Thursday, 21 July 2016

चीन समजण्यासाठी आधी भारत समजून घेणे आवश्यक: डॉ. जबीन जेकब




कोल्हापूर, दि. २१ जुलै: चीन समजून घेण्यासाठी भारताला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतले पाहिजे, असे प्रतिपादन इन्स्टिट्यूट ऑफ चायनीज स्टडीज, दिल्लीचे सहाय्यक संचालक डॉ. जबीन जेकब यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागामार्फत आयोजित 'भारत चीन संबंध' या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मानव्यशास्त्र इमारतीमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
डॉ. जेकब पुढे म्हणाले, चीनी अभ्यासासाठी अन्य वैचारिक सामग्री आवश्यक आहे, केवळ कटूता असणे महत्वाचे नाही. भारत चीन संबंधाचे भविष्य हे फक्त दिल्ली किंवा बिजिंग केंद्रिनव्हे, तर ते राज्य, प्रदेश आणि शहर केंद्री असले पाहिजे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला चीनशी आर्थिक, औद्योगिक तसेच व्यावसायिक संबंध वृद्धिंगत करण्याची मोठी संधी आहे. मुंबई हे आशियाचे एक मोठे बिझनेस केंद्र आहे. त्यामुळे चीनमध्ये मुंबईविषयी मोठे आकर्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीनला भेट देणाऱ्या शिष्टमंडळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश होणे ही त्यामुळे स्वाभाविक बाब होती. या पार्श्वभूमीवर, चीन एकीकडे भारताचा प्रतिस्पर्धी मानला जात असला तरी, त्याच्या क्षमतांचा अभ्यास करून त्यांच्याशी तदअनुषंगिक सहकार्य वृद्धी करणे गरजेचे आहे. चीन महाराष्ट्राचा महत्त्वाचा आर्थिक सहकारी होऊ शकतो. महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास चीनी कंपन्याही उत्सुक आहेत. त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे.
चीनने अत्यंत धोरणीपणाने चीनी उत्पादनांचा 'ब्रँड चायना' ज्या पद्धतीने जगभरात विकसित केला आहे, तशा प्रकारे भारतीय उत्पादनांचा 'ब्रँड' जगभरात कसा निर्माण करता येईल, याची शिकवण चीनी अर्थतज्ज्ञांकडून आपण घेण्याची गरज आहे. त्या दृष्टीने चीनी तंत्रज्ञान, चीनी अर्थकारण समजून घेण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, असेही जेकब यांनी सांगितले.
ते म्हणाले, कोल्हापूरच्या कृषी व कृषी आधारित प्रक्रिया उद्योगांमध्येही चीनी तंत्रज्ञानाच्या सहकार्याने वृद्धी करण्यासाठी त्याचा अभ्यास केला पाहिजे. मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातीलच कुरुंदवाड येथील गिरी देशिंगकर यांनी चीनविषयक अभ्यासक म्हणून भारत व चीन या दोन्ही देशांदरम्यान सहकार्य वृदधीसाठी १९८०-९०च्या दशकांत मोठे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे चीनशी संबंधांचा कोल्हापूरचा हा वारसा देशिंगकर यांनी आधीच निर्माण करून ठेवला आहे. तो कोल्हापूरकरांनी पुनरुज्जिवित करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, चीनी भाषा शिकणे भारतीय अर्थकारणाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. चीनसमवेत शैक्षणिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी शिवाजी विदयापीठ प्रयत्नशील राहील.
यावेळी मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र व नागरिकशास्त्र विभागाचे डॉ. सुरेंद्र जोंधळे यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले, 'न्स्टिट्यूट ऑफ चायनीज स्टडीज्' या संस्थेत विदयार्थ्यांना संशोधनाची मोठी संधी आहे. शेजारी राष्ट्र म्हणून चीनसंदर्भातील अध्ययनाची उत्सुकता विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण करणे आवश्यक आहे.


डॉ. वासंती रासम यांनी प्रास्ताविक केले; तर, डॉ. रविंद्र भणगे यांनी आभार मानले. राज्यशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ.प्रकाश पवार, डॉ. भारती पाटील, डॉ.भगवान माने यांच्यासह शिक्षक, संशोधक, विदयार्थी उपस्थित होते.

Friday, 15 July 2016

कौशल्यांच्या योग्य वापराने ध्येयसिद्धी निश्चित: कौस्तुभ बंकापुरे


कौस्तुभ बंकापुरे





शिवाजी विद्यापीठात जागतिक युवा कौशल्य दिन उत्साहात

कोल्हापूर, दि. १५ जुलै: आपल्याला आयुष्यात कोठे पोहोचायचे आहे, ते ठरवून त्या दृष्टीने आपल्या अंगभूत कौशल्यांचा विकास करण्याबरोबरच अन्य आवश्यक कौशल्ये आत्मसात करून त्यांचा योग्य वापर केल्यास आपले ध्येय निश्चितपणे साध्य करता येते, असा विश्वास कौशल्य प्रणेते कौस्तुभ बंकापुरे यांनी आज विद्यार्थ्यांच्या मनात जागविला.
शिवाजी विद्यापीठाच्या 'कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रा'तर्फे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आज 'आइस ब्रेकिंग फॉर स्कील डेव्हलपमेंट' या विषयावर श्री. बंकापुरे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉ. डी.आर. मोरे होते. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, तंत्रज्ञान अधिविभाग संचालक डॉ. जे.एस. बागी प्रमुख उपस्थित होते.
विविध उदाहरणांसह कौशल्याचे महत्त्व पटवून देताना श्री. बंकापुरे यांनी कौशल्य विकासाची चतुःसूत्रीच विद्यार्थ्यांना दिली. ते म्हणाले, आयुष्यात कोणतेही कौशल्य मिळवायचे असेल, तर त्यासाठी सर्वप्रथम आपली तयारी असणे हा पहिला मंत्र आहे. त्यानंतर तुम्हाला काय येते, ही गोष्टही महत्त्वाची ठरते. आपल्या मनात आलेल्या प्रत्येक विचाराला गांभीर्याने घेऊन प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करणे ही तिसरी महत्त्वाची बाब, तर तांत्रिक व अतांत्रिक कौशल्यांचा समतोल अंगिकार व विकास ही चौथी महत्त्वाची बाब ठरते. या बळावर आयुष्यात कोणत्याही कौशल्याचे उत्तम रोजगारात यशस्वी रुपांतर करता येऊ शकते. संवाद कौशल्य, इंग्रजी भाषेचा न्यूनगंड दूर करणे आणि सामान्यज्ञान या मूलभूत गोष्टींच्या बळावर स्वतःच्या व्यक्तीमत्त्वाचा ठसा निर्माण करणे ही बाबही महत्वाची आहे, असेही त्यांनी सांगितले.
प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे म्हणाले, आजच्या युवा पिढीची तंत्रज्ञानावर उत्तम पकड आहे. त्यामुळे तंत्रविषयक कौशल्ये सहजतेने आत्मसात केली जाताहेत. कौणतेही कौशल्य शिकण्याची संधी विद्यार्थ्यांनी अजिबात सोडता कामा नये. ते आत्मसात करणे अवघड आहे, असे मानू नये. आत्मसात केलेले कोणतेही कौशल्य कधीही वाया जात नाही. त्याचा योग्य वेळी वापर केला तर ते निश्चितच आयुष्याला दिशादर्शक ठरते.
अध्यक्षीय भाषणात प्रभारी कुलगुरू डॉ. डी.आर. मोरे यांनी इंग्रजी भाषा आणि संभाषण कौशल्याचे महत्त्व विषद केले. ते म्हणाले, वाचन, लिखाण या बाबींप्रमाणेच श्रवण ही सुद्धा कौशल्यपूर्ण बाब आहे. आणि संभाषण हे तर त्याहूनही महत्त्वाचे कौशल्य आहे. विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेचा बाऊ न करता तिच्या माध्यमातून हे संभाषण कौशल्य विकसित केले पाहिजे. तथापि, पारंपरिक ज्ञानाबरोबर आयुष्यात उभे करणारे कोणतेही कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्याची नितांत गरज आहे.
कार्यक्रमाच्या सुरवातीला कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. महाराष्ट्र शासनाच्या रोजगार व स्वयंरोगजार विभागाचे सहाय्यक संचालक सचिन जाधव यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Thursday, 14 July 2016

एम.फील./पीएच.डी.साठी युजीसीची नवी अधिसूचना जारी




महाविद्यालयीन मार्गदर्शकांना पुनश्च मान्यता;

शिवाजी विद्यापीठाचा सातत्याने पाठपुरावा; देशपातळीवरील पेच सोडविण्यात महत्त्वाची भूमिका
कोल्हापूर, दि. १४ जुलै: एम.फील./ पीएच.डी.साठी मार्गदर्शकांना मान्यता देण्यासाठीची विद्यापीठ अनुदान आयोगाची (युजीसी) नवी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. युजीसीने गतवर्षी केवळ पदव्युत्तर संस्थांमधील नियमित शिक्षकांनाच मार्गदर्शक म्हणून मान्यता देण्याचा निर्णय घेतल्याने महाविद्यालय स्तरावरील मार्गदर्शकांची तसेच संशोधक विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली होती. ती या नव्या अधिसूचनेमुळे दूर झाली आहे. या संदर्भात शिवाजी विद्यापीठाने गेले वर्षभर सातत्याने या विषयी युजीसीकडे पाठपुरावा केला. यामुळे देशातील ६००हून अधिक विद्यापीठांसह हजारो महाविद्यालयांसमोर निर्माण झालेला संशोधन मार्गदर्शकाविषयीचा पेच दूर झाला आहे. या मध्ये शिवाजी विद्यापीठाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.

युजीसीने 'एम.फील./ पीएच.डी. पदवी प्रदान करणेबाबत किमान मानदंड व प्रक्रिया विनिमय-२०१६' ही सन २००९च्या अधिसूचनेला अधिक्रमित करणारी अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये एम.फील./ पीएच.डी. प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पात्रता, मानके आणि प्रक्रियेचे नियम निर्धारित करण्यात आले आहेत. त्यामध्ये एम.फील./पीएच.डी. मार्गदर्शकांच्या पात्रतेचे निकषही स्पष्ट करण्यात आले आहेत. त्यानुसार-

·         मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणताही नियमित शिक्षक, ज्याचे संदर्भित पत्रिकेमध्ये किमान पाच शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत; आणि विद्यापीठ/स्वायत्त विद्यापीठ, संस्था/ महाविद्यालय येथील कोणीही नियमित सहयोगी/ सहाय्यक प्राध्यापक, जो पीएच.डी. धारक असेल, आणि संदर्भित पत्रिकांमध्ये ज्याचे किमान दोन शोधनिबंध प्रकाशित झाले असतील, त्यांना मार्गदर्शक म्हणून मान्यता देण्यात आली आहे. ज्या विषयांत अशा शोधपत्रिका नसतील वा ठराविक ठिकाणीच त्या असतील, अशा वेळी लेखी स्वरुपात सशर्त परवानगी देता येईल.

·         केवळ संबंधित विद्यापीठ/ महाविद्यालय येथील पूर्णवेळ शिक्षकच मार्गदर्शक म्हणून काम करू शकतील. बाह्य मार्गदर्शकास परवानगी नाही. तथापि, आंतरविद्याशाखीय संशोधनाच्या बाबतीत संशोधन सल्लागार समितीच्या मान्यतेने सह-मार्गदर्शक म्हणून त्याच संस्थेतील अथवा संबंधित संस्थेमधील शिक्षकास मान्यता देता येईल.

·         निवडलेल्या संशोधक विद्यार्थ्यास मार्गदर्शक देण्याची जबाबदारी संबंधित विभागाची असेल. त्यावेळी मार्गदर्शकाकडील विद्यार्थ्यांची संख्या, त्यांचे मार्गदर्शनाचे विषय, विद्यार्थ्याच्या संशोधनाचे क्षेत्र, मुलाखतीवेळी त्यांनी दाखविलेली रुची आदी बाबींचा साकल्याने विचार व्हावा.

·         आंतरविद्याशाखीय संशोधनाच्या संदर्भात ज्यावेळी संबंधित विभागास बाहेरील मार्गदर्शकाची जरुरी भासेल, अशा वेळी विभागातील संशोधक मार्गदर्शकाची नियुक्ती करावी आणि त्याच्या जोडीला बाहेरील विभाग/ विद्याशाखा/ महाविद्यालय/ संस्था येथील शिक्षकाची सह-मार्गदर्शक म्हणून संबंधित संस्था/ महाविद्यालयाच्या मान्यतेने नियुक्ती करता येईल.

·         संशोधक मार्गदर्शक/ सह-मार्गदर्शक हा प्राध्यापक असल्यास तो एकाच वेळी जास्तीत जास्त ३ एम.फील. व ८ पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकेल. सहयोगी प्राध्यापक जास्तीत जास्त दोन एम.फील. व ६ पीएच.डी. संशोधकांना तर सहाय्यक प्राध्यापक हा एक एम.फील. व ४ पीएच.डी. संशोधकांना मार्गदर्शन करू शकेल.

·         एम.फील./पीएच.डी. करणाऱ्या महिला संशोधकास विवाह अथवा अन्य कारणांनी संशोधनाचे ठिकाण बदलून हवे असल्यास या अधिसूचनेतील पात्रतेच्या नियम व अटींशी अधीन राहून स्थानबदलास मातृसंस्थेने परवानगी द्यावी. संशोधक महिलेनेही मातृसंस्था आणि तेथील मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केलेल्या संशोधनाचे श्रेय प्रबंधात नमूद करावे.

युजीसीच्या या नूतन अधिसूचनेचे स्वागत करत असताना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू आणि बीसीयुडी संचालक म्हणून या अधिसूचनेसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे डॉ. डी.आर. मोरे म्हणाले, या संदर्भात जुलै २०१५मध्ये युजीसीने केवळ पदव्युत्तर संस्थांमधील नियमित शिक्षकच मार्गदर्शक म्हणून काम करू शकतील, असे कळविले होते. त्यामुळे महाविद्यालयीन (पदवी) स्तरावर काम करणाऱ्या कोणाही शिक्षकास मार्गदर्शक म्हणून मान्यता देणे अथवा त्यांना संशोधक विद्यार्थी देणे विद्यापीठास अशक्य बनले होते. साहजिकच, यंदा विद्यापीठाने राबविलेल्या एम.फील./पीएच.डी. प्रवेश प्रक्रियेमधील संशोधक विद्यार्थ्यांचा इनटेकही सुमारे ९० टक्क्यांनी खालावला होता. तरीही, विद्यापीठाने विद्यार्थी हितास प्राधान्य देताना कॅम्पस स्तरावर जास्तीत जास्त संशोधक विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला आणि हे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत वाढविले. आता नूतन अधिसूचनेतील उपरोक्त स्वयंस्पष्ट नियमावलीमुळे आता विद्यापीठांबरोबरच महाविद्यालयातील शिक्षकही एम.फील./ पीएच.डी. संशोधन मार्गदर्शक म्हणून काम करू शकणार आहेत. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. या अनुषंगाने विद्यापीठाच्या सद्य नियमावलीचा आढावा घेऊन आवश्यक ते बदल संबंधित अधिकार मंडळांच्या मान्यतेने करण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

या संदर्भात शिवाजी विद्यापीठाने युजीसीकडे वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यासंदर्भात माहिती देताना डॉ. मोरे म्हणाले, युजीसीच्या दि. ६ जुलै २०१५ रोजीच्या पत्रामुळे केवळ शिवाजी विद्यापीठच नव्हे, तर संलग्नित महाविद्यालये असणाऱ्या देशभरातील ६००हून अधिक विद्यापीठांपुढे संशोधन वृत्तीस चालना देण्याचा मोठा पेच निर्माण झाला होता. या गोष्टीचे गांभीर्य आणि होणारे दूरगामी परिणाम लक्षात घेऊन  शिवाजी विद्यापीठाने सप्टेंबर २०१५ पासून युजीसीकडे इ-मेल, पत्र, दूरध्वनीद्वारे सातत्याने पाठपुरावा केला. विद्यापीठाचे नोडल ऑफिसर उपकुलसचिव संजय कुबल, पीजी-बीयुटीआर विभागाचे उपकुलसचिव डॉ. नीलेश बनसोडे यांनी नवी दिल्ली येथे जाऊन व्यक्तीशः या विषयासंदर्भात सविस्तर भूमिका मांडली. युजीसीचे अतिरिक्त सचिव डॉ. पी. प्रकाश कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांच्यासह त्यांना प्रत्यक्ष भेटूनही सारी परिस्थिती विषद केली होती. त्यामुळे देश पातळीवर निर्माण झालेला शैक्षणिक व संशोधकीय पेच सोडविण्यात शिवाजी विद्यापीठाने कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत कळीची भूमिका बजावली, याचा अत्यंत अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.



अधिसूचनेची यंदापासूनच अंमलबजावणी

शिवाजी विद्यापीठाने यंदाची एम.फील./ पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया युजीसीच्या निर्णयासाठी स्थगित ठेवली होती. युजीसीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळविण्यासाठी सातत्याने संपर्क साधून पाठपुरावा करण्यात येत होता. आता प्राप्त अधिसूचनेबाबत बीयुटीआर (बोर्ड ऑफ युनिव्हर्सिटी टीचिंग ॲन्ड रिसर्च) तसेच अन्य अधिकार मंडळांची मान्यता घेऊन या वर्षीपासूनच (सन. २०१६-१७) अंमलात आणण्यात येईल. यामुळे महाविद्यालयीन मार्गदर्शक, संशोधक विद्यार्थी यांचा मोठा लाभ होईल, असे प्रभारी कुलगुरू डॉ. डी.आर. मोरे यांनी सांगितले.