Monday 5 June 2017

‘आव्हान’ जोमात; कुलगुरूंचाही सहभाग!













कोल्हापूर, दि. ५ जून: शिवाजी विद्यापीठात १ जूनपासून सुरू झालेले आव्हान-२०१७ हे राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबीर अत्यंत जोमाने सुरू आहे. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनीही काल दिवसभर या शिबिरातील विविध सत्रांत तसेच प्रात्यक्षिकांतही सहभाग घेतला.
या शिबिरांतर्गत सहभागी शिबिरार्थींना जल, भूमी व वायू यांच्या संदर्भातील कोणत्याही प्रकारची आपत्ती उद्भवली असता घ्यावयाची दक्षता आणि मदतकार्य याविषयी एनडीआरएफची टीम सकाळी सात वाजल्यापासूनच प्रशिक्षण देत आहे. जलविषयक आपत्ती व्यवस्थापनाविषयी राजाराम तलाव येथे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात येत आहे. उपलब्ध साहित्याचा वापर करून बचावकार्य कसे सुरक्षितरित्या पार पाडावे, तराफे कसे तयार करावेत, प्लास्टीक डबे, कॅन, बाटल्या, दोरांच्या सहाय्याने तात्पुरती जीवरक्षणाची सुविधा कशी उभारावी, या सर्वांचा या प्रशिक्षणात समावेश आहे. त्याचप्रमाणे पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला शास्त्रशुद्ध पद्धतीने तसे वाचवावे, लाँचमधून मदतकार्य कसे पार पाडावे, याविषयी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात येत आहे.
मोठमोठ्या इमारतींमध्ये आपत्तीत अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्याचे प्रशिक्षण दूरशिक्षण केंद्र इमारतीमध्ये देण्यात येत आहे. दोरखंडांच्या सहाय्याने एनडीआरएफचे जवान चित्तथरारक पद्धतीने इमारतींच्या भिंतीवर प्रात्यक्षिके सादर करून मुलांना मार्गदर्शन करीत आहेतच, शिवाय, सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनीही न घाबरता या प्रात्यक्षिकांत सहभागी होत आहेत. तात्पुरता रोप-वे अल्पावधीत तयार करून इमारतीत अडकलेल्या व्यक्तींची निर्धोक पद्धतीने जलदरित्या कशी सुटका करावी, याचेही प्रशिक्षण शिबिरार्थींना दिले जात आहे.

कुलगुरूंनी गिरवले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे




दहा दिवसांच्या आव्हान शिबिरातील प्रत्येक घडामोडीवर आपण बारकाईने लक्ष ठेवून राहू, असे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आपल्या उद्घाटनाच्या भाषणातच सांगून ठेवले होते. मात्र, कालच्या रविवारी थोडी उसंत मिळताच तिचा उपयोग कुलगुरू डॉ. शिंदे यांनी संपूर्ण दिवस शिबिरार्थी विद्यार्थ्यांसमवेत आपत्ती व्यवस्थापनाचे धडे गिरवण्यात घालविला. आपत्ती व्यवस्थापन ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी असून एकमेकांच्या मदतीला धावून जात असताना शास्त्रशुद्ध माहिती व सुविधांनी आपण सुसज्ज असले पाहिजे, या दृष्टीने कुलगुरू डॉ. शिंदे यांनी रविवारची सकाळ राजाराम तलावावर जल आपत्ती व्यवस्थापनाविषयी जाणून घेण्यात घालविला, तर सायंकाळी त्यांनी इमारतींवरून आपद्ग्रस्तांची सुटका कशी करावी, हे सुद्धा जाणून घेतले. एनडीआरएफचे निरीक्षक श्री. एस.डी. इंगळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांनी विविध शंका विचारून त्यांचे निरसन करून घेतले. तात्पुरत्या रोप-वेच्या सहाय्याने दूरशिक्षण केंद्राच्या छतावरुन ते थेट जमिनीच्या दिशेने झेपावले, तेव्हा त्यांच्या जिद्दी, जिज्ञासू आणि धाडसी वृत्तीची खात्रीच उपस्थित विद्यार्थ्यांना पटली. थेट कुलगुरूच आपल्यासमवेत प्रशिक्षणात सहभागी झाल्याचे पाहून शिबिरार्थींचाही उत्साह द्विगुणित झाल्याचे दिसून येत होते. यावेळी एनएसएसचे समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, डॉ. एन.पी. सोनजे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment