Thursday, 8 May 2014

खोटी तक्रार, साक्ष देणाऱ्यांवरही कारवाईची लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्यात तरतूद: डॉ. साधना झाडबुके



कोल्हापूर, दि. ७ मे: महिलांचा कार्यस्थळी लैंगिक छळ (निवारण, प्रतिबंध आणि सुधारणा) कायदा-२०१३ हा पुरूषांच्या विरोधात नसून खोटी तक्रार करणाऱ्या महिलांवर आणि खोटी साक्ष देणाऱ्यांवरही कारवाई करण्याची यात तरतूद आहे, असे डॉ. साधना झाडबुके यांनी आज सांगितले. शिवाजी विद्यापीठात या कायद्यासंदर्भात अंतर्गत तक्रार निवारण कक्षातर्फे आयोजित उद्बोधन कार्यशाळेत त्या बोलत होत्या.
अंतर्गत तक्रार निवारण कक्षातर्फे विद्यापीठातील शिक्षक व प्रशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवसीय उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आज सकाळी प्रशासकीय कर्मचाऱ्यांना या कायद्याविषयी माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
डॉ. झाडबुके म्हणाल्या, या कायद्यामध्ये अनेक चांगल्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्याचा सर्वांनीच अगदी मुळापासून अभ्यास करण्याची गरज आहे. त्याच्या उत्तम अंमलबजावणीसाठी संबंधित समितीला अर्धन्यायिक अधिकार देण्यात आले आहेत. प्रतिबंध, मनाई आणि नियमन अशा तीन स्तरांवर कार्यरत होणाऱ्या या कायद्यामुळे शोषित महिलेला जितके सक्षम बनविले जाते, तितकेच ज्याच्यावर आरोप आहे, अशा पुरूषालाही तक्रारीची प्रत देऊन त्याची बाजू पटवून देण्याची अथवा निर्दोषत्व सप्रमाण सिद्ध करण्याची संधीही दिली जाते. तसेच त्यासाठी नियुक्त समितीही संपूर्ण प्रकरणाची पूर्णतः त्रयस्थ भूमिकेतून तपास करते. त्यामुळे सहजासहजी कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली जाते.
डॉ. कृष्णा किरवले यांनी यावेळी विद्यापीठ व तत्सम सार्वजनिक संस्थांमध्ये या कायद्याचे जबाबदारपूर्वक पालन करण्याची गरज अधोरेखित केली. ते म्हणाले, विद्यापीठासारख्या संस्थांची सार्वजनिक प्रतिमा जपण्याची जबाबदारी सर्वच संबंधित घटकांची असते. त्यामुळे आपले प्रत्येक वर्तन कर्तव्यनिष्ठ भावनेतून प्रेरित असले पाहिजे. निनावी तक्रारींवरुन प्रसारमाध्यमांत बातम्या येणे, त्यावर गहजब माजविणे हे चुकीचे आहे. त्यामुळे माध्यम प्रतिनिधींनीही याचे भान जपले पाहिजे. अशा वृत्तांची शहानिशा करण्याचे अधिकार संबंधित चौकशी समितीला आहेत आणि समितीसमोर प्रसारमाध्यमांनी स्रोत सांगणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठ स्तरावर विद्यार्थ्यांना हाताशी धरून एखाद्याविरुदध कर्मचारी जाणीवपूर्वक तक्रारी घडवून आणतात किंवा न्यायप्रक्रियेत हस्तक्षेप करतात, हे प्रकारही गंभीर आहेत. समितीच्या कामकाजात गोपनीयतेला सर्वोच्च प्राधान्य असून तक्रार करणाऱ्या आथवा आरोप असणाऱ्या अशा कोणाचेही नाव जाहीर न करणे बंधनकारक आहे. त्यामुळे बदनामी किंवा चारित्र्यहनन होण्याची शक्यता याठिकाणी कमी राहते.
यावेळी डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी कार्यालयीन नातेसंबंधांमध्ये सभ्यतेच्या मर्यादा सांभाळल्यास कोणावर कधीही अनवस्था प्रसंग ओढवणार नाही, असे सांगितले. सुरवातीला विद्यापीठाच्या अंतर्गत तक्रार निवारण कक्षाच्या अध्यक्षा डॉ.एम.एस. पद्मिनी यांनी प्रास्ताविक केले. श्रीमती व्ही.एल. अंत्रेडी यांनी आभार मानले. यावेळी प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, काल शिक्षकांसाठीच्या सत्रालाही परीक्षा सुरू असूनही शिक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद लाभला. त्यावेळी डॉ. पद्मिनी यांनी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनद्वारे कायद्यातील विविध कलमांची सविस्तर माहिती दिली. समिती सदस्य डॉ. किरवले यांनी कायद्याचे महत्त्व सांगितले तर डॉ. झाडबुके यांनी अशासकीय सदस्याच्या दृष्टीकोनातून कायद्याचे विश्लेषण केले.

रेशीम उद्योगाच्या विकासाला महाराष्ट्रात व्यापक संधी



वस्त्रोद्योग सहसचिव सुधीर कुरसंगे यांचे मत
 कोल्हापूर, दि. ७ मे: महाराष्ट्रात रेशीमउद्योगाच्या विकासाला अतिशय व्यापक संधी उपलब्ध असून त्यादृष्टीने या क्षेत्रातील कुशल व प्रशिक्षित विद्यार्थी घडविण्याचे शिवाजी विद्यापीठात सुरू असलेले काम कौतुकास्पद असल्याचे मत राज्याच्या वस्त्रोद्योग विभागाचे सहसचिव सुधीर कुरसंगे यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर जिल्हा भेटीवर आलेल्या श्री. कुरसंगे यांनी आज सकाळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.जे. पवार आणि प्र-कुलगुरू डॉ. ए.एस. भोईटे यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, उपकुलसचिव बी.बी. पाटील, रेशीमशास्त्र विभागाचे डॉ. ए.डी. जाधव उपस्थित होते.
श्री. कुरसंगे म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रात उसाच्या खूप मोठ्या लागवडीमुळे आणि उत्पादनामुळे अन्य शेतीकडे तुलनेत कमी लक्ष दिले जाते आहे. तथापि, राज्य शासनाने अल्प खर्चातला आणि दीर्घकालीन उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देणाऱ्या रेशीम उद्योगाला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातल्या मुद्याळ आणि यळगूड या ठिकाणी सुरू असलेल्या रेशीम प्रकल्पांना भेट देऊन तेथील स्थानिकांशी चर्चा करण्यात येणार आहे. तसेच, त्यांना विविध योजनांच्या साह्याने अधिक काय मदत करता येईल, या दृष्टीने विचार करण्यात येणार आहे. रेशीम क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रम शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागात शिकविला जातो, ही खूप उत्साहवर्धक बाब आहे. या विद्यार्थ्यांना राज्यात निश्चितपणे चांगले भवितव्य असेल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी कुलगुरू डॉ. पवार यांनी विद्यापीठ स्तरावर रेशीम उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी काय करता येईल आणि त्यांना शासन कसे सहकार्य करू शकेल, याविषयी गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले. ते म्हणाले, विद्यापीठामध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण विकास स्कूलच्या माध्यमातून एखादा अभ्यासक्रम किंवा पथदर्शी प्रकल्प राबविता येईल का, यादृष्टीने विचार करता येईल. विशेषतः विद्यार्थी आणि शेतकरी यांचे साहचर्य या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून वृद्धिंगत होण्यासाठी शेतकऱ्यांचे टार्गेट ग्रुप तयार करून त्यांना रेशीम उद्योगाबाबत प्रशिक्षित करता येऊ शकेल. विशेषतः दुष्काळी भागातील शेतकऱ्यांपर्यंत याचे लाभ पोहोचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. विद्यापीठाच्या महाविद्यालयांचे जाळे त्यासाठी खूप उपयुक्त सिद्ध होऊ शकेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Monday, 5 May 2014

डॉ. आप्पासाहेब पवार यांना शिवाजी विद्यापीठात अभिवादन



कोल्हापूर, दि. ५ मे: शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठात त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.जे. पवार, प्र-कुलगुरू डॉ. ए.एस. भोईटे, कुलसचिव डॉ. डी.व्ही. मुळे, बीसीयुडी संचालक डॉ. ए.बी. राजगे, परीक्षा नियंत्रक डॉ. बी.एम. हिर्डेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी.के. गायकवाड यांनी आज सकाळी विद्यापीठ अतिथीगृहाच्या प्रांगणातील डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यानंतर मुख्य इमारतीत डॉ. पवार यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांनीही डॉ. पवार यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून आदरांजली वाहण्यात आली. डॉ. आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवनमध्येही कुलगुरू डॉ. पवार यांच्या उपस्थितीत विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरूंची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांची उपस्थितीही लक्षणीय होती.

शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात बी.व्होक. अभ्यासक्रमास मान्यता



कोल्हापूर, दि. ५ मे: शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील दोन महाविद्यालयांमध्ये बी.व्होक. हा ३ वर्षांचा व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम राबविण्यास विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (युजीसी) मान्यता मिळाल्याची माहिती विद्यापीठाचे बीसीयुडी संचालक प्राचार्य डॉ. ए.बी. राजगे यांनी आज दिली.
यासंदर्भात माहिती देताना डॉ. राजगे म्हणाले की, केंद्र सरकारच्या नॅशनल स्कील क्वालिफिकेशन फ्रेमवर्क (एनएसक्यूएफ) या नूतन उपक्रमांतर्गत युजीसीने देशातल्या विविध विद्यापीठांकडून बॅचलर ऑफ व्होकेशन (बी.व्होक.) हा ३ वर्षांचा पदवी व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत १५ एप्रिलपर्यंत प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार शिवाजी विद्यापीठाने दहा महाविद्यालयांचे प्रस्ताव सादर केले होते. महाराष्ट्रातील एकूण २८ महाविद्यालयांत हा अभ्यासक्रम सुरू करण्यास युजीसीकडून नुकतीच मान्यता प्राप्त झाली असून त्यांमध्ये कोल्हापूर येथील कमला महाविद्यालय आणि विवेकानंद महाविद्यालय या दोन महाविद्यालयांचा समावेश आहे. कमला महाविद्यालयात रिटेल मॅनेजमेंट ॲन्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि फूड प्रोसेसिंग ॲन्ड मॅनेजमेंट हे दोन अभ्यासक्रम, तर विवेकानंद महाविद्यालयात ग्राफिक डिझाईन आणि फौंड्री टेक्नॉलॉजी हे दोन अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यासाठी युजीसीकडून या महाविद्यालयांना प्रत्येकी १ कोटी ८५ लाख रुपयांचे अनुदानही देण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
बी.व्होक अभ्यासक्रमाची उपयुक्तता सांगताना डॉ. राजगे म्हणाले, आजघडीला विद्यापीठीय शिक्षणातून देशातील व्यवसाय-उद्योगांना आवश्यक असणारे कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होण्याचे प्रमाण अल्प आहे. योग्य प्रशिक्षण व कौशल्याअभावी विद्यार्थ्यांना रोजगार संधीही मिळत नाहीत. यावर उपाय म्हणून सर्वसाधारण शिक्षणामधूनच व्यावसायिक कौशल्य अभ्यासक्रम राबवून उद्योग-व्यवसायांची गरज भागवून, बेरोजगारी दूर करण्यासाठी युजीसीने बी.व्होक. अभ्यासक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. बारावीपर्यंत व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढचे पदवी शिक्षण पुरविण्याच्या दृष्टीनेही बी.व्होक अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहे. यातून उद्योगांची मागणी आणि कुशल, प्रशिक्षित मनुष्यबळ यातील दरी कमी होऊन रोजगारक्षम युवक निर्माण होतील. यातून उद्योगांची गरज भागून बेरोजगारीची समस्याही कमी होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

‘एमआयएस’च्या यशस्वी अंमलबजावणीबाबत शिवाजी विद्यापीठाचे शासनाकडून अभिनंदन



Alok Jatratkar

कोल्हापूर, दि. ५ मे: महाराष्ट्र शासनाच्या माहिती व्यवस्थापन प्रणालीच्या (एम.आय.एस.) यशस्वी अंमलबजावणीमध्ये शिवाजी विद्यापीठाने घेतलेले परिश्रम कौतुकास्पद आहेत, अशा शब्दांत महाराष्ट्र शासनाचे शिक्षण संचालक (उच्चशिक्षण) डॉ. प्र.रा. गायकवाड यांनी शिवाजी विद्यापीठाचे विशेष प्रशस्तीपत्र पाठवून अभिनंदन केले आहे. या प्रशस्तीपत्रात विद्यापीठाचे एमआयएस नोडल ऑफिसर आलोक जत्राटकर आणि अभिजीत रेडेकर यांचेही अभिनंदन करण्यात आले आहे. ही माहिती विद्यापीठाचे बीसीयुडी संचालक प्राचार्य डॉ. ए.बी. राजगे यांनी दिली.
Abhijeet Redekar
प्रशस्तीपत्रात म्हटले आहे की, उच्चशिक्षण संचालनालय तसेच अधिपत्याखालील राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालये यांच्या दैनंदिन कामकाजात आमुलाग्र सुधारणा करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याच्या हेतूने राज्य शासनाने माहिती व्यवस्थापन प्रणाली (एम.आय.एस.) राबविण्याचा निर्णय घेतला. या प्रणालीमार्फत सन २०१३-१४ या वर्षाची शैक्षणिक व इतर बाबींची माहिती शिवाजी विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांनी विहीत वेळेत व अचूकपणे संकेतस्थळावर ऑनलाइन भरून शासनाला उपलब्ध केली आहे. ही माहिती शानाला वेळेत आणि धोरणात्मक बाबींवर निर्णय घेण्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. याबाबत सहसंचालक कार्यालयाचे प्रशासन अधिकारी हरिविजय शिंदे, आणि विद्यापीठाचे एमआयएस नोडल ऑफिसर श्री. जत्राटकर आणि श्री. रेडेकर यांनी सदर प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद आहेत. या पुढील कालावधीत देखील विद्यापीठाकडून अशाच प्रकारच्या सर्वोत्तम आणि इतर विद्यापीठांकरिता आदर्शवत कामगिरीसाठी शुभेच्छाही दिल्या असल्याचे डॉ. राजगे यांनी सांगितले.