'आव्हान-२०१७'मध्ये राज्यभरातून सहभागी झालेले राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक. |
आपत्काळात बचावकर्त्यांची स्वसुरक्षाही
महत्त्वाची: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे
कोल्हापूर, दि. १
जून: कोणत्याही आपत्तीच्या प्रसंगी आपत्तीत सापडलेल्यांना वाचविणे जितके महत्त्वाचे
तितके त्यांना मदतीसाठी जाणाऱ्यांनी स्वतःची सुरक्षा जपणेही महत्त्वाचे आहे, असे
प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज सकाळी येथे
केले.
महाराष्ट्राचे
राज्यपाल तथा कुलपती यांचे कार्यालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या ‘आव्हान-२०१७’ राज्यस्तरीय आपत्ती
व्यवस्थापन शिबिरास आज सकाळी ठीक नऊ वाजता यजमान शिवाजी विद्यापीठाच्या प्रशस्त
लोककला सभागृहात प्रारंभ झाला. राज्यभरातून आलेल्या राष्ट्रीय येवा योजनेच्या सुमारे
१२०० स्वयंसेवकांच्या प्रचंड उत्साहात पहिल्या दिवशीच्या प्रशिक्षण सत्रास कुलगुरू
डॉ. देवानंद शिंदे यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर प्रभारी
प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, एनडीआरएफचे निरीक्षक
सी.डी. इंगळे, विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम समन्वयक डॉ. डी.के.
गायकवाड उपस्थित होते.
यावेळी
शिबिरार्थींना पुढील दहा दिवसीय शिबिरासाठी शुभेच्छा देऊन कुलगुरू डॉ. शिंदे
म्हणाले, या प्रशिक्षणाअंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांचा विद्यार्थ्यांनी उपयोग
केवळ शिबिरापुरताच न राखता भावी आयुष्यातही त्याचा समाजासाठी उपयोग करावा. प्रशिक्षणाचा
दैनंदिन आढावा घेण्यासाठी सर्व प्रशिक्षण स्थळांना आपण स्वतः भेट देणार असल्याचेही
त्यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रीय
सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी प्राचार्य डॉ. अतुल साळुंखे यांनी या प्रशिक्षण
शिबिरामधून १०० उत्कृष्ट शिबिरार्थी निवडून त्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद
दलाच्या (एन.डी.आर.एफ.) तळेगाव येथील शिबिरात विशेष प्रशिक्षण देण्यात येणार
असल्याची माहिती दिली.
एनडीआरएफचे निरीक्षक
एस.डी. इंगळे यांनी शिबिरार्थींना शिबिराविषयी थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर
विद्यापीठाच्या पाच विविध सभागृहांत प्रशिक्षण कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. या
प्रशिक्षणात एन.डी.आर.एफ.चे मार्गदर्शक योगा, भूमी आपत्ती व्यवस्थापन, जल आपत्ती
व्यवस्थापन, जीवरक्षा, मदत व पुनर्वसन कार्य, मूल्यशिक्षण आदींविषयी मार्गदर्शन करणार
आहेत.
उद्घाटन समारंभ उद्या सायंकाळी
शिबिराचे औपचारिक
उद्घाटन उद्या (दि. २ जून) सायंकाळी ४ वाजता कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस
महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते होणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या
लोककला सभागृहात हा कार्यक्रम होईल.
No comments:
Post a Comment