Showing posts with label Dr. N.D. Patil. Show all posts
Showing posts with label Dr. N.D. Patil. Show all posts

Monday, 17 January 2022

प्रा. एन. डी. पाटील यांना शिवाजी विद्यापीठाने प्रदान केलेले मानपत्र (सन २००६)

 

सन २००६मध्ये शिवाजी विद्यापीठाची सर्वोच्च मानद डी.लिट. पदवी डॉ. एन.डी. पाटील यांना प्रदान करताना तत्कालीन कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे. सोबत (डावीकडून) तत्कालीन परीक्षा संचालक एन.व्ही. ठक्कर, दीक्षान्त समारंभाचे प्रमुख पाहुणे तथा युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे 'पद्मविभूषण' प्रा. एम.एम. शर्मा आणि कुलसचिव डॉ. एस.एन. देसाई.


ज्येष्ठ नेते डॉ. एन.डी. पाटील (वय ९३ वर्षे) यांचे आज सोमवार, दि. १७ जानेवारी २०२२ रोजी निधन झाले. दि. १४ मार्च २००६ रोजी शिवाजी विद्यापीठाच्या ४२व्या दीक्षान्त समारंभात डॉ. एन. डी. पाटील यांना सन्मानदर्शक डॉक्टर ऑफ लेटर्स (डी.लिट.) ही पदवी तत्कालीन कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली होती. या समारंभात डॉ. पाटील यांना प्रदान करण्यात आलेले मानपत्र पुढीलप्रमाणे-

निःस्पृह विचारवंत, शैक्षणिक जागृती करणारे निष्ठावंत आणि प्रबोधनकार यांनी महाराष्ट्र संस्कृतीची वैभवशाली परंपरा निर्माण केली आहे. असे जाणते लोक आपल्या ध्येयाच्या वाटा स्वतःच धुंडाळतात आणि समाजाला पुरोगामित्वाचे आणि आदर्श जीवनाचे क्षितिज दाखवतात. असे धीरोदात्त पुरुष त्या समाजाचे मानदंड असतात. आपल्या भूमीतील अशा प्रबोधनकारांनी केवळ महाराष्ट्राचीच नव्हे, तर साऱ्या देशाची मान उंचावत ठेवली आहे. या परंपरेत आपल्या कृतशीलतेने तळपणारे खंदे विचारवंत म्हणजे नारायण ज्ञानदेव पाटील उर्फ एन. डी. पाटील हे एक होत.

प्रा. एन. डी. पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील ढवळी (ता. वाळवा) या गावी १५ जुलै, १९२९ रोजी एका गरीब व निरक्षर शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ढवळी (ता. वाळवा) येथे झाले व माध्यमिक शिक्षण तेथून आठ मैलावर असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या ष्टा येथील माध्यमिक शाळेत झाले. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारच्या चळवळीचे वाळवा तालुका हे मुख्य केंद्र. त्यामुळे स्वातंत्र्याचे आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे बाळकडूनही त्यांना येथेच मिळाले. या संस्कारात त्यांचे व्यक्तिमत्व घडत गेले. या सर्व गोष्टींचा एक अटळ परिपाक असा की, हात्मा गांधींच्या 'भारत छोडो' संग्रामात नारायणाने विद्यार्थीदशेत उडी घेतली. महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू छत्रपती, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांच्या सामाजिक जीवनाची वाटचाल सुरू झाली. पुढे राजाराम महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयाची बी. ए. पदवी आणि नंतर एम.ए. व एल.एल.बी. या पदव्या त्यांनी संपादन केल्या.

रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेज येथे ते प्राध्यापक म्हणून रूजू झाले. तेव्हापासून ते रयत शिक्षण संस्थेचे अविभाज्य घटक बनले. अर्थशास्त्राचे प्राध्यापक, 'कमवा व शिका' वसतिगृहाचे प्रमुख म्हणून सुरू झालेल्या त्यांच्या जीवनकार्याचा ओघ पुढे अनेक वाटांनी संस्थेच्या प्रवाहात मिसळून गेला. रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य, संस्थेच्या मॅनेजिंग कॉन्सिलचे पस्तीस वर्षे सदस्य आणि १९९० पासून आजतागायत चेअरमन म्हणून ते संस्थेची धुरा वाहत आहेत. नैतिक जबाबदारी पत्करून स्वतःला झोकून देऊन विधायक व संघटनात्मक वृत्तीने कार्य करणे हा त्यांचा प्रकृतिधर्म. आपल्या चेअरमनपदाच्या कारकिर्दीत कर्मवीर अण्णांच्या तत्त्वज्ञानाला त्यांनी कृतिशील रूप दिले आणि सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने त्याचे उपयोजन केले. बदलत्या काळानुसार नवे तंत्रज्ञान देणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संगणक प्रशिक्षण केंद्र, कर्मवीर भाऊराव पाटील इन्फर्मेशन अॅण्ड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, स्पर्धा परीक्षा केंद्र, गुरुकुल प्रकल्प, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासन आदी संस्था व प्रकल्प तर त्यांनी सुरू केले; पण, सामाजिक, सांस्कृतिक कारणांमुळे शिक्षणापासून दुरावलेल्या, परिस्थितीने मागे पडलेल्या असंख्य मुलांनाही पुढे आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. शिक्षणशास्त्रात ज्या समाजस्तरांचे नावही नव्हते, त्यांच्यासाठी त्यांनी शिक्षणाची दारे उघडी केली. महाराष्ट्रभूमीत हा प्रयोग प्रथम घडत होता. तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचविण्याचा कर्मवीरांचा मंत्र त्यातून साकारत होता. संस्थेत प्रा. एन.डी. पाटील यांनी आश्रमशाळा, साखरशाळा सुरू केल्याच, पण त्यासोबत नापासांचीही शाळा सुरू केली. परिस्थितीने मागे राहिलेल्या मुलांच्या मनातील न्यूनगंड काढून टाकून त्यांच्या मानसिक पुनर्वसनाचा हा प्रयत्न म्हणजे साक्षात जीवनाचीच आव्हाने पेलण्याचा प्रयत्न होता.

त्यांनी कर्मवीर विद्या प्रबोधिनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती यासारख्या अनेक संस्थाच्या माध्यमातून संशोधनास चालना देण्यापासून बुद्धिवादी लोकमानस घडविण्यापर्यंत अनेक प्रयोग केले. समाजपरिवर्तनासाठीची त्यांची सजगता त्यातून प्रकट होते. संस्थाचालकांनी केवळ गुणवत्तेवर कटाक्ष ठेवून निरपेक्ष वृत्तीने शिक्षण संस्थांत पावित्र्य कसे राखावे, याचा वस्तुपाठ प्रा. एन. डी. पाटील यांनी घालून दिला, हे त्यांच्या चेअरमनपदाच्या कारकिर्दीचे आणखी एक वैशिष्ट्य. व्यावसायिक अभ्यासक्रमाचा राखीव असणारा कोटा न स्वीकारता त्या जागा गुणवत्तेवर भरल्या, हे महाराष्ट्रातील रयत शिक्षण संस्थेचे आगळवेगळ उदाहरण होय.

महाराष्ट्राच्या राजकीय जीवनातही वेगवेगळी पदे विभूषित करून ते सातत्याने सक्रिय राहिले. सुमारे अठरा वर्षे ते विधान परिषदेचे सदस्य होते. १९८५-१९९० या काळात महाराष्ट्र विधान सभेचे सदस्य होते. तसेच, काही काळ विरोधी पक्षनेते होते. १९७८-८० या अवधीत ते महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री होते. पण जनतेने दिलेले प्रतिनिधीत्व आणि शासकीय सत्तापदे त्यांनी सामाजिक न्यायासाठीच वापरली. सध्याचा शेतकऱ्याच्या अस्तित्वाशी निगडित असलेला ज्वलंत प्रश्न म्हणजे एकाधिकार कापूस खरेदी. महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री असताना आणि अनेक बाजूंनी विरोध असतानादेखील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठ्या ताकदीने ही योजना त्यांनी राबविली. आजही या प्रश्नासाठी ते लढा देत आहेत. सध्या सर्वत्र जागतिकीकरणाची लाट आलेली असताना कृषिप्रधान भारतीय अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या तिच्या विपरित परिणामांची दखल घेऊन, तीस विरोध करण्याची चळवळ त्यांनी उभी केली. यामागील कष्टकरी-शोषितांविषयीची त्यांची करूणाच प्रकट होते.

सीमा प्रश्न हा उभ्या मराठी माणसाच्या मनातला धगधगता प्रश्न आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला असला, तरी आपल्या दहा लाख मराठी भाषिक बांधवांना आपण कर्नाटकात तसेच सोडून दिले, याचे शल्य त्यांच्या मनात आजही तसेच आहे. सीमा भागातील मराठी भाषिकांवर होणारा हा अन्याय त्यांच्या संवेदनशील मनाला सतत अस्वस्थ करत आहे. प्रतिकूल परिस्थितीत तेथील बांधवांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी व अस्मिता जागृत ठेवण्यासाठी त्यांनी जे लढे दिले, त्यातून त्यांच्यातील लढाऊ, खंदा कार्यकर्ताच प्रकट होतो. या सर्व अन्यायाविरुद्धच्या आंदोलनातील त्यांची भाषणे खूपच गाजली. समाज त्यातून पेटून उठत असे. या भाषणातील प्रा. एन. डी. पाटील यांचे विचार व वक्तृत्व यांना दोन शब्द साजेसे ठरतील. एक म्हणजे 'प्रपात' आणि दुसरा म्हणजे 'घणाघात'. समकालीन प्रश्नांवर त्यांनी काही लेखनही केले. "महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे कृष्णस्वरूप', 'शेवटी' शिक्षण आहे तरी कुणासाठी?, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे इ. त्यांचे लेखन समाजाला प्रेरक ठरले.

प्रा. एन. डी. पाटील यांनी केलेल्या विविध चळवळी, सत्याग्रह आंदोलने म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, मानवी हक्क आणि राष्ट्रीय भावना या मूल्यांच्या प्रतिष्ठपनेसाठी निर्माण झालेली संग्रामगाथा आहे. अन्यायाची चीड आणि न्यायाची चाड हे त्यांच्या जीवनाचे मूलसूत्र आहे. अनेक सत्याग्रह चळवळीत त्यांना कारावास भोगावा लागला. महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील कारागृहे या काळात त्यांची माहेरघरे होती. महाराष्ट्रात वेळोवेळी जे प्रश्न निर्माण झाले आणि मानवी मूल्यांनाच आव्हान देणारे राजकीय निर्णय होऊ लागले. तेव्हा त्यांचा झाडा घेण्यासाठी सर्वशक्तिनिशी ते रस्त्यावर आले. शेतकरी कामगार पक्षाची बांधिलकी मानून त्याच्या विचारप्रणालीशी ते एकनिष्ठ राहिले आहेत. कोणत्याही प्रलोभनाने विचलित न होता व्रतस्थ वृत्तीने पक्षाच्या माध्यमातून शेतकरी, कामगार, शेतमजूर, दलित, पीडित, उपेक्षित यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अखंड लढा दिला. आजही देत आहेत. केवळ सामाजिक परिवर्तनच नव्हे, तर शोषणमुक्त समाजनिर्मितीचा त्यांचा प्रयत्न आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गोवा मुक्ती संग्राम, कापूस एकाधिकार खरेदी योजना, महागाई आणि उपासमारविरोधी आंदोलन, सीमा प्रश्न, धरणग्रस्तांचे आंदोलन, जागतिकीरणविरोधातील आंदोलन आणि वीज प्रश्नावरील ताजे आंदोलन अशा अनेक पर्वानी प्रा. एन. डी. पाटील यांची संग्रामगाथा भरलेली आहे.

थोरामोठ्यांचे सद्गुण आणि कर्तृत्व यातून उच्च जीवनाची ऊर्जा घेऊन त्याविषयी मनःपूर्वक आदरभाव प्रकट करणे हा महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा स्वभाव आहे. त्यानुसारच प्रा. एन. डी. पाटील यांच्या सर्वस्पर्शी कार्याचा भाई माधवराव बागल पुरस्कार, क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार, कर्मवीर भाऊराव पाटील समाजसेवा पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी झालेला गौरव याची साक्ष आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद तसेच स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांनी प्रा. एन. डी. पाटील यांच्या समग्र शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यास डी.लिट. ही सन्मानदर्शक पदवी प्रदान करून गौरविले आहे.

शिवाजी विद्यापीठाशी असणारे एन. डी. पाटील यांचे दृढ नाते कुणाच्याही सहज लक्षात येणार नाही, इतके जुने आहे. विद्यापीठाच्या स्थापनेसाठी महाराष्ट्र शासनाने १९६२ मध्ये जी पहिलीच सल्लागार समिती नियुक्त केली होती, तिचे प्रा. एन. डी. पाटील सदस्य होते. १९६५ मध्ये विद्यापीठाच्या अधिसभेवर ते निवडून आले होते. विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्रे विद्याशाखेचे ते अधिष्ठाता होते. आणि १९६५-१९७८ अशी तब्बल तेरा वर्षेते विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचेही सदस्य होते. या अधिकार मंडळात राहून आपली शिक्षण विषयक भूमिका वेळोवेळी प्रकट करीत शिवाजी विद्यापीठाला त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण असे शैक्षणिक व समाजाभिमुख स्वरूप प्राप्त करून देण्यात आपला वाटा उचलला. त्यांनी या विद्यापीठास दिलेली ही बहुमोल देणगी आम्ही मानतो.

अशाप्रकारे सामन्यत्वाकडून असामान्यत्वाकडे गेलेले एक समर्थ, जनहितैषी, शोषणमुक्त व मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीसाठी धडपडणारे तसेच शिक्षणाच्या मूलगामी विचाराकडे समाजाला नेणारे एक कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्त्व प्रा. एन. डी. पाटील यांच्या रूपाने आपणास लाभले आहेत. प्रखर तत्त्वविचाराचा व बुलंद वक्तृत्वाचा आचरणशुद्ध नेता अशी त्यांची प्रतिमा मराठी माणसाने आपल्या मनात जपली आहे. दुसऱ्यासाठीच झगडण्यात त्यांच्या आयुष्याचे सुवर्णपात्र ओसंडत राहिले. कर्तव्यनिष्ठ विचारवंत अनेक लौकिक लाभालोभापलिकडे गेलेले असतात, त्यांना कीर्तीचे धागे बांधू शकत नाहीत. उलट अशा महनीय व्यक्तींचे अस्तित्व हा समाजाच्याच अभिमानाचा विषय असतो. प्रा. एन. डी. पाटील यांच्याविषयी आम्हा सर्वांची हीच भावना आहे. त्यांना डी. लिट. ही सन्मानदर्शक पदवी प्रदान केल्याने आपलाच सन्मान झाल्याचे विद्यापीठास वाटते आहे. आदरणीय प्रा. एन. डी. पाटील महोदय, सामाजिक कृतज्ञतेच्या प्रांज भावनेने डी. लिट. ही सन्मानदर्शक पदवी शिवाजी विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या वतीने आपणांस आज प्रदान करीत आहोत. प्रस्तुत पदवीचा आपण स्वीकार करावा, अशी विनंती आहे.

ज्येष्ठ नेते डॉ. एन.डी. पाटील यांच्या निधनामुळे

कृतीशील, खंदे प्रबोधक नेतृत्व हरपले: कुलगुरू डॉ. शिर्के

 



सन २०१९मध्ये शिवाजी विद्यापीठाचा 'प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार' ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन.डी. पाटील यांना प्रदान करताना ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार. व्यासपीठावर तत्कालीन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, सौ. सरोज (माई) पाटील, प्राचार्य बी.ए. खोत आदी.

सन २००६मध्ये शिवाजी विद्यापीठाची सर्वोच्च मानद डी.लिट. पदवी डॉ. एन.डी. पाटील यांना प्रदान करताना तत्कालीन कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे. सोबत (डावीकडून) तत्कालीन परीक्षा संचालक एन.व्ही. ठक्कर, दीक्षान्त समारंभाचे प्रमुख पाहुणे तथा युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे 'पद्मविभूषण' प्रा. एम.एम. शर्मा आणि कुलसचिव डॉ. एस.एन. देसाई.

ज्येष्ठ नेते डॉ. एन.डी. पाटील यांनी सन २०१९मध्ये शिवाजी विद्यापीठाचा प्राचार्य कणबरकर पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेले अत्यंत महत्त्वाचे भाषण. (ध्वनीचित्रफीत)

ज्येष्ठ नेते श्री. शरद पवार यांनी डॉ. एन.डी. पाटील यांच्याविषयी व्यक्त केलेल्या भावना. (ध्वनीचित्रफीत)


कोल्हापूर, दि. १७ जानेवारी: ज्येष्ठ नेते डॉ. एन.डी. पाटील यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक अत्यंत विवेकनिष्ठ, निस्पृह विचारवंत आणि सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कणखर कृतीशीलतेने तळपणारे खंदे प्रबोधक नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या रुपाने शिवाजी विद्यापीठाचा एक महान मार्गदर्शक व हितचिंतक काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शोकभावना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी व्यक्त केल्या आहेत.

कुलगुरू डॉ. शिर्के यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्राचे पुरोगामी व्यक्तीमत्त्व घडविणाऱ्या महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाने आणि विचारांनी प्रभावित झालेल्या डॉ. एन.डी. पाटील यांनी विद्यार्थी दशेपासूनच त्या आदर्शाबरहुकूम वाटचाल केली आणि अखेरच्या श्वासापर्यंत अव्याहतपणे जपली. एन.डी. पाटील यांचे जीवन म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, मानवी हक्क आणि राष्ट्रीय भावना या मूल्यांच्या प्रतिष्ठापनेसाठी निर्माण झालेली संग्रामगाथाच आहे. 

शिवाजी विद्यापीठाशीही एन.डी. पाटील सरांचे स्थापनेपूर्वीपासूनचे दृढ नाते राहिले. विद्यापीठाच्या स्थापनेसाठी महाराष्ट्र शासनाने १९६२ मध्ये नियुक्त केलेल्या पहिल्या सल्लागार समितीचे ते सदस्य होते. १९६५ मध्ये विद्यापीठाच्या अधिसभेवर ते निवडून आले होते. विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे विद्याशाखेचे ते अधिष्ठाता होते. १९६५ ते १९७८ अशी तब्बल तेरा वर्षे ते विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचेही सदस्य होते. विविध अधिकार मंडळांच्या माध्यमातून आपली शिक्षणविषयक भूमिका वेळोवेळी प्रकट करीत शिवाजी विद्यापीठाला त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण असे शैक्षणिक व समाजाभिमुख स्वरुप प्राप्त करून देण्यात मोलाचा वाटा उचलला. विद्यापीठात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासन स्थापन करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला. शिवाजी विद्यापीठाने सन २००६मध्ये सर्वोच्च डी.लिट. पदवी प्रदान करून त्यांच्या या योगदानाचा गौरव केला. तसेच २०१९ साली प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार देऊनही त्यांना गौरविले. त्यांचे अखेरपर्यंत विद्यापीठाशी स्नेहाचे नाते राहिले. एन.डी. पाटील यांच्या निधनामुळे शिवाजी विद्यापीठ परिवार एका महान मार्गदर्शक व हितचिंतकास मुकला आहे, असेही कुलगुरूंनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

Thursday, 27 December 2018

ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन.डी. पाटील यांना यंदाचा

प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते १२ जानेवारीला प्रदान समारंभ



कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची माहिती

Dr. N. D. Patil
कोल्हापूर, दि. २७ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा प्राचार्य आर.के. कणबरकर राष्ट्रीय पुरस्कार यंदा ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन.डी. पाटील यांना आज जाहीर करण्यात आला. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात शनिवार, दि. १२ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ५.३० वाजता ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय कृषीमंत्री, खासदार शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान समारंभ होईल, अशी घोषणा कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

कुलगुरू डॉ. शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू (स्व.) प्राचार्य रा.कृ. कणबरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार निर्मितीसाठी त्यांच्या कुटुंबियांनी शिवाजी विद्यापीठाकडे २५ लाख रुपयांची ठेव प्रदान केली आहे. श्रीमती शालिनी कणबरकर यांच्यासमवेत झालेल्या सामंजस्य करारातून शिवाजी विद्यापीठाच्या या माजी कुलगुरूंच्या स्मृतिप्रित्यर्थ प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्काराची संयुक्त निर्मिती करण्यात आली. देशातील शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा तसेच अन्य क्षेत्रांत अत्युत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तीला प्राचार्य कणबरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी पुरस्कार देण्यात येतो. रुपये १ लाख ५१ हजार रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यापूर्वी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. सी.एन.आर. राव (२०१६), रयत शिक्षण संस्था (२०१७), ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल (२०१८) यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

यावेळी पुरस्कारासंदर्भात अधिक माहिती देताना कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले की, ज्येष्ठ नेते व विचारवंत डॉ. एन.डी. पाटील यांचे आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक जडणघडणीत डॉ. एन.डी. पाटील यांचे अतिशय महत्त्वाचे योगदान आहे. समाजकारणासाठी राजकारणाचा वापर करणाऱ्या एका ध्येयनिष्ठ विचारवंतांच्या फळीचे ते प्रतिनिधी आहेत. नैतिकता हा त्यांच्या प्रत्येक कार्याचा आणि आंदोलनाचा प्रमुख कणा आहे. त्या बळावरच त्यांनी अगदी अलिकडच्या टोल हटाव आंदोलनापर्यंतची अनेक आंदोलने यशस्वी केली आहेत. संयुक्त महाराष्ट्राचा लढा असो, शेतकरी, कष्टकऱ्यांची, कामगारांची चळवळ असो किंवा आजही अव्याहत सुरू असलेला कर्नाटक-महाराष्ट्राचा सीमाप्रश्नाचा लढा असो, डॉ. पाटील यांनी या साऱ्या चळवळींना प्राप्त करून दिलेले नैतिक अधिष्ठान ही फार मोलाची बाब आहे. शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी आग्रही असणाऱ्यांत आघाडीवर असलेल्या डॉ. पाटील यांनी स्थापनेनंतरच्या कालखंडातही विद्यापीठाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विद्यापीठाच्या पहिल्या सल्लागार समितीच्या सदस्यत्वापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे अधिसभा सदस्य, कार्यकारिणी सदस्य, सामाजिक शास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता असा अनेकांगांनी झाला. शिवाजी विद्यापीठाने त्यांच्या योगदानाबद्दल सन २००६मध्ये विद्यापीठाची सर्वोच्च मानद पदवी डी.लिट. देऊन त्यांचा गौरव केला आहे.

यावेळी शोध समितीचे सदस्य डॉ. जे.एफ. पाटील म्हणाले की, समितीच्या अवघ्या एकाच बैठकीत आणि एकमताने यंदाच्या पुरस्कारासाठी डॉ. एन.डी. पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, सहकारिता आणि शिक्षण या पाच क्षेत्रांत अधिकारपूर्ण आणि सहज वावर असणारे हे व्यक्तीमत्त्व आहे. संविधान आणि कायद्याच्या शिस्तीतच त्यांनी आपला संघर्ष मांडला. रायगड येथील विशेष आर्थिक क्षेत्रांसाठी (सेझ) संपादित केलेल्या सुमारे ३६ हजार एकर जमिनीसाठीचा लढा हा ऐतिहासिक स्वरुपाचा आहे. छोट्या छोट्या शेतकऱ्यांना संघटित करून व्यवस्थेविरुद्ध अशा प्रकारचा लढा यशस्वी करणे सहजशक्य बाब नव्हती. मात्र पाटील सरांनी केवळ आपल्या शिस्तबद्ध व्यूहरचनेच्या बळावर तो यशस्वी केला. अद्यावत संदर्भांच्या अभ्यासासह भूमिका घेण्याचा त्यांचा गुणधर्म हा एकमेवाद्वितिय स्वरुपाचा आहे. त्यांना पुरस्कार देताना होणारा आनंद हा त्यामुळे खूप मोठा आहे.


यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, अधिष्ठाता डॉ. भारती पाटील, शोध समितीचे सदस्य डॉ. जे.एफ. पाटील, प्राचार्य डॉ. बी.ए. खोत आदी उपस्थित होते.



डॉ. एन.डी. पाटील यांचा संक्षिप्त परिचय


संपूर्ण नाव : डॉ. नारायण ज्ञानदेव पाटील
जन्म : १५ जुलै १९२९ ढवळी (नागाव), जि.सांगली येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात जन्म
शिक्षण : एम.ए. (अर्थशास्त्र), पुणे विद्यापीठ, (१९५५); एल.एल.बी. पुणे विद्यापीठ (१९६२)
अध्यापन कार्य:
  • १९५४- १९५७ छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे प्राध्यापक तसेच कमवा व शिकाया योजनेचे प्रमुख व रेक्टर
  • १९६० साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, इस्लामपूर येथे प्राचार्य
शैक्षणिक क्षेत्रातील कार्य:
  • शिवाजी विद्यापीठ पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य (१९६२)
  • शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य (१९६५)
  • शिवाजी विद्यापीठ कार्यकारिणी सदस्य (१९६२-१९७८)
  • शिवाजी विद्यापीठ सामाजिकशास्त्र विभागाचे डीन (१९७६-१९७८)
  • सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य (१९९१)
  • रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- (१९५९ पासून)
  • रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन – (१९९० पासून)
  • दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, बेळगाव अध्यक्ष – (१९८५ पासून)
राजकीय कार्य:
  • १९४८ शेतकरी कामगार पक्षात प्रवेश
  • १९५७ मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस
  • १९६०-६६,१९७०-७६,१९७६-८२ अशी एकूण १८ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य
  • १९६९- १९७८, १९८५ २०१० शे.का.प.चे सरचिटणीस
  • १९७८-१९८० सहकारमंत्री, महाराष्ट्र राज्य
  • १९८५-१९९०- महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी)
  • १९९९-२००२ निमंत्रक, लोकशाही आघाडी सरकार
  • महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते.
मिळालेले सन्मान / पुरस्कार:
  • भाई माधवराव बागल पुरस्कार (१९९४)
  • स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ, नांदेड डी.लीट.पदवी (१९९९)
  • राष्ट्रीय बियाणे महामंडळ (अध्यक्षपद) भारत सरकार (१९९८ २०००)
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ डी.लीट. पदवी (२०००)
  • विचारवेध संमेलन, परभणी अध्यक्षपद (२००१)
  • शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर डी.लीट. पदवी (२००६)
  • शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार
भूषविलेली पदे:
  • रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल- सदस्य
  • समाजवादी प्रबोधिनी ,इचलकरंजी उपाध्यक्ष
  • अंधश्रद्धा निमूर्लन समिती,महाराष्ट्र अध्यक्ष
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी , सातारा अध्यक्ष
  • जागतिकीकरणविरोधी कृती समिती मुख्य निमंत्रक
  • म.फुले शिक्षण संस्था, इस्लामपूर अध्यक्ष
  • दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था, बेळगाव अध्यक्ष
  • महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समिती सदस्य
प्रसिद्ध झालेले लेखन:
  • समाजविकास योजनेचे वस्त्रहरण (पुस्तिका)
  • शेतजमिनीवरील कमाल मर्यादा आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिगामी कायदा (पुस्तिका) (१९६२)
  • काँग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट (पुस्तिका) (१९६२)
  • शेतीमालाला किफायतशीर किमतीची हमी आणि घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयीकरण (पुस्तिका) (१९६३)
  • वाढती महागाई आणि ग्राहकांची ससेहोलपट (पुस्तिका) (१९६६)
  • महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे (White Paper) कृष्णस्वरूप (पुस्तिका) (१९६७)
  • शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत (पुस्तक) (१९७०)
  • शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी? (पुस्तिका) (१९९२)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (पुस्तिका)
  • नववे विचारवेध संमेलन परभणी, अध्यक्षीय भाषण, (२००१) (नवसाम्राज्यवादी युगातील भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने)
रयत शिक्षण संस्थेतील विशेष कार्य:
  • चेअरमन पदाच्या काळात : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आश्रमशाळा, साखरशाळा, नापासांची शाळा, श्रमिक विद्यापीठ, संगणक शिक्षक केंद्र, कर्मवीर भाऊराव पाटील इन्फॉर्मेशन अॅण्ड टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट, ‘कमवा व शिकाया योजनेवर भर, स्पर्धा परीक्षा केंद्रे, गुरुकुल प्रकल्प, लक्ष्मीबाई पाटील शिष्यवृत्ती योजना, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना यांची राबवणूक, दुर्बल शाखा विकास निधी, महर्षी वि. रा. शिंदे अध्यासन केंद्र आदींची स्थापना, कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत विविध पुस्तकांची निर्मिती. 
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी, समाजवादी प्रबोधिनी, अंधश्रद्धा निर्मुलन समिती या संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थी, शिक्षक प्राध्यापक प्रबोधन कार्याला चालना.

Tuesday, 18 October 2016

कॉ. दत्ता देशमुख अत्यंत तेजस्वी, लढाऊ नेते: डॉ. एन.डी. पाटील






कोल्हापूर, दि. १८ ऑक्टोबर: कॉ. दत्ता देशमुख हे एक अत्यंत तेजस्वी, लढाऊ आणि हिम्मतबाज नेतृत्व होते. या अलौकिक व्यक्तित्वाच्या विविध पैलूंची नव्या पिढीला ओळख करून देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन.डी. पाटील यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठातील प्रस्तावित कॉ. दत्ता देशमुख अध्यासनासाठी एस.एम.ई. वर्कर्स फेडरेशन आणि स्वाभिमानी वीज कामगार या मुखपत्राकडून दहा लाख रुपयांचा निधी विद्यापीठाकडे सुपूर्द करण्याचा कार्यक्रम गणितशास्त्र अधिविभागात झाला. त्यावेळी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे प्रमुख उपस्थित होते.
कॉ. दत्ता देशमुख यांच्या आठवणींना उजाळा देताना डॉ. पाटील म्हणाले, कॉ. देशमुख यांची काम करण्याची पद्धत अत्यंत झंझावाती होती. एक लढवय्या कामगार नेते असण्याबरोबरच अत्यंत अभ्यासू वृत्ती त्यांच्यात होती. त्या बळावरच त्यांनी कृषी आणि सिंचनाच्या संदर्भातही महाराष्ट्राला मोलाचे योगदान दिले. संयुक्त महाराष्ट्र लढा असो, दुष्काळ निर्मूलन समितीवरील कामकाज असो, साऱ्याच बाबतीत त्यांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा राहिला. तत्कालीन परिस्थितीत त्यांनी उभारलेला उसाच्या किंमतीसाठीचा संघर्ष आणि आजच्या परिस्थितीतील त्याच प्रकारचे लढे यांच्यात अत्यंत गुणात्मक फरक असल्याचे दिसून येते. निवडणुकीच्या मर्यादांतून बाहेर पडून पूर्णतः कामगार व सामाजिक चळवळीला त्यांनी वाहून घेतले.
यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर आणि गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी दत्ता देशमुख यांना प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन कायद्याखाली केलेली स्थानबद्धता आणि त्यानंतर घडलेल्या विविध राजकीय घडामोडींची अत्यंत रंजक माहितीही डॉ. पाटील यांनी या वेळी दिली.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, कॉ. दत्ता देशमुख यांना लहानपणापासूनच त्यांच्या आईकडून दातृत्वाचे संस्कार लाभले. स्वतःची परिस्थिती अत्यंत खडतर असतानाही इतरांना मदत करण्याचा गुण त्यांनी आपल्या आईकडून घेतला. हे दातृत्व त्यांनी आयुष्यभर जोपासले. प्रत्यक्ष शिक्षक नसले तरी त्यांनी शिक्षकाचा पिंड सदोदित जोपासला. जनसामान्यांचा कळवळा असणारा एक द्रष्टा पुढारी, कृतीशील शेतकरी, अभ्यासू समाजचिंतक असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तीमत्त्वात दडलेले होते. प्रस्तावित अध्यासनाच्या माध्यमातून त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले, विविध समाजघटकांशी संवाद प्रस्थापित करणे आणि त्यांच्या हिताचे कार्यक्रम राबविणे हे विद्यापीठाचे उद्दिष्ट असते. त्याची पूर्तता करणारे कॉ. दत्ता देशमुख अध्यासन आहे. त्यांच्यामुळेच आज विद्यापीठात इतक्या मोठ्या संख्येने वीज कर्मचारी प्रथमच आले, ही मोठी उपलब्धी आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष कॉ. मोहन शर्मा म्हणाले, कॉ. दत्ता देशमुख यांचे विचार व कार्य नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अध्यासनाचा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावेल. त्यांनी केलेल्या त्याग व त्यामागील भावना ही आजच्या पिढीसमोर मांडण्याची नितातं गरज निर्माण झाली आहे. सुजाण समाजाची जडणघडण होण्याच्या दृष्टीने प्रस्तावित अध्यासन उपयुक्त ठरेल. नागपूर विद्यापीठातही कॉ. ए.बी. वर्धन यांच्या नावे अध्यासन सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
यावेळी डॉ. एन.डी. पाटील यांच्या हस्ते प्रस्तावित अध्यासनासाठी दहा लाख रुपयांचा धनादेश आणि कॉ. दत्ता देशमुख यांची प्रतिमा कुलगुरू डॉ. शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. स्वाभिमानी वीज कामगारचे संपादक सुरेश परचुरे यांनी प्रास्ताविक केले, तर वीज कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन विनय कोटी यांनी आभार मानले.