Saturday 10 June 2017

आपत्ती व्यवस्थापनविषयक जागृतीसाठी स्वयंसेवकांनी प्रशिक्षणाचा वापर करावा: मंत्री चंद्रकांतदादा पाटील




Minister Chandrakandada Patil speaking at 'Avhan-2017' Concluding ceremony

NSS Team from Satara district

NSS Team from Pune District

'आव्हान-२०१७' राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिराचा समारोप
Minister Shri. Chandrakantdada patil
कोल्हापूर, दि. १० जून: ‘आव्हान प्रशिक्षणांतर्गत प्रशिक्षित झालेल्या युवकांनी आपापल्या जिल्ह्यांतील गावागावांतून, शाळा-महाविद्यालयांतून आपत्ती व्यवस्थापनविषयक जागृतीसाठी कार्यरत राहावे, असे आवाहन राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठात गेल्या १ जूनपासून सुरू असलेल्या आव्हान-२०१७ या राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराच्या समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, महापौर सौ. हसिना फरास, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत चौधरी, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी प्राचार्य डॉ. अतुल साळुंखे, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) निरीक्षक एस.डी. इंगळे उपस्थित होते.
यावेळी मंत्री श्री. पाटील म्हणाले, दुर्घटना होऊ नये, यासाठी दक्षता बाळगणे हा आपत्ती व्यवस्थापनाचा महत्त्वाचा भाग आहेच, पण त्याच्या इतकेच आपत्तीच्या क्षणी आपद्ग्रस्तांना मदत करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ असणे हेही महत्त्वाचे आहे. आव्हान हा मा. कुलपती कार्यालयाचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. या चॅन्सलर्स ब्रिगेडच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला आता आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रशिक्षणाचा उपयोग आपल्या परिसरातील अन्य युवकांना करून द्यायला हवा, जेणे करून त्यांनाही आपत्तीच्या प्रसंगी कशा प्रकारे निर्णय घ्यावेत किंवा आपद्ग्रस्तांना सुरक्षितपणे कशी मदत करता येईल, याची माहिती होईल. यावेळी मंत्री श्री. पाटील यांनी आपल्या कारकीर्दीतील गतवर्षी रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटना आणि त्यानंतरच्या कालखंडातील बचाव व मदत कार्य, माळीण दुर्घटनेनंतर झालेले गावाच्या पुनर्वसनाचे कार्य तसेच ठाणे येथील इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतून पाच शालेय विद्यार्थ्यांना २४ तासांनंतरही वाचविण्यात आलेले यश असे प्रसंग सांगून आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व शिबिरार्थींना सांगितले. देशाच्या आपत्ती व्यवस्थापनात अत्यंत मोलाचे योगदान देणाऱ्या एन.डी.आर.एफ.च्या जवानांचीही त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली.
Shri. Avinash Subhedar
जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी विद्यार्थ्यांना जिल्हा पातळीवरील आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने माहिती दिली. ते म्हणाले, आपत्ती व्यवस्थापनात तत्काळ मदत (Rescue), त्यानंतर निवारा व अन्य मदत (Relief) आणि त्यानंतर पुनर्वसन (Rehabilitation) हे तीन घटक महत्त्वाचे असतात. यापैकी पहिल्या तत्काळ मदतीच्या प्रसंगी आव्हानसारख्या शिबिरांतून देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाचा मोठा वाटा आहे. कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनांतर्गत १२९ गावांत पूरस्थिती येण्याची शक्यता लक्षात घेऊन तेथील स्थानिक २५ ते ५० वयोगटातील नागरिकांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आहे. त्यापैकी ५० गावांतील नागरिकांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले.
Vice Chancellor Dr. Devanand Shinde
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आपल्या भाषणात आपत्तीप्रसंगी विद्यापीठ परिक्षेत्रात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून देण्यात येत असलेल्या योगदानाविषयी माहिती दिली. विद्यापीठ एनएसएसच्या माध्यमातून एक व्यक्ती, एक पेंडी, एक मूठ धान्य असे उपक्रम राबवून गतवर्षी दुष्काळग्रस्त भागातील नागरिक व जनावरे यांना दिलासा देण्याचे काम करण्यात आले. त्याचप्रमाणे शेततळी, छोटे बंधारे यांच्या बांधकामात श्रमदानातून योगदान देत असल्याचेही सांगितले.
या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागाच्या माध्यमविद्या या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. काल शहरातून काढण्यात आलेल्या जागृती फेरीदरम्यान सोलापूर विद्यापीठाची स्वयंसेवक विद्या कदम हिने आपत्ती निधी गोळा केला. कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र वडजे यांनी तो जिल्हाधिकारी श्री. सुभेदार यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आव्हान-२०१७मधील विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी मा. राज्यपाल तथा कुलपती श्री. चे. विद्यासागर राव यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन केले. डॉ. डी.के. गायकवाड यांनी आव्हान-२०१७चे अहवाल वाचन केले. डॉ. तृप्ती करेकट्टी आणि नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.
राष्ट्राला मदतीसाठी तत्पर असावे
महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती हे काही अपरिहार्य कारणामुळे आजच्या समारोप समारंभाला उपस्थित राहू शकले नाही. तथापि, त्यांनी शिबिरार्थींना विशेष शुभसंदेश पाठवून प्रोत्साहित केले. या शिबिराचे यजमानपद यशस्वीरित्या भूषविल्याबद्दल शिवाजी विद्यापीठाचे सुरवातीलाच अभिनंदन केले आहे, तसेच, चॅन्सलर्स ब्रिगेडच्या भेटीसाठी उपस्थित राहू न शकल्याची खंतही व्यक्त केली आहे. त्यात आव्हान आणि एकूणच राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्राला जेव्हाही कधी त्यांच्या सेवेची गरज भासेल, तेव्हा ती बजावण्यासाठी तत्पर असावे. असे आवाहन त्यांनी केले आहे.
पुणे व सातारा जिल्हा सर्वोत्कृष्ट
आव्हान-२०१७मध्ये प्रशिक्षणात पुणे व सातारा जिल्ह्याचे संघ अनुक्रमे सर्वोत्कृष्ट ठरले. त्यांना बेस्ट कॉन्टिन्जेन्ट फिरता चषक प्रदान करण्यात आला. बेस्ट कॉन्टिन्जेन्ट लीडरसाठीचा फिरता चषक नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे प्रा. अतुल अकोठोर आणि पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रा. सारिका पेरणे यांना देण्यात आला. बेस्ट एनएसएस व्हॉलंटिअरसाठीचा फिरता चषक चौघांना देण्यात आला. यामध्ये महेश गणेश बन (महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक), कुणाल मानकर (उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव), हर्षा सुनिल भट्ट (महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक) आणि सामिका सावंत (बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, दापोली) यांचा समावेश आहे. जनजागृती फेरीमधील सर्वोत्कृष्ट सहभागासाठीचा फिरता चषक मुंबई विद्यापीठाने पटकावला.

2 comments: