गुरव, विद्याधर कांबळे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuesday, 26 April 2016

लोकशाहीच्या प्रगल्भतेमध्ये मतदारांची कळीची भूमिका: प्रा. परिमल




 
शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना एम.आय.टी.चे आशिष लाल. व्यासपीठावर प्रा.डॉ.वासंती रासम, प्रा.डॉ.प्रकाश पवार, प्रा.परिमल माया सुधाकर, मनिष केळकर प्रा. कल्पना दीक्षित.

कोल्हापूर, दि. २६ एप्रिल: भारतीय निवडणूक प्रक्रियेत मतदार हे सातत्याने कळीची भूमिका बजावतात. त्यांच्या जागरुकतेमुळेच निवडणुकांचा कौल दरवेळी वेगळा असला तरी लोकशाही प्रगल्भ बनविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन प्रा. परिमल माया सुधाकर यांनी आज येथे केले.
एम.आय.टी. पुणे, शिवाजी विद्यापीठाचा राज्यशास्त्र आधिविभाग तसेच श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'भारतातील सद्य:राजकीय परिस्थिती आणि उदयोन्मुख संधी' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आज पार पडली. या परिषदेत ते बोलत होते.
'भारतातील निवडणूक, राजकारणाचे बदलते स्वरुप' या विषयावर बोलताना प्रा. परिमल म्हणाले, भारतातील निवडणुकांमध्ये सातत्य, स्थिरता नसून ती सातत्याने मतदाराच्या कौलावर अवलंबून असतात. केंद्रीय पातळीवरील निवडणका प्रादेशिक पातळीवरील निवडणुकांचा कौल वेगवेगळा असतो. याचा अर्थ मतदारांत संभ्रम आहे, असा नाही; तर, प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या परिस्थितीची आणि त्याठिकाणी आवश्यक असणाऱ्या नेतृत्वाबद्दल त्याच्या अपेक्षांची, आशाआकांक्षांची त्यांना जाणीव आहे. हेच यातून अधोरेखित होते. त्यामुळेच भारताला जगातील सर्वात मोठी लोकशाही मानले जाते. मतदार जागरुक असून वेळोवेळी योग्य त्या पक्षाला त्यांनी पाठिंबा दिल्याचे दिसून येते.
प्रा. वासंती रासम म्हणाल्या, भारताच्या राजकारणाचे स्वरुप झपाटयाने बदलत असल्यामुळे हिल्यांदा मतदान करणाऱ्या युवकांची संख्या वाढत आहे. तसेच निवडणुकांमध्ये समाज माध्यमाचा वापर मोठया प्रमाणात होत असून निवडणूक प्रक्रिया व्यावसायिकांकडून हाताळली जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये सामाजिकशास्त्र, विधी, व्यवस्थापन शास्त्राच्या विद्यार्थ्यांना या निवडणूक प्रक्रियांमध्ये होणाऱ्या बदलांचा उपयोग आपल्या करिअरसाठी हो शकतो.
दुसऱ्या सत्रामध्ये राज्यशास्त्र अधिविभाग प्रमुख प्रा. प्रकाश पवार यांनी पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू, पाँडिचेरी या चार राज्यांतील निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय सामाजीकरण, इतिहास, संस्कृती, आणि बदलत्या राजकीय वातावरणासंदर्भात विश्लेषण केले. दक्षिण राज्यांमध्ये भाजप हिंदुत्ववादावर नव्हे, तर आर्थिक विकासावर भर देत असल्यामुळे बहुमत नाही मिळाले, तरी मताची टक्केवारी वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्ती केली.
प्रा. मनिष केळकर यांच्या मते, निवडणुकांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे राज्यशास्त्र सामाजिक शास्त्रांतील विद्यार्थ्यांना या निवडणुकींच्या बदलत्या स्वरुपामुळे अनेक रोजगार संधी उपलब्ध होतील. राजकीय नेतृत्व, राजकीय विश्लेषक, राजकीय सल्लागार, प्रचार सभा संयोजक, निवडणूक कार्यक्रम आयोजक, वैयक्तिक सल्लागार, निवडणुकीचे व्हेंट मॅनेजमें शा अनेक संधी उदयोन्मुख युवकांना उपलब्ध असल्याचे सांगितले.
या कार्यशाळेच्या सुरवातीला एम.आय.टी.च्या आशिष लाल यांनी स्वागत केले. डॉ. रविंद्र भणगे यांनी आभार मानले. यावेळी विद्यापीठ परिसरातील सामाजिकशास्त्र, वाणिज्य व्यवस्थापनशास्त्राचे शिक्षक विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.