कोल्हापूर, दि. ९
जून: शिवाजी विद्यापीठात गेल्या १ जूनपासून
सुरू असलेल्या ‘आव्हान-२०१७’ या राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिराच्या
समारोप समारंभाच्या पूर्वसंध्येला शिबिरार्थींनी कोल्हापूर शहरातून मोठ्या जल्लोषात
रॅली काढून नागरिकांत आपत्ती व्यवस्थापनापासून ते लेक वाचवा अभियानापर्यंत विविध
सामाजिक विषयांवर जनजागृती केली. पावसाचा शिडकावा सुरू असतानाही स्वयंसेवकांचा
उत्साह कमी झाला नाही, हे विशेष!
शिवाजी
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद
शिंदे यांच्या हस्ते फ्लॅग-ऑफ करून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू
डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक
महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, अधिष्ठाता डॉ. पी.एस.
पाटील, डॉ. वासंती रासम, डॉ. पी.डी. राऊत, डॉ. ए.एम. गुरव, विद्यार्थी कल्याण संचालक
डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रभारी संचालक डॉ. डी.के. गायकवाड,
क्रीडा अधिविभागप्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड यांच्यासह राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद
दलाचे (एनडीआरएफ) एस.डी. इंगळे यांच्यासह एनडीआरएफचे जवान, एनएसएसचे जिल्हा संपर्क
अधिकारी, विद्यापीठाचे शिक्षक, अधिकारी, सेवक व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
‘आव्हान-२०१७’मध्ये राज्यभरातील चौदा विद्यापीठांतील राष्ट्रीय
सेवा योजनेचे सुमारे १२०० स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. दि. १ जूनपासून गेल्या नऊ
दिवसांत भूमी, जल आदी ठिकाणी उद्भवणाऱ्या विविध आपत्ती आणि त्यांचे व्यवस्थापन,
मदतकार्य, पुनर्वसन आदींविषयी एनडीआरएफच्या जवानांच्या सहकार्याने अत्यंत उत्तम
प्रशिक्षण या स्वयंसेवकांना देण्यात आले आहे. या कालावधीतील संपूर्ण प्रशिक्षणावर
आधारित लेखी, प्रात्यक्षिक व मौखिक परीक्षाही आज सकाळी घेण्यात आली. त्यानंतर आज
सायंकाळी आपत्ती व्यवस्थासह विविध सामाजिक प्रश्नांच्या संदर्भात जगजागृतीपर रॅली
शहरातून काढण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीपासून प्रारंभ
झाल्यानंतर मालती अपार्टमेंट, आईचा पुतळा व सायबरमार्गे ही रॅली पुन्हा
विद्यापीठात प्रविष्ट होऊन तिची सांगता करण्यात आली.
ढोलताशांच्या गजरात
आणि छत्रपती शिवरायांच्या जयघोषात सुरू झालेल्या रॅलीच्या अग्रस्थानी एनडीआरएफचे
आपत्ती व्यवस्थापन सामग्रीने सुसज्ज वाहन होते. त्याबरोबर एनडीआरएफचे जवानही
रॅलीच्या अग्रणी होते. या रॅलीत विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी
ताराराणी, जिजाऊ, तानाजी मालुसरे, संत गाडगेबाबा आदी विविध वेशभूषा केल्या होत्या.
त्याचबरोबर पर्यावरण संरक्षण व संवर्धन, स्त्री-भ्रूण हत्याविरोधी बेटी बचाओ
अभियान, वृक्षसंवर्धन, महिला सन्मान, ग्लोबल वॉर्मिंग, मतदार जागृती, व्यसनमुक्ती,
भ्रष्टाचार, शेतकरी आत्महत्या, लष्करी जवानांचा सन्मान अशा अनेक विषयांबाबत
प्रबोधन करणारे फलक घेऊन स्वयंसेवक रॅलीत सहभागी झाले होते. आपापल्या विद्यापीठ
परिक्षेत्रातील संस्कृतीचे दर्शन घडविणारे कलाविष्कारही काही संघांनी सादर केले. या
रॅलीमुळे ‘आव्हान-२०१७’मधील तरुणाईचा उत्साह आणि जल्लोष अगदी टीपेला पोहोचल्याचे दिसून आले.
राज्यपालांच्या उपस्थितीत उद्या सांगता
या दहा दिवसीय
शिबिराचा समारोप समारंभ उद्या (दि. १० जून) सकाळी १०.३० वाजता महाराष्ट्राचे
राज्यपाल तथा शिवाजी विद्यापीठाचे कुलपती श्री. चे. विद्यासागर राव, पालकमंत्री
चंद्रकांतदादा पाटील, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, महापौर हसिना फरास यांच्या
प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाच्या लोककला केंद्रात होणार आहे. यावेळी कुलपतींच्या
हस्ते उत्कृष्ट स्वयंसेवक, उत्कृष्ट संघ आदी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागाच्या विस्तारित इमारतीचे
भूमीपूजन आणि विद्यापीठाच्या परिसरात साकारलेल्या ‘चॅन्सलर्स कोकोनट गार्डन’चे डिजीटल उद्घाटन
कुलपतींच्या हस्ते होणार आहे.
No comments:
Post a Comment