Showing posts with label NSS. Show all posts
Showing posts with label NSS. Show all posts

Monday, 5 June 2017

‘आव्हान’ जोमात; कुलगुरूंचाही सहभाग!













कोल्हापूर, दि. ५ जून: शिवाजी विद्यापीठात १ जूनपासून सुरू झालेले आव्हान-२०१७ हे राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबीर अत्यंत जोमाने सुरू आहे. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनीही काल दिवसभर या शिबिरातील विविध सत्रांत तसेच प्रात्यक्षिकांतही सहभाग घेतला.
या शिबिरांतर्गत सहभागी शिबिरार्थींना जल, भूमी व वायू यांच्या संदर्भातील कोणत्याही प्रकारची आपत्ती उद्भवली असता घ्यावयाची दक्षता आणि मदतकार्य याविषयी एनडीआरएफची टीम सकाळी सात वाजल्यापासूनच प्रशिक्षण देत आहे. जलविषयक आपत्ती व्यवस्थापनाविषयी राजाराम तलाव येथे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात येत आहे. उपलब्ध साहित्याचा वापर करून बचावकार्य कसे सुरक्षितरित्या पार पाडावे, तराफे कसे तयार करावेत, प्लास्टीक डबे, कॅन, बाटल्या, दोरांच्या सहाय्याने तात्पुरती जीवरक्षणाची सुविधा कशी उभारावी, या सर्वांचा या प्रशिक्षणात समावेश आहे. त्याचप्रमाणे पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला शास्त्रशुद्ध पद्धतीने तसे वाचवावे, लाँचमधून मदतकार्य कसे पार पाडावे, याविषयी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात येत आहे.
मोठमोठ्या इमारतींमध्ये आपत्तीत अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्याचे प्रशिक्षण दूरशिक्षण केंद्र इमारतीमध्ये देण्यात येत आहे. दोरखंडांच्या सहाय्याने एनडीआरएफचे जवान चित्तथरारक पद्धतीने इमारतींच्या भिंतीवर प्रात्यक्षिके सादर करून मुलांना मार्गदर्शन करीत आहेतच, शिवाय, सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनीही न घाबरता या प्रात्यक्षिकांत सहभागी होत आहेत. तात्पुरता रोप-वे अल्पावधीत तयार करून इमारतीत अडकलेल्या व्यक्तींची निर्धोक पद्धतीने जलदरित्या कशी सुटका करावी, याचेही प्रशिक्षण शिबिरार्थींना दिले जात आहे.

कुलगुरूंनी गिरवले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे




दहा दिवसांच्या आव्हान शिबिरातील प्रत्येक घडामोडीवर आपण बारकाईने लक्ष ठेवून राहू, असे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आपल्या उद्घाटनाच्या भाषणातच सांगून ठेवले होते. मात्र, कालच्या रविवारी थोडी उसंत मिळताच तिचा उपयोग कुलगुरू डॉ. शिंदे यांनी संपूर्ण दिवस शिबिरार्थी विद्यार्थ्यांसमवेत आपत्ती व्यवस्थापनाचे धडे गिरवण्यात घालविला. आपत्ती व्यवस्थापन ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी असून एकमेकांच्या मदतीला धावून जात असताना शास्त्रशुद्ध माहिती व सुविधांनी आपण सुसज्ज असले पाहिजे, या दृष्टीने कुलगुरू डॉ. शिंदे यांनी रविवारची सकाळ राजाराम तलावावर जल आपत्ती व्यवस्थापनाविषयी जाणून घेण्यात घालविला, तर सायंकाळी त्यांनी इमारतींवरून आपद्ग्रस्तांची सुटका कशी करावी, हे सुद्धा जाणून घेतले. एनडीआरएफचे निरीक्षक श्री. एस.डी. इंगळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांनी विविध शंका विचारून त्यांचे निरसन करून घेतले. तात्पुरत्या रोप-वेच्या सहाय्याने दूरशिक्षण केंद्राच्या छतावरुन ते थेट जमिनीच्या दिशेने झेपावले, तेव्हा त्यांच्या जिद्दी, जिज्ञासू आणि धाडसी वृत्तीची खात्रीच उपस्थित विद्यार्थ्यांना पटली. थेट कुलगुरूच आपल्यासमवेत प्रशिक्षणात सहभागी झाल्याचे पाहून शिबिरार्थींचाही उत्साह द्विगुणित झाल्याचे दिसून येत होते. यावेळी एनएसएसचे समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, डॉ. एन.पी. सोनजे आदी उपस्थित होते.

Wednesday, 27 April 2016

समाजाभिमुख दृष्टीकोन विकसित करण्यात राष्ट्रीय सेवा योजनेचे मोलाचे योगदान: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे



शिवाजी विद्यापीठाच्या सन २०१५-१६ उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना महाविद्यालयीन एकक तथा कार्यक्रम अधिकारीम्हणून कोल्हापूर जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार स्वीकारताना डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲन्ड टेक्नॉलॉजी, कसबा बावडा, कोल्हापूर या महाविद्यालयाचे प्रा. प्रमोद डी. चौगुले व मान्यवर.
कोल्हापूर, दि. २७ एप्रिल: विद्यार्थ्यांत समाजाभिमुख दृष्टीकोन विकसित करण्यात राष्ट्रीय सेवा योजनेचे (एन.एस.एस.) मोठे योगदान असून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना व उपक्रमांच्या अंमलबजावणीत एन.एस.एस.ने अधिक सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे सन २०१५-१६मधील विद्यापीठस्तरीय पुरस्कार वितरण व सन २०१६-१७ची कार्यनियोजन बैठक असा संयुक्त कार्यक्रम विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. 

कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, केंद्र सरकार व राज्य शासन यांनी व्यापक सामाजिक हिताच्या दृष्टीकोनातून अनेक अभिनव आणि महत्त्वाचे उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये मतदार जागृती व नोंदणी, जन-धन योजना, डिजीटल इंडिया, जलयुक्त शिवार, स्वच्छ भारत, व्यसनमुक्ती अभियान आदींचा समावेश आहे. त्यांच्यासंदर्भात समाजात जागृती करणे, त्यांना सदर उपक्रम राबविण्यासाठी प्रेरित करणे अशी कामे एनएसएसच्या माध्यमातून अधिक उत्तम प्रकारे करता येतील. त्यासाठी शिक्षक, विद्यार्थी यांनी एनएसएसच्या माध्यमातून काम करणे अपेक्षित आहे.
छोट्या-छोट्या गोष्टींतून देशसेवा शक्य आहे, हे एनएसएससारख्या उपक्रमांतून सिद्ध झाले आहे. या सर्व उपक्रमांकडे सकारात्मकपणे पाहण्याचा दृष्टीकोन समाजाच्या सर्व स्तरांत निर्माण होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे यांनी विद्यार्थ्यांच्या श्रमशक्तीच्या बळावर या जगात अशक्य असे काहीही नाही, याची प्रचिती एनएसएसच्या उपक्रमांतून येते; तसेच, भरीव कार्याची उभारणी या माध्यमातून होते, असे गौरवोद्गार काढले.
या प्रसंगी केआयटी महाविद्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या शिवाजी विद्यापीठ एनएसएस संकेतस्थळाचे कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हे संकेतस्थळ निर्माण करणाऱ्या टीमचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते विद्यापीठ स्तरीय तसेच कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्हा स्तरीय एनएसएस महाविद्यालयीन एकक, कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक व स्वयंसेविका यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. विद्यापीठाचे स्मृतिचिन्ह व ग्रंथभेट असे सत्काराचे स्वरुप होते.
एनएसएसचे कार्यक्रम समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सह-समन्वयक डॉ. सुरेश शिखरे यांनी आभार मानले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांच्यासह एनएसएसचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक डॉ. डी.जी. चिघळीकर, सांगली जिल्हा समन्वयक डॉ. सदाशिव मोरे, सातारा जिल्हा समन्वयक डॉ. एस.एन. जाधव आणि महाविद्यालयांचे प्राचार्य, कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुरस्कारप्राप्त मान्यवर व महाविद्यालयांची यादी पुढीलप्रमाणे-