‘चॅन्सलर्स कोकोनट गार्डन’चे उद्घाटन व रसायनशास्त्र अधिविभाग
विस्तारित इमारतीचेही होणार भूमीपूजन
Hon'ble Chancellor Shri. Ch. Vidyasagar Rao |
कोल्हापूर, दि. ८
जून: महाराष्ट्राचे राज्यपाल तथा शिवाजी विद्यापीठाचे कुलपती श्री. चे. विद्यासागर
राव येत्या शनिवारी (दि. १० जून) शिवाजी विद्यापीठात येत आहेत. विद्यापीठात सुरू
असलेल्या ‘आव्हान-२०१७’ या राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराचा समारोप समारंभ मा. कुलपती यांच्या प्रमुख
उपस्थितीत होणार आहे.
यावेळी शिवाजी
विद्यापीठाच्या परिसरात साकारण्यात येत असलेल्या ‘चॅन्सलर्स कोकोनट गार्डन’चे उद्घाटन आणि
रसायनशास्त्र अधिविभागाच्या विस्तारित इमारतीचे भूमीपूजन मा. कुलपती श्री. राव
यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री
ना.श्री. चंद्रकांतदादा पाटील, महापौर सौ. हसिना फरास, जिल्हाधिकारी श्री. अविनाश
सुभेदार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. विद्यापीठाच्या लोककला केंद्रात शनिवारी
सकाळी १०.३० वाजता हा समारंभ होणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.
विलास नांदवडेकर यांनी दिली आहे.
शिवाजी विद्यापीठात कुलगुरू
डॉ. देवानंद शिंदे आणि प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली दि.
१ जूनपासून ‘आव्हान-२०१७’ हे राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर राष्ट्रीय
आपत्ती प्रतिसाद दल (एन.डी.आर.एफ.) यांच्या सहकार्याने सुरू आहे. या दहा दिवसीय
प्रशिक्षण शिबिराचा समारोप १० जून रोजी मा. कुलपती श्री. राव यांच्या प्रमुख
उपस्थितीत होईल. ‘आव्हान’ हा उपक्रम मा. कुलपती कार्यालयाचा असून तो सन २००७पासून
दरवर्षी राबविण्यात येतो. पहिल्या ‘आव्हान’ शिबीराचे यजमानपद शिवाजी विद्यापीठाने भूषविले होते.
त्याचप्रमाणे यंदाच्या शिबिराचे यजमानपद भूषविण्याचा मानही शिवाजी विद्यापीठास
प्राप्त झाला आहे. या शिबिरात सहभागी शिबिरार्थींना ‘चॅन्सलर्स ब्रिगेड’ असे सन्मानपूर्वक संबोधले
जाते. या ब्रिगेडचा सन्मान आणि अभिनंदन सोहळा मा. कुलपती यांच्या उपस्थितीत साजरा
होण्याला त्यामुळे विशेष महत्त्व आहे.
विद्यापीठाने संगीत
अधिविभागाच्या पाठीमागील विहीरीच्या परिसरात नारळ उद्यान विकसित करण्याचा उपक्रम
हाती घेतला आहे. तिचे ‘चॅन्सलर्स कोकोनट गार्डन’ असे नामकरण करण्यात आले आहे. मा. कुलपती श्री.
राव यांच्या हस्ते या उद्यानाचे डिजीटल उद्घाटन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे
विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी रसायनशास्त्र अधिविभागाच्या विस्तारित इमारतीचे
भूमीपूजनही मा. कुलपती यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहितीही कुलसचिव डॉ.
नांदवडेकर यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment