Wednesday, 31 May 2017

शिवाजी विद्यापीठात उद्यापासून ‘आव्हान-२०१७’ला प्रारंभ




कोल्हापूर, दि. ३१ मे: शिवाजी विद्यापीठात उद्यापासून (गुरूवार, दि. १ जून) आव्हान-२०१७ या दहा दिवसीय राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीरास सुरवात होत असून यात राज्यभरातील १८ विद्यापीठांमधील सुमारे १२२२ राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक सहभागी होणार आहेत, अशी माहिती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, प्रशिक्षण शिबिरास उद्या सकाळी ९ वाजल्यापासून प्रारंभ होत असला तरी औपचारिक उद्घाटन समारंभ शुक्रवार, दि. २ जून रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे. मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यासारख्या आपत्तीच्या वेळी प्राणांची पर्वा न करता दहशतवाद्यांशी दोन हात करणारे कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर शनिवार दि. १० जून रोजी शिबिराचा समारोप होणार असून महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती श्री. चे. विद्यासागर राव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अखेरच्या दिवशी शिबिरार्थींची त्यांच्या प्रशिक्षणावर आधारित रॅलीही शहरातून काढण्यात येणार आहे.
प्रशिक्षण शिबिराच्या आयोजनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून प्रशिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एन.डी.आर.एफ.) चाळीस प्रशिक्षक दाखल झाले असल्याचे सांगून कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, या दहा दिवसांत भूमी व जल यांच्यावर उद्भवणाऱ्या विविध आपत्तींच्या व्यवस्थापनाशी निगडित प्रशिक्षण सहभागी शिबिरार्थींना देण्यात येणार आहे. दि. ९ जून रोजी सकाळी ८.३० ते १२.३० या वेळेत सहभागींची परीक्षा घेण्यात येणार असून त्यामधून उत्कृष्ट विद्यापीठ संघाबरोबरच उत्कृष्ट शिबिरार्थींचीही निवड करण्यात येणार आहे.
आव्हानमध्ये मोठ्या प्रमाणात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणारे शिवाजी विद्यापीठ पहिले यजमान विद्यापीठ ठरले असल्याची माहिती देऊन कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, यावेळी सर्व शिबिरार्थींची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. प्रत्येक सहभागी शिबिरार्थीला बारकोड असणारे ओळखपत्र देण्यात येणार येईल. त्याशिवाय आव्हान-२०१७ नावानेच ॲन्ड्रॉईड ॲप्लीकेशनही तयार करण्यात आले असून त्यावर वेळापत्रक, प्रशिक्षणाचे ठिकाण, निवास व्यवस्था आदी शिबिरार्थींना आवश्यक सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिबीर कालावधीतील घडामोडींची छायाचित्रे वगैरेही यावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याशिवाय, सर्व सहभागींना प्रमाणपत्रेही डिजीटल स्वरुपातच प्रदान करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, डॉ. जे. पी. जाधव, डॉ. सुमेधा साळुंखे, विश्वजीत देसाई आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment