ढोलताशांच्या निनादात, शिवरायांच्या
जयघोषात विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन
कोल्हापूर, दि. ६
जून: छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ शौर्याचेच नव्हे, तर ज्ञानाचेही प्रतीक आहेत.
म्हणूनच आज जगभर त्यांच्या युद्धनितीचा आणि कुशल व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यास
केला जातो आहे, असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे
यांनी आज सकाळी येथे काढले. शिवाजी विद्यापीठात आज सकाळी शिवराज्याभिषेक
दिनानिमित्त आयोजित विशेष समारंभात विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते बोलत होते.
शिवाजी विद्यापीठात ‘आव्हान-२०१७’ हे राष्ट्रीय सेवा योजनेचे
राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबीर सुरू आहे. आज सकाळी या शिबिरात सहभागी
झालेल्या १२००हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विद्यापीठाच्या
प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती जमून त्यांच्या स्मृतींना
अभिवादन केले. या विद्यार्थ्यांच्या मुखातून होणारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या
जयघोषाचा अखंड गजर आणि ढोलताशांचा निनाद यांच्या तालावर शिवाजी विद्यापीठात
शिवराज्याभिषेक दिनाची आजची सकाळ शिवमय होऊन गेली. शिवरायांच्या नामाचा गजर
करताना शिबिरार्थींचा उत्साह ओसंडून वाहात होता.
शिबिरार्थींनी
अत्यंत अनोख्या पद्धतीने शिवरायांना अभिवादन केले. राज्याच्या १४ विद्यापीठांतून
आलेल्या या विद्यार्थ्यांची पन्हाळा, भिवगड, कन्हेरगड, रायगड आणि देवगिरी पाच
गटांत विभागणी केली आहे. त्यांना अनुक्रमे भगवा, पांढरा, हिरवा, आकाशी आणि गडद
निळा असे पाच रंगांचे गणवेश देण्यात आले आहेत. यापैकी पांढऱ्या गणवेशातील
विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या पुतळ्याभोवती गोल कडे केले आणि इतर संघांनी पुतळ्याच्या
बागेभोवती गोल कडे करीत रंगीबेरंगी स्वस्तिक साकारले.
यावेळी कुलगुरू डॉ.
देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ.डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर,
प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के.
गायकवाड, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड, अधिष्ठाता डॉ. पी.एस.
पाटील, डॉ. पी.डी. राऊत, डॉ. ए.एम. गुरव, एनडीआरएफचे निरीक्षक एस.डी. इंगळे, डॉ.
डी.आर. मोरे, श्रीमती नागरबाई शिंदे, सौ. अनिता शिंदे आदींनी शिवपुतळ्यास अभिवादन
केले.
या प्रसंगी
राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक अक्षय चव्हाण व तेजस घुलघुले यांनी केलेल्या
शिवगर्जनेने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. नागपूरच्या राष्ट्रसंत
तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या जोसेस वढाई या विद्यार्थ्याने प्रेरणादायी शिवगीत
सादर केले. यामुळे उपस्थित तरुणाईच्या उत्साहात आणखीच चैतन्यदायी भर पडली. त्याच
उत्साहात सर्व मान्यवर ढोलताशाच्या गजरात विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय
इमारतीसमोरील प्रांगणात जमले. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या संबोधनाने
कार्यक्रमाची सांगता झाली.
No comments:
Post a Comment