Tuesday, 29 April 2025

महात्मा बसवेश्वरांचे विचार कालसुसंगत - आमदार सतेज पाटील

 

कोल्हापूर, दि.29 एप्रिल - महात्मा बसवेश्वरांचे विचार आजही कालसुसंगत असून ते पुढे घेवून जाण्याचे कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी आज येथे केले.

महात्मा बसवेश्वर जयंतीच्या पूर्वसंध्येला शिवाजी विद्यापीठातील शरण साहित्य अध्यासनाच्या नूतनीकृत कार्यालयाचे लोकार्पण अध्यासनास पाच लक्ष रूपयांच्या ग्रंथांचे हस्तांतरण समारंभ प्रसंगी आमदार पाटील प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के अध्यक्षस्थानी होते. प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांची विशेष उपस्थिती होती.

आमदार पाटील पुढे म्हणाले, जातीभेद दूर ठेवून सर्वांना सोबत घेवून पुढे जाण्याचे मोठे कार्य महात्मा बसवण्णांंनी 12 व्या शतकामध्ये सुरू केले.हेे विचार आजच्या काळामध्ये खूप उपयुक्त आहेत. त्यांच्या विचारांचा वसा पुढे घेवून जाण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.शरण साहित्याचे कंटेंट ऑनलाईन उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.त्याचेबरोबर, ज्या महापुरूषांचे इतिहास आपण सांगतो त्यांचे विचार पुढे घेवून जातो त्यांच्या विचारांचा इतिहास ऑनलाईन उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न व्हावेत.तंत्रज्ञानाचा उपयोग उद्याच्या भविष्यकाळात आपला खरा इतिहास बदलण्यासाठी होवू नये.तो तसाच टिकून रहावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. महाराष्ट्र शासनाने महापुरूषांचे अध्यासन होण्याच्या दृष्टीने योग्य ते धोरण स्विकारून निधी देण्यास सुरू केले आहे.ज्या भूमिला इतिहास असतो ती भूमी भूगोल घडवते.आपल्या भूमीला मोठा इतिहास आहे.

            आमदार जयंत आसगांवकर म्हणाले, समाजामध्ये समता, बंधुता पसरविण्याची भूमिका महात्मा बसवेश्वरांनी घेतली होती, हे मार्गदर्शक विचार शरण साहित्याच्या माध्यमातून आजच्या तरूण पिढी पुढे आले पाहिजे.शिवाजी विद्यापीठातील हे शरण साहित्य अध्यासन राज्यातील पहिले अध्यासन केंद्र आहे.शरण साहित्याच्या प्रचार आणि प्रसाराबरोबरच हा ठेवा जतन करणे आणि समाजापुढे आणणे गरजेचे आहे.

            अध्यक्षीय मनोगतामध्ये कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के म्हणाले, महात्मा बसवेश्वर यांच्या विचार कार्यामध्ये श्रमाधिष्ठित जीवन, स्वयंपूर्ण स्वावलंबी समाज आणि स्त्री-पुरूष समानता हे सूत्र आढळते. ऑनलाईन कन्टेंटच्या माध्यमातून महामानवांचे कार्य पुढे घेवून जाण्याचे काम विद्यापीठामध्ये सुरू झालेले आहे.

याप्रसंगी माजी व्यवस्थापन परिषद सदस्य सुर्यकांत पाटील बुध्दीहाळकर, अधिसभा सदस्य ॲड.अभिषेक मिठारी यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यासनाच्या समन्वयक डॉ.तृप्ती करेकट्टी यांनी स्वागत प्रास्ताविक केले.कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांनी आभार मानलेे.

          कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.रघुनाथ धमकले, डॉ.शरद बनसोडे, डॉ.व्ही.एम.पाटील, डॉ.विजय ककडे, यश आंबोळी, सरलाताई पाटील, अक्षर दालनचे आलोक जोशी यांचेसह शिक्षक, अधिविभागप्रमुख, अधिकार मंडळाचे सदस्य, नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

------

Friday, 25 April 2025

‘आय.आय.एस.सी.’समवेत संशोधनासाठी निवड झालेल्या संशोधकांचा विद्यापीठात गौरव

 

देशातील आघाडीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्ससमवेत 'हब अँड स्पोक' प्रकल्पांतर्गत संशोधनासाठी निवड झालेल्या विविध अधिविभागांतील संशोधकांचा शिवाजी विद्यापीठात गौरव करण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासमवेत सर्व संशोधक.

(संशोधक गौरव समारंभाचा व्हिडिओ)


कोल्हापूर, दि. २५ एप्रिल: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) या देशातील आघाडीच्या संशोधन संस्थेमधील संशोधकांसमवेत काम करण्याची संधी शिवाजी विद्यापीठातील संशोधकांना लाभणार आहे, ही गौरवाची बाब आहे. भविष्यात हे संबंध अधिक दृढतर होण्याच्या दृष्टीने विद्यापीठातील संशोधकांनी गांभीर्यपूर्वक कार्य करावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले.

भारतीय विद्यापीठांची संशोधन व विकासाची क्षमता वाढवण्यासाठी केंद्राने स्थापित केलेल्या अनुसंधान नॅशनल रिसर्च फौंडेशन (ANRF) यांच्या अंतर्गत अत्यंत महत्त्वाकांक्षी पेअर (PAIR)च्या हब-अँड-स्पोक उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठ देशातील आघाडीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूर यांच्याशी स्पोक म्हणून जोडले गेले आहे. या प्रकल्पामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या नॅनो सायन्स व तं६ज्ञान, रसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान, पदार्थविज्ञान, संगणकशास्त्र, संख्याशास्त्र, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट, गणित आणि युसिक या विभागांतील १८ संशोधक काम करणार आहेत. या संशोधकांचा आज विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने ग्रंथभेट देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते.

कुलगुरू डॉ. शिर्के पुढे म्हणाले, शिवाजी विद्यापीठामध्ये संशोधन प्रकल्पांवर काम करण्याचा शिरस्ता पदार्थविज्ञानाचे प्रा. एस.एच. पवार यांनी निर्माण केला. माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी संशोधन विकासासाठी आवश्यक पर्यावरण आणि शिस्त निर्माण करून महत्त्वाचे बीजारोपण केले. त्याची फळे गेल्या दशकभरापासून आपणास मिळत आहेत. त्यानंतरच्या कालखंडात विविध विभागांतील अत्यंत वरिष्ठ संशोधकांनी विद्यापीठाचे नाव जगभरात उंचावले. मटेरियल सायन्समध्ये तर अद्भुत म्हणावे असे काम आपण केले. त्यामुळे आयआयएससीसोबत अॅडव्हान्स्ड मटेरियल सायन्सविषयक प्रकल्पावर काम करण्याची संधी आपल्या संशोधकांना मिळाली आहे. या संशोधकांना प्रकल्पासाठी आवश्यक ते पाठबळ उपलब्ध करण्यास विद्यापीठ तत्पर असेल. आपणा सर्वांमुळे विद्यापीठाला मोठा लौकिक प्राप्त होणार आहे, याचे भान बाळगून आपण संशोधनकार्य करावे, असे त्यांनी आवाहन केले.

प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, शिवाजी विद्यापीठातील संशोधन परंपरेमुळेच आयआयएससीसमवेत काम करण्याची संधी चालून आली आहे. या संशोधकीय सहकार्यामुळे भविष्यात विद्यापीठाचे विविध प्रणालींमधील रँकिंग उंचावण्यासह पेटंटचे व्यावसायीकरण आणि उद्योगांसमवेत काम करण्याची संधी अशा बाबी घडून येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह मुख्य संशोधक डॉ. किरणकुमार शर्मा, डॉ. केशव राजपुरे, डॉ. राजेंद्र सोनकवडे, डॉ. नीलेश तरवाळ, डॉ. सागर डेळेकर, डॉ. के.एम. गरडकर, डॉ. अनिल घुले, डॉ. एस.एन. तायडे, डॉ. डी.एस. भांगे, डॉ. जे.बी. यादव, डॉ. के.डी. पवार, डॉ. तुकाराम डोंगळे, डॉ. कविता ओझा, डॉ. के.डी. कुचे, डॉ. एस.डी. पवार, डॉ. एस.एस. सुतार आणि डॉ. के.एस. खराडे या संशोधकांचा ग्रंथभेट देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धैर्यशील यादव यांनी केले, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.

 

Thursday, 24 April 2025

महर्षी वि.रा. शिंदे क्रांतीकारी लोकोत्तर व्यक्तीमत्त्व: राजन गवस

 प्रा. एन.डी. पाटील लिखित महर्षींवरील पुस्तकाचे विद्यापीठात प्रकाशन

शिवाजी विद्यापीठात प्रा. एन.डी. पाटील लिखित 'महर्षी विठ्ठल रामजी शिंदे: एक उपेक्षित महात्मा' या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी (डावीकडून) डॉ. राजन गवस, डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. सरोज पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. टी.एस. पाटील आणि डॉ. रणधीर शिंदे.

शिवाजी विद्यापीठात प्रा. एन.डी. पाटील लिखित 'महर्षी विठ्ठल रामजी शिंदे: एक उपेक्षित महात्मा' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलताना डॉ. राजन गवस.

शिवाजी विद्यापीठात प्रा. एन.डी. पाटील लिखित 'महर्षी विठ्ठल रामजी शिंदे: एक उपेक्षित महात्मा' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलताना डॉ. राजन गवस. मंचावर (डावीकडून) डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. सरोज पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. टी.एस. पाटील आणि डॉ. रणधीर शिंदे.


(पुस्तक प्रकाशन समारंभाचा व्हिडिओ)


कोल्हापूर, दि. २४ एप्रिल: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे क्रांतीकारक लोकोत्तर व्यक्तीमत्त्वाचे धनी होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनाच्या वतीने शिंदे यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन.डी. पाटील लिखित महर्षी विठ्ठल रामजी शिंदे: एक उपेक्षित महात्मा या पुस्तकाचे प्रकाशन आज श्रीमती सरोज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे आणि प्राचार्य टी.एस. पाटील प्रमुख उपस्थित होते.

डॉ. राजन गवस म्हणाले, महर्षी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणाचे अंगीकृत कार्य करीत असताना स्वकीयांकडूनच अपमान, अवहेलना आणि उपेक्षा झेलली. मात्र, ते सदैव निरपेक्ष वृत्तीने कार्य करीत राहिले. यशापयशाच्या परीघात ते कधीही नव्हते. केवळ आपले काम करीत राहणे, एवढेच त्यांना ठाऊक होते. म्हणूनच प्रा. एन.डी. पाटील यांनी त्यांच्या कार्याला एकतारीवरचे गाणे म्हटले. यात महर्षींबरोबर त्यांच्या भगिनींसह सारे कुटुंबीय सहभागी होते. एन.डी. पाटील यांच्यामध्ये एक कवी दडलेला होता. त्या अंगाने त्यांनी महर्षी शिंदे यांना शापित म्हटले. महर्षी शिंदे यांना केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेचे यथायोग्य मापन करण्याचे महत्त्वाचे काम एन.डी. पाटील यांनी केले. एका रात्रीत लिहीलेल्या या पुस्तकाच्या माध्यमातून ते आता वाचकांसमोर येत आहे, याचा आनंद मोठा असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे म्हणाले, प्रा. एन.डी. पाटील यांनी महर्षी शिंदे यांना उपेक्षेच्या छायेतून बाहेर काढण्याचे मोठे काम एकविसाव्या शतकात केले आहे. तर, गो.मा. पवार आणि रणधीर शिंदे यांनी महर्षींच्या अनुषंगाने दस्तावेजीकरणाचे महत्त्वाचे काम हाती घेऊन तडीस नेले आहे.

यावेळी डॉ. सरोज पाटील यांनी प्रा. एन.डी. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, एन.डी. पाटील यांनी सुरवातीपासून आपल्या मूल्यांना प्राणापलिकडे जपले. त्यांच्याशी जुळवून घेताना प्रारंभी दमछाक झाली, मात्र, त्या मूल्यांशी तडजोड करण्याचा विचार कधी मनी आला नाही. हेच मूल्यसंस्कार मुलांनीही आत्मसात करून पुढे चालविले आहेत, यापेक्षा मोठे सुख आणि समाधान दुसरे असू शकत नाही. जगभरात जी माणसे मोठी झाली, त्यांच्यापाठी ठाम उभ्या राहणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनींचाही समाजाने सकारात्मक दखल घेण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

प्रा. टी.एस. पाटील म्हणाले, प्रा. एन.डी. पाटील यांनी आपला सामाजिक, राजकीय व्याप सांभाळून अक्षरशः रात्रीचा दिवस करून लेखन केले आहे. त्यांच्या भाषणांचे आणि मुलाखतींचे संकलनाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठामधील विविध अध्यासनांनी धोरण निर्मितीमध्ये योगदान देण्यासाठी पुढे येणे अपेक्षित आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विविध संशोधन प्रकल्पांची यादी करून टप्प्याटप्प्याने त्यांच्यावर काम सुरू करावे. महामानवांनी विसाव्या शतकात हाताळलेल्या प्रश्नांचे एकविसाव्या शतकातील स्वरुप आणि त्यावरील उपाय या अनुषंगानेही काम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

यावेळी अरिष्ट काळाचे भयसूचन या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा केशवसुत पुरस्कार मिळाल्याबद्दल एकनाथ पाटील यांचा डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यासनाचे समन्वयक डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुखदेव एकल यांनी आभार मानले. कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, सुरेश शिपूरकर, डॉ. प्रभंजन माने, डॉ. अवनीश पाटील, डॉ. मेघा पानसरे, प्रसाद कुलकर्णी, व्यंकाप्पा भोसले, डॉ. गिरीश मोरे, डॉ. भारती पाटील, नामदेवराव कांबळे, डॉ. सिंधु आवळे, डॉ. रघुनाथ कडाकणे, किसन कुराडे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday, 19 April 2025

‘आय.आय.एस.सी.’सोबत शिवाजी विद्यापीठ राबविणार संयुक्त संशोधन प्रकल्प

 विद्यापीठाचे मोठे यश; संशोधकीय दर्जावर राष्ट्रीय मोहोर

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू



शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर



कोल्हापूर, दि. १९ एप्रिल: भारतातील नवोन्मेषी संशोधन आणि विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा डीएसटी-पेअर (DST-PAIR)च्या हब-अँड-स्पोक उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठ देशातील आघाडीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूर यांच्याशी स्पोक म्हणून जोडले जात आहे. अशा पद्धतीच्या देशातील अवघ्या ३२ राज्य अकृषी विद्यापीठांपैकी शिवाजी विद्यापीठ एक ठरले आहे. विद्यापीठाच्या संशोधकीय दर्जावर या निमित्ताने राष्ट्रीय मोहोर उमटली आहे. केंद्रीय मंत्रालयाचे सचिव प्रा. अभय करंदीकर यांनी आज सकाळी संबंधित शैक्षणिक संस्थांसमवेत ऑनलाईन बैठक घेऊन ही घोषणा केली.

भारतीय विद्यापीठांची संशोधन व विकासाची क्षमता वाढवण्यासाठी केंद्राने स्थापित केलेल्या अनुसंधान नॅशनल रिसर्च फौंडेशन (ANRF) यांच्या अंतर्गत पार्टनरशीप फॉर अ‍ॅक्सिलरेटेड इनोव्हेशन अँड रिसर्च (PAIR) हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला. देशातील उच्च-स्तरीय संस्था आणि उदयोन्मुख संशोधन क्षमता असलेल्या विद्यापीठांमध्ये परस्पर संशोधन सहकार्य वाढवणे असा त्यामागील उद्देश आहे.

सदरचा पेअर कार्यक्रम हब-अँड-स्पोक मॉडेलद्वारे कार्य करेल. नोडल हब म्हणून काम करणारी केंद्रीय संस्था देशभरात संशोधन आणि नवोपक्रम चालविण्यासाठी किमान सात संस्थांशी भागीदारी करेल. त्यांना यात स्पोक असे संबोधले आहे. एन.आय.आर.एफ. रँकिंगमध्ये देशात पहिल्या स्थानी असलेल्या बंगळूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने या उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठाची स्पोक संस्था म्हणून निवड केली आहे. या उपक्रमाचा पहिला टप्पा आजच्या बैठकीमध्ये जाहीर करण्यात आला. या टप्प्यामध्ये सात उच्चस्तरीय संस्थांची नावे हब म्हणून जाहीर करण्यात आली. त्यात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्ससह आयआयटी- इंदोर, आयआयटी- मुंबई, आयआयटी- रोपार, एनआयटी- रुरकेला, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली आणि केंद्रीय विद्यापीठ, हैदराबाद यांचा समावेश आहे. त्यांच्यासमवेत स्पोक म्हणून संशोधनकार्य करण्यासाठी देशातील एकूण ४३ शैक्षणिक संस्थांची निवड करण्यात आली आहे. त्यात ३२ राज्य अकृषी विद्यापीठे, ६ केंद्रीय विद्यापीठे आणि ७ एनआयटी यांचा समावेश आहे. या ३२ राज्य विद्यापीठांमध्ये शिवाजी विद्यापीठाचा समावेश आहे.

प्रत्येक नेटवर्कला शंभर कोटींचा निधी

या प्रकल्पांतर्गत प्रत्येक हब-अँड-स्पोक नेटवर्कला १०० कोटी रुपयांचा निधी केंद्राकडून प्रदान करण्यात येणार आहे. यातील ३० टक्के निधी हब म्हणून काम करणाऱ्या संस्थेला आणि ७० टक्के निधी स्पोक म्हणून निवडलेल्या संस्थांसाठी असेल. हब असणारी संस्था आपल्याशी जोडलेल्या स्पोक संस्थांना संशोधकीय मार्गदर्शनाबरोबरच आवश्यक संसाधने, उपकरणे आणि सुविधा प्रदान करतील. त्यामुळे भारतभरात संशोधनाची एक सक्रिय अशी परिसंस्था निर्माण होणे, अभिप्रेत आहे.

या उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठ अॅडव्हान्स्ड मटेरियल सायन्समधील आधुनिक संशोधन करणार आहे. त्यात विद्यापीठाच्या नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान, संगणकशास्त्र, संख्याशास्त्र आणि यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट (वाय.सी.एस.आर.डी.) या अधिविभागांतील संशोधकांचा सहभाग असणार आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या दर्जेदार संशोधनकार्यावर शिक्कामोर्तब

या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले की, पेअरसारख्या देशातील एका अत्यंत महत्त्वाकांक्षी संशोधकीय उपक्रमामध्ये शिवाजी विद्यापीठाची निवड होणे ही बाब अभिमानास्पद आहेच; पण, त्याच बरोबर देशातील रँकिंगमध्ये क्रमांक एकवर असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सबरोबर स्पोक म्हणून संशोधन करण्याची संधी मिळणे ही विद्यापीठाच्या संशोधकीय दर्जावर शिक्कामोर्तब करणारी बाब आहे.

आयआयएससीसारख्या दिग्गज संस्थेसोबत संशोधन करण्याची संधी शिवाजी विद्यापीठातील संशोधकांना व विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे त्या संस्थेतील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधकांकडून मार्गदर्शन मिळाल्याने शिवाजी विद्यापीठाची एकूण संशोधन मानके उंचावण्याची आणि शैक्षणिक क्षेत्रात नवोपक्रमांना चालना मिळण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. हे संशोधन सहकार्य पुढील काळात अधिक वृद्धिंगत होत जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.