Wednesday, 16 March 2016

वेदनाच कथेला घडवते: भास्कर चंदनशिव

कोल्हापूर, दि. १५ मार्च: कथाकार हा सामान्य माणसाच्या जगण्याशी एकरूप होऊन सामान्यांच्या जगण्यातील वेदनेला शब्दरूप देत असतो. संपूर्ण साहित्याच्या मुळाशी मानवी वेदनाच असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचा विदेशी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवलेखक कार्यशाळेच्या उद्‍घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. डॉ. देवानंद शिंदे होते. समन्वयक डॉ. मेघा पानसरे यांनी स्वागत केले.  डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले.
श्री. चंदनशिव म्हणाले, लेखक 'नाही रे' वर्गाचा आवाज आपल्या साहित्यातून मांडत असतो. १९४५पासून पडणाऱ्या प्रत्येक दुष्काळाने मूल्यांची उलथापालथ केली. बीड, उस्मानाबादमधील जीवघेण्या दुष्काळाने मला लेखक बनवले. समकालीन वास्तव गतीने बदलत असून या काळाने नवलेखकांसमोर असंख्य प्रश्न निर्माण केले आहेत. कथा ही लेखकाच्या अनुभवातून आणि त्याने जोपासलेल्या नैतिक मूल्यभावातून जन्म घेते. बदलती मूल्ये, मूल्यभावांमधील संघर्ष, संवेदना आणि काळाचा दाब कथेच्या निर्मितीत महत्त्वाचा असून अनुभवाला भिडण्याचा सच्चेपणाच लेखकाला घडवत जातो. लेखकाच्या सच्चेपणातूनच चांगली कथा जन्मते. आणि अशी कथाच मानवी जीवनाचे सत्य सांगणारी असते. ती समाज वास्तवाचा, मानवी संवेदनेचा इतिहास बनते. 
दुसऱ्या सत्रात कथाकार आसाराम लोमटे यांनी आपल्या कथानिर्मितीचा प्रवास उलगडून दाखवला. त्यांच्या विविध कथांची निर्मितीप्रक्रिया शिबिरार्थींना उर्जा देणारी होती. तिसऱ्या सत्रात कथाकार भारत काळे, कृष्णा खोत आणि किरण गुरव यांनी आपल्या कथालेखानाचा प्रवास आणि निर्मिती प्रक्रिया विषद केली. कथाकार आप्पासाहेब खोत यांनी 'कथा कशी सांगावी' याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. समारोप सत्र भास्कर चंदनशिव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस उपस्थित होते. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि बेळगाव येथील परिसरातील सुमारे २०० नवलेखक या कार्यशाळेला उपस्थित होते. डॉ. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले. राजेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

Saturday, 12 March 2016

एकाच दिवशी एकाच व्यक्तीवर 125 व्याख्याने


 
शिवाजी विद्यापीठाचे डॉ. आंबेडकरांना अनोखे अभिवादन - संलग्न महाविद्यालयात उपक्रम
कोल्हापूर - दिवस एकच, वेळही एकच आणि विशेष म्हणजे एकाच व्यक्तीवर 125 व्याख्याने, असा आगळा-वेगळा उपक्रम शिवाजी विद्यापीठातर्फे आज राबविण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर जयंतीनिमित्त विद्यापीठाशी संलग्नित 125 महाविद्यालयांत डॉ. आंबेडकर यांच्याविषयी व्याख्याने झाली आणि राज्यातील विद्यापीठांमध्ये असा उपक्रम राबविणारे शिवाजी विद्यापीठ पहिलेच ठरले. विद्यापीठाच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्ण दिन ठरला.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या शतकोत्तर जयंतीनिमित्त विद्यापीठात काय करता येईल, याची माहिती घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. कृष्णा किरवले यांच्याशी चर्चा केल्यानंतर 125 व्याख्याने बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड यांच्या जयंतीदिनी घेण्याचे निश्‍चित झाले. कुलगुरू डॉ. शिंदे यांनी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत त्यासाठी बैठक घेऊन आवाहन केले. सुरवातीला इतके व्याख्याते मिळतील का, असा प्रश्‍न होता. केंद्रातर्फे झालेल्या शोध मोहिमेत नव्या पिढीतील अनेक संशोधकांनी व्याख्याने देण्याची ग्वाही दिली. 60 टक्के ज्येष्ठ व 40 टक्के नवोदित संशोधक असा मेळ साधण्यात आला. डॉ. आंबेडकरांची राजकीय भूमिका कशी होती, असा विषयही व्याख्यानात होता. विद्यापीठाशी संलग्नित 125 महाविद्यालयांची निवड करताना काही महाविद्यालयांतून यादीत नाव नसल्याने विचारणाही झाली. मात्र अशा महाविद्यालयांना व्याख्याने घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. संचालक डॉ. किरवले म्हणाले, ‘आजचा दिवस विद्यापीठाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला जाईल. घटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्याने घेण्यासाठी कुलगुरू डॉ. शिंदे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी केलेल्या आवाहनाला महाविद्यालयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यामुळेच एकाच दिवशी 125 व्याख्याने घेणे शक्‍य झाले.‘‘

पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता
विशेष म्हणजे विषयांची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली. संशोधकांचे विषय पाहण्यात आले. सामाजिक, शिक्षण, तत्त्वज्ञान, भारतीय संविधान, अर्थशास्त्र आदी विषयांतील डॉ. आंबेडकर यांची भूमिका यासंबंधीचे विषय निवडण्यात आले.

(दै. सकाळ (कोल्हापूर)च्या सौजन्याने)

Friday, 11 March 2016

प्रामाणिक बौद्धिक वादविवाद हे बाबासाहेबांच्या चळवळीचे सूत्र: प्रा. अविनाश डोळस



डॉ. आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक १२५ व्याख्यानांचे विद्यापीठाकडून यशस्वी आयोजन


कोल्हापूर, दि. ११ मार्च: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या आयुष्यातील बहुतेक सर्व लढे, चळवळी या बुद्धीच्या बळावरच जिंकल्या. प्रामाणिक बौद्धिक वादविवाद, चर्चांवर त्यांचा विश्वास होता, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण प्रकाशन समितीचे सदस्य-सचिव प्रा. अविनाश डोळस यांनी आज येथे केले.
डॉ. आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त आणि बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील १२५ संलग्नित महाविद्यालयांत सकाळी ११ वाजता एकाच वेळी सुमारे १२५ तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. या मालिकेअंतर्गत शिवाजी विद्यापीठात 'डॉ. आंबेडकर व चळवळ' या विषयावर आयोजित व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डोळस बोलत होते. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज उद्घाटक म्हणून उपस्थित होते.
प्रा. डोळस म्हणाले, बौद्धिक, वैचारिक देवाणघेवाणीखेरीज सुसंवाद प्रस्थापित होणे अशक्य आहे, असे बाबासाहेबांचे ठाम मत होते. कोणी राजा, नेता किंवा धर्मगुरू नव्हे, तर त्या त्या समाजातील बुद्धीवादी लोकच परिवर्तन घडवून आणण्यास कारणीभूत ठरत असतात, असे ते म्हणत. भ्रष्ट पोटार्थी कारणांसाठी बुद्धीवादाचा वापर केल्यास त्यातून भ्रष्ट व्यवस्थाच जन्माला येते. त्यामुळे मानव कल्याणाचा विचार करणाऱ्या प्रामाणिक बुद्धीवादाची समाजाला नित्य गरज असते कारण त्यातून समतेच्या विचारांची रुजवात शक्य असते, असे त्यांचे मत होते. या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावरच केवळ एका भाषणामुळेच बाबासाहेबांचे घटना समितीमधील स्थान पक्के झाले, हा इतिहास आहे.
डॉ. आंबेडकरांची चळवळ ही कधीही प्रतिक्रियावादी नव्हती, असे सांगून प्रा. डोळस म्हणाले, बाबासाहेब त्यांच्या चिंतनातून आणि कार्यातून या व्यवस्थेपुढे प्रश्न उपस्थित करत आणि त्यांची उत्तरे समाजाला द्यायला भाग पाडत. या प्रतिक्रियांतून बाबासाहेबांना प्रबोधनाची अपेक्षा असे. या वादविवादांमधूल विचारांचा विस्तार व्हावा आणि दुसऱ्यांना समजून घेण्याच्या प्रक्रियेची निर्मिती व्हावी, असा त्यांचा विचारमंथन घडवून आणण्यामागे हेतू असे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात वादविवादांना मोठे महत्त्व आहे. या वादविवादाला बौद्ध धम्माची परंपरा तर आहेच, शिवाय, संसदीय लोकशाही पद्धतीत विरोधी पक्ष ठेवण्यामागेही निकोप लोकशाहीच्या निर्मितीचा हेतू असल्याचेच आपल्या निदर्शनास येईल.
कोणत्याही समस्येचा राष्ट्रीय भावनेच्या दृष्टीकोनातून वेध घेणारे बाबासाहेब हे महान व्यक्ती असल्याचे सांगून प्रा. डोळस म्हणाले, भारत- पाकिस्तान फाळणीच्या संदर्भात सैद्धांतिक मांडणी करणारे डॉ. आंबेडकर एकमेव व्यक्ती होते. त्यांच्या या मांडणीमुळेच फाळणीच्या प्रक्रियेला दिशा मिळू शकली. भारतीय संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेमध्येही त्यांनी भारतातील विविध भाषा, प्रांत, संस्कृती यांचा सखोल अभ्यास करून समावेश केला. ईशान्य भारतीय राज्यांतील नागरिकांची जमातींमध्ये गणना करून ते भारताचा अविभाज्य घटक राहतील, याची तजवीजही बाबासाहेबांनी मोठ्या कौशल्याने केली.
आज एक राष्ट्र म्हणून आपण एकत्र असण्याला एकच आधार आहे, तो म्हणजे भारताचे संविधान, असे सांगून प्रा. डोळस पुढे म्हणाले, समता, बंधुता, सामाजिक न्याय, व्यक्तीस्वातंत्र्य आदी मानवी मूल्यांचा संविधानात बाबासाहेबांनी समावेश केला. या मूल्यांना व्यक्तीगत पातळीवर मानणारे काही उदारमतवादी नेतेही होते, तथापि, त्यांना मानणारा समूह अस्तित्वात नसणे हा बाबासाहेबांच्यासमोरील मोठा प्रश्न होता. त्यामुळे बौद्ध धम्माच्या स्वीकारातून त्यांनी या मूळ बौद्ध तत्त्वज्ञानाचा जीवनमूल्य म्हणून अंगिकार करणारा समूह निर्माण केला. धम्म म्हणजे नैतिकता या मूल्याचा आग्रह धरणारा समाज बाबासाहेबांनी दिला, हे भारतीय लोकशाही टिकण्यासाठी त्यांनी दिलेले मोठे योगदान आहे. जेव्हाही या देशासमोर बौद्धिक कसोटीचा क्षण उभा ठाकतो, तेव्हा संदर्भ म्हणून बाबासाहेबच सामोरे येतात, असेही ते म्हणाले.
धर्म, जात यांच्या भेदांवर नव्हे, तर समताधिष्ठित नवसमाज निर्मितीचा आग्रह धरणाऱ्या बाबासाहेबांच्या कार्यामागे लिंगभेदाच्या पलिकडे जाऊन सामाजिक समता प्रतिष्ठापनेचे सूत्र होते. त्याचप्रमाणे अडाणी माणसालाही लोकशाही प्रक्रियेत स्थान व मूल्य प्राप्त करून देण्याचे श्रेयही बाबासाहेबांचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. महात्मा फुले यांच्याबरोबरीने राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव महाराज यांच्या उल्लेखाखेरीज सामाजिक चळवळींचा इतिहास अपूर्ण असल्याची भावनाही प्रा. डोळस यांनी व्यक्त केली.
यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत. त्यांनी ज्या कौशल्याने लवचिक संविधानाची निर्मिती केली, त्यामुळेच ही लोकशाही टिकून आहे. भारतीय समाज त्यांच्या प्रती सदैव कृतज्ञ राहील. राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर यांच्यामधील अनोख्या स्नेहपूर्ण पैलूंचाही त्यांनी आपल्या भाषणात वेध घेतला.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, डॉ. आंबेडकर यांना कितीही विशेषणे-उपमा देण्यात येत असल्या तरी 'बाबासाहेब' हे संबोधन माझ्यासारख्या त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या हृदयाशी अधिक जवळचे आहे. बाबासाहेबांनी आम्हाला स्वाभिमान, ओळख आणि अस्तित्वाची जाणीव प्रदान केली. बाबासाहेबांच्या नवसमाजरचनावादाची आता विज्ञानाच्या आधारावर नव्याने मांडणी करणे आवश्यक आहे. विज्ञानाच्या मते, जात ही आपली 'ब्लडलाइन' असते; तथापि, आपण तिला 'बॅटल-लाइन' बनविली आहे. संविधानाचा प्रामाणिक अंगिकार हा त्यावरचा एकच उपाय आहे. या देशाचा संविधान हा एकच ग्रंथ असला पाहिजे, असेही ते म्हणाले.
यावेळी बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. कृष्णा किरवले यांनी परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या सुरवातीला डॉ. आंबेडकर आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले. सुस्मिता खुटाळे, कोमल खैरमोडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी. के. गायकवाड, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्याख्यान मालिका उपक्रमाचे मान्यवरांकडून कौतुक
महामानवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा अभिनव उपक्रम, अशा शब्दांत शिवाजी विद्यापीठाने डॉ. आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त आज एकाच वेळी १२५ महाविद्यालयांत १२५ तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्याच्या उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले. ही अभिनव कल्पना प्रत्यक्षात आणल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने मी कुलगुरू डॉ. शिंदे यांचे मी अभिनंदन करतो, असे प्रा. अविनाश डोळस म्हणाले. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनीही विद्यापीठाचा हा एकमेवाद्वितिय उपक्रम असून त्यात सहभागी होण्याची संधी मिळाली, याबद्दल समाधान व्यक्त केले.

मानवी जीवनाच्या पृथःकरणास संख्याशास्त्राचा आधार शोधा: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचे आवाहन



शिवाजी विद्यापीठात संख्याशास्त्र राष्ट्रीय परिषदेचे द्घाटन


कोल्हापूर, दि. ११ मार्च: संख्याशास्त्राच्या आधारे मानवी जीवनाचे पृथ:करण कसे करता येईल, यासाठी संख्याशास्त्राच्या संशोधकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे यांनी केले. शिवाजी विद्यापीठातील संख्याशास्त्र अधिविभागातर्फे आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या द्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
      डॉ. शिंदे म्हणाले, मानवी जीवनातील प्रत्येक गोष्टीचे संख्याशास्त्रीय विश्लेषण करता येईल, अशी मला आशा वाटते. राष्ट्रीय विकासात संख्याशास्त्राचे योगदान मोठे आहे. सर्व प्रकारच्या संशोधनात संख्याशास्त्राचा उपयोग होतो.  माझ्या व्यक्तिगत संशोधनातही संख्याशास्त्राचे मोठे योगदान आहे. उत्तम विद्यार्थी घडविण्यात संख्याशास्त्र अधिविभाग आघाडीवर आहे. या अधिविभागातील पूर्वीचे चारही विभागप्रमुख परिषदेस उपस्थित आहेत, यावरून आजी माजी प्राध्यापकांमधील समन्वय दिसून येतो. या राष्ट्रीय परिषदेत एम.एस्सी.च्या विद्यार्थ्यांचा शासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग असणेही महत्त्वपूर्ण बाब आहे.
      परिषदेचे द्घाटक माजी विभागप्रमुख डॉ. एम. एस. प्रसाद म्हणाले, संख्याशास्त्राचे अनेक पैलू आहेत. या सर्व पैलूंचा अभ्यास या परिषदेच्या निमित्ताने होत आहे, ही अभिमानाची बाब आहे. आपण सुरू केलेल्या अधिविभागाचे यश पाहून समाधान वाटत असल्याची भावनाही डॉ. प्रसाद यांनी व्यक्त केल.
परिषदेचे समन्वयक प्रा.डॉ. डी.टी. शिर्के यांनी प्रास्ताविक केले. रिझर्व्ह बँ ऑफ इंडियाचे माजी मुख्य सल्लागार परिषदेचे प्रमुख पाहुणे प्रा. डी.व्ही.एस. शास्त्री म्हणाले, अचूक संख्याशास्त्रीय मॉडेल वापरणे हे आपल्यासमोरचे आव्हान आहे. दैनंदि जीवनातील परिस्थिती संशोधन या मोठा फरक आहे. संशोधकांची दैनंदिन जीवनाची मोठी फारकत निर्माण झाली आहे.  दैनंदिन जीवनातील आव्हानांकडे आपण लक्ष देण्याची गरज आहे.
      संख्याशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. डी.एन. काशी यांनी अधिविभागाची माहिती दिली. डॉ. एस. बी. महाडि यांनी सूत्रसंचालन केले. परिषदेत बेंगलोर, मुंबई, मैस, हैद्राबाद, गुजरात, तमिळनाडू, सालेम, जळगाव, जालना, सोलापूर आदी ठिकाणच्या १४ विशेष वक्त्यांसह १४३ संशोधक सहभागी झाले आहेत.
--००--