Sunday, 20 February 2022

शिवाजी विद्यापीठात बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती

 




कोल्हापूर, दि. २० फेब्रुवारी: मराठी पत्रकारितेचे आद्य संपादक दर्पणकार बाळशात्री जांभेकर यांची जयंती शिवाजी विद्यापीठात उत्साहात साजरी करण्यात आली.

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. निशा मुडे-पवार, डॉ. सुमेधा साळुंखे यांच्यासह पत्रकार, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

Saturday, 19 February 2022

छत्रपती शिवाजी महाराज हेच सर्वार्थाने भारतीय आरमाराचे जनक: डॉ. सुरेश शिखरे

 

डॉ. सुरेश शिखरे


('छत्रपती शिवाजी महाराज यांची आरमार निती' व्याख्यानाचा व्हिडिओ)


शिवजयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात विशेष व्याख्यान

कोल्हापूर, दि. १९ फेब्रुवारी: छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या राष्ट्रीय जाणिवेतून आणि गांभीर्यपूर्वक आरमाराची उभारणी केली, ती पाहता ते सर्वार्थाने भारतीय आरमाराचे जनक आहेत, असे प्रतिपादन इतिहास संशोधक डॉ. सुरेश शिखरे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग आणि जनसंपर्क कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आज शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांची आरमार निती या विषयावर विशेष ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यावेळी विषयतज्ज्ञ व्याख्याते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील प्रमुख उपस्थित होते. विद्यापीठाच्या 'शिव-वार्ता' या युट्यूब वाहिनीवरुन व्याख्यान प्रसारित करण्यात आले.

डॉ. शिखरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमार नितीच्या प्रेरणा, कारणे आणि परिणाम या अनुषंगाने तपशीलवार चर्चा केली. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे सागरी शक्तींना शह देऊन व्यापारी नियंत्रण प्राप्त करण्यासाठी सुरवातीपासूनच पश्चिम किनारपट्टीवर बारीक लक्ष होते. पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच आदी सागरी संस्कृतीचा पुरस्कार करणाऱ्या सत्ताधीशांना शह देऊन सागरी व्यापारावर नियंत्रण प्रस्थापित करावयाचे असेल, तर स्वतःचे सक्षम आरमार असले पाहिजे, ही जाणीव त्यांना होती. त्या दिशेने त्यांनी सातत्याने मोहिमांचे नियोजन केले. आरमाराच्या बळावर गब्बर झालेल्या सिद्दी, पोर्तुगीज या सागरी सत्तांच्या गुलामगिरीतून स्थानिकांची मुक्तता करणे, हाही एक प्रमुख उद्देश त्यांच्या आरमार निर्मितीमागे होता. जहाजबांधणी तंत्रज्ञान आणि आरमारी युद्धाचे कौशल्यज्ञान हे भारतातून लुप्त झाले होते. त्याचा शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना पुनःपरिचय करून दिला. आरमार निर्मितीच्या माध्यमातून त्यांच्यात आत्मविश्वास पेरण्याचे कार्यही महाराजांनी केले. उसळलेल्या समुद्रात टिकणाऱ्या नौकांची निर्मिती करण्यासाठी महाराजांनी पोर्तुगीज आणि इंग्रजांचीही मदत घेतली. त्यासाठी आवश्यक अर्थउभारणीही केली. महत्त्वाचे म्हणजे समाजात सिंधुबंदीची मानसिकता खोलवर रुजलेली असतानाही त्यावर मात करीत महाराजांनी नेटकेपणाने आरमारनिर्मितीचे कार्य हाती घेतले आणि त्यामध्ये सर्व समाजघटकांचे सहकार्यही घेतले. हे करीत असताना आपला आश्वासक आणि लोककल्याणकारी राज्याचा मूलमंत्रही वृद्धिंगत केला. नाविकज्ञान सहजासहजी निर्माण होत नाही. त्यासाठी पिढ्यान्-पिढ्या जाव्या लागतात. असे असतानाही अत्यंत विपरित परिस्थितीतून महाराजांनी युरोपियनांच्या तोडीचे स्वतःचे आरमार निर्माण केले, ही प्रचंड कौतुकास्पद बाब आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी संस्कृतीच्या व्यापाऱ्यांची साम्राज्यशाही मानसिकता प्रकर्षाने ओळखलेली होती, हे महाराजांच्या एका आज्ञापत्राचा दाखला देऊन सांगताना डॉ. शिखरे म्हणाले, शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच आदी टोपेकरांशी कसे वागावे, हे एका आज्ञापत्रातूनच अत्यंत बारकाईने स्पष्ट केले होते. यात त्यांनी विविध सूचना केल्या होत्या. टोपेकरांना कोणीही व्यापारासाठी म्हणून सुद्धा कायमस्वरुपी जागा देऊ नये. जलदुर्गांच्या आसपासही त्यांना फिरकू देऊ नये. जागा द्यायचीच झाल्यास समुद्राच्या, दुर्गाच्या आसपास न देता आत खोलवर खाडीप्रदेशात द्यावी. त्यातही दोन शहरांच्या मधोमध निकृष्ट जागी द्यावी. त्यांना कायमस्वरुपी बांधकामास परवानगी देऊ नये. मोठी जागा देऊ नये. या सूचनांचे पालन झाले नाही, तर त्यांच्या आरमार आणि दारुगोळ्याला तुम्ही निश्चितपणे बळी ठराल, असा इशारा महाराजांनी दिला होता. आरमार हे राज्याचे स्वतंत्र अंगच आहे. ज्याचे आरमार, त्याचा समुद्र या भू-राजनैतिक धोरणाची जाणीव महाराजांच्या ठायी तीव्र होती. या दृष्टीकोनामुळेच महाराजांनी केलेल्या या सूचना पाहता या व्यापारी परकीयांना त्यांनी किती सूक्ष्मपणाने ओळखले होते, हे लक्षात येते. त्यांना या देशात पाय रोवू न देण्याची खबरदारी त्यांनी कटाक्षाने घेतलेली होती. ती खबरदारी पुढील राज्यकर्त्यांनीही घेतली असती, तर कदाचित हा देश इंग्रजांच्या ताब्यातही गेला नसता. त्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्याचा पहिला हुंकार देणारे पहिले राज्यकर्ते म्हणूनही आपल्याला छत्रपती शिवरायांकडे पाहावे लागते, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

शिवरायांनी किल्ले व दुर्गबांधणी करताना बाळगलेला शास्त्रीय दृष्टीकोन, त्यांचे स्थापत्यविषयक ज्ञान, स्वच्छतागृहे व शौचालयांच्या बांधणी करताना घेतलेली दक्षता पाहता महाराज हे एक थोर शास्त्रज्ञच होते. त्यांच्या या पैलूचा अधिक तपशीलाने अभ्यास करण्याची गरज डॉ. शिखरे यांनी अधोरेखित केली.

महाराजांचे स्त्रीदाक्षिण्य आणि धार्मिक सहिष्णुता

शिवाजी महाराज जेव्हा बसरुरच्या मोहीमेवर आरमार घेऊन गेले होते, तेव्हा परतीच्या प्रवासात कारवारची बाजारपेठ लुटण्याचा त्यांचा मानस होता. नेमकी त्याचवेळी आदिलशहाची आई बडी बेगम ही मक्केला जाण्यासाठी काही खरेदी करण्यासाठी कारवार येथे आलेली होती. तेव्हा तिच्या संरक्षणासाठी सोबत आलेल्या शेरखान याने शिवाजी महाराजांची भेट घेऊन त्यांना कारवारवर स्वारी न करण्याविषयी विनंती केली. तेव्हा तेथील व्यापाऱ्यांकडून खंडणी देण्याच्या मोबदल्यात महाराजांनी आपल्या स्वारीचा बेत रद्द केला. शत्रूच्या आईला देखील अभय देण्याच्या या प्रसंगातून महाराजांचे स्त्रीदाक्षिण्य तसेच धार्मिक सहिष्णुताही दिसून येते, असे डॉ. शिखरे यांनी सांगितले. मात्र, त्याचवेळी बार्देश येथे स्थानिक नागरिकांना सक्तीने धर्मांतर करावयास लावणाऱ्या आणि धर्मांतर न करणाऱ्या नागरिकांचा शिरच्छेद करणाऱ्या जुलमी पोर्तुगीज पाद्र्यांचा शिरच्छेद करायलाही महाराजांनी कमी केले नाही, असेही त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, भय हा शब्द शिवाजी महाराजांच्या कोषात नव्हता. कोणत्याही संकटाला न डगमगता सामोरे जाण्याचा महाराजांचा गुण अत्यंत अनुकरणीय व आदर्शवत असा आहे. समुद्रावर स्वामित्व प्राप्त करून स्वराज्याचा व्यापार विस्तार आणि संरक्षण करण्याचे ध्येय बाळगून ते सिद्धीस नेणाऱ्या महाराजांचे द्रष्टेपणच त्यातून अधोरेखित होते. महाराजांचे हे द्रष्टेपण आणि गुण आत्मसात करण्याचा आपण प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनिश पाटील यांनी स्वागत व परिचय करून दिला. जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले.

शिवाजी विद्यापीठात शिवजयंती उत्साहात

शिवाजी विद्यापीठात शिवजयंतीनिमित्त विद्यापीठ ध्वजास कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते वंदन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्यास शिवजयंतीनिमित्त कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकारी, शिक्षक व विद्यार्थी.


कोल्हापूर, दि. १९ फेब्रुवारी: येथील शिवाजी विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.

आज सकाळी ठीक साडेआठ वाजता कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचा ध्वज फडकावून त्यास वंदन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यास पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. इतिहास अधिविभागाच्या वतीने विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमापूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. येथेही मान्यवरांनी प्रतिमापूजन करून अभिवादन केले. कुलगुरू डॉ. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व घटकांना शिवजयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी.आर. पळसे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे संचालक डॉ. ए.एम. गुरव, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. एम.एस. देशमुख, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक अभय जायभाये यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांसाठी चहापानाचे आयोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे शिवजयंतीनिमित्त छत्रपतींच्या अश्वारुढ पुतळ्यासह परिसराला आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली.


Friday, 18 February 2022

समकालीन समीक्षकांत डॉ. वसंत पाटणकर यांचे स्थान महत्त्वाचे: डॉ. गणेश देवी

 

शिवाजी विद्यापीठात डॉ. वसंत पाटणकर यांना म.सु. पाटील समीक्षा पुरस्कार-२०२२ प्रदान करताना डॉ. गणेश देवी व कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, कवयित्री नीरजा, डॉ. राजन गवस, सौ. सरोज पाटणकर, रंगनथ पाठारे, डॉ. व्ही.एन. शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे.


डॉ. म.सु. पाटील पुरस्काराचे शिवाजी विद्यापीठात वितरण

 

कोल्हापूर, दि. १८ फेब्रुवारी: सैद्धांतिक वैचारि मांडणीचा परामर्ष घेता समकालीन समीक्षकांमध्ये डॉ.वसंत पाटणकर यांचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ.गणेश देवी यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाच्या वतीने राजर्षी शाहू सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात डॉ. म.सु. पाटील समीक्षा पुरस्कार २०२२ मुंबई येथील ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक डॉ.वसंत पाटणकर यांना प्रदान करताना डॉ. देवी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते.  

डॉ. गणेश देवी म्हणाले, वितेचे कवीपण नेमके कशामध्ये आहे, याचा शोध डॉ.वसंत पाटणकर सातत्याने घेत आले आहेत. डॉ. म.सु. पाटील यांच्या नावच्या पुरस्काराने त्यांच्या या गुणविशेषावर विद्यापीठीय शिक्कामोर्तब झाले आहे. विचारांच्या बांधणीचे एकत्रिकरण करण्याची अद्भ कला डॉ.पाटील यांना अवगत होती, याचेही स्मरण या निमित्ताने केले पाहिजे.  

या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठात उपस्थित राहता येत असल्याचा आनंद खूप मोठा असल्याचेही डॉ. देवी यांनी सांगितले. ते म्हणाले, माझी चांगल्या अर्थाने घरवापसी घडून आली. या विद्यापीठामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने घडलो. घडण्याची प्रेरणा विद्यापीठाच्या या सिनेट सभागृहानेच दिली. या प्रेरणेमुळेच अमेरिका, इंग्लंड येथील विद्यापीठांमध्ये शिकवू शकलो.

पुरस्काराला उत्तर देताना ज्येष्ठ साहित्यिक डॉ.वसंत पाटणकर म्हणाले, शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला प्राप्त होत असलेल्या पुरस्काराचा खूप आनंद होत आहे. डॉ.म.सु.पाटील यांच्याशी माझे फार जवळचे संबंध होते. शिवाजी विद्यापीठ आणि कोल्हापूरकारांकडून मला नेहमीच सन्मान लाभलेला आहे.  वेगवेगळया प्रकारची समीक्षा लिहिलेली आहे.  मुख्यत: काव्यसमीक्षा माझ्या लेखनाचा केंद्रबिंदू राहिलेली आहे. विता आणि समीक्षा माणसाची आत्मिक भूक भागवत असते. समीक्षा करताना पळवाट स्विकारता कामा नये. लेखन करणे ही स्वत:ला एका प्रकारे मुक्त करण्याची प्रक्रिया आहे.  दीर्घकाळ साचून राहिलेले, निचरा झालेले, बांधून टाकणारे, बंदीस्त असणारे या ठिकाणी मोकळे होते, प्रवाही होते.  हा एका अर्थाने स्वतंत्र्याचा आनंद मानता येईल.

अध्यक्षीय मनोगता कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, डॉ. म.सु. पाटील पुरस्कार प्रदान करण्यासाठी डॉ.गणेश देवी यांच्यासारख्या विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यास आमंत्रित केले, याचा एक वेगळा आनंद आहे. त्याचप्रमाणे मान्यवर साहित्यिकांची मांदियाळी या निमित्ताने विद्यापीठाच्या प्रांगणात अवतरली आहे, ही बाबही समाधान देणारी आहे.

यावेळी, ज्येष्ठ साहित्यिक, कादंबरीकार रंगनाथ पठारे आणि ज्येष्ठ कवयित्री नीरजा यांनी मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ समीक्षक प्रा.अविनाश सप्रे आणि मौज प्रकाशनच्या लेखिका संपाद मोनिका गजेंद्रगडकर यांच्या शुभेच्छा संदेशाच्या चित्रफित दाखविण्यात आल्या. 

याप्रसंगी, प्रतिभा कणेकर यांच्या कवयित्रींची सर्जनशीलता आणि म.सु.पाटील यांच्या साहित्यसमीक्षा - सिध्दांत आणि व्यवहार या समीक्षाग्रंथांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. 

यावेळी पुरस्कारप्राप्त डॉ.वसंत पाटणकर यांचा डॉ.गणेश देवी यांच्या हस्ते सपत्निक सत्कार झाला. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, ५१ हजार रूपये,  सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे. यावेळी डॉ. गणेश देवी यांचाही कुलगुरूंच्या हस्ते सपत्निक सत्कार झाला.

याप्रसंगी डॉ.किरण गुरव, सोनाली नवांगुळ, डॉ. अक्षय सरवदे यांचा अनुक्रमे साहित्य अकादमी नरहरी कुरूंदकर पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल डॉ.गणेश देवी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ.रणधीर शिंदे प्रास्ताविक केले. डॉ.नंदकुमार मोरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. राजेश पाटील यांनी डॉ.पाटणकर यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन केले. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले.

यावेळी एकनाथ पगारे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस, डॉ. म.सु. पाटील यांचे कुटुंबीय यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, संशोधक उपस्थित होते.