Showing posts with label Education Department. Show all posts
Showing posts with label Education Department. Show all posts

Saturday, 19 March 2016

ज्ञानरचनावादी संशोधनाचे लाभ वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्याची गरज: डॉ. शेफाली पंड्या




कोल्हापूर, दि.19 मार्च: ज्ञानरचनावादी संशोधनाचे लाभ समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. शेफाली पंड्या यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'ज्ञानरचनावादी अध्यापन शास्त्रातील संशोधने प्रयोग' या विषयावरील दोन दिवसीय आंतरविद्याशाखी राष्ट्रीय परिषदे बीजभाषण करताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉ. डी.आर. मोरे होते, तर शिक्षण संहसंचालक डॉ. अजय साळी प्रमुख उपस्थित होते.
डॉ. पंड्या म्हणाल्या, प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत ऱ्या अर्थाने ज्ञानरचनावाद आणावयाचा असेल तर दोन गोष्टींची नितांत गरज आहे. त्या म्हणजे प्रथम सर्वच शिक्षण स्तरावरील शिक्षकांचा परंपरावादी शैक्षणिक दृष्टिकोन बदलावा लागेल आणि त्याचबरोबर या क्षेत्रातील संशोधनांवर विशेषत: ज्ञानरचनावादी मूल्यमापनासंदर्भातील संशोधनांवर भर द्यावा लागेल. ज्ञानरचनावाद या विषयातील काही संशोधनेही त्यांनी सादर केली.
डॉ. डी.आर. मोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात उच्च शिक्षणामध्ये ज्ञानरचनावाद कसा आणता येईल, याविषयी चर्चा केली.
शिक्षणशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. प्रतिभा पाटणकर यांनी स्वागत केले, डॉ. एम. एस. पद्मिनी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. चेतना सोनकांबळे यांनी आभार मानले. श्रीमती सुषमा कोंडुसकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ. जी. एस. पाटील, डॉ. एन. आर. सप्रे, संशोधन विद्यार्थी,विद्यार्थिनी उपस्थित होते.
परिषदेच्या दुसऱ्या सत्रा कुवेम्पु विद्यापीठ, शिमोगा (कर्नाटक) येथील शिक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एस. एस. पाटील यांनी ज्ञानरचनावादी अध्यापनशास्त्रासमोरील काही आव्हाने या विषयावर विचार मांडले. ज्ञानरचनावादी दृष्टीकोनाचा प्रत्यक्ष वापर करताना शिक्षक, अभ्यासक्रम आणि प्रत्यक्ष समाज आदी स्तरांवर अनेक आव्हाने आपल्यासमोर आहेत. त्यांची उत्तरे शोधणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या परिषदेत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक राज्यांतील विविध विद्यापीठांमधून शिक्षणप्रेमी, प्राथमिक माध्यमिक शिक्षक सहभागी झाले आहेत. या दोन दिवसांत सुमारे 50 शोधनिबंधाचे वाचन आणि चर्चा होणार आहे.

Thursday, 20 March 2014

एकविसावे शतक समाजशास्त्रीय संशोधनाचे: डॉ. आनंद करंदीकर




संशोधन पद्धतीविषयक राष्ट्रीय परिसंवादाचे शिवाजी विद्यापीठात उद्घाटन

कोल्हापूर, दि. २० मार्च: विसावे शतक हे जीवशास्त्रीय आणि भौतिकीय संशोधनाचे होते, तर एकविसावे शतक हे समाजशास्त्रीय संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, असे मत व्यवस्थापन शास्त्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. आनंद करंदीकर यांनी आज येथे व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाचा शिक्षणशास्त्र अधिविभाग आणि इंडियन कौन्सिल फॉर सोशल सायन्स रिसर्च, मुंबई (आयसीएसएसआर) यांच्या संयुक्त विद्यमाने रिसर्च मेथडॉलॉजी, एथिकल कन्सिडरेशन्स इन एज्युकेशन ॲन्ड सोशल सायन्स रिसर्च या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन.जे. पवार होते. मानव्यविद्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.
एकविसाव्या शतकातील संशोधक आणि मार्गदर्शकांना आवश्यक कौशल्ये या विषयावर बोलताना डॉ. करंदीकर म्हणाले, वैज्ञानिक संशोधनाने मानवाच्या राहणीमानाचा दर्जा वृद्धिंगत झाला. तो दर्जा अबाधित राखण्याची जबाबदारी प्रामुख्याने समाजशास्त्रीय संशोधनावर आहे. स्त्री-पुरूष समानता, जातिभेद निर्मूलन, विशेष सामाजिक घटकांच्या हक्कांचे संरक्षण आणि सर्वसमावेशक वृद्धी या चार प्रमुख गोष्टींवर या संशोधनाचा भर असला पाहिजे. मात्र, ते करत असताना ओबडधोबड काम, विपर्यस्त अथवा चुकीचे दावे तसेच वाङ्मयचौर्य या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये माहिती तंत्रज्ञानाधारित संवाद कौशल्य साधनांचा वापर केला गेला पाहिजे. सामाजिक सहभागावर आधारित अध्ययन-अध्यापन प्रणालीचा अंगिकार ही सुद्धा त्यासाठीची महत्त्वाची गरज आहे.
इंटरनेटसारख्या माध्यमामुळे आज आपल्याकडे विविध प्रकारचा डाटा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्या सर्व माहितीचे योग्य व्यवस्थापन आणि विश्लेषण पद्धतींचा विकास करण्याची गरज असल्याचे सांगून डॉ. करंदीकर म्हणाले, या सर्व प्रकारच्या उपलब्ध माहितीच्या अनुषंगाने आपण जोपर्यंत शास्त्रीय प्रश्न उपस्थित करत नाही आणि मिळालेल्या उत्तरांचे विश्लेषण करत नाही, तोपर्यंत त्यातून योग्य संशोधन साकार होणार नाही. संख्यात्मक संशोधनापेक्षा गुणात्मक व अर्थपूर्ण संशोधन होण्याची गरज आज निर्माण झाली आहे. प्रादेशिक भाषांतून संशोधनाला प्रोत्साहन देण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.
दर्जेदार संशोधन संस्कृतीचा अद्याप आपल्याकडे विकास झालेला नाही. ती विकसित करण्यासाठी बुद्धीजीवी वर्गाचे परस्पर साहचर्य, वाद-संवाद या गोष्टी अत्यावश्यक असून ज्ञानाची भूक असणारा विद्यार्थी घडविल्याखेरीज दर्जेदार संशोधन संस्कृतीची निर्मिती अशक्य असल्याचेही डॉ. करंदीकर यांनी सांगितले.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना कुलगुरू डॉ. पवार म्हणाले, संशोधकांनी संशोधनाकडे पाहण्याचा पारंपरिक, संकुचित दृष्टीकोन बदलून अधिक व्यापक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्समधील विषय आपल्या संशोधनाचे विषय व्हायला हवेत. केवळ पदवी मिळविणे इतके मर्यादित ध्येय बाळगणाऱ्या आणि पीएच.डी. हे प्राथमिक संशोधन न मानता अखेरचा टप्पा मानणाऱ्या संशोधकांमुळे विद्यापीठीय संशोधनाचा एकूणच दर्जा खालावत चालला आहे. केवळ नेट-सेट परीक्षांना पर्याय आणि एपीआय गुणांक वाढविण्याचे साधन म्हणून संशोधनाकडे पाहिले जात असल्यामुळेही चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. संशोधकांनी संशोधकीय विश्वासार्हता आणि उच्च नैतिक मूल्यांची जोपासना करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला डॉ. एम.एस. पद्मिनी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. एन.आर. सप्रे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. रुपाली संकपाळ, डॉ. एम.व्ही. गुळवणी, डॉ. पी.एस. पाटणकर, डॉ. शरद नावरे, डॉ. निशा पवार, डॉ. वासंती रासम आदी उपस्थित होते.