Wednesday, 14 August 2019

पूरबाधित महाविद्यालयांची कुलगुरूंकडून पाहणी



श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील आपत्तीग्रस्त रसायनसास्त्र प्रयोगशाळेची पाहणी करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.

महावीर महाविद्यालयातील महिला वसतीगृहाच्या परिसरातील आपत्तीग्रस्त विभागाची पाहणी करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.

कोल्हापूर, दि. १४ ऑगस्ट: कोल्हापूर शहरातील शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय आणि महावीर महाविद्यालय या दोन ठिकाणी महापुराचे पाणी शिरल्याने झालेल्या नुकसानीची शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड होते.
दसरा चौक येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय आणि न्यू पॅलेस परिसरातील महावीर महाविद्यालय या दोन्ही महाविद्यालयांच्या परिसरात महापुराचे पाणी शिरले होते. शहाजी महाविद्यालयाच्या तळमजल्यावरील सर्व खोल्यांमध्ये पुराचे पाणी निम्म्याहून अधिक उंचीपर्यंत चढले होते. यामुळे तळमजल्यांवरील वर्गखोल्यांसह प्रशासकीय कार्यालय आणि विशेषतः रसायनशास्त्र विभागाची प्रयोगशाळा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे महावीर महाविद्यालयातील महिला वसतीगृहाच्या तळमजल्यावरील सभागृह आणि तेथील ग्रंथालय, त्याचप्रमाणे त्यांच्या प्रांगणातील आचार्य विद्यानंद संस्कृती भवन या सभागृहाच्या तळमजल्यात पूर्णतः पाणी भरले होते. या दोन्ही महाविद्यालयांना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह भेट दिली आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करून माहिती घेतली. शहाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेशान शानेदिवाण यांना, सदर आपत्तीच्या क्षणी विद्यापीठ महाविद्यालय प्रशासनासोबत असून त्यांना या परिस्थितीतून सावरण्यास आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे कुलगुरूंनी आश्वस्त केले. सदरच्या वर्गखोल्या, कार्यालय, प्रयोगशाळा आदी पूर्ववत करण्याच्या कामात गुंतलेल्या शिक्षक, कर्मचाऱ्यांनाही त्यांनी आपण त्यांच्यासोबत असल्याचा दिलासा दिला. महावीर महाविद्यालयातील नुकसानीची सुद्धा त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. त्याचप्रमाणे पूर कालावधीत महाविद्यालयाच्या सुरक्षित इमारतीमध्ये सत्तरहून अधिक बाधितांना निवारा उपलब्ध करून देण्याची कामगिरी बजावल्याबद्दल महाविद्यालयाचे अभिनंदनही केले.
यानंतर कुलगुरू डॉ. शिंदे यांनी शिवाजी पूल, कुंभारवाडा, शाहूपुरी, हुतात्मा पार्क आदी परिसरात फिरून उद्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांमार्फत कोठे कोठे स्वच्छता मोहीम राबविता येऊ शकेल, याचीही चाचपणी केली.

आपत्तीग्रस्तांसाठी विद्यापीठाचा समुपदेशन कक्ष
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील पूरस्थितीमुळे आपत्तीग्रस्त भागातील जीवन पुरते उद्ध्वस्त झाले आहे. या आपत्तीग्रस्तांना या परिस्थितीतून सावरण्यासाठी पुढील टप्प्यात समुपदेशनाची मोठी गरज असल्याची बाब लक्षात घेऊन विद्यापीठाच्या एमएसडब्ल्यू विभागातर्फे समुपदेशन कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. आपत्तीग्रस्त नागरिकांची आपत्तीग्रस्त भागात जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन समुपदेशन करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन दोन प्राध्यापकांसह तीस विद्यार्थ्यांची टीम तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी दिली.

Tuesday, 13 August 2019

शिवाजी विद्यापीठाकडून १५ ऑगस्टपासून कोल्हापूर शहर-जिल्ह्यात व्यापक स्वच्छता मोहीम: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची माहिती

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. शेजारी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आदी.


कोल्हापूर, दि. १३ ऑगस्ट: येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचे ध्वजवंदन झाल्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) स्वयंसेवकांनी कोल्हापूर शहर स्वच्छतेची व्यापक मोहीम हाती घ्यावी, तसेच पुढील टप्प्यात जिल्हा परिषदेच्या प्राधान्यक्रमानुसार स्थानिक तसेच अन्य विद्यापीठांतील एनएसएस स्वयंसेवकांच्या चमूंनी जिल्ह्यातील विविध आपत्तीग्रस्त गावांत नियोजनबद्ध पद्धतीने जाऊन स्वच्छता मोहीम राबवावी, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या बैठकीत केले.
शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत उद्भवलेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात स्वच्छता मोहीम राबविण्याच्या अनुषंगाने नियोजन करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यांतील कार्यक्रम अधिकाऱ्यांची बैठक कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी झाली. त्यावेळी ते बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, कार्यक्रम अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय येवा योजनेचे सेवा हे ब्रीद लक्षात घेऊन संपूर्ण मोहिमेचे नियोजन करावे. तत्पूर्वी, उद्या (दि. १४) शहरातील पूरबाधित विभागांची जागेवर जाऊन पाहणी करावी. त्यातून त्या ठिकाणी लागणारे मनुष्यबळ, सामुग्री आणि शासकीय स्तरावरील सहकार्य यांचा त्यांना अंदाज येईल. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष मोहिमेचे नियोजन करावे. त्यातही स्वच्छतेचे स्वरुप प्रथम ठरवावे लागेल. हातमोजे, गमबूट, मास्क इत्यादी साहित्य आवश्यक आहेच, पण, त्याशिवाय सुद्धा शासकीय यंत्रणेचे कुठे सहकार्य लागेल, या संदर्भात त्यांनाही आधीच अवगत करा. स्वच्छता मोहिमा राबवित असताना शासकीय यंत्रणेशी समन्वय राखूनच काम करावे. प्रत्येक महाविद्यालयाने आपापल्या शेजारच्या आपत्तीग्रस्त विभागात स्वच्छता मोहीम राबवावी. त्याचप्रमाणे, विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्यासही सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी कुलगुरू डॉ. शिंदे यांनी आपत्ती काळात विद्यापीठाने केलेल्या कामाचीही माहिती दिली. ते म्हणाले, विद्यापीठाने गेल्या सहा दिवसांत कॅम्पसवर शिव सहायता व आपत्ती निवारण केंद्र चालविले. यामध्ये तीनशेहून अधिक बाधित नागरिकांना आसरा देण्यात आला. अगदी बसस्थानकावर अडकून पडलेल्या पूरग्रस्तांचीही येथे सोय करण्यात आली. अनेक ठिकाणी लोकांना अन्नपदार्थ होते, पण जनावरांना चारा मिळत नव्हता. ही बाब लक्षात घेऊन विद्यापीठाच्या कॅम्पसवरील गवत पाठवून जनावरांसाठी चारा-वैरणीची व्यवस्था केली. त्याचप्रमाणे विद्यापीठाने शहरातील नागरिकांची दररोज सुमारे दोन लाख लीटर पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही केली.
दरम्यान, नागरिकांनी यापुढील काळात काही वस्तूरुपी मदत द्यावयाची असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्राकडे जमा कराव्यात, त्याचप्रमाणे आर्थिक स्वरुपातील मदत ही मुख्यमंत्री सहायता निधीकडेच सुपूर्द करावी, असे आवाहनही कुलगुरू डॉ. शिंदे यांनी केले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या संपूर्ण क्षमतेचा आढावा घेतला. त्यांच्या बरोबरीने आवश्यक तेथे राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) आणि सर्वसामान्य विद्यार्थी यांचीही मदत घेण्याबाबतचा निर्णय कार्यक्रम अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर घ्यावा, असे आवाहन केले.
विद्यापीठाचे एनएसएसचे समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड यांनी स्वच्छता अभियान सर्व कार्यक्रम अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध रितीने राबवावे, असे आवाहन केले. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते.

Saturday, 3 August 2019

वैश्विक भान जपणाऱ्या साहित्यनिर्मितीची गरज: डॉ. लक्ष्मीकांत देशमुख

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. लक्ष्मीकांत देशमुख. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. राजन गवस, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, सलीम मुल्ला, डॉ. रणधीर शिंदे व डॉ. नंदकुमार मोरे.


शिवाजी विद्यापीठात मराठी अधिविभागातर्फे आयोजित साहित्यिकांच्या सत्कार समारंभात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. लक्ष्मकांत देशमुख, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे आणि डॉ. राजन गवस यांच्यासमवेत (डावीकडून) साहित्यिक दत्ता घोलप, सुशीलकुमार शिंदे, किरण गुरव, सलीम मुल्ला, डॉ. रणधीर शिंदे व डॉ. नंदकुमार मोरे.


कोल्हापूर, दि. ३ ऑगस्ट: मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी आग्रही असणाऱ्या आणि वैश्विक भान जपणाऱ्या साहित्याची निर्मिती होत राहणे आजच्या परिस्थितीत अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाच्या वतीने साहित्य अकादमी आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचा सत्कार समारंभ आज आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते, तर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस प्रमुख उपस्थित होते.
पुरस्कार विजेत्या साहित्यिकांमध्ये बालसाहित्यासाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते सलीम मुल्ला (जंगल खजिन्याचा शोध- कादंबरी), युवा साहित्य पुरस्कार विजेते सुशीलकुमार शिंदे (शहर आत्महत्या करायचं म्हणतंय- कवितासंग्रह), मराठवाडा साहित्य परिषदेचा बी. रघुनाथ पुरस्कार विजेते किरण गुरव (जुगाड- कादंबरी), परिषदेचाच म.भि. चिटणीस पुरस्कार विजेते दत्ता घोलप (मराठी कादंबरी: आशय आणि आविष्कार- समीक्षाग्रंथ) यांचा समावेश होता. मान्यवरांच्या हस्ते शाल, ग्रंथ व स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. लक्ष्मीकांत देशमुख
यावेळी डॉ. देशमुख म्हणाले, आजच्या परिस्थितीत मूल्यभान ठेवून, शांतपणे, तटस्थपणे सत्याचा शोध घेणाऱ्या साहित्यिकांची आज नितांत गरज आहे. पुस्तके जशी जगण्याचे भान देतात, तशीच ती लेखकाच्या मनाचा आरसा म्हणूनही काम करतात. लेखकाचे विस्तृत अनुभवविश्व त्याला वैश्विक संवेदनांचा हुंकार बनायला भाग पाडतात, ज्याच्याशी वाचक जोडला जातो. हेच मानवी मूल्यभान, वैश्विक जाणीवा या सर्व साहित्यिकांच्या साहित्यामधून प्रतिबिंबित होताना दिसते. जागतिकीकरणानंतर आलेली अमानुषता, जगण्यातली विषमता, नव-आर्थिक चातुर्वर्ण्य व्यवस्था, जल, जमीन, जंगल यांच्यासंदर्भातील पर्यावरणीय अनास्था यांचा वेध घेताना आणि त्यांवर प्रहार करतानाच मानवतावादाचा उद्घोष हे साहित्यिक करतात. आजच्या काळाचे विधान या साहित्यकृतींमध्ये प्रकर्षाने जाणवते. तरीही निराशावादाचा सूर न ओढता आशेच्या बळावर चालत राहण्याचे भानही ते जपतात, अशा शब्दांत देशमुख यांनी सर्वच साहित्यकृतींचे यथायोग्य मूल्यमापन केले.

डॉ. राजन गवस
डॉ. राजन गवस म्हणाले, विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या या साहित्यिकांनी केलेले लेखन हे ताजे, टवटवीत आणि कसदार आहे. दीर्घचिंतनाचा अवकाश आणि आस्थेचा पैस यांचे भान जपल्याने त्यांच्या साहित्यकृतींचे साहित्यमूल्य अधिक अधोरेखित झाले आहे. लेखक भ्रष्ट झाला की तो लेखक म्हणून संपतो. त्याच्या लेखनातूनच ते आपोआप जाणवू लागते आणि त्यामुळे त्याचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गी लागते. लेखक हा नेहमी व्यवस्थेचा विरोधक असतो, असावा कारण व्यवस्थेच्या दोषांवर बोट ठेवणं हेच त्याचे खरे काम असते. त्यामुळे लेखन ही खूप गांभीर्याने करण्याची बाब आहे. तटस्थ आणि व्रतस्थ राहण्याची जबाबदारी लेखकावर असते, याचे भान कधीही हरपू देता कामा नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, आजच्या परिप्रेक्ष्यात श्रमिक, शोषित, दलित, वंचित, महिला यांच्या प्रश्नांनी नवे स्वरुप धारण केले आहे. युवा पिढीला त्यांच्यासमोरील प्रश्नांचा वेध घेऊन दिशा दाखविणाऱ्यांची गरज आहे. समाजाच्या एकूणच अस्तित्वासंदर्भातील अनेक समस्यांनी भोवताल ग्रस्त आहे. या सर्वांना सामावून घेणारे, त्यांना दिशा दाखविणारे सकस साहित्य निर्माण होणे ही फार गरजेची गोष्ट आहे. त्या दृष्टीने असे साहित्य निर्माण करणाऱ्या, करू इच्छिणाऱ्या आणि निर्माण करण्याची क्षमता असणाऱ्या प्रत्येक लेखकाला प्रोत्साहित करण्याची नितांत गरज आहे. म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचे मोल मोठे आहे. इथे उपस्थित असणारा प्रत्येक साहित्यिक त्यासाठी सक्षम आहे, म्हणूनच या देशातल्या महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्यांना प्रोत्साहित केले आहे. या पुढील काळातही त्यांच्या हातून अशाच प्रकारची साहित्यसेवा होत राहावी. समाजाला भान देण्याचे, सामाजिक जाणीवांचे हे भान कायम राखण्याचे काम हे त्यांच्या साहित्यकृतींतून करीत राहतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी सर्व सत्कारमूर्तींनीही आपले मनोगत व्यक्त केले. मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी परिचय करून दिला. यावेळी डॉ. प्रकाश पवार, जयसिंग पाटील, यांच्यासह शिक्षक, साहित्य रसिक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

किरण गुरव लंबी रेस का घोडा’ : डॉ. राजन गवस

किरण गुरव यांचा सत्कार करताना डॉ. लक्ष्मीकांत देशमुख. व्यासपीठावर कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, डॉ. राजन गवस यांच्यासह मान्यवर.
जुगाड या कादंबरीमुळे चर्चेत आलेले साहित्यिक किरण गुरव हे मराठी साहित्य क्षेत्रातील लंबी रेस का घोडा आहेत, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी काढले. डॉ. गवस म्हणाले, शिवाजी विद्यापीठात प्रशासकीय जबाबदारी सांभाळत किरण गुरव यांनी आपली साहित्यिक वाटचाल केली आहे. त्यांच्या श्रीलिपी, राखीव सावल्यांचा खेळ आणि बाळूच्या अवस्थांतराची डायरी या कथासंग्रहांनी मराठी साहित्य क्षेत्रात मोठी धूम माजवली. जागतिकीकरणानंतर भोवतालातील घडामोडी अत्यंत चिकित्सकपणे टिपून त्याचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यकृतींमध्ये उमटल्याचे दिसते. जुगाड या पहिल्या कादंबरीनेही त्यांच्याकडून अपेक्षा वाढविल्या आहेत. मराठी साहित्य क्षेत्रात व्यंकटेश माडगूळकरांसारखी दमदार कामगिरी करण्याची क्षमता असलेला मराठीतला हा एक महत्त्वाचा साहित्यिक आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Friday, 2 August 2019

अण्णाभाऊंचे साहित्य चिरंतन: डॉ. मेघा पानसरे


विद्यापीठात शाहिरी जागराद्वारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

शिवाजी विद्यापीठाच्या अण्णाभाऊ साठे अध्यासनातर्फे आयोजित 'शाहिरी जागर' कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात बोलताना डॉ. मेघा पानसरे. व्यासपीठावर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. अक्षय सरवदे, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे यांच्यासह सहभागी शाहीर.

शिवाजी विद्यापीठाच्या अण्णाभाऊ साठे अध्यासनातर्फे आयोजित 'शाहिरी जागर' कार्यक्रमात सादरीकरण करताना शाहीर देवानंद माळी.


कोल्हापूर, दि. २ ऑगस्ट: साहित्याच्या सार्वकालिक निकषांवर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य चिरंतन टिकून राहणारे आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागाच्या प्रमुख डॉ. मेघा पानसरे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या अण्णाभाऊ साठे अध्यासनाच्या वतीने अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्ताने शाहिरी जागर या विशेष शाहिरी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वि.स. खांडेकर भाषा भवनमध्ये झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. पानसरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंग्रजी अधिविभागाचे प्रमुख डॉ. अक्षय सरवदे होते तर, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. पानसरे म्हणाल्या, महाराष्ट्राची शाहिरी परंपरा अण्णाभाऊंनी अधिक संपन्न, अधिक उन्नत केली. वंचित, श्रमिक समाजाच्या प्रबोधनाशी जोडत शाहिरीला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे काम त्यांनी केले. वाटेगाव ते रशिया व्हाया मुंबई ही त्यांची उत्तुंग भरारी विस्मयकारक होती. परिस्थितीचे भान आणि संवेदनशीलता हे त्यांच्या साहित्याचे महत्त्वाचे गुणविशेष होते. परिस्थिती आणि शोषितांचे जीवन बदलून टाकण्यासाठी त्यांनी सातत्याने विचारमंथन घडवून आणले आणि त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात उमटल्याचे दिसते. प्रचलित अभिजन साहित्यात स्थान नसलेल्या वर्गाचा अवकाश साहित्याच्या परीघात त्यांनी निर्माण केले. त्यांचे गुरू मॅक्झिम गॉर्की यांच्याप्रमाणेच कोणतेही औपचारिक शिक्षण न घेता, परिस्थितीशी दोन हात करीत उभ्या राहिलेल्या अण्णाभाऊंनी जग हेच त्यांचे विद्यापीठ मानले. सामाजिक दांभिकतेवर सातत्याने प्रहार केले. राज्याच्या पातळीवर माझी मैना गावाकडं राहिली... लिहीणाऱ्या अण्णाभाऊंनी राष्ट्रीय पातळीवर बंगालची हाक ऐकून तिला ओ दिली, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर संचार करीत असताना स्टालिनग्राडचा पोवाडा रचला. साहित्याच्या क्षेत्रात स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंतचा आवाका असणारा साहित्यिक आजच्या काळातही दुर्मिळ आहे.
कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीनिमित्त विद्यापीठातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. डॉ. सरवदे यांनी अध्यक्षीय भाषणात अण्णाभाऊंच्या साहित्याची प्रस्तुतता आजच्या काळातही कमी झालेली नसून उलट वाढलेलीच असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी वाहून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यासनाचे प्रमुख तथा मराठी विभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले.
शाहीरांनी गाजविला दिवस
शिवाजी विद्यापीठातला आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने शाहिरांनी गाजविला. शाहीर देवानंद माळी (सांगली), शाहीर डॉ. आझाद नायकवडी (कोल्हापूर), शाहीर बाबूराव कांबळे (कांडगाव), शाहीर संजय जाधव (इचलकरंजी), शाहीर सदाशिव निकम (सिद्धनेर्ली) आणि शाहीर नुपूर व राजवैष्णवी वायदंडे यांनी शाहिरी जागर या कार्यक्रमांतर्गत एकाहून एक सरस असे पोवाडे सादर करून वातावरण भारावून टाकले. तर, उपस्थितांमध्येही शाहीर राजू राऊत, शामराव खडके, विनायक चव्हाण, दिलाप सावंत असे शाहिरी परंपरा समृद्ध करणारे कलावंत होते. त्यामुळे या कार्यक्रमाला उत्तरोत्तर रंगत चढत गेली.
डॉ. आझाद नायकवडी यांनी शाहिरी मुजऱ्याने सुरवात करून अण्णाभाऊंची जग बदल घालुनी घाव आणि साहीर आत्माराम पाटील यांची एका धरतीच्या पोटी हे पोवाडे सादर करून कार्यक्रमाची एकदम दमदार सुरवात करून दिली. त्यानंतर शाहीर देवानंद माळी यांनीही त्यांच्या नेहमीच्या जोशात गण आणि अण्णाभाऊंना स्वरचित शाहिरी वंदना अर्पण केली. त्यानंतर दिवसभरात शाहीर बाबूराव कांबळे, शाहीर संजय जाधव, शाहीर नुपूर व राजवैष्णवी वायदंडे या भगिनी आणि शाहीर सदाशिव निकम यांनीही अत्यंत जोशपूर्ण सादरीकरण केले.



Tuesday, 23 July 2019

'बीएआरसी 'च्या 'आयर्मोन' सुविधेची शिवाजी विद्यापीठात प्रस्थापना


-      अणुसंशोधन क्षेत्रातील संशोधनाचे नवे दालन खुले

-      सुविधा प्रस्थापित करणारे राज्यातील पहिलेच विद्यापीठ

कोल्हापूर, दि. २३ जुलै: भाभा अणू संशोधन केंद्राच्या 'आयर्मोन'  (IERMON) या सुविधेची प्रस्थापना हा शिवाजी विद्यापीठाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा असून त्यामुळे येथील संशोधक शिक्षक व विद्यार्थ्यांना संशोधनाचे एक नवे दालन खुले झाले आहे. त्याचा त्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान अधिविभागामध्ये भाभा अणू संशोधन केंद्राच्या (बीएआरसी) सहकार्याने इंडियन एनव्हायर्नमेंटल रेडिएशन मॉनिटरिंग नेटवर्क (IERMON) ही सुविधा प्रस्थापित करण्यात आली आहे. तिचे औपचारिक उद्घाटन प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
प्र-कुलगुरू डॉ. शिर्के  म्हणाले, भाभा अणू संशोधन केंद्राने ही सुविधा विद्यापीठामध्ये मोफत प्रस्थापित केली आहे. अशी सुविधा प्रस्थापित करणारे शिवाजी विद्यापीठ हे राज्यातील पहिले अकृषी विद्यापीठ ठरले आहे. पर्यावरणात विविध प्रकारचे किरणोत्सार (रेडिएशन) असतात. त्यामध्ये गॅमा रेडिएशनचाही समावेश असतो. या किरणोत्साराच्या पातळीचे मापन, नोंदी घेऊन त्यावर सातत्याने नजर ठेवून विशिष्ट मर्यादेपलिकडे ती गेल्यास त्यावर तातडीने योग्य ती कार्यवाही करणे या दृष्टीने ही सुविधा महत्त्वाची असते. त्याचप्रमाणे अणू संशोधन क्षेत्रामधील संशोधक शिक्षक व विद्यार्थी यांना या सर्व माहितीचा अभ्यास व विश्लेषण यासाठी अतिशय महत्त्वाचा उपयोग होणार आहे. विद्यापीठीय अणू संशोधन क्षेत्रात या निमित्ताने एक नवे दालन आज खुले झाले आहे. 'इस्रो'च्या रिसिव्हर प्रस्थापनेमुळे या पूर्वीच अवकाश संशोधन क्षेत्रातील एक महत्त्वाचे दालन विद्यापीठातील संशोधकांना खुले झाले आहे. त्यानंतर आता या नव्या सुविधेमुळे विद्यापीठाच्या संशोधकीय वाटचालीला आणखी गती प्राप्त होईल. या सुविधेचा योग्य पद्धतीने वापर करावा, असे आवाहनही डॉ. शिर्के यांनी केले.

'आयर्मोन' सुविधेच्या प्रस्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉ. आर.जी. सोनकवडे यावेळी माहिती देताना म्हणाले, अणुऊर्जेमुळे केवळ विध्वंसक अणुबॉम्ब तयार होतो, असे नाही; तर त्यापासून विधायक अशा अनेक बाबी साध्य केल्या जातात. वीजनिर्मिती हा त्याचा महत्त्वाचा पैलू आहेच, पण त्यापुढे जाऊन उद्योग, कृषी, आरोग्य उपचार अशा अनेक बाबींसाठी अणुऊर्जा ही वरदान ठरली आहे. या क्षेत्रात अद्यापही संशोधनाच्या बऱ्याच संधी आहेत. त्याचप्रमाणे खनिज इंधनांच्या अतिरेकी वापरामुळे ग्लोबल वॉर्मिंगसारख्या परिणामांना सामोरे जावे लागत असताना अणुऊर्जेकडे पर्यायी स्रोत म्हणूनही पाहिले जाते आहे. किरणोत्सार नियंत्रित स्वरुपात असेल तर तो मानवासाठी वरदान ठरू शकतो. या पार्श्वभूमीवर, निसर्गामध्ये सुद्धा भूजन्य आणि अवकाशजन्य अशा दोन प्रकारचे किरणोत्सार सुरू असतात. जमिनीमधील युरेनियम, थोरियम आणि पोटॅशियम हे पदार्थ सातत्याने किरणोत्सार करीत असतात. युरेनियमचे प्रमाण १ ते ५ पीपीएम आणि थोरियमचे प्रमाण २ ते १० पीपीएम इतके असते. जमिनीत मुळातच अवघे १ ते २ टक्के पॉटॅशियम असते. त्यातीलही केवळ ०.०१२ टक्के इतकेच पोटॅशियम किरणोत्सारी असते. याखेरीज अवकाशात, पर्यावरणात, हवेतही काही विशिष्ट प्रकारचे किरणोत्सार उपलब्ध असतात. काही विशिष्ट मर्यादेपर्यंत त्यांचा मानवावर काही अनिष्ट परिणाम होत नाही. मात्र, पातळी ओलांडल्यास ती मानवी आरोग्यास धोकादायक ठरू शकते. म्हणून त्यांचे सातत्याने मापन करीत राहणे आवश्यक असते. अशा सर्व प्रकारच्या किरणोत्साराचे मापन करणे 'आयर्मोन' सुविधेमुळे शक्य होते. नैसर्गिक किरणोत्साराची पातळी ओलांडली जात असल्याचे यामुळे वेळीच लक्षात येऊ शकते आणि त्यावर गरजेनुसार लघु, मध्यम आणि दूरगामी स्वरुपाच्या योग्य उपाययोजना करणेही संशोधकांना शक्य होते. त्या दृष्टीने नैसर्गिक पर्यावरणीय किरणोत्साराच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे दालन शिवाजी विद्यापीठात खुले होत आहे, ही अभिमानाची बाब आहे.

या उद्घाटन प्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, पदार्थविज्ञान अधिविभाग प्रमुख तथा अधिष्ठाता डॉ.पी.एस.पाटील, डॉ.व्ही.जे.फुलारी, डॉ.एन.व्ही.मोहळकर, डॉ.आर.एस.व्हटकर, डॉ.एम.व्ही.टाकळे, डॉ.एन.एल.तरवार यांचेसह संशोधक विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.
------



Wednesday, 17 July 2019

द्वेषाधारित राष्ट्रवादामुळे बुद्धीप्रामाण्यवाद आंधळा: डॉ. सूरज येंगडे


माणगाव परिषद शताब्दी वर्ष व्याख्यानमाला: पुष्प दुसरे

शिवाजी विद्यापीठात आयोजित 'राष्ट्रवाद आणि आंबेडकरवाद' या विषयावर बोलताना अमेरिकेतील हार्वर्ड केनेडी स्कूल येथील डॉ. सूरज येंगडे. व्यासपीठावर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि डॉ. श्रीकृष्ण महाजन.


कोल्हापूर, दि. १७ जुलै: सध्याचा आपला राष्ट्रवाद हा द्वेषाधारित असून तिने आपला बुद्धीप्रामाण्यवाद आंधळा करून सोडला आहे, असे प्रतिपादन अमेरिकेतील हार्वर्ड केनेडी स्कूल येथील संशोधक डॉ. सूरज येंगडे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने आयोजित माणगाव परिषद शताब्दी वर्ष व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफताना राष्ट्रवाद आणि आंबेडकरवाद या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन होते, तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर उद्घाटक म्हणून उपस्थित होते.
Dr. Suraj Yengade
भारतीय राष्ट्रवादाचे अत्यंत वस्तुनिष्ठ विश्लेषण करताना डॉ. येंगडे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे भारतीय समाज हा हजारो जातीजातींत विभागला गेला आहे. त्या अंतर्गत आणखी पोटजाती आहेत. इथली प्रत्येक जात ही एक स्वतंत्र राष्ट्र आहे आणि इथला प्रत्येक नागरिक हा ज्याच्या त्याच्या जातीय-राष्ट्राशी प्रामाणिक आणि बांधील राहण्यासाठी प्रयत्नशील असतो. या प्रत्येक पोटजातीत जिचा तिचा राष्ट्रवाद आहे. ही बाब एखाद्या स्फोटकापेक्षा कमी नाही. म्हणून खऱ्या राष्ट्रवादाच्या प्रस्थापनेसाठी प्रथमतः हा जातीजातींमधील, पोटजातींमधील भेद संपूर्णतः नष्ट करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे आपला राष्ट्रवाद हा परस्पर द्वेषाबरोबरच क्रिकेट-राष्ट्रवाद आहे. यामुळे खेळामध्ये अभिप्रेत असलेल्या खिलाडूवृत्तीला हरताळ फासला जातो आणि अखिलाडू राष्ट्रवाद हा खरा राष्ट्रवाद पुढे आणला जातो.
डॉ. येंगडे पुढे म्हणाले, अंबानी, अदानी, मल्ल्या असले धनिक लोक आपल्या राष्ट्रवादाची भूमिका व दिशा ठरवितात. तो देशाचा राष्ट्रवाद म्हणून पुढे केला जातो. कष्टकरी, मजूर, महिला, शोषित, वंचित यांचा राष्ट्रवाद हा आपला कधीच होत नाही. त्याचबरोबर जुन्या काळात संस्कृतीच्या नावाखाली झालेल्या चुकीच्या, समाजविघातक गोष्टींचे नव्याने पुनरुज्जीवन आणि त्यांची बहुजनांच्या पाठिंब्यावरच पुनर्प्रस्थापना करून सांस्कृतिक राष्ट्रवाद या गोंडस नावाखाली थोपविण्याची प्रक्रियाही सुरू आहे. राष्ट्रवादाचा पुरस्कारच करावयाचा असेल तर तो आर्थिक राष्ट्रवादाचा केला पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

डॉ. सूरज येंगडे
राष्ट्रवाद या संकल्पनेच्या उगमाविषयी बोलताना डॉ. येंगडे म्हणाले, राष्ट्रवाद ही संकल्पना समूहवादातून पुढे आलेली आहे. पूर्वीच्या काळी माणूस छोट्या छोट्या समूहांतून राहायचा. त्यामुळे साहजिकच तिथे असुरक्षिततेची भावना मोठ्या प्रमाणात असायची. या असुरक्षिततेमधून त्यांना बाहेर काढण्याचे आश्वासन देणारा त्यांचा म्होरक्या असायचा. त्याच्याप्रती त्यांना वारंवार उद्घोष व जयजयकार करून आपली निष्ठा प्रदर्शित करावी लागायची. त्यातून त्या राजाचे अनुयायी मोठ्या प्रमाणावर तयार होत असत. पुढे आपले वर्चस्व टिकविण्यासाठी वेगवेगळे कायदे करून समाजघटकांवरील आपले नियंत्रण व वर्चस्व अबाधित राखण्याचा हे वरिष्ठ घटक प्रयत्न करीत. मनुस्मृती आणि तत्सदृश कायद्यांनी कनिष्ठ समाजघटकांवर असे वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्या बळावर त्यांनी हजारो वर्षे आपली सत्ता त्यांच्यावर गाजविली. भारतातील विषमतेचे मूळ या सामाजिक कारणांमध्येच दडलेले आहे. हीच असुरक्षिततेची भीती व दहशत आजच्या राष्ट्रवादातही प्रतिबिंबित झालेली दिसते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रवादाला भावनिक व मानसिक स्तरावरील दुधारी तलवार म्हणत. राष्ट्रवादासाठी तुम्हाला एक बाह्यशक्ती आणि तिची भिती यांची गरज असते. भीती नसेल तर राष्ट्रवादाचीही गरज नाही, असे ते म्हणत. खरे तर आजच्या युगात अशी भीती नसेल तर आपण उत्तम ग्लोबल सिटीझन होऊन जाऊ; मुक्त, स्वतंत्र व्यक्ती म्हणून वावरू शकू.
डॉ. येंगडे पुढे म्हणाले, जागतिकीकरणाने आपल्याला जगाशी उन्मुक्तपणे जोडले, हा सकारात्मक आणि आर्थिक बाबतीत दुय्यमत्व लादले, हा नकारात्मक, असे परिणाम आपल्यावर झाले. या काळात अशा प्रकारचे राष्ट्रवादी होणे आपल्याला परवडणारे नाही. राष्ट्रवाद हवाच असेल तर तो प्रागतिक मुक्ततावादी असायला हवा, महिला सबलीकरणाचा आग्रह धरणारा राष्ट्रवाद असायला हवा, मध्ययुगीन, पुरणमतवादी संकल्पनांतून बाहेर कढून भारतीय समाजाला आधुनिकतेच्या दिशेने घेऊन जाणारा राष्ट्रवाद हवा, भावनिक आणि मानसिक असुरक्षिततेमधून बाहेर काढणारा राष्ट्रवाद हवा, कोणाला वाचविणारा अगर कोणाला बदनाम करणारा नव्हे, तर फुले-शाहू-आंबेडकरांच्या मार्गाने जाणारा राष्ट्रवाद हवा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात डॉ. महाजन म्हणाले, भारतीय म्हणून आपली ओळख देत असताना आपण स्वतःच्या इतर ओळखी मात्र आपण सोडल्या नाहीत, ही फार मोठी चूक आहे. असे साऱ्या प्रकारचे भेद आपण सोडून दिले पाहिजेत. राष्ट्रवादापेक्षा मानवतावाद हा सर्वश्रेष्ठ आहे. मानवी मूल्याधिष्ठित, समतामूलक आणि अहिंसात्मक राष्ट्र म्हणून आपली ओळख निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी संविधानिक मूल्ये अंमलात आणण्याची खरी गरज आहे.
सुरवातीला कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तेजपाल मोहरेकर यांनी स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले, तर सचिन देठे यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक, अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Thursday, 11 July 2019

कोल्हापुरी चप्पल क्लस्टरसमवेत विद्यापीठाचा सामंजस्य करार

शिवाजी विद्यापीठाच्या कोल्हापुरी चप्पल क्लस्टरसमवेत झालेल्या सामंजस्य करार प्रसंगी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि क्लस्टरचे अरुण सातपुते. यावेळी (डावीकडून) व्ही.टी. पाटील, कला-दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई, डॉ. ए.एम. गुरव, उपमहापौर भूपाल शेटे, महेश काकडे आदी.


कोल्हापूर, दि. ११ जुलै: कोल्हापुरी चप्पलला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्याच्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर चप्पल क्लस्टरला सर्वोतोपरी सहाय्य करील, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे दिली.
शिवाजी विद्यापीठाचे कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र आणि कोल्हापुरी चप्पल क्लस्टर समूह यांच्यात आज सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमहापौर भूपाल शेटे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, कोल्हापुरी चप्पल ही अत्यंत दर्जेदार आहे. या चप्पलला कालसुसंगत असे आधुनिक रुप प्रदान करण्यासाठी संशोधन, तंत्रज्ञान विकास, पाणन व व्यवस्थापन आणि कौशल्य निर्मिती या चार आघाड्यांवर विद्यापीठ सक्रियपणे मदत करील. त्या दृष्टीने हा सामंजस्य करार अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
उपमहापौर तथा क्लस्टरचे अध्यक्ष भूपाल शेटे म्हणाले, कोल्हापूर चप्पलच्या निर्मितीमध्ये सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या कारागीरांवर पारंपरिक स्वरुपाची अनेक बंधने आहेत. त्या बंधनात तसेच अत्यंत वंचित स्थितीत राहून ते कोल्हापुरी चप्पलचा दर्जा आणि वैभव जपण्यासाठी कार्यरत आहेत. त्यांच्यासाठी आणि कोल्हापुरी चप्पलला तिचे पूर्ववैभव मिळवून देण्यासाठी क्लस्टर प्रयत्नशील आहे. कोल्हापुरी चप्पलच्या बरोबरीनेच कोल्हापुरी शूज सुद्धा लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत. कोल्हापुरी चप्पलचा ब्रँड कर्नाटकात नेण्याचे काही लोकांचे प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे कोल्हापुरी चप्पलला जी.आय. मिळविण्यासाठीही आम्ही प्रयत्न करतो आहोत. या सर्व बाबींमध्ये विद्यापीठाकडून सहकार्य अभिप्रेत आहे. त्या दृष्टीने हा करार महत्त्वाचा आहे.
यावेळी सामंजस्य करारावर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि अरुण सातपुते यांनी स्वाक्षरी केल्या. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक व अधिष्ठाता डॉ. ए.एम. गुरव, महेश चव्हाण आदी उपस्थित होते.

शिवबा क्राफ्ट बुकचे प्रकाशन
'शिवबा' या क्राफ्टबुकचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कला-दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई, साईप्रसाद बेकनाळकर यांच्यासह मान्यवर.

या प्रसंगी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राच्या संकल्पनेतून साईप्रसाद बेकनाळकर यांनी साकारलेल्या शिवबा या क्राफ्ट बुकचे प्रकाशन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, कला-दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शिवबा हे क्राफ्ट बुक हे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रसंगांवर बेतलेले असून गड-किल्ल्यांच्या निर्मितीसह अनेक अभिनव उपक्रम यात विद्यार्थ्यांसाठी आहेत.
या क्राफ्ट बुकची संकल्पना अत्यंत अत्यंत अभिनव असून नव्या पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार कुलगुरू डॉ. शिंदे यांनी काढले.
यावेळी साईप्रसाद बेकनाळकर यांनी अशा आणखी २३ महनीय व्यक्तीमत्त्वांवर बेतलेल्या क्राफ्ट बुकच्या निर्मितीचा हा प्रकल्प असून त्याचे विद्यार्थी-पालकांतून अत्यंत सकारात्मक स्वागत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.