शिवाजी विद्यापीठाच्या भाषा भवन तलाव परिसरात आढळलेला रुडी शेलडक |
Dr. S.M. Gaikwad |
प्राणीशास्त्र
अधिविभागातील प्राध्यापक डॉ. सुनिल एम. गायकवाड विद्यापीठ परिसरातील पृष्ठवंशीय
प्राण्यांवर काम करीत आहेत. ‘रुडी शेलडक’ हा स्थलांतरित पक्षी त्यांना सर्वप्रथम ७ मार्च २०२० रोजी वि.स.
खांडेकर भाषा भवनच्या पिछाडीस असलेल्या तलावामध्ये आढळला. ह्या पक्षाची नोंद करून त्यांनी
त्याची छायाचित्रे घेतली आहेत. यावरून शिवाजी विद्यापीठ परिसर व या परिसरातील पाणवठे
जैवविविधतेसाठी अत्यंत पोषक असून शिवाजी विद्यापीठ जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन
करण्याच्या कामी योगदान देत असल्याचे अधोरेखित होते.
डॉ. सुनिल
गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात सुमारे ३५० हून अधिक स्थलांतरित
पक्षांच्या प्रजातींची नोंद होत असल्याची माहिती मिळते. परंतु, पाणथळ जागांच्या प्रदूषणासह विविध कारणांमुळे या पक्ष्यांच्या प्रजाती कमी होत चालल्या
आहेत. त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी पाणथळ जागांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. भारतातील
अनेक स्थलांतरित पक्षांपैकी ‘रुडी शेलडक’ (टॅडोर्ना फेरुजीनिया) असून त्याला
भारतात ‘ब्राह्मणी बदक’ म्हणूनही ओळखतात. या विशिष्ट पक्ष्याची लांबी २३ ते २८ इंच इतकी व वजन सव्वा किलो
इतके असते. याचे डोके फिकट गुलाबी असून पिसे नारंगी-तपकिरी रंगाची तर शेपटीकडील पिसे काळी असतात. हा असा प्रवासी पक्षी आहे, जो भारतीय उपखंडात हिवाळ्यात आगमन करतो आणि एप्रिलमध्ये परत जातो. हा
सुमारे २६०० कि.मी. इतका प्रवास करू शकतो आणि जवळपास ६०००
मीटर इतक्या उंचीवर पोहचू शकतो. जम्मू-काश्मीरमधील अति उंचीवरील तलावात आणि दलदलीमध्ये ते प्रजनन करतात. जगामध्ये याचा आढळ उत्तर-पश्चिम आफ्रिका, इथिओपिया, दक्षिण-पूर्व युरोप ते मध्य-आशिया
ओलांडून दक्षिण-पूर्व चीनपर्यंत व दक्षिण आशियामध्ये आहे. बौद्ध लोक या पक्षास पवित्र
मानतात. त्यामुळे मध्य व पूर्व आशियामध्ये या पक्ष्यांना काही प्रमाणात संरक्षण मिळते,
जिथे यांची संख्या स्थिर किंवा वाढत असल्याचे मानले जाते. हा बदक मुख्यत: तलाव, जलाशय आणि नद्यांसारख्या पाणथळ जागी राहतो.
स्थलांतरित पक्षी
दिनाच्या संदर्भात माहिती देताना डॉ. गायकवाड म्हणाले, दरवर्षी ९ मे हा दिवस
जागतिक स्थलांतरित पक्षी दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. सन २०२० च्या जागतिक स्थलांतरित पक्षी दिनाचा विषय ‘बर्ड्स कनेक्ट अवर वर्ल्ड’ असा आहे. यामध्ये जगभरातील स्थलांतरित पक्ष्यांचे मार्ग शोधण्यासाठी
वापरल्या जाणाऱ्या ट्रॅकिंग तंत्रज्ञानाचा संबंधित पक्ष्यांच्या संवर्धनासाठी अधिक प्रभावीपणे कसा उपयोग करता येईल, यावर जगभरातील पक्षीतज्ज्ञांनी लक्ष केंद्रित केले आहे.
No comments:
Post a Comment