Saturday, 17 June 2017

ज्ञानसंस्कार वृद्धीसाठी शिष्यवृत्ती प्रोत्साहनाचे माध्यम: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने डीकेटीई इचलकरंजी येथे झालेल्या शिष्यवृत्ती गुणगौरव समारंभात शिष्यवृत्ती प्राप्त महाविद्यालयातील प्राचार्यांच्या सत्कार प्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद बी. शिंदे, डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे, शिवाजी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, सचिव डॉ. सौ. सपना आवाडे यांच्यासमवेत उपस्थित महाविद्यालयांचे प्राचार्य.

शिवाजी विद्यापीठाचा गुणवत्ता शिष्यवृत्ती गुणगौरव समारंभ डीकेटीईमध्ये उत्साहात

कोल्हापूर, दि. १७ जून: ज्ञानसंस्कार वृद्धीसाठी शिष्यवृत्ती हे प्रोत्साहनाचे महत्त्वाचे माध्यम आहे. या शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये विद्यार्थ्यांना सहकार्य व प्रेरित करणे आणि आत्मविश्वास वाढविणे हा उद्देश आहे तसेच येत्या काळात महाविद्यालयातील संशोधनात्मक कार्य पाहून 'रिसर्च परफॉर्मिग कॉलेज' म्हणून महाविद्यालयांचा गौरव करण्याचा मानस आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज केले. इचलकरंजी येथील डीकेटीई महाविद्यालयात झालेल्या शिष्यवृत्ती गुणगौरव समारंभात ते बोलत होते.
शिवाजी विद्यापीठ आणि डीकेटीईचे टेक्स्टाईल ॲण्ड इंजिनिअरींग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने डीकेटीईच्या ऐतिहासिक दरबार हॉलमध्ये शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती गुणगौरव समारंभ (शैक्षणिक वर्ष २०१६-१७) गटनिहाय गुणवत्ताप्राप्त महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या सत्कार समारंभ आज सकाळी संपन्न झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे प्रमुख उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, गेली १९ वर्षे शिवाजी विद्यापीठाने विद्यापीठातील जे विद्यार्थी अभ्यासक्रमामध्ये पहिल्या, दुसऱ्या व अंतिम वर्षाच्या परीक्षांमध्ये विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत येतात त्यांच्यासाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती सुरू केली आहे. अधिकाधिक गुणवत्ताधारक विद्यार्थी तयार व्हावेत, हा हेतू यामागे आहे. या योजनेअंतर्गत शहरी, निमशहरी व ग्रामीण गटातून सर्वाधिक विद्यार्थ्यांनी गुणवत्ता शिष्यवृत्ती संपादन केलेली आहे, अशा महाविद्यालयाच्या प्राचार्यांचा सत्कार करण्यामागे गुणवत्ता वर्धित करण्याचा मुख्य हेतू आहे.
या कार्यक्रमात कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, शिक्षण शास्त्र व विधी विद्याशाखांच्या प्राचार्यांचा सत्कार करण्यात आला. डीकेटीईचे संचालक प्रा. डॉ. पी.व्ही. कडोले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कल्लाप्पाणा आवाडे यांनी डीकेटीईची स्थापना व वस्त्रोद्योगाच्या प्रगतीचा इतिहास सांगितला.
संस्थेचे डायरेक्टर प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, डेप्युटी डायरेक्टर ॲडमिनिस्ट्रेशन प्रा. डॉ. यु. जे. पाटील, डेप्युटी डायरेक्टर शैक्षणिक प्रा. डॉ. सौ. एल. एस. आडमुठे यांनी स्विकारला.
कार्यक्रमामध्ये डीकेटीईचे प्रशाकीय उपसंचालक डॉ. यु.जे. पाटील, शैक्षणिक उपसंचालक डॉ. सौ. एल.एस. आडमुठे, शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जयदीप बागी, घाळी कॉलेजचे प्राचार्य एम. आर. पाटील, तासगाव कॉलेजचे प्राचार्य आर. आर. कुंभार, विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. होणगेकर, एएससी कॉलेज, पलूसचे प्राचार्य डॉ. बी. एन. पवार यांनी मनोगत व्यक्त केले. गुणगौरव समारंभ डीकेटीईच्या एतिहासिक दरबार हॉलमध्ये संपन्न झालेबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले. डॉ. यु. जे. पाटील यांनी आभार मानले.
सदर कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, डीकेटीईच्या मानद सचिव डॉ. सौ. सपना आवाडे यांच्यासह विभागप्रमुख व शिक्षक उपस्थित होते. प्रा. एस. जी. कानिटकर यांनी सूत्रसंचालन केले.


No comments:

Post a Comment