Tuesday, 28 February 2023

दृष्टीदिव्यांग विद्यार्थ्यांनी स्पर्शज्ञानातून अनुभवले शरीररचनाशास्त्र

 शिवाजी विद्यापीठात विज्ञान दिनानिमित्त विशेष प्रदर्शन

शिवाजी विद्यापीठात दृष्टीदिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आयोजित विशेष प्रदर्शनामध्ये स्पर्शज्ञानाद्वारे वैज्ञानिक उपकरणांची त्यांना माहिती देताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत सतीश नवले आणि उपस्थित शिक्षक व स्वयंसेवक.


शिवाजी विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्रामध्ये विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान ग्रंथ प्रदर्शनाची पाहणी करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. प्रकाश बिलावर,  कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. धनंजय सुतार व अन्य अधिकारी, कर्मचारी.

कोल्हापूर, दि. २८ फेब्रुवारी: मानवी शरीराची अंतर्गत रचना कशी असते, हे आज आम्हाला प्रथमच स्पर्शज्ञानाच्या माध्यमातून अनुभवता आले. हा अनुभव अत्यंत रोमांचक ठरला, अशी प्रतिक्रिया आज शहरातील विविध शाळांतील दृष्टी-दिव्यांग विद्यार्थ्यांनी येथे व्यक्त केली. निमित्त होते शिवाजी विद्यापीठाने जागतिक विज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या दृष्टी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या विशेष विज्ञान प्रदर्शनाचे!

शिवाजी विद्यापीठाचे समावेशी शिक्षण संसाधन केंद्र व युजीसी स्किम फॉर पर्सन विथ डिसॅबिलीटीज् यांच्या संयुक्त विद्यमाने आज जागतिक विज्ञान दिनाच्या निमित्ताने शहरातील जिल्हा परिषदेच्या विविध शाळांतील दृष्टीदिव्यांग विद्यार्थी व त्यांचे विशेष शिक्षक यांच्यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्रातील व्हर्चुअल क्लासरूममध्ये करण्यात आले. अंध विद्यार्थ्यांना विज्ञानातील विविध प्रयोग समजावेत, शरीररचनाशास्त्र त्यांनी समजून घ्यावे, जेणे करून विज्ञानातील संकल्पना त्यांना सुलभपणे समजतील, या हेतूने प्रदर्शनामध्ये अनेकविध त्रिमितीय मॉडेल्स मांडण्यात आली. ती हाताळून हे विद्यार्थी रचना समजावून घेत होते. या प्रयोगाबद्दल संबंधित शिक्षक व विद्यार्थ्यांनी अत्यंत आनंद व्यक्त केला.

कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनीही या अनोख्या विज्ञान प्रदर्शनास भेट दिली आणि या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, अंध विद्यार्थ्यांना विज्ञान विषयातील प्रयोगांचे हे समजावणे केवळ एका दिवसापुरते मर्यादित न राहता त्यांना कायमस्वरूपी शिकता आले पाहिजेत, यासाठी विद्यापीठातील समावेशी शिक्षण संसाधन केंद्र त्यांच्यासाठी पूर्ण वेळ काम करेल. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील सर्व प्रयोग उपलब्ध करून शिकवले जातील, असेही सांगितले.

यावेळी प्रकल्प सहाय्यक श्री. सतीश नवले यांनी मनोगत मांडले. विज्ञानाचे नवनवीन प्रयोग दृष्टी दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

यावेळी जिल्हा परिषदेच्या विविध शाळांचे दृष्टी दिव्यांग शिक्षक व विद्यार्थी यांनी प्रदर्शन स्पर्शज्ञानात्मक प्रयोग पध्दतीने पाहिले. प्रदर्शनाच्या नियोजनासाठी राजाराम महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी मयुरी आवळे, पल्लवी राणे, अमृता किल्लेदार, प्रमोद कोराणे, ओंकार कांबळे, तुषार सुतार यांनी स्वयंसेवक म्हणून काम पाहिले.

यावेळी ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक युजीसी स्किम फॉर पर्सन व्हिथ डिसॅबिलीटीज या योजनेच्या समन्वयक डॉ. प्रतिभा देसाई यांनी केले. भगवान लोखंडे यांनी आभार मानले.

विज्ञान पुस्तकांचे भव्य प्रदर्शन

शिवाजी विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राने आज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त एक अनोखा उपक्रम आयोजित केला. ग्रंथालयातील विज्ञान विषयाला वाहिलेल्या निवडक पुस्तके व संशोधन प्रबंधांचे प्रदर्शन आज मांडण्यात आले. प्रदर्शनात शुद्ध विज्ञानासह माहिती तंत्रज्ञान, विज्ञान कथा कादंबऱ्या, अन्नविज्ञान, प्रक्रिया, योगा, औषधनिर्माण आदी विषयांवरील सुमारे २०० ग्रंथांची मांडणी करण्यात आली. त्याचप्रमाणे पीएच.डी.चे निवडक शोधप्रबंधही मांडण्यात आले. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सकाळी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. संचालक डॉ. धनंजय सुतार व उपग्रंथपाल डॉ. प्रकाश बिलावर यांनी प्रदर्शनाची माहिती दिली.

Monday, 27 February 2023

मराठी भाषा दिन विशेष:

डॉ. यशवंतराव थोरात यांचे लेखन व्यापक मूल्यशिक्षणाचा वस्तुपाठ

शिवाजी विद्यापीठातील ग्रंथचर्चेमधील सूर

(शिवाजी विद्यापीठात काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीचा व्हिडिओ)


मराठी भाषा दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात आयोजित ग्रंथदिंडीचे उद्घाटन पालखीपूजनाने करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. यशवंतराव थोरात, डॉ. उषा थोरात, डॉ. धनंजय सुतार, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे.

मराठी भाषा दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात आयोजित ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झालेले कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. यशवंतराव थोरात, डॉ. नंदकुमार मोरे, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. रघुनाथ कडाकणे, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. धनंजय सुतार आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी. 


मराठी भाषा दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात आयोजित ग्रंथदिंडीमध्ये विद्यार्थिनी लक्षणीय संख्येने सहभागी झाल्या.  

मराठी भाषा दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात आयोजित ग्रंथचर्चेमध्ये डॉ. यशवंतराव थोरात यांचा सत्कार करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. विलास शिंदे, डॉ. उषा थोरात आणि डॉ. रघुनाथ कडाकणे.

मराठी भाषा दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात आयोजित ग्रंथचर्चेमध्ये डॉ. यशवंतराव थोरात यांच्या पुस्तकांविषयी बोलताना डॉ. रघुनाथ कडाकणे. मंचावर (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. विलास शिंदे, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. यशवंतराव थोेरात व डॉ. उषा थोरात. 

मराठी भाषा दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात आयोजित ग्रंथचर्चेमध्ये डॉ. यशवंतराव थोरात यांच्या पुस्तकांविषयी बोलताना डॉ. रणधीर शिंदे. मंचावर (डावीकडून) डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. विलास शिंदे, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. यशवंतराव थोेरात, डॉ. रघुनाथ कडाकणे व डॉ. उषा थोरात.


कोल्हापूर, दि. २७ फेब्रुवारी: ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ तथा विचारवंत डॉ. यशवंतराव थोरात यांचे लेखन हा व्यापक मूल्यशिक्षणाचा वस्तुपाठ आहे, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित केलेल्या ग्रंथचर्चेमध्ये उमटला.

डॉ. थोरात यांच्या काही वाटा, काही वळणं आणि नवी वाट नवे क्षितीज या दोन पुस्तकांचे नुकतेच प्रकाशन झाले. आजच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने या दोन्ही पुस्तकांच्या अनुषंगाने विशेष ग्रंथचर्चा कार्यक्रमाचे विद्यापीठाच्या वि.स. खांडेकर सभागृहात आयोजन करण्यात आले. राजाराम महाविद्यालयाचे डॉ. रघुनाथ कडाकणे आणि डॉ. रणधीर शिंदे हे प्रमुख वक्ते होते, तर कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमास डॉ. यशवंतराव थोरात, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. उषा थोरात व प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित होते.

डॉ. रणधीर शिंदे म्हणाले, मराठी साहित्यामध्ये स्वकेंद्री, मध्यमवर्गी अनुभवकथनात ललितलेखन गुरफटलेले आहे. या पार्श्वभूमीवर मराठी ललितलेखनाच्या क्षेत्रात डॉ. थोरात यांचे मुक्त, वैश्विक वाचनानुभव देणारे लेखन वेगळे ठरते. त्यांचा अनुभवसंचय दांडगा आणि मांडण्याची शैली ही त्यांच्या लेखनाला वेगळे वैशिष्ट्य प्रदान करते. त्यांचा अनुभव व सादरीकरणाच्या कक्षा या अत्यंत विस्तृत स्वरुपाच्या आहेत. स्वतःकडे न्यूनत्व घेऊन बहुकेंद्री व समाजकेंद्री लेखनाकडे त्यांचा कल आहे. व्यापक सामाजिक बांधिलकी, जगण्याविषयीची शहाणीव, सामाजिक-आर्थिक विषमता निर्मूलनासाठी आग्रह, नैतिकता व बुद्धिमत्ता यांचा आपसमेळ आणि मानव व समतेची पूजा म्हणजेच धर्म याची जाणीवपेरणी करीत माणूसपणाचे अधोरेखन डॉ. थोरात त्यांच्या लेखनातून करतात. संविधानाप्रती अविचल निष्ठा आणि मानवतेविषयीचे चिंतन त्यांच्या लेखनातून अखंड पाझरते. त्यांच्या ठाम व भक्कम इतिहासदृष्टीचे प्रत्यंतर त्यातून येते.

डॉ. थोरात हे आपल्यातील सुप्त अनुवादकाचे जन्मदाते असल्याचे सांगून डॉ. रघुनाथ कडाकणे म्हणाले, भारताचे संविधान ज्या व्यक्तीला गोष्टीरुपात वाचावयाचे असेल, त्याने डॉ. थोरात यांची पुस्तके वाचावीत. डॉ. यशवंत थोरात म्हणजे अखंड अस्वस्थता आहे. अविश्रांत अभ्यासातून त्यांनी त्यांचे व्यासंगी व्यक्तीमत्त्व घडविले आहे. वडिलांच्या निष्ठूर प्रेमाने त्यांना घडविले. त्यांच्या समग्र व्यासंगाचे दर्शन त्यांच्या लेखनातून घडते. अर्थशास्त्रासह, नीतीशास्त्र, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, ऊर्दू कविता, काव्यशास्त्र, मानववंशशास्त्र, इतिहास अशा अनेकविध विषयांचा त्यांचा व्यासंग स्तिमित करणारा आहे. आपल्या अवघडातील अवघड इंग्रजीचा सोप्यात सोप्या मराठीत अनुवाद व्हावा, याकडे त्यांचा कटाक्ष असतो. त्या अर्थाने ते शब्दांचे उत्तम कारागीर आहेत. त्यांच्या या कौशल्याचे प्रत्यंतर ललित लेखनातून येते.

डॉ. यशवंतराव थोरात म्हणाले, मी सुरवातीपासूनच माझ्या कुठल्याही लेखात उपदेश न देण्याचा निर्धार केला. मध्यममार्ग मला प्रिय आहे. टोकाची भूमिका घेणे मला योग्य वाटत नाही. सत्याचे सर्व पैलू चिकित्सापूर्वक लक्षात घेऊन लेखन करण्याकडे माझा कल असतो. सत्याच्या पावित्र्यावर माझा सदैव विश्वास आहे. आपल्या देशातील विविधता ही आपली ताकद आहे, पण आपापसातली भेदभावाची भावना आपल्याला दूर लोटायला हवी. आपल्या भारतीयत्वाचा विसर आपण कधीही पडू देता कामा नये. आपले हृदय आभाळाएवढे विशाल करा, विवेकी व्हा, विचार करा आणि देशाच्या प्रगतीची दिशा निश्चित करा, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

कुलगुरू डॉ. शिर्के अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, आपल्या प्रचंड अनुभव संचिताची मांडणी सहज संवादी भाषेत कशी करावयाची, हे डॉ. थोरात यांच्या लेखनातून समजते. अनेक दुर्मिळ संदर्भ त्यांच्या लेखांमध्ये आढळतात. त्यामुळे त्यांच्या लेखनाला साहित्यमूल्याबरोबरच संदर्भमूल्यही प्राप्त आहे. आपल्या प्रत्येक लेखाच्या शेवटी ते वाचकाला विचारप्रवृत्त करतात, हे त्यांचे मोठे वैशिष्ट्य आहे.

सुरवातीला मराठी अधिविभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले तर सुखदेव एकल यांनी आभार मानले.

उपक्रमाच्या दुसऱ्या सत्रात अरुण कोलटकर लिखित भिजकी वही या कवितासंग्रहाचे नाट्यात्म सादरीकरण जळगाव येथील परिवर्तन चमूतर्फे करण्यात आले. यामध्ये शंभु पाटील, सोनाली पाटील, हर्षदा कोलटकर, राहुल निंबाळकर, हर्षल पाटील, मंगेश कुलकर्णी, जयश्री पाटील, सुदिप्ता सरकार, मंजुषा भिडे, अंजली पाटील, सुनीला भोलाने आदी कलाकारांचा समावेश होता.

ज्ञानोबा-तुकारामच्या गजरात ग्रंथदिंडी उत्साहात

मराठी अधिविभाग तसेच डॉ. आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवनच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आज सकाळी मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने विद्यापीठ परिसरामध्ये ज्ञानोबा-तुकारामच्या गजरात मोठ्या उत्साहात ग्रंथदिंडी काढली. त्यांना हुपरीच्या अनुभवी वारकऱ्यांची साथसंगत लाभली. त्यामुळे दिंडीमध्ये अधिकच रंगत आली. दिंडीतील पालखीमध्ये श्री ज्ञानेश्वरीसह तुकारामबोवांची गाथा, नामदेवांची गाथा यांसह भारतीय संविधान ठेवण्यात आले होते. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दिंडीस सुरवात झाली. प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुढे दिंडी वि.स. खांडेकर भाषा भवन येथे आल्यानंतर विसर्जन करण्यात आले.

Thursday, 23 February 2023

शिवाजी विद्यापीठात संत गाडगेबाबा जयंती


कोल्हापूर, दि.23 फेब्रुवारी - शिवाजी विद्यापीठात आज संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.

 


शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात प्र-कुलगुरू डॉ.पी.एस.पाटील यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.  यावेळी कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे, वाणिज्य व्यवस्थापन अधिविभागाप्रमुख  डॉ.ए.एम.गुरव, आजीवन अध्ययन केंद्र संचालक डॉ.रामचंद्र पोवार, तंत्रज्ञान अधिविभाग संचालक डॉ.शिवलिंगप्पा सपली, डॉ.केदार मारूलकर, डॉ.दीपा इंगवले, डॉ.रामदास बोलके, डॉ.टी.सी.घोडके, डॉ.दिपाली पाटील, डॉ.जयश्री लोखंडे, सचिन चौगुले, समीर गावडे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

दरम्यान, आज संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध अधिविभागांसह प्रशासकीय विभागाअंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

                                              -----


Sunday, 19 February 2023

तरुणाईच्या आकर्षक सादरीकरणांसह

शिवाजी विद्यापीठात शिवजयंती उत्साहात

 

(शिवाजी विद्यापीठात साजऱ्या झालेल्या शिवजयंती सोहळ्याचा व्हिडिओ)

शिवाजी विद्यापीठात शिवजयंतीनिमित्त कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजास वंदन करण्यात आले.

शिवजयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवर. 

शिवाजी विद्यापीठात शिवजयंतीनिमित्त कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

शिवजयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात ढोल-ताशा वादन करताना विद्यार्थी.

शिवजयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात सादरीकरण करताना विद्यार्थिनींचे झांजपथक

शिवजयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात जरीपटका मिरविताना विद्यार्थिनींचे पथक

शिवाजी विद्यापीठात शिवजयंतीनिमित्त लेझीम प्रात्यक्षिके सादर करताना विद्यार्थिनी


कोल्हापूर, दि. १९ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठात आज शिवजयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. तरुणाईकडून उत्स्फूर्तपणे काढण्यात आलेली शोभायात्रा, लेझीम, ढोल व झांजपथकाचे उत्कृष्ट सादरीकरण, जरीपटक्याचे मिरविणे यांमुळे विद्यापीठाचा परिसर आज पूर्णपणे शिवमय होऊन गेला.

विद्यापीठात आज सकाळी ठीक साडेआठ वाजता कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजास वंदन करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. यानंतर कुलगुरू डॉ. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवरांनी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यास पुष्प वाहून अभिवादन केले, त्याचप्रमाणे शिवप्रतिमेसही पुष्पहार घालून अभिवादन केले.

या प्रसंगी विद्यापीठाच्या वसतीगृहातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसह राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी विद्यापीठ परिसरात ढोल-ताशाच्या निनादात भव्य शोभायात्रा काढली. भगवे फेटे आणि शुभ्रवस्त्रांकित तरुणाईमुळे ही शोभायात्रा लक्ष्यवेधी ठरली. शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आल्यानंतर तेथे आणि मुख्य प्रशासकीय भवन इमारतीसमोर या विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कारांचे सुमारे दोन तास सादरीकरण केले. यामध्ये झांजपथकाचे सादरीकरण, लेझीम प्रात्यक्षिके जरीपटका नाचविण्याचा उपक्रम यांचा समावेश होता. सळसळत्या तरुणाईच्या उत्साहाने विद्यापीठाचा परिसर पूर्णपणे शिवमय होऊन गेला. कुलगुरू डॉ. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांनी पूर्णवेळ उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणाला प्रोत्साहन दिले. त्याचप्रमाणे त्यांच्या उत्साहपूर्ण सादरीकरणाबद्दल कौतुकही केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रापासून प्रेरणा घेऊन, त्यांनी दाखविलेल्या मार्गावरुन आपल्याला वाटचाल करावयाची आहे, याचे भान बाळगून या तरुणांनी देशहितासाठी स्वतःस तयार करावे, असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.

यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. धनंजय सुतार, इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनिश पाटील, डॉ. प्रल्हाद माने, डॉ. प्रभंजन माने यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday, 15 February 2023

शिवाजी विद्यापीठात संत सेवालाल महाराज यांची जयंती

 




कोल्हापूर, दि. १५ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठात आज संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, समाजशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. प्रतिमा पवार, डॉ. प्रल्हाद माने, कायदे सल्लागार अनुष्का कदम आदी उपस्थित होते.

Friday, 3 February 2023

ज्येष्ठ कवी ना.वा. देशपांडे यांची साहित्यसंपदा वाचकांसाठी उपलब्ध

 

कवी ना.वा. देशपांडे यांची साहित्यसंपदा लोकार्पण प्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, ज्ञानस्रोत केंद्र संचालक डॉ. धनंजय सुतार, प्रा. शशिकांत चौधरी, सुनंदा देशपांडे, वसुधा लाटकर आदी

कवी ना.वा. देशपांडे यांच्या साहित्यसंपदेसह सुनंदा देशपांडे

सुनंदा देशपांडे यांचा कृतज्ञतापूर्ण गौरव करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के.

                               

कोल्हापूर, दि. ३ फेब्रुवारी: ज्येष्ठ साहित्यिक व कवी ग.दि. माडगूळकर यांनीच ज्यांना आपले मानसपुत्र मानले, असे येथील प्राचीन वाङ्मयाचे ज्येष्ठ अभ्यासक व कवी ना.वा. देशपांडे यांच्या ९०व्या जयंतीचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठाकडील त्यांची साहित्यसंपदा आजपासून वाचकांसाठी उपलब्ध करण्यात आली. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि सुनंदा देशपांडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

कवीवर्य देशपांडे यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पत्नी सुनंदा यांनी त्यांची समग्र साहित्यसंपदा गेल्या वर्षी विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राकडे सुपूर्द केली. यामध्ये अनेक दुर्मिळ ग्रंथांचाही समावेश आहे. विद्यापीठाने या संग्रहाच्या नोंदणीचे काम पूर्ण करून आज देशपांडे यांच्या ९०व्या जयंतीनिमित्त वाचकांसाठी हा संग्रह उपलब्ध केला. विद्यापीठाच्या अर्काईव्ह कक्षामध्ये स्वतंत्र कपाटामध्ये हे साधारण ४६८ ग्रंथ ठेवण्यात आले आहेत. आज कुलगुरू डॉ. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पाटील, श्रीमती देशपांडे यांच्या उपस्थितीत हा लोकार्पणाचा छोटेखानी कार्यक्रम झाला. हा माझ्या आयुष्यातील सर्वाधिक हृद्य व संस्मरणीय प्रसंग असून पतीला दिलेल्या वचनाची पूर्तता केल्याचे समाधान वाटत आहे, अशा भावना सुनंदा देशपांडे यांनी व्यक्त केल्या.

यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प तसेच ग्रंथदेणगी प्रदान प्रसंगीचे छायाचित्र भेट देऊन देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, ज्ञानस्रोत केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. धनंजय सुतार, प्रा. शशिकांत चौधरी, उपग्रंथपाल डॉ. पी.बी. बिलावर, सहायक ग्रंथपाल डॉ. एस.व्ही. थोरात, ए.बी. मातेकर, रविंद्र बचाटे, मदन मस्के, वसुधा वासुदेव लाटकर, स्मिता श्रीपाद देशपांडे, उषा अरविंद भिलवडीकर, अनामिका अनिल पाठक आदी उपस्थित होते.