Monday, 5 June 2017

विद्यापीठात पर्यावरण दिनानिमित्त पक्ष्यांसाठी घरटी






कोल्हापूर, दि. ५ जून: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात आज कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह अधिकारी व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्याचप्रमाणे द कॉन्झर्वेशन फाऊंडेशन ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने विद्यापीठास पक्ष्यांसाठी घरटी व धान्य प्रदान केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विद्यापीठाचे द्वार क्रमांक एक व दोन दरम्यानच्या परिसरात कुलगुरू डॉ. शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सुमारे तीस रोपे या वेळी लावण्यात आली. याच ठिकाणी द कॉन्झर्वेशन फाऊंडेशनच्या वतीने अध्यक्ष आशिष घेवडे यांनी परिसरातील पक्ष्यांसाठी साठ घरटी आणि धान्य कुलगुरू डॉ. शिंदे यांच्याकडे सोपविली. संस्थेच्या या अभिनव उपक्रमाचे कुलगुरू डॉ. शिंदे यांनी कौतुक केले आणि पर्यावरणातील अत्यंत महत्त्वाच्या घटकाच्या संरक्षणासाठी उचललेले पाऊल महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
यावेळी कुलगुरूंच्या हस्ते एक घरटे झाडावर लटकावण्यात आले. त्यानंतर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठाच्या परिसरात ठिकठिकाणी ही घरटी त्यात धान्य ठेवून झाडांवर बसविली.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, डॉ. गिरीष कुलकर्णी, एनएसएस समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड, यांच्यासह विश्वजीत सावंत, धैर्यशील पवार, मनिष घेवडे, शार्दुल गरगटे, यतीश शहा, आमीर शेख, आकाश गोगले, मितेष घेवडे, विशाल पाटील, रुची पेंडूरकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment