Monday, 6 May 2019

शिवाजी विद्यापीठाचा लवकरच तंजावरच्या विद्यापीठाशी सामंजस्य करार


तंजावर येथील शिलालेखांची पाहणी करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, डॉ. अवनीश पाटील.

तंजावर येथे आयोजित बैठकीत तमिळ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सी. बालसुब्रम्हण्यम् यांचा सत्कार करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत तंजावरचे शिवाजीराजे भोसले, कुलसचिव मुथ्थुकुमार, डॉ. अवनीश पाटील व डॉ. विवेकानंद गोपाळ.

कुलगुरूंच्या तंजावर भेटीत यशस्वी चर्चा; सरस्वती महाल ग्रंथालयाशीही होणार करार

कोल्हापूर, दि. ६ मे: तंजावर (तमिळनाडू) येथील तमिळ विद्यापीठ आणि सरस्वती महाल ग्रंथालय यांच्यासमवेत तंजावर पेपर्स आणि तंजावरी मराठी भाषा अभ्यासासंदर्भात सामंजस्य करार करण्याबाबत तमिळ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सी. बालसुब्रम्हण्यम् यांच्याशी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची यशस्वीपणे चर्चा झाली. कुलगुरू डॉ. शिंदे यांनी या संदर्भात नुकतीच विद्यापीठाच्या अभ्यासकांसमवेत तंजावरला भेट दिली.
तंजावर येथील तमिळ विद्यापीठाने मराठा इतिहास आणि मराठी भाषेसंदर्भातील चाळीस हजारहून अधिक कागदपत्रे जतन करून ठेवलेली आहेत. हे विद्यापीठ भाषेला केंद्रस्थानी ठेऊन स्थापन करण्यात आले असून या विद्यापीठाकडून मोडी कागदपत्रांचे भाषांतर कार्यही मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे या विद्यापीठाशी तंजावर पेपर्स आणि तंजावरी मराठी भाषा अभ्यासासंदर्भात सामंजस्य करार शिवाजी विद्यापीठाच्या विचाराधिन होता. त्याचबरोबर सरस्वती महल ग्रंथालयात मोडी कागदपत्रांसह हजारो मराठी ग्रंथांचे जतन केलेले असल्याने संशोधकांना अभ्यासासाठी ते सहज उपलब्ध व्हावे, यासाठी या ग्रंथालयाबरोबरही सामंजस्य करार करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालयामध्ये बैठक झाली. सदर बैठकीमध्ये वरील सर्व मुद्यांसह तंजावरला मराठी अध्यासन आणि शिवाजी विद्यापीठात तमिळ अध्यासन स्थापन करण्यासंदर्भात विस्तृत चर्चा झाली. शिवाय, शिवाजी विद्यापीठ नवे म्युझिअम साकारत असून या म्युझिअममध्ये तंजावर येथील मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित दालन उभारण्यासंदर्भातही सकारात्मक चर्चा यावेळी झाली. शिवाय, सरस्वती महल ग्रंथालयातील उपलब्ध अभ्यास साधनासंदर्भात तंजावरचे जिल्हाधिकारी ए. अण्णादुराई यांच्यासमवेतही स्वतंत्र बैठक झाली. दोन्ही बैठका तंजावरचे राजे शिवाजीराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या. या बैठकांना तमिळ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सी. बालसुब्रम्हण्यम्, कुलसचिव मुथ्थूकुमार यांच्यासह तमिळ विद्यापीठातील डॉ. विवेकानंद गोपाळ, डॉ. जयकुमार, डॉ. कविता, डॉ. शीला, डॉ. नीलकंठ हे भारतीय भाषा आणि सामाजिक शास्त्रांचे प्राध्यापक उपस्थित होते; तर, शिवाजी विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, समिती सदस्य डॉ. अवनीश पाटील, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. निलांबरी जगताप आणि गणेश नेर्लेकर-देसाई उपस्थित होते.

मराठ्यांच्या इतिहासात तंजावर महत्त्वाचे!
तमिळनाडूतील तंजावर येथे साडेतीनशे वर्षांपूर्वी इ.स. १६७६ ला मराठ्यांनी आपले राज्य स्थापन केले. शहाजीराजेंचे पुत्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजी यांनी हे राज्य स्थापन केले. तेव्हापासून ब्रिटीशांनी १८५५ ला संस्थान खालसा करेपर्यंत तेथे मराठा अंमल होता. या जवळजवळ दोनशे वर्षांमध्ये अकरा राजांनी राज्यकारभार केला. त्यांच्या कारकिर्दीत तेथे मराठी संस्कृती रुजली. मराठ्यांच्या इतिहासात तंजावरचे राज्य हा एक महत्त्वाचा भाग असून तंजावरच्या अभ्यासाशिवाय मराठ्यांचा इतिहास पूर्ण होत नाही. त्यामुळे तंजावर राजघराण्याचे हजारो पेपर्स, इतर ऐतिहासिक कागदपत्रे, वस्तू, शिल्पे, चित्र, शिलालेख, ग्रंथ अभ्यासने हे मराठा इतिहासाच्या अभ्यासात महत्त्वाचे आहे. तंजावरच्या राजांनी साहित्य, नाट्यकला, चित्रकला, मराठी संस्कृतीतील भजन, कीर्तन आणि लावणी परंपरा तंजावरला रुजवली आहे. त्याचबरोबर सर्फोजी (दुसरा) यांनी स्थापन केलेले सरस्वती महल ग्रंथालय जागतिक ठेवा ठरले आहे. हे हस्तलिखित ग्रंथांचे जगातील सर्वात मोठे ग्रंथालय असून माणसाच्या लेखन आणि पुस्तक निर्मितीच्या इतिहासाचा दस्तऐवज म्हणून जगभर नावाजलेले आहे. येथे रामायण, महाभारतापासून, विवेकसिंधू, भगवद्गीता या ग्रंथाची शेकडो हस्तलिखिते उपलब्ध आहेत.


Thursday, 2 May 2019

डॉ. शालिनी लिहितकर यांचा आंतरराष्ट्रीय परिषदेत गौरव





कोल्हापूर, दि. २ मे: शिवाजी विद्यापीठाच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र अधिविभागाच्या प्रमुख डॉ. शालिनी लिहितकर यांचा नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत इंडियन लायब्ररी लीडर्स अॅवॉर्ड फॉर प्रोफेशनल एक्सलन्स हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Dr. Shalini Lihitkar
नवी दिल्ली येथे १९-२० एप्रिल रोजी दिल्ली ग्रंथालय संघ आणि सतीजा रिसर्च फौंडेशन फॉर लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरी ग्रंथालय व माहितीशास्त्र आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेत देशभरातून ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयाशी निगडित ५००हून अधिक व्यावसायिक, संशोधक, प्राध्यापक व शिक्षणतज्ज्ञ सहभागी झाले. या परिषदेत ग्रंथालय व ग्रंथपालन व्यवसायाच्या विकासासाठी आराखडा तयार करण्यात आला. परिषदेत ग्रंथालय व माहितीशास्त्राच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल डॉ. शालिनी लिहितकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध विचारवंत व शिक्षणतज्ज्ञ अशोक बेरी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान समारंभ झाला. यावेळी एन.आय.सी.चे माजी संचालक डॉ. एम. मणी, डॉ. पी.बी. मंगला, डॉ. एम.पी. सतीजा, डॉ. सी.पी. वसिष्ठ, दिल्ली ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. आर.के. शर्मा, सतीजा रिसर्च फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. के.पी. सिंग आदी उपस्थित होते.
डॉ. लिहितकर यांना या पूर्वीही विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये पुरस्कार प्राप्त झाले आहे. साधन व्यक्ती म्हणून त्यांनी देशभरात व्याख्याने दिली आहेत. त्यांचे अनेक शोधनिबंध प्रतिष्ठित जर्नल्समधून प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अकरा विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.